माझे ‘गांधीजीं’वरील प्रयोग(!)

माझे ‘गांधीजीं’वरील प्रयोग(!)

म. गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रमोद कपूर लिखित व सविता दामले अनुवादित ‘गांधी : सचित्र जीवनदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन १ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, पटवर्धन सभागृह, टिळक रोड, पुणे-३० येथे होत आहे. हे पुस्तक मंजुल पब्लिशिंग हाउसतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाचे लेखक प्रमोद कपूर यांनी या पुस्तकाच्या लेखनामागील व्यक्त केलेली प्रेरणा.

जगण्याची समृद्ध वर्तुळे
‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’
‘नावा’तली स्त्रीमुक्ती

काही वर्षांपूर्वी दोन पोलीस माझ्या कचेरीत आले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला. आल्याआल्या त्यांनी जाहीर केले,“साहेब, आम्ही तुम्हाला न्यायला आलो आहोत.’’

काही काळ मी वृत्तपत्र चालवत होतो. तो काळ सोडला तर माझं बहुतेक जीवन हे पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायातच व्यतीत झालेलं आहे. त्यामुळे मी टक्केटोणपे खाऊन टणक झालेलो असलो तरीही अशी काही परिस्थिती उद्भवेल यासाठी माझ्या मनाची मुळीच तयारी झाली नव्हती हे मान्य करावंच लागेल.

‘‘का हो?’’ त्यांना प्रश्न विचारताना माझ्या हृदयाचे ठोके चुकले.

‘‘तुम्ही एक पुस्तक छापलेलं आहे त्यामुळे लोकांच्या भावना प्रक्षुब्ध होऊ शकतात.’’ त्यातील एकानं पाठांतर केल्यासारखं उत्तर दिलं खरं परंतु त्याच्या स्वरात गुळमुळीतपणा होता.

आता आम्ही तेव्हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’ यांच्यावर एक उत्कंठापूर्ण पुस्तक लिहून घेतलं होतं खरं. परंतु तो राजकीय ग्रंथ नव्हता तर व्यक्तिगत इतिहास होता. मी ते पुस्तक छापण्याचं ठरवलं तेव्हा मला विश्वास वाटत होता की आज आंबेडकर जिवंत असते तर त्यांनी नक्कीच त्या पुस्तकाला अनुमती दिली असती. शेवटी काय, मी जे प्रकाशित करणार होतो त्यातला काही भाग तर स्वतः त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवला होता. तथापि, त्या टप्प्यावर तर लेखकानं माझ्याकडे एकही प्रकरण पाठवलेलं नव्हतं. त्यामुळे मग मी स्वतःला सावरलं आणि वॉरंट दाखवण्याची मागणी केली. त्यांच्याकडे वॉरंट तर नव्हतं. मी असा सहजासहजी दबणारा माणूस नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते निघून गेले खरे परंतु जाता जाता मला इशारा देऊन गेले की माझ्या कुठल्याही कृत्यामुळे सार्वजनिक भावना दुखावल्या गेल्या तर मला अटक करण्याचा अधिकार त्यांना आहे.

शेवटी ते पुस्तक प्रकाशित झालं नाही ते नाहीच- कारण हस्तलिखित न ठेवताच त्या लेखकांचं आकस्मिक निधन झालं. आता मी ‘गांधीजी- एक सचित्र आत्मकथा’ हे पुस्तक प्रकाशित करायला निघालोय. या पुस्तकात गांधीजींची लैंगिकता आणि अन्य वैयक्तिक तपशील आहेत, परंतु या वेळेस मात्र माझ्या दारावर थाप पडेल अशी कसलीही भीती मला वाटत नाही. गांधीजींवर पुस्तकं काढणाऱ्यांवर सहसा पोलीस वॉरंट काढत नसतात.

माझे मित्र नॉर्वेचे ‘विल्यम निगार्ड’ यांच्यासोबत मी दोन बिन-राजकीय विषयावरची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. या विल्यम निगार्डना सल्मान रश्दींसाठी खास राखून ठेवलेल्या सहा बंदुकीच्या गोळ्या भेटीदाखल मिळाल्या होत्या कारण त्यांनी ‘सटानिक व्हर्सेस’ची नॉर्वेजियन आवृत्ती काढण्याचं धाडस केलं होतं. खरोखर, प्रकाशन व्यवसायातही धोके असतातच. मलाही एका फौजदारी खटल्याला तोंड द्यावं लागलं आहे आणि नवी दिल्लीतील तीस हजारी फौजदारी कोर्टात ११ वर्षं फेऱ्या माराव्या लागल्या आहेत. कारण काय तर मी ‘कामसूत्रा’ची सचित्र आवृत्ती छापली होती ज्यातली चित्रं मुळात शेकडो वर्षापूर्वी काढली गेली होती. त्यानंतर काही वर्षांपूर्वी एका राजकीय पक्षाच्या युवा शाखेने एका वकिलातीपुढे निदर्शनंही केली होती- कारण काय तर त्या देशातील एका लेखकानं त्यांच्या नेत्याचं एक निरूपद्रवी चरित्र लिहिलं होतं. ते चरित्र प्रकाशित करण्याचा आमचाही विचार होता.

