नवी दिल्ली : बलुचिस्तान प्रांतातील झोब जिल्ह्यातले सुमारे २०० वर्ष जुने हिंदू मंदिर स्थानिक हिंदू समाजाला पाकिस्तान सरकारने ८ फेब्रुवारीला परत दिले शि
नवी दिल्ली : बलुचिस्तान प्रांतातील झोब जिल्ह्यातले सुमारे २०० वर्ष जुने हिंदू मंदिर स्थानिक हिंदू समाजाला पाकिस्तान सरकारने ८ फेब्रुवारीला परत दिले शिवाय १९४७ पासून हे मंदिर ताब्यात घेतल्याबद्दल पाकिस्तान सरकारने हिंदू समाजाची माफीही मागितली आहे.
भारत सरकारने संसदेत नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांना भारतीय नागरिक होण्याची संधी दिल्याने आणि या कायदाला आपल्याकडील अल्पसंख्याक हिंदू बळी पडू नये म्हणून पाकिस्तान सरकारचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
पाकिस्तानातील ‘ऑल पाकिस्तान हिंदू राइट्स मुव्हमेंट’ या संघटनेने फाळणी झाल्यानंतर सरकारच्या ताब्यातील ४२८ हून अधिक मंदिरे मुक्त करावीत याबाबत चळवळ सुरू केली होती. १९९० नंतर या ४२८ मंदिरांपैकी ४०८ मंदिरांमध्ये सरकारी कार्यालये, रेस्तराँ, खेळण्याची दुकाने, शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. ही सर्व मंदिरे हिंदूसाठी मोकळी करावी ही मागणी, ‘ऑल पाकिस्तान हिंदू राइट्स मुव्हमेंट’ या संघटनेची होती. ती मान्य होऊन एप्रिल २०१९मध्ये पाकिस्तान सरकारने धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी अनेक मंदिरांचे नूतनीकरण तर खूप पडझड झालेल्या मंदिरांचे नव्याने बांधकामही हाती घेतले होते.
पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी जुलै २०१९मध्ये ७२ वर्षे बंद असलेले व १९९२मध्ये बाबरी मशीद पाडल्याची प्रतिक्रिया म्हणून जमावाने हल्ला केलेले सियालकोट येथील एक हजार वर्षे प्राचीन श्वाला तेजा सिंग मंदिर हिंदू भाविकांसाठी उघडे केले होते.
त्याअगोदर एप्रिल २०१९मध्ये पेशावर येथील १६० वर्षे जुन्या गोरखनाथ मंदिराचे पुनर्निर्माणाची सरकारने घोषणा केली होती. हे मंदिर न्यायालयाच्या एका निर्णयाने २०११ मध्ये हिंदू भाविकांसाठी उघडे केले होते पण २०१२ जमावाने मंदिराची नासधूस केली होती.
८ फेब्रुवारी रोजी बलुचिस्तानमधील जे मंदिर हिंदू भाविकांना देण्यात आले, त्या मंदिरात ३० वर्षे सरकारी शाळा सुरू होती. हे मंदिर चार मोठ्या खोल्यांचे होते पण गेल्या वर्षी शाळेला नवी जागा दिल्यानंतर हे मंदिर सरकारने हिंदू भाविकांना देण्याचा निर्णय घेतला.
८ फेब्रुवारीला पाकिस्तान सरकारने या मंदिराच्या किल्ल्या हिंदू समाजाच्या प्रतिनिधींकडे सोपवल्या. त्यावेळी झोब जिल्ह्यातल्या जमैत उलेमा-इ-इस्लामचे खतीब मौलाना अल्लाह दाद काकर, डेप्यु. कमिशनर सलीम ताहा व सर्वपक्षीय नेते उपस्थित होते, असे वृत्त द डॉनने दिले आहे. तर द क्वेट्टा डेटलाइनने दिलेल्या वृत्तानुसार हिंदू समाजाला हे मंदिर सोपवण्यात ७० वर्ष विलंब लागल्याबद्दल डेप्यु. कमिशनरनी माफी मागितली. या मंदिराचे नूतनीकरणाचे सर्व प्रयत्न केले जातील असेही आश्वासन त्यांनी दिले. हे मंदिर पूर्वीसारखे झाल्यानंतर त्याचा उपयोग हिंदू समाजाला करता येईल तसेच पाकिस्तानात गुरुद्वारांबाबतही हे धोरण राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मूळ बातमी
COMMENTS