नवी दिल्लीः काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी रविवारी जाहीर केली. मार्
नवी दिल्लीः काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांची उमेदवारी रविवारी जाहीर केली. मार्गारेट अल्वा यांचा थेट मुकाबला भाजपप्रणित एनडीए आघाडीचे उमेदवार जगदीश धनख़ड यांच्याशी होईल. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे.
अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या १७ पक्षांच्या विरोधी नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
दोन तास चाललेल्या बैठकीनंतर पवार यांनी घोषणा केली, “आम्ही एकमताने मार्गारेट अल्वा यांना उपाध्यक्षपदासाठी आमची संयुक्त उमेदवार म्हणून उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की एकूण १७ पक्षांनी एकमताने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याने त्या एकूण १९ पक्षांच्या संयुक्त उमेदवार असतील.
“आम्ही ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या वेळी त्यांनी आमच्या संयुक्त राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता,” ते म्हणाले, की झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) देखील या निवडणुकीत विरोधी पक्षांसोबत आहे.
शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही सगळे एकत्र आहोत.
मार्गारेट अल्वा यांचा परिचय
भारतीय राजकारणात अनेक दशके काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा कार्यरत आहेत. १४ एप्रिल १९४२ साली जन्म झालेल्या अल्वा यांनी आजपर्यंत अनेक घटनात्मक पदे भूषवली आहेत. यूपीए सरकार सत्तेत असेपर्यंत ऑगस्ट २०१४ पर्यंत त्या गोव्याच्या राज्यपाल होत्या. त्या अगोदर त्यांनी गुजरात, राजस्थान, उत्तराखंड अशा राज्यांचे राज्यपाल पद भूषवले आहे. त्या पूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळातही होत्या.
अल्वा या मूळच्या वकील असून त्यांनी अनेक सामाजिक संघटनांसोबत काम केले आहे. त्या तरुण वयात यंग विमेन ख्रिश्चन असो.च्या अध्यक्ष झाल्या. २४ मे १९६४ मध्ये त्यांचा विवाह निरंज थॉमस अल्वा यांच्याशी झाला. निरंजन अल्वा हे निर्यात वस्तूंचे व्यापारी असून या दाम्पत्याला एक मुलगी व तीन मुले आहेत.
१९६९मध्ये मार्गारेट अल्वा यांनी राजकारणात प्रवेश केला. अल्वा यांच्या सासू वायलेट अल्वा या काँग्रेसच्या खासदार होत्या व ६० च्या दशकात त्या राज्यसभेच्या सभापतीही होत्या. त्यांच्या कार्याचा प्रभाव मार्गारेट अल्वा यांच्यावर पडला. १९६९मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या या पक्षाच्या एकनिष्ठ सदस्य राहिल्या.
COMMENTS