‘लेडी चॅटर्लीज लव्हर’ किंवा वेंडी डोनिजर यांची पुस्तकं मी वाचलेली नाहीत परंतु प्रत्येक वेळेस पुस्तकांवर बंदी घातली जाते तेव्हा वर्णन करता येणार नाही अशी एक भावना माझ्या मनात उफाळून येते. त्या भावनेचा संबंध  बोलण्याच्या आणि लेखनाच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याशी असतो तसाच तो छळ होण्याच्या भीतीशीही असतो. जोपर्यंत ते लेखन अस्सलपणा, वास्तविक परिस्थिती आणि दस्तावेजांच्या संशोधनामुळे मिळालेली पुष्टी या परीक्षा उत्तीर्ण करत आहे तोपर्यंत त्या विषयावरची नवीन माहिती किंवा नवा दृष्टिकोन देणारी पुस्तके छापण्याचा उत्साह माझ्यासारख्या प्रकाशकांना वाटणारच. म्हणूनच गांधीजींच्या वैयक्तिक जीवनाबद्दल लिहिताना मला कसलीही भीती वाटत नाहीये म्हणजे त्यात जरी काही काळोख्या छटा असल्या तरीही वाटत नाहीये.

मोहनदास करमचंद गांधी यांच्याबद्दल लिहिणे हा मला मिळालेला बहुमान आहे आणि ते माझं कर्तव्यही आहे असं मी मानतो. ते बापू आहेत, राष्ट्रपिता आहेत, महात्मा आहेत आणि असे नेते आहेत ज्यांचं विश्लेषण पिढ्यानुपिढ्या म्हणजे त्यांच्यावर पहिलं पुस्तक लिहिलं गेलं तेव्हापासूनच चाललंय. नुसतं विश्लेषणच नव्हे तर पुनर्विश्लेषण चाललंय. टीका आणि कौतुकही चाललंय. जोसेफ डॉक यांनी १९०८ साली त्यांच्यावर ‘एम. के. गांधी- ऍन इंडियन पॅट्रियट इन साऊथ आफ्रिका’ हे पुस्तक लिहिलं होतं. स्वतः गांधीजींनी त्यांचं पहिलं पुस्तक ‘हिंद स्वराज’ हे १९०९ साली लिहिलं होतं. स्टॅन्ली वोल्पर्ट लिखित ‘नाईन अवर्स टू राम’ आणि जोसेफ लेलिवेल्ड लिखित ‘ग्रेट सोल- महात्मा गांधी अँण्ड हिज स्ट्रगल विथ इंडिया’ अशासारख्या गांधीजींवरील पुस्तकांवर स्थानिक स्तरावर किंवा मर्यादित बंधनं घातली जाण्याची दुर्मीळ उदाहरणंही असली तरी आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल पुस्तक लिहिलं म्हणून कुणी निषेध व्यक्त केलेला नाही की ती  जाळलीही नाहीत. त्यामुळे मी आशा करतो की या वेळेस पोलीस माझ्या दाराशी वॉरंट घेऊन येणार नाहीत. मागच्या वेळेस तर त्यांनी ते आणलं नव्हतं.

गांधीजी स्वतःच्या जीवनाला ‘उघडं पुस्तक’ मानायचे आणि त्याबद्दल अत्यंत प्रांजळपणे बोलायचे. मी काही त्यांच्या काळाचा साक्षीदार नाही परंतु वाचलेल्या पुस्तकांतून आणि लेखांतून मला जाणवलं की त्यांनी स्वतःच्या वागण्यावर जेवढी टीका केली आहे तेवढी अन्य कुणीही केली नसेल. त्यांच्या काही कृती आणि वैयक्तिक इतिहास मला पटला नसला तरीही हे सचित्र पुस्तक प्रकाशित करताना मी एक प्रकारच्या ध्यासानं आणि मोहानं पछाडलाच गेलो म्हणूनच तर गांधी या माणसाबद्दल, धर्मयोद्धाबद्दल, पती, पिता, नेता आणि राजकारण्याबद्दल जे लाखो शब्द लिहिले गेले ते वाचण्याच्या आणि त्याचा अभ्यास करण्याच्या कार्यात मी स्वतःला झोकून दिलं आणि सगळं काही सोडून याच प्रकल्पात पूर्णतया बुडून गेलो.

कामाला सुरूवात केली तेव्हा मला गांधीजींबद्दल फारच कमी माहिती होती. फक्त शाळेत मी जे काही वाचलं होतं ते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांना पाठिंबा देणाऱ्या घरच्या लोकांनी किस्से सांगितले होते ते- एवढंच माझं ज्ञान होतं. माझ्यातील प्रकाशकाच्या सहजप्रेरणेला अनुसरून दोन वर्षांपूर्वीपासून मी हे काम हाती घेतलं आहे.

