मुंबई कोणाची आहे?

मुंबई कोणाची आहे?

कंगना राणावत हिच्या चिथावणीखोर विधानांना शिवसेनेने दिलेली तीव्र प्रतिक्रिया, म्हणजे प्राधान्यक्रम चुकल्याचे दिसत आहे.

भाजप नेत्याच्या फार्महाऊसमधून सहा अल्पवयीनांची सुटका
कर्नाटकात आमदाराचे मंत्रीपद न्यायालयाने रोखले
संजय राऊत, एकनाथ खडसेंचे सलग ६० दिवस फोन टॅप

महाराष्ट्राचे राजकारणी आणि कंगणा राणावत हे एकमेकांसाठीच बनल्यासारखे आहेत. कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि कोणावर ना कोणावर हल्ला करण्यासाठी सतत काहीबाही बोलत आहे.

सतत खोटा मुखवटा घेऊन वावरणारी घाबरट फिल्मी दुनिया सहसा सार्वजनिकरित्या कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. ते जेंव्हा राजकरण्यांवर हल्ला करतात, तेंव्हा ते अस्वस्थ होऊन स्वतःच्याच जाळ्यात फसतात आणि रागाने फणफणत असतात. कंगना सतत भडकवणारी आणि खाजगी स्वरूपाची वक्तव्यं करीत असल्याने राजकारणीही खुष आहेत.

या सगळ्यात आपली सर्कस चालू ठेवण्यासाठी आणि प्रेक्षकांना खुष ठेवण्यासाठी, सतत तमाशा शोधणारा टेलिव्हिजन मिडीया आरडा-ओरडा अजून वाढवत असतो.

लाखो-करोडो बेसहारा, पगार, नोकऱ्या आणि प्राणघातक अजारांनी चिंतित वगळता बाकी लोकही खुष आहेत, कारण प्रत्येकाची चारही बोटे तुपात आहेत.

‘मुंबई पाकव्याप्त काश्मीर’सारखी झाल्याचे राणावतचे वक्तव्य अतिशय निरर्थक आणि अनावश्यक होते, ज्याचा कशाशीच काही संबंध नव्हता. मुंबई कोणाच्या ताब्यात आहे? पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबईमध्ये काय समानता आहे? पण हा एक असा मुद्दा होता, की शिवसेना भडकली आणि त्यांनी कंगनाला. मुंबई चांगली वाटत नसेल, तर निघून जा, असे सांगितले.

एका जमान्यातील नवोदित अभिनेत्याने कंगनावर लावलेल्या ड्रगच्या आरोपांची चौकशी केली जाईल, असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले. कॉँग्रेसही यामध्ये मागे राहिली नाही. त्यांनी विधानसभेमध्ये हक्क भंगाचा प्रस्ताव मांडला. कंगनाने केवळ मुंबईचाच नव्हे, तर मुंबई महाराष्ट्रात राहावी, म्हणून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात (1950) त्याग केलेल्यांचाही अपमान केल्याचा मुद्दा कॉँग्रेसने मांडला. मात्र तिने अपमान कसा केला, हे सांगितले नाही.

दरम्यान शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग पाडला. तिची याचिका त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती आणि त्यावर सुनावणी सुरू होती. ज्यामध्ये महापालिकेच्या कारवाईवर स्थगिती मिळाली. महापालिकेकडून या पद्धतीची कार्यक्षमता दशकांमध्ये दिसली नव्हती. मुंबईचा अपमान केल्याबद्दलचा हा सूड होता.

भाजपच्या सांगण्यानुसार कंगना हे करीत असल्याचे आणि तिला भाजपचा पाठींबा असल्याचे  महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या तीनही पक्षांचे म्हणणे आहे. परिस्थितीजन्य पुरावे पाहता हे खरे वाटते, कारण माजी मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंगनाचा बचाव केला असून, महापालिकेची कारवाई सूडाच्या भावनेने केलेली भ्याड कृती म्हंटले आहे.

