भगवंत मान यांच्या नशेच्या वृत्ताने आप अडचणीत

भगवंत मान यांच्या नशेच्या वृत्ताने आप अडचणीत

चंदीगढः दारुच्या नशेत असल्याने जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेले पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्थांसा एअरलाइनने विमान प्रवेशास मनाई केल्याच्या वृत्तानंतर पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. राज्यातले प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस, अकाली दल व भाजपने मान यांच्यावर जोरदार टीका केली असून मुख्यमंत्री म्हणून मान यांनी पंजाबला लाज वाटावी असे कृत्य केल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी मान हे दारुच्या नशेत असल्याने त्यांना विमानात चढू दिले नाही. त्यामुळे ४ तास विमान उड्डाणास विलंब झाला, असा आरोप केला. मान यांचे कृत्य शरमेचे असून पंजाब सरकार व आपचे अध्यक्ष केजरीवाल यावर मौन बाळगून आहेत. त्यांनी या संदर्भात अधिकृत खुलासा करावा अशी मागणी बादल यांनी केली. मान यांना खरोखरच विमानातून उतरवले असेल तर तो पंजाब व देशाच्या सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न असून भारत सरकारने या संदर्भात पावले उचलली पाहिजेत. हा प्रश्न भारताने जर्मन सरकारच्या पुढे मांडला पाहिजे, असे बादल म्हणाले.

तर आम आदमी पार्टीने मान यांच्या विरोधात हा भाजपचा खोटा प्रचार असल्याचे प्रत्युत्तर दिले आहे. मान यांची प्रकृती खराब असल्याने त्यांनी आपले भारतात येणे लांबवले असे आपने म्हटले आहे.

सोमवारी सकाळी मान यांनी केलेल्या नशेसंदर्भात वृत्त आले होते. मान यांनी मद्यप्राशन इतके केले होते की ते उभे राहू शकत नव्हते. त्यामुळे लुफ्थांसा एअरलाइन्सने त्यांना विमानात चढू दिले नाही. पण या वृत्ताची शहानिशा अद्याप झालेली नाही.

COMMENTS