हा विचार पुढे कसा न्यावा याबद्दल मी माझे जुने मित्र- लेखक मुशीर उल हसन यांच्याशी चर्चा केली. उत्साहाच्या भरात ते मला कशात पडायला सांगताहेत याचा अंदाज त्यांनाही आला नाही आणि या विषयाचा आवाका महासागरासारखा विशाल आहे हे मलाही कळलं नाही, त्यामुळे त्यांनी सुचवल्यानुसार मी ‘महात्मा गांधीचा लेखनसंग्रह’ वाचायला घेतला आणि पुढील सहा महिन्यांतच माझं जीवन पार बदलूनच गेलं. मला त्यात खऱ्याखुऱ्या जीवनात घडणारे रंजक प्रसंग आणि कहाण्या वाचायला मिळाल्या. सर्वसामान्य वाचकांना त्या आकर्षित करणाऱ्याच होत्या. अर्थात् विद्वानांना त्यांच्या सखोल अभ्यासात उल्लेख करण्याच्या दृष्टीनं त्या किरकोळ वाटतही असतील. शेवटी काय, गांधीजींबद्दल सध्या एवढं लिहिलं गेलं आहे की खाजगी संग्रहांच्या पेट्यांची कुलुपं काढली गेली किंवा गांधींजींच्या वंशजांनी त्यांचे खाजगी कागदपत्र खुले केले किंवा लिलावात विकले तरच आणखी काही शोधायचं बाकी राहिलं असलं तर ते मिळेल. तरीही मी जे काही वाचत होतो, त्याबद्दलची माझी ओढ वाढू लागली होती आणि दुसरं म्हणजे माझ्यातील प्रकाशकाच्या ‘नाका’ला एका चांगल्या विषयाचा वासही लागला होता. म्हणूनच मला जाणवलं की त्यांची कथा ही सध्याच्या पिढीसाठी पुन्हा नव्यानं सांगितली जायला हवी. त्यामुळेच मी गोष्टी जशा घडल्या तशा त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते करताना मी अती न्यायनिवाडा करण्याच्या भरीसही पडलो नाही. गांधीजींवर एवढी पुस्तकं लिहिली गेली त्यांच्यापेक्षा या पुस्तकातला वेगळेपणा हाच आहे की प्रत्येक वेळी जेव्हा मी जुन्या संग्रहातील माहिती खणू लागलो तेव्हा इतिहासाचा असा एखादा भाग किंवा मनोवेधक माहिती माझ्या हाताला लागली जी इतिहासकारांनी असंबद्ध म्हणून सोडून दिलेली होती.

मी जेवढं जेवढं जास्त खणलं तेवढ्या तेवढ्या अधिक कहाण्या वर येऊ लागल्या आणि मग काय, माझी उत्कंठा अधिकच वाढली. त्यांचं व्यक्तिमत्व गुंतागुंतीचं होतं. इतिहासात घडून गेलेले ते एक महान राजकारणी होते. जन्मजात नेते आणि क्रांतिकारक होते. असामान्य धाडसी आणि दूरदृष्टीचे होते, परंतु त्याच वेळेस बरेचदा स्वतःच्या शिकवणुकीपेक्षा वेगळं वागलेलेही होते.  ज्यांच्यासोबत त्यांनी काम केलं किंवा वाटाघाटी केल्या त्या नेत्यांपेक्षा आणि राजकारण्यापेक्षा ते वेगळे होतेच शिवाय त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या ‘पिता आणि पती’ अशासारख्या कित्येक पैलूंबाबतही वेगळे होते हे सगळं जणू माझ्या डोळ्यांसमोर सजीवच होऊन उठलं होतं.

1903 जोहान्सबर्ग येथील वकिली कचेरीच्या बाहेर आपल्या सहकार्‍यांसोबत गांधी (डावीकडून तिसरे). कचेरीसाठी जागा शोधताना गांधी म्हणाले होते, “भारतीय व्यक्तीला सोयिस्कर वस्तीत कचेरीसाठी जागा मिळणं तिथं अवघडच होतं.”

१९०३ जोहान्सबर्ग येथील वकिली कचेरीच्या बाहेर आपल्या सहकार्‍यांसोबत गांधी (डावीकडून तिसरे). कचेरीसाठी जागा शोधताना गांधी म्हणाले होते, “भारतीय व्यक्तीला सोयिस्कर वस्तीत कचेरीसाठी जागा मिळणं तिथं अवघडच होतं.”