केंद्र सरकारने कंगनाला ‘वाय’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली. जी स्वच्छ राजकीय कृती असून, महाराष्ट्रामध्ये तिला धोका असल्याचे सूचित करते. भाजपचे इतर लोकही तिच्यामागे उभे राहिले आहेत.

गेल्यावर्षी सत्ता हातातून गेल्यापासून भाजप स्वतःला सावरू शकलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना अस्थिर करून राज्यातील सरकार पाडणे, हा या सगळ्यामागचा हेतु असल्याचे सेना-राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीच्या नेत्यांना वाटते.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या विरोधात व्हॉटसपवर प्रपोगंडा सुरू आहे. त्यामध्ये तरुण नेते आदित्य यांचा सुशांत सिंग यांच्या आत्महत्येमध्ये संबंध असल्याचे सांगितले जात आहे.राणावत हिनेही ड्रग प्रकरणात अटक झालेल्या ‘रिया चक्रवर्तीच्या मागे असणारे लोक’, असे म्हणत इशारा केला आहे. सेनेच्या भितीमागचे हे कारण असू असू शकते.

पण राणावत भाड्याने आणलेली बंदूक नाही. तिला द्वेष आणि आपमानजनक शब्दांच्या फैरी झाडायला आवडतात आणि त्यातून तिला आनंद मिळतो आणि त्यासाठी तिला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही.

तिने करण जोहरच्या शोमध्ये जेंव्हा घराणे(नेपोटीझम)शाहीचा मुद्दा काढून त्याच्यावर टीका केली तेंव्हा तिची वाहवा झाली आणि तिच्याकडे आदराने पाहीले गेले. बॉलीवूडमधील माफियांच्या विरोधात लढणारी एकटी, अशी स्वतःची प्रतिमा तिने तयार केली. नेहमीच अशा प्रतिमेच्या शोधात असणाऱ्या उदारमतवाद्यांची तिला प्रशंसाही मिळाली.

राणावतने काही चांगले चित्रपट करून आपली प्रतिभा सिद्ध केली, पण तिचा राजकीय कल लवकरच स्पष्ट झाला. राष्ट्रवादाला घेऊन तिने केलेले ट्विट, पाकिस्तानातील एका कार्यक्रमाचे निमंत्रण स्विकारण्यावरून शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्यावर केलेली टीका. अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचे तोंड काळे करून त्यांची गाढवावर बसवून धिंड काढली पाहीजे, अशी तिची वक्तव्ये पाहता, तिची राजकीय मते स्पष्ट होतात.

भागव्या रंगात रंगलेल्या तिच्या ‘झांसी की रानी’ चित्रपटाततील राणी गायींच्या प्रती ममत्व असणारी दाखविण्यात आली आहे. यावरून स्पष्ट संकेत होता, की कंगना कुठे उभी आहे. ती भाजपसाठी पूर्णपणे उपयोगी होती. पण हे सगळे भाजप दृष्टीपथात नसताना, कंगना स्वतःची प्रतिमा घडवत होती, जी पुढे लाभदायक ठरेल, हे तिला माहीत होते.

भाजपला ती उपयुक्त वाटू शकते आणि तिलाही त्यामध्ये आनंद वाटू शकतो. शिवसेनेला उचकवण्यासाठीच्या भाजपच्या खेळातील ती मोहराही असू शकते, पण शिवसेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जहाल प्रतिक्रियाही अनावश्यक आहे. तीच्या बोलण्याला ते सहज दूर्लक्षीत करू शकले असते. कंगनाला गरज असलेली प्रसिद्धी आणि विश्वासार्हता देणे ते टाळू शकले असते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख आणि कुशल राजकारणी शरद पवार यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असेच करायला सांगितल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेसाठी या कथित अपमानाचे उत्तर देणे राजकीय अपरिहार्यता होती. कारण सेनेने आपली प्रतिमा मराठी माणूस आणि मुंबईची रक्षणकर्ती अशी तयार केली आहे. त्यामुळे शहराच्या सन्मानासाठी आपण उभे आहोत, हे दाखवणे त्याना गरजेचे होते. शिवसेनेसाठी आक्रमक आणि गरज भासल्यास ‘सेना स्टाइल’ हिंसक होणे आवश्यक होते.

