पं शिवकुमार शर्मा : एक अद्भुत सांगीतिक प्रवास

पं शिवकुमार शर्मा : एक अद्भुत सांगीतिक प्रवास

सुप्रसिद्ध संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांचे मंगळवारी निधन झाले. आपल्या अद्भूत अशा संतूर वादनातून पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याविषयी कुतुहल निर्माण केलेच शिवाय या वाद्याने भारतीय शास्त्रीय संगीतांच्या मैफलीत स्वतःचे स्थानही मिळवले. त्यांनी विकसित केलेल्या या वाद्याचा गेल्या ७ दशकांचा प्रवास नोंद घेण्यासारखाच आहे.

‘शेवटी माझे नाव तर स्टॅलिनच आहे!’
झायराची एक्झिट
उपभोक्ता खर्चातील घट दाखवणारा अहवाल प्रकाशित करणार नाही

शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यात मूलभूत फरक कोणता असं विचारलं तर ‘ठेहराव’ असे उत्तर देता येईल. एखादी धून, गाणं किंवा संगीतप्रकार हा मूळ रूपात गायला किंवा वाजवला जात असतो, त्याच्यावर बरेच संस्कार होऊन, तो प्रकार काही वर्ष स्थिरावून नंतर त्यात शास्त्र निर्माण होतं व त्याला व्यासपीठाची पात्रता प्राप्त होते. परंतु हा गानप्रकार एकदा व्यासपीठावर पोचला की एक नवा संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष असतो व्यासपीठावर टिकून राहण्याचा व प्रस्थापित रसिकांकडून पसंती मिळवायचा. आणि मग पुढे या संगीतप्रकाराला विद्यार्थी लाभतात व त्याची परंपरा तयार होते. ही प्रक्रिया खरं तर खूप कठीण, खडतर आणि अनेक दशकं – कदाचित शतकं – सुरू राहणारी असते. या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जर पं. शिवकुमार शर्मा यांच्या सांगीतिक कार्याचा विचार केला तर ते अद्भुत आणि असामान्य अशाच दर्जाचं म्हणावं लागेल.

त्याचं कारण असं की, पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य शास्त्रीय संगीतासाठी अनुकूल म्हणून विकसित तर केलंच, पण त्याचबरोबर त्याला व्यासपीठाची, प्रस्थापित रसिकांची मान्यताही मिळवली. पुढे त्यांच्या शिष्यांमुळे त्याची एक परंपरा देखील तयार झाली. विलक्षण गोष्ट ही की, हे सारं त्यांच्या उभ्या आयुष्यात घडलं. संतूर या वाद्याचा गेल्या जवळपास सात दशकांचा हा प्रवास पं. शिवकुमार शर्मा यांच्यामुळेच होऊ शकला.

आता थोडं ‘ठेहराव’ या विषयाबद्दल जाणून घेऊ. भारतीय शास्त्रीय संगीतात ‘टायमिंग’ या संकल्पनेला प्रचंड महत्त्व आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ‘भूप’ ह्या रागात केवळ पाच सूर आहेत – सा, रे, ग, प आणि ध. परंतु हे गाताना किंवा वाजवताना जर यातील प्रत्येक सुरावर विशिष्ट वेळ थांबलं नाही तर तो ‘राग’ सिद्ध होणार नाही. हे सूर जर नुसते गात किंवा वाजवत राहिलो तर ते गाणं किंवा धून म्हणून ओळखलं जाईल. हे सुरांवर थांबणं किंवा स्थिरावणं संगीताला ‘शास्त्रीय’ दर्जा देतं. अर्थात, या स्थिरावण्यासाठी (गायक असल्यास) आपला गळा किंवा वाद्य विकसित करावं लागतं. काश्मीर खोऱ्यातील संतूर हे तिथल्या धुनांसाठी किंवा गायकाला साथ करण्यासाठी एक उत्कृष्ट वाद्य आहेच. परंतु त्याच्याद्वारे तासभर रंगणारा राग वाजवायचा असेल तर त्यात जे बदल अपेक्षित होते ते पं. शिवकुमार शर्मांनी केले. या बदललेल्या संतूरमध्ये प्रत्येक सुराला आस तयार होऊ शकली, ठेहराव उत्पन्न होऊ शकला व स्वर टिकू शकल्यामुळे राग वाजवता येऊ लागला. ही संगीत क्षेत्रातील क्रांतीच म्हणावी लागेल. आणि ती घडताना काही प्रस्थापितांच्या व पारंपरिक विचारांच्या कलाकारांचा विरोधाला त्यांनाही सामोरं जावं लागलं. परंतु शेवटी पं. शिवकुमार शर्मांच्या निर्मितीला मान्यता मिळाली व देशातील व देशाबाहेरील मानाच्या व्यासपीठांवर शास्त्रीय संतूर प्रस्तुत झालं.

या संतूरची शैली अगदी खास होती. तिच्यात स्वराचा ठेहराव होता, त्याच्या तारांवर मेझराब हलकेस फिरवून रागाला अपेक्षित असणारे स्वरांचे सातत्य आणता येत होते व अवघड लयक्रिडा ही शक्य होती. पं. शिवकुमार शर्मांच्या मैफलीची सुरुवात ही संथ, शांत आलापीने होत असे. त्यात अलगदपणे लयीची साथ मिळून त्याचे रूपांतर जोड व झाला यात होत असे. विशेष म्हणजे ही बढत धृपद अंगाने होत असे. म्हणजे, आपल्या वादनात केवळ ख्याल नाही, तर धृपद अंगाचा समावेश करण्याचा प्रयत्न शर्मा ह्यांनी केला होता. परंतु ख्याल वादन सुरू होण्याआधी शिवकुमार शर्मांच्या वादनाचा केंद्रबिंदू हा ‘स्वर’ असे. लयक्रीडेला त्यात फारसे प्राधान्य नसे. तबला-साथ सुरू झाल्यानंतर मात्र लयकारीला प्रचंड वाव दिला जाई. शिवाय त्यांच्या प्रस्तुतीत तालाची विविधताही जपली गेली होती. संतूर या वाद्याची क्षमता इतकी विकसित झाली होती की, पं. शिवकुमार शर्मा यांनी आपल्या प्रस्तुतीत ‘तीनताल’, ‘झपताल’ व ‘रूपक’ यांच्या व्यतिरिक्त ‘मत्त ताल’, ‘चार ताल की सवारी’, ‘जयताल’ अशा तालांचा देखील समावेश केला. म्हणूनच त्यांच्याबरोबर तबल्याची साथ करणे हे अनेकांसाठी एक आव्हान होते. झाकीर हुसेन, अनिंदो चॅटर्जी, शफाअत अहमद खान ह्यांच्यासारखे दिग्ग्ज तबला वादकच ते पेलू शकले. राग प्रस्तुती संपताना वाढवलेल्या