गांधींची आणि माझी ओळख अन्य भारतीयांसारखीच खूप लौकर म्हणजे शाळेतच झाली. तिथं त्यांच्याबद्दल वाचन करणं आवश्यक होतं. त्या काळातल्या अन्य लोकांप्रमाणे माझ्याही आईवडिलांवर गांधीजींचा खोल पगडा होता. आपल्या मुलांना ते पुस्तक किंवा तो विषय कळण्याची पुरेशी समज येण्यापूर्वीच त्यांनी गांधींजींचं आत्मचरित्र वाचावं म्हणून ते अधीर झालेले होते. आमचं कुटुंब  ‘गांधीवादी’ नसलं तरी आम्ही मुलं काही चुकीचं वागलो तर त्यांच्या जीवनातली उदाहरणं न चुकता उद्धृत केली जात होती. त्या काळातल्या प्रत्येकाच्या जीवनात गांधीजी थोड्याबहुत प्रमाणात होतेच. त्यांची सर्वात जुनी दृश्य आठवण एका तसबिरीची आहे, वाराणसीतल्या आमच्या दिवाणखान्यात भिंतीवर लटकावलेल्या त्या तसबिरीत गांधीजी, नेहरू आणि पटेल आहेत आणि त्यांच्या बाजूच्या फोटोत चंद्रशेखर आझाद आहेत. कित्येक दशकांपूर्वीची गोष्ट आहे ती. त्यातल्या बऱ्याच आठवणी आता अंधुकही झालेल्या आहेत. एका कौटुंबिक शोकांतिकेमुळे त्यांचं नाव माझ्या मनात जिवंत राहिलं आणि त्याचा संबंध ‘रघुपती राघव राजाराम, पतितपावन सीताराम’ या त्यांच्या आवडत्या भजनाशी आहे.

माझ्या विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या आईला पक्षाघाताचा झटका आला, त्यामुळे अर्धांगवायू होऊन तिच्या बोलण्यावरही परिणाम झाला. तेव्हा फक्त एकच ओळ बोलण्याची तिची क्षमता राहिली होती- ती ओळ होती रामधून म्हणजेच ‘पतितपावन सीताराम’ हीच. गांधीजींमुळेच ते भजन घरोघरी म्हणायच्या श्लोकासारखं झालं होतं. आनंदाच्या- दुःखाच्या दोन्ही प्रसंगी माझी आई ती ओळ पुन्हापुन्हा म्हणत असे. कदाचित गांधीजी त्या अंशरूपात तिच्यापाशी शिल्लक राहिले असतील. नंतरच्या जीवनात ती तेवढेच शब्द बोलू शकत होती. हे पुस्तक लिहिताना माझं मन तिच्या आठवणींनीही भरून येत होतं.

गांधींच्या विचारांचं लोकांनी अवलोकन केलं, पुनरावलोकन केलं, विश्लेषण केलं आणि जवळजवळ प्रत्येक दशकात त्या विचारांचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला गेला. या पुनरावलोकनामुळे आणि पुनर्मूल्यांकनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुंतागुंत आणि विरोधाभासच बाहेर आले आहेत. संघर्ष मिटवण्यात निष्णात असल्यामुळे उग्र विरोधकांशी यशस्वी करार करणं त्यांना शक्य झालं तरी त्याच वेळेस स्वतःच्या निकटतम नातेवाईंकाशी किंवा अनुयायांशी वागताना ते अत्यंत हुकुमशाही वृत्तीनं वागत होते. शांततापूर्ण मार्ग निघावा म्हणून ते विरोधकांपुढे मान तुकवायचे परंतु प्रेमळ पत्नीवर किंवा अत्यंत एकनिष्ठ अनुयायांवर मात्र मनाविरुद्ध वागण्याची सक्ती करायचे.

खादीची चळवळ कळसाला पोचली तेव्हा गांधीजींनी सर्वांना परदेशी माल न घेण्याविषयी बजावून सांगितलं. तेव्हा पत्नी कस्तुरबांनी तक्रार केली की ‘‘खादीची साडी नेसून स्वयंपाक करणं अवघड जातं. घरकाम करताना ती अंगावर जड वाटते. म्हणून मला दुसरी एखादी वजनानं हलकी साडी नेसू द्या.’’ तेव्हा गांधीजी एवढे वैतागले की त्यांनी कस्तुरबांना सांगितलं, “त्यापेक्षा स्वयंपाक करूच नका ना. तुम्ही ते अपवित्र परदेशी वस्त्र नेसून स्वयंपाक केलात तर मी त्या अन्नाला शिवणारही नाही.’’

१९१५साली भारत-शोधाच्या यात्रेवर निघाल्यापासून त्यांना बरेच नेते भेटले, त्यातल्या काहींवर त्यांचा प्रभाव पडला तर काहींशी त्यांचा संघर्ष झाला. त्याचसोबत त्यांना सर्वसामान्य भारतीय जनसागरही भेटला जो त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि कार्यपद्धतीमुळे आकर्षित झाला. अशा सर्वांनी मिळून सरतेशेवटी त्यांना ‘महात्मा’ पदावर नेऊन ठेवलं. भारताच्या आणि भारतीयांच्या शोधावर निघताना गांधीजी त्या अनुभवाला बालसदृश उत्सुकतेने सामोरे गेले, वाटेत भेटलेल्या माणसांशी बोलले, त्यांच्यासोबत राहिले. म्हणजे जेव्हा अन्य भारतीय नेते गांधीजींचा शोध घेत होते तेव्हा गांधीजी एखाद्या शिकाऊ उमेदवारासारखे भारताची ओळख करून घेत होते.

भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड रिडिंग यांनी एकदा म्हटलं होतं की : ‘‘त्यांच्या दिसण्यात लक्ष वेधून घेईल असं काहीच नव्हतं,… मी रस्त्यात त्यांना ओलांडून पुढे गेलो असतो तर दुसऱ्यांदा मागं वळून पाहिलं नसतं. पण ते बोलू लागतात तेव्हा त्यांचा वेगळाच ठसा पडतो. ते थेट, नेमकं बोलतात, उत्कृष्ट इंग्रजीत व्यक्त होतात, बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाची त्यांना कदर असते.’’ हाती घेतलेल्या बऱ्याच मोहिमांच्या वेळेस या अभिव्यक्ती सामर्थ्याचाच गांधीजींनी वापर केला होता. (शेवटी काय, त्यांनी बॅरिस्टरीचं शिक्षण घेतलं होतं ना.) त्यातील एक मोहीम होती ती म्हणजे बोलण्यात आणि वेषभूषेत इंग्रजाळलेल्या भारतीयांना पुन्हा स्वदेशाकडे परत आणणे. त्यांची लोकांचं मन वळवण्याची शक्ती आणि स्वतः तसं वागून आदर्श समोर ठेवण्याची पद्धत यांचा वापर करून त्यांनी कित्येक आंग्लाळलेल्या भारतीयांना स्वराज्यपद्धतीच्या जीवनशैलीत परत आणलं. त्यातलं एक उल्लेखनीय उदाहरण होतं मोतीलाल नेहरूंचं. त्यांनी आपले ‘सॅविल रो’ ब्रँडचे सुट वापरणं सोडून खादीचे कपडे परिधान करावयास सुरुवात केली.

गांधीजींचे मार्गदर्शक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून भारतात आल्यावरची पहिली काही वर्षं ते भारतभर पुष्कळ फिरले तेव्हा त्यांनी आपले डोळे उघडे आणि कान बंद ठेवले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीस नेतृत्व देणारा मुख्य नेता म्हणूनच केवळ त्यांचा उदय होत नव्हता तर ‘अहिंसा’ हे एक अद्वितीय शस्त्र ते जगाला देणार होते. १९२० च्या दशकाच्या प्रारंभापासून सर्वसामान्य भारतीयांचं खूप मोठं अनुयायीत्व त्यांच्या नेतृत्वाला लाभणार होतं. आगगाडीच्या तिसऱ्या वर्गातूनच प्रवास करण्याच्या हट्टामुळे ते सर्व स्तरातील भारतीयांच्या संपर्कात राहू शकत होते. आगगाडीच्या प्रवासात त्यांना बघण्यासाठी  हजारो लोक फलाटावर जमायचे, सार्वजनिक सभेतलं त्यांचं भाषण ऐकण्यासाठी मैलोनमैल चालत यायचे. जिथं जिथं म्हणून जातील तिथं तिथं ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणांचा आवाज चढत्या पट्टीतच ऐकू येऊ लागला होता. त्यातूनच त्यांची जलदगतीनं वाढणारी लोकप्रियता आणि प्रतिष्ठा जाणवू लागली होती. निषेधाच्या नवनव्या पद्धतींतून त्यांनी लोकांच्या कल्पनाशक्तीवर काबू मिळवला. त्यांच्या पद्धती अहिंसक आणि शांततेच्या मार्गानं जाणाऱ्या असल्या तरी सरकारशी असहकार करणाऱ्या होत्या. त्यांचा आणि त्यांच्या तंत्राचा स्वीकार सर्वच लोकांनी केला नाही. बऱ्याच राजकीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी त्यांच्या अहिंसक सत्याग्रह चळवळीबद्दल प्रश्न उपस्थित केले. खरं सांगायचं तर या त्यांच्या विचाराबद्दल तीव्र वादविवाद रंगले. बऱ्याच जणांना असंही वाटलं की गांधी अहिंसक मार्ग वापरत असले तरी त्यांच्या निषेधाच्या कल्पना आक्रमक होत्या. बरेचदा त्यांची परिणती अनुयायांकडून घडलेल्या हिंसक कृतीत होत असे.

हिंसाचार घडल्यामुळे गांधीजीनी आपली असहकार चळवळ मागे घेतली खरी परंतु तोपर्यंत हजारो तरुण स्त्रीपुरुषांनी शिक्षण, नोकऱ्यांवर लाथ मारून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती. त्यामुळे गांधीजींनी आपल्याला निराश केलं अशीच भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्याशिवाय शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते प्राणघातक उपोषणं करतात म्हणूनही त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. अँनी बेझंट, मोहम्मद अली जिना, एम. आर. जयकर आणि अगदी जहाल समजले जाणारे बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या नेत्यांनाही त्यांची सर्वच मतं पटत नव्हती.

साम्यवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांना गांधीजी भांडवलदारांचे समर्थक वाटायचे हे खरं तर विचित्रच होतं परंतु त्यामुळेच ते त्यांना विरोध करायचे. गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले तेव्हा तरुण साम्यवादी नेत्यांनी ‘गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या.

फक्त साम्यवादीच नव्हे तर पाश्चात्यांकडे झुकलेले दिनशा वाच्छासारखे ‘टाटा सन्स’चे काही संचालकसुद्धा गांधीजींवर टीका करत असत. कदाचित यांत्रिक गिरणीत बनलेल्या कापडावर बहिष्कार घालण्याचं आवाहन गांधीजींनी दिल्यामुळे ते त्रस्त झाले असतील किंवा त्यांच्या असहकार चळवळीलाही त्यांचा विरोध असेल. लोकांना वाटत असतं की जी. डी. बिर्ला आणि जमनालाल बजाज हे गांधीजींच्या ध्येयासाठी देणग्या देणारे सुरुवातीचे देणगीदार असावेत. परंतु तसं नाही कारण त्यांच्याही आधी सर रतन टाटांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णवर्चस्ववादाशी चाललेल्या लढ्याला समर्थन म्हणून  गांधीजींना बाळ गंगाधर टिळकांच्या माध्यमातून लाखो रूपये दिले होते.

गांधीजींनी उभारलेल्या चळवळीमुळे भारताला स्वतःची वेगळी व्याख्या मिळाली आणि जगाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर भारताची मोहर उमटली. गांधीजी अमेरिकेला कधीच गेले नसले तरी अमेरिकेतल्या कित्येक लोकांना त्यांच्याबद्दल भक्ती वाटू लागली होती. १९२१ साली एका धार्मिक व्याख्यानात ख्रिश्चन धर्मोपदेशक डॉक्टर जॉन हेनेस होम्स यांनी त्यांना ‘जगातील महान माणूस’ अशी उपाधी दिली होती. त्यानंतर आणखी ४ वर्षांनी आणखी एक अमेरिकन मिशनरी डॉक्टर एली स्टॅन्ले यांनी गांधीजींकडून प्रेरणा घेऊन ‘भारतीय रस्त्यांवरील ख्रिस्त’ हे सर्वाधिक खपाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामुळे मार्टीन ल्युथर किंग (ज्युनियर) यांनाही प्रेरणा मिळाली. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे इटालियन हुकुमशहा बेनिटो मुसोलिनीला भेटण्यासाठी गांधीजींनी रोमला १९३१ साली भेट दिली. नंतर त्यांनी त्याचं वर्णन करताना म्हटलं की तो एखाद्या ‘खाटका’सारखा दिसत होता.

गांधीजी आणि त्यांच्या कार्यपद्धतींबद्दल आकर्षण वाटण्यासारखी बाब म्हणजे ते मनाशी धरलेल्या ध्येयाचा अथक पाठपुरावा करायचे. ‘ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य’ या ध्येयापासूनच त्यांनी सुरुवात केली. स्वातंत्र्यलढ्यात लढताना खिलाफत चळवळ, असहकार, परदेशी वस्त्रांवर बहिष्कार, घरच्या घरी कातलेली खादी, चले जाव चळवळ, मिठाचा सत्याग्रह अशा एकामागून एक नवनव्या कल्पना त्यांनी प्रचारात आणल्या. नंतरच्या काळात मिठाच्या सत्याग्रहाची तुलना गांधीजी बरेचदा अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यातील बोस्टन टी पार्टीशी करत असत.

तरीही गांधीजी काय होते? असा विचार करू लागलं की सगळे विरोधाभास तसेच राहातात हे मात्र नक्कीच. त्यांचं नाव आता युद्धविरोधी शांततावाद आणि अहिंसक लढ्याशी जोडलं गेलेलं असलं तरी विजय मिळवण्यासाठी नैतिक अधिकाराचा दारूगोळा वापरणारे ते एक धूर्त सेनानी होते.

बऱ्याचदा राजकीय नेत्यांशी वाटाघाटी करताना मित्रांचं रूपांतर शत्रूंत होत असे तेव्हा त्यांनी त्यांच्या नैतिक क्षमतेचा वापर करायला मुळीच मागेपुढे पाहिलं नाही. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल काही गांधीजींचे चाहते नव्हते, त्यामुळे दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या धामधुमीत गांधीजींची तब्येत एका प्राणांतिक उपोषणाच्या वेळी धोकादायकरीत्या खालावली तेव्हा ब्रिटनच्या ‘भारतीय प्रकरणात’ अनिच्छेनं का होईना परंतु हस्तक्षेप करण्याचं काम त्यांच्यावतीने अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलीन डिलॅनो रूझवेल्ट यांच्या खांद्यावर येऊन पडलं.

माझं जीवन हे एक ‘उघडं पुस्तक’ याच रूपात ठेवा अशी आज्ञा गांधीजींनी मित्रांना दिलेली असूनही त्यांच्या निकटवर्तीयांजवळचे खाजगी कागदपत्र (उदाहरणार्थ, प्यारेलाल यांच्याजवळील कागदपत्रे) आणि गांधीजींनी स्वतःच्या कुटुंबीयांना पाठवलेली वैयक्तिक पत्रे यांचा समावेश सार्वजनिक संग्रहात नाही. ती सरकारी आणि खाजगी कपाटांत कुलुपबंद असून अजूनही अप्रकाशित आहेत. बहुतेक चरित्रकारांना ती अभ्यासायला मिळालेली नाहीत. त्यामुळे ती शिल्लक राहिलीच तर केव्हा तरी सार्वजनिक केली जातील अशी फक्त आशाच आपण करू शकतो.