सत्तेत असल्याने आणि एका नवीन पद्धतीने पक्षाची प्रतिमा तयार होत असताना, तोंडाला काळे फासण्यासारख्या गोष्टी ते करू शकत नाहीत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्याऐवजी सेनेने शाब्दिक हल्ले आणि कंगनाच्या कार्यालयावर बुलडोझर पाठवले. सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी कंगनाच्या छायाचित्राला कोल्हापुरी चपलेने फटके दिले. याच्यामुळे सेनेचे समाधान झाले नसले, तरी तसे त्याना करायला हवे होते.

पण आततायी प्रतिक्रिया एक मोठा प्रश्न निर्माण करते. मुंबईच्या सन्मानासाठी उभे राहणे नेहमीच स्वागतार्ह आहे, पण सेना शहराची रक्षणकर्ती आहे, असे म्हणणे अडचणीचे आहे. तसेच शहराचा ‘अपमान’ या कल्पनेवरही चर्चा व्हायला हवी. कंगनाने जे म्हंटले, तो नेमका कसा अपमान आहे आणि त्यासाठी तिला वेगवेगळ्या पद्धतीने त्याची किंमत कशी चुकवावी लागत आहे.

रस्त्यावरचे खड्डे, प्रत्येक पावसाळ्यात भरणारे पाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दुर्दशा आणि अशा अनेक समस्या आणि शहराच्या ढासळलेल्या पायाभूत सुविधांबाबत मुंबईचे रहिवासी, दररोज तक्रारी करीत आहेत.

बृन्मुंबई महापालिकेचा उल्लेख लोक अनेक आकार्यक्षमतांबद्दल करतात. वास्तवात महापालिका कर्मचारी खूप कष्ट करतात आणि महापालिकेच्या काही विभागांमध्ये खूप हुशार माणसे आहेत. पण सामान्य माणसासाठी रस्त्यावर दिसणारे खड्डे, वाईट व्यवस्थापन आणि प्रशासनाची ग्वाही देतात. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात गेल्या २५ वर्षांपासून असून, त्यांना आता कोणताही बचाव करता येणार नाही.

परंतु प्रत्येक वेळी जेव्हा एखादा हाय प्रोफाईल बीएमसीवर टीका करतो, तेव्हा प्रत्येक वेळी त्याला त्रास होतो. कपिल शर्माने एकदा ट्वीट केले होते, की त्याला ५ लाख रुपयांची लाच मागितली होती, त्याच्या मालमत्तेचा काही भाग तोडण्यात आला. पावसात मुंबईच्या खड्ड्यांमुळे भयानक झालेल्या  प्रवासाविषयी गाणे म्हणलेल्या लोकप्रिय रेडिओ जॉकी मल्लिश्का मेंडोंसाला बीएमसीने ताबडतोब सांगितले, की तिच्या आईच्या अपार्टमेंटमध्ये डासांची पैदास होत आहे आणि तिला कायदेशीर खटल्याचा सामना करावा लागू शकतो. एका सेना नगरसेवकाने तर तिच्याविरोधात ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करावा अशी मागणी केली.

