म्यानमारच्या ३० हजार निर्वासितांचा मिझोराममध्ये आश्रय

म्यानमारच्या ३० हजार निर्वासितांचा मिझोराममध्ये आश्रय

आयझोलः गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात म्यानमारमध्ये सत्तांतर होऊन लष्कराच्या हातात सत्ता गेली होती. या सत्तांतराच्या काळात म्यानमारमधील ३० हजाराहून अधिक नागरिकांनी भारतातील राज्य मिझोराममध्ये पलायन केले आहे. यात ११,७९८ मुले, १०,०४७ महिलांचा समावेश असून निर्वासितांची एकूण संख्या ३०,३१६ इतकी आहे. मिझोरामच्या गृहखात्याने जुलै महिन्याच्या सुरूवातीस ही आकडेवारी प्रसिद्ध केली.

३०,३१६ निर्वासितांपैकी ३०,२९९ निर्वासितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून या सर्व निर्वासितांना भारत सरकारने ओळख पत्रे दिली आहेत. या निर्वासितांना राज्यात शरणार्थी असल्याचे कार्डही देण्यात आले असून फक्त मिझोराममध्ये हे कार्ड वैध धरले जाणार आहे. या निर्वासितांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही, असे राज्याच्या गृहखात्याने स्पष्ट केले आहे.

म्यानमारहून आलेल्या निर्वासितांसाठी राज्यात १५६ शिबीरे उभी करण्यात आली आहेत. यातील ४१ शिबिरे सियाहा जिल्हा, ३६ शिबिरे लवंगतलाई जिल्ह्यात व ३३ शिबिरे चम्फाई जिल्ह्यात वसवण्यात आली आहेत.

या निर्वासितांसाठी राज्य सरकारने ८० लाख रु. खर्च केला आहे.

मिझोराममधील चम्फाई, सियाहा, लवंगतलाई, सेरछीप, हनाहथियाल, सैतुअल हे जिल्हे म्यानमारच्या चीन राज्याला लागून आहेत. ही सीमारेषा ५१० किमी इतक्या लांबीची आहे. मिझोराममध्ये आलेले सर्वाधिक निर्वासित हे चीन राज्यातले आहेत. या निर्वासितांचे मिझो नागरिकांशी पूर्वापार संबंध आहेत.

मूळ बातमी

COMMENTS