गांधी भारतात परतले तेव्हा त्यांच्यासह दक्षिण आफ्रिकेतल्या दरबान येथील फिनिक्स वसाहतीत राहाणारे लोकही आले. गांधीजी त्यांच्याबरोबर भारतात सर्वप्रथम ज्या ठिकाणी गेले ते ठिकाण होतं रवींद्रनाथ टागोराचं शांतिनिकेतन. टागोरांनी गांधीजींना ‘महात्मा’ ही पदवी दिलेली असूनही असहकार चळवळ आणि परदेशी कपड्यांवर बहिष्कार आणि त्यांची होळी अशा बऱ्याच महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्या दोघांचे मतभेदही होते, हे विशेष म्हणावे लागेल. दोघंही आपली प्रभावी लेखनकला वापरून एकमेकांवर सार्वजनिक टीका करायचे. टागोरांनी ‘मुक्तधारा’ नाटक लिहून गांधीजींबाबतचा विरोध प्रकट केला तर गांधीजीनी त्याचा प्रतिवाद म्हणून ‘द ग्रेट सेंटिनेल’ नावाचं निबंधांचं एक उत्कृष्ट पुस्तक लिहिलं. एवढं असूनही त्यांच्यातल्या मैत्रीला बाधा आली नाही. म्हणजे शांतीनिकेतन आर्थिक अरिष्टात सापडलं तेव्हा गांधीजींनी बराच निधी जमवून दिला होता. १९४१ मध्ये टागोरांचं निधन झालं तेव्हा गांधीजींनी त्यांच्यावर एक हृदयद्रावक मृत्यूलेखही लिहिला होता.

गांधीजींचं जीवन आणि त्यांनी मिळवलेलं यश यांचं आपल्याला सदैव कौतुकच वाटलं तरी जो माणूस त्यांच्या काळात जगलेला नाहीये, ज्याला त्यांचं मन माहिती नाहीये त्या माणसाला त्यांच्या वैयक्तिक श्रद्धा काय होत्या? ते त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना कसे वागवायचे? याबद्दल स्पष्टीकरण देणं कठीणच जाईल. त्यांनी त्यांचा ज्येष्ठ पुत्र हरीलाल याला जी वागणूक दिली ते तर मोठं उदाहरणच आपल्यासमोर आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना हरीलालनं आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून तुरुंगवासही भोगला परंतु ब्रिटनमधील उच्च शिक्षणाचा खर्च करण्याची वेळ आली तेव्हा गांधीजींनी त्याच्याऐवजी आपल्या पुतण्याची निवड केली. आता याचं काय स्पष्टीकरण देणार? ज्या माणसाला अहिंसेबद्दल जागतिक कीर्ती मिळाली त्यानं आपली तरूण पत्नी कस्तुरबा हिच्या श्रीमुखात लगावली आणि नंतर म्हटलं की तिच्या मूक अश्रूंनीच मला अहिंसेचा पहिला धडा शिकवला. गांधीजींचं त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाशी असं काहीतरी विचित्र नातं होतं याची आणखीही बरीच उदाहरणं आहेत. त्यासाठी कदाचित एक वेगळा मानसशास्त्रीय अभ्यास करावा लागेल. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं स्वतःचं कुटुंब आणि एकूण बाह्य जग या दोन्ही एकच संस्था होत्या आणि ते या दोन्हींना समान वस्तुनिष्ठतेने वागवत होते. त्यांना त्या दोन्हींमध्ये काही फरक करायचा असतो असं वाटतच नव्हतं.

गांधीजींकडे स्त्रिया आकर्षित व्हायच्या हा मला त्यांच्या जीवनातील एक गुंतागुंतीचा पैलू वाटतो. खरं तर त्यांनी वयाच्या ३७व्या वर्षीच ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती. गांधीजींनी स्वतःहून एका अमेरिकन पत्रकाराजवळ मान्य केलं आहे की टागोरांची सुंदर, सुसंस्कृत भाची सरला देवी चौधराणी हिनं त्यांचा विवाह जवळजवळ मोडायच्या मार्गावर आणून ठेवला होता. ते तेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभे होते. गांधीजींचं लैंगिक जीवन किंवा त्यांची लैंगिकता हा विषय विशेषतः त्यांचा वैयक्तिक ‘यज्ञ’ हा आत्तापर्यंत भरपूर वादाचा आणि टीकेचा धनी झाला आहे. त्यात निकटच्या स्त्री-अनुयायांसोबत नग्नावस्थेत झोपण्याचे प्रयोग अंतर्भूत होते. त्या स्त्रियांत त्यांच्या भावाची किशोरवयीन नात मनूबेनसुद्धा होती. ‘असे प्रयोग करू नका’ असा सल्ला त्यांना बऱ्याच निकटवर्तीयांनी दिला होता. नौखालीत हिंदू-मुसलमान दंगल कळसाला पोचली तेव्हा ती मिटवण्यासाठी म्हणून ते १९४६-४७ मध्ये तिथं गेले तेव्हाही त्यांचे हे प्रयोग चालू होते. तेव्हाचा त्यांचा सचिव पार्शराम यानं हे असले विचित्र यज्ञ पाहून रागारागानं त्यांना दहा पानी पत्र लिहून नोकरी सोडून दिली होती. त्यांचे बंगाली अनुवादक प्राध्यापक सुधीर घोष यांनीही तोच मार्ग अनुसरला होता. परंतु ती पत्रं लपवून ठेवण्याचा कुठलाही प्रयत्न गांधीजींनी केला नाही, उलट त्या मुद्द्यावर त्यांनी पत्रं आणि भाषणाच्या माध्यमातून सार्वजनिक चर्चा केली याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे.