शिवसेनेने नेहमीच स्वतःची प्रतिमा मराठी माणसाची रक्षक, म्हणजेच ते मुंबईचे खरे नागरिक आहेत, अशी तयार केली आहे. ‘बाहेरील’ लोकांच्याविरूद्ध द्वेष निर्माण करुन हा पक्ष स्थापन करण्यात आला. बहुतेकांना आठवत नाही की मुळात ज्यांना मुंबई गुजरात राज्याचा भाग व्हावे, अशी इच्छा होती त्या गुजराती लोकांच्या विरोधातही शिवसेना होती. शिवसेनेचे लक्ष वेगाने बदलले आणि ‘लुंगीवाल्यां’कडे गेले, विविध भागातल्या दक्षिण भारतीय लोकांच्या रेस्टॉरंट्स आणि मालमत्तांची तोडफोड केली गेली. (बर्‍याच वर्षांनंतर, ‘उत्तर भारतीय’ मारहाण करण्यात आली.) शिवसेनेचा हिंदुत्व अवतार तुलनेने नवा आणि १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धातला. परंतु पक्षाचे मुख्य समर्थक मराठी भाषक आहेत, ज्यांना त्यांच्या आवाजाचे कोणीतरी प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा आहे. इथेही सेनेला पाठिंबा गमावण्याचा धोका आहे, कारण हिंदुत्वात मोठा भाऊ म्हणजे भाजपा आणि मराठी तरुण त्यांच्याकडे जाऊ शकतात. ते निश्चितच नरेंद्र मोदी यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. याखेरीज, सेनेला मुंबईबाहेर पाठिंबा कमी आहे. त्यामुळे आहे तो आधार कायम ठेवणे आवश्यक असून, कंगनासारखे लोक त्यांना राजकारण करण्याची संधी देत राहतात.

पण उर्वरित शहरातील ज्या लोकांचा शिवसेनेवर पूर्ण भरवसा नाही, त्यांना न सांगताही, हे लक्षात आले, की ते अजूनही ‘बाहेरील’ आहेत आणि म्हणूनच त्यांनी शब्द जपून वापरले पाहिजेत.

राणावतची वागणूक कितीही निषेधार्ह असली, तरी हे खरे आहे, की ती मुंबईची नागरीक आहे, जितका नागरीक एक रिक्षावाला, तरुण व्यावसायिक, एखादा व्यापारी, हजारो स्त्री-पुरुष आहेत, की जे शहरात काम करण्यासाठी येतात, कर भरतात आणि रोजच्या प्रवासात अपमान आणि अडचणी सहन करतात.

वस्त्र गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले आणि इथल्या संस्कृती व बौद्धिक जिवनात हातभार लावणारे, तसेच पारशी, गुजराती, कामाठी मंजूर, कच्छी, बोहरा, अरब, ख्रिश्चन, युरोपियन अशा संगळ्यांचेच या शरामध्ये योगदान आहे, जितके महाराष्ट्रीय माणसाचे आहे.

मुंबईचा इतिहास लोकांचे स्वागत करण्याचा आहे, त्यांना बाहेर जा असे सांगणारा नाही. मुंबई या संगळ्यांमध्ये आहे आणि या सगळ्यांची आहे, एक राजकीय पक्ष दाखवतो, तशी स्थानिक लोकांच्या खोट्या अभिमानाची नाही.

हे सगळे लोक सध्या लांबलचक प्रवास, कोविड १९, बिघडणारी आर्थिक परिस्थिती आणि निश्चितच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे चिंतित आहेत. कंगना राणावत आणि तीच्या बडबडीमध्ये त्यांना अजिबात रस नाही.

म्हणून सेना आणि त्याच्या सहकारी राजकारण्यांनी जर तिच्याकडे दुर्लक्ष करून या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष दिले तर राज्यासाठी ते मोठे काम होईल.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांचे खूप कौतुक झाले. अजूनही खूप लोकांच्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहेत. ते आपल्या सार्वजनिक भाषणांमध्ये तोलून-मापून बोलतात. तरुण आदित्यही लोकांचा आदर मिळवत आहे.

पुन्हा एकदा सगळे लक्ष प्रशासनावर देणे गरजेचे असून, पक्षाला शांत राहून कंगनाला हवा देणे थांबवले पाहीजे.

आणि त्याचवेळी सेनेनेही आपल्या राजकीय भविष्यासाठी स्वत:च्या अस्तित्वासाठी हा संदेश सर्वत्र पसरवला पाहीजे, की मुंबईत राहणाऱ्या मुंबईवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांसाठी हा पक्ष आहे आणि या शहराला अधिक चांगले करण्यासाठी तो अधिक प्रयत्न करेल.

सिद्धार्थ भाटिया, हे ‘द वायर’चे संस्थापक संपादक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: