पीएम केअर फंडाकडून केवळ २,९२३ व्हेंटिलेटर

पीएम केअर फंडाकडून केवळ २,९२३ व्हेंटिलेटर

नवी दिल्लीः पीएम केअर फंडच्या माध्यमातून ५० हजार व्हेंटिलेटरचे लक्ष्य सरकारने ठरवले असले तरी आजपर्यंत केवळ २,९२३ व्हेंटिलेटर तयार केले गेले आहेत.

इंडियन एक्प्रेस या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाने एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करताना पीएम केअर्स फंड अंतर्गत आजपर्यंत २,९२३ व्हेंटिलेटरचे उत्पादन झाले असून त्यापैकी १,३४० व्हेंटिलेटर काही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहेत.

ज्या राज्यांना हे व्हेंटिलेटर पाठवले आहेत त्यांची माहिती पुढील प्रमाणे.

महाराष्ट्र (२७५), दिल्ली (२७५), गुजरात (१७५), बिहार (१००), कर्नाटक (९०) व राजस्थान (७५).

या महिन्याच्या अखेरीस १४ हजार व्हेंटिलेटर सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात येणार असल्याचे पीएमओने स्पष्ट केले आहे.

व्हेंटिलेटरच्या उत्पादनासंदर्भात ११ जून रोजी नीती आयोग, डीपीआयआयटी, डीआरडीओच्या प्रमुखांची बैठक झाली होती. या बैठकीत देशात व्हेंटिलेटरची कमतरता भासत असून त्याचे उत्पादन वेगाने करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. या बैठकीला मुख्य वैज्ञानिक सल्लागार डी. विजय राघवनही उपस्थित होते.

या बैठकीत व्हेंटिलेटरला लागणारे सुटे भाग कमी उपलब्ध असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या उत्पादनाला विलंब होत असल्याचे कारण पुढे आले होते. केंद्र सरकारने ४ भारतीय व्हेंटिलेटर उत्पादक कंपन्यांना ६० हजार व्हेंटिलेटर तयार करण्याचे कंत्राट दिले होते पण या कंपन्यांनी सुट्या भागांची कमतरता असल्याने व्हेंटिलेटर वेळेत तयार करता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

डीपीआयआयटीच्या अधिकार्यांनी एसी/डीसी कन्व्हर्टर, फिल्टर, थर्मो इलेक्ट्रिक डिव्हाइस, प्रेशर पंप, सेन्सर, ऑप्टिकल एनकोडर, ऑक्सिजन सेन्सर, फ्लो सेन्सर व सब्सटन्स वॉल्व या सुट्या भागांच्या कमतरता कमी असल्याचे सांगितले होते. यावर नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांता यांनी व्हेंटिलेटरचे अनेक सुटे भाग आयात करावे लागत असल्याने व्हेंटिलेटर तयार करण्यास विलंब होत असल्याचे सांगितले.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रतीकात्मक आहे.)

मूळ बातमी

COMMENTS