मात्र ज्या स्त्रियांनी त्या यज्ञात भाग घेतला होता किंवा ते यज्ञ होताना पाहिले होते त्यांचं लेखन मात्र इतक्या सहजतेनं उपलब्ध नाही. एका ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञांशी झालेली माझी पहिली भेट मला आठवते.  दिल्लीतील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’च्या हिरवळीवर ठेवलेल्या खुर्च्यांवर आम्ही स्थानापन्न होतच होतो तेवढ्यात मी त्यांना एकदम विचारलं की गांधीजी आपल्या भावाच्या तरुण नातीसोबत नग्न झोपायचे त्याबद्दल आपलं मत काय आहे? तेव्हा तेवढंच अचानक परंतु खरंखुरं उत्तर त्यांच्या तोंडून बाहेर पडलं. ते म्हणाले की ‘‘या विषयावर मलाही अवघडल्यासारखं झालं होतं.’’ अर्थात्, आम्ही व्यवस्थित बैठक मारल्यावर त्यांनी मला नीट समजावून सांगितलं होतं आणि लैंगिकतेबद्दल गांधीजींचं काय तत्वज्ञान होतं त्याची माहिती दिली होती.

अहिंसाव्रत आचरताना आणि लोकांनी ते पाळावं म्हणून उपदेश करताना आपण जीवनमरणाचा केवढा धोका पत्करत आहोत हे गांधीजींना माहिती होतं. वास्तवात पाहिलं तर त्यांच्या काही सुप्रसिद्ध भाषणांत आणि लेखनात मृत्यूच्या संबंधी विचार मांडलेले आहेत. त्यांचा लाडका किशोरवयीन नातू रसिकलाल (त्यांचा ज्येष्ठ पुत्र हरीलालचा मुलगा- हरीलाल गांधीजींना दुरावला होता.) याच्या मृत्यूनंतर गांधीजींनी हृदयद्रावक मृत्युलेख लिहिला आहे. गांधीजींना स्वतःच्या मृत्यूबद्दलही संकेत मिळाले होते. हत्या होण्यापूर्वी हेच विचार त्यांनी आपल्या निकटवर्तीयांना आणि शिष्यांना बोलून दाखवले होते. जणू असं काही घडणार आहे हे त्यांना माहितीच होतं.

कोर्टामध्ये नथुराम गोडसे या गांधीजीच्या मारेकऱ्यानं आपल्या हातून घडलेल्या जघन्य कृत्याचं समर्थन करताना अधूनमधून गांधीजींची स्तुतीही केली. त्यांचं कोर्टातलं ते भाषण जवळजवळ दिवसभर चाललं. त्याचं बचावाचं ते बोलणं इतकं प्रभावी होतं की न्यायमूर्ती जी. डी. खोसला यांनी आपल्या आठवणींत लिहून ठेवलंय की तिथं न्याय द्यायला पंचांची व्यवस्था असती तर त्यांनी त्याची निर्दोष मुक्तताच केली असती. कदाचित स्वतः गांधीजींनीच गोडसेचा बचाव केला असता.

जीवनाच्या संध्याकाळी स्वतः गांधीजींनीच जाहीरपणे आपल्या भावी मारेकऱ्याबद्दलचं स्पष्ट मत नोंदवताना म्हटलं होतं की ‘‘ एका हरामखोर माणसाला मी नष्ट करतोय अशा विचारानं कुणी मला गोळी घालायला आलं तर त्याच्या हातून खराखुरा ‘मी’ मारला जाणार नाही, तर त्याला जो हरामखोर वाटतोय, असा माणूस मारला जाईल.’’ त्यामुळेच ‘गांधीजींवरील प्रयोग मी आणि माझ्यानंतरचे पुष्कळ लोक करत राहिले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

गांधी – सचित्र जीवनदर्शन

प्रमोद कपूर

अनुवाद – सविता दामले

मंजुल पब्लिशिंग हाऊस, पुणे,

मूल्य – रु. ९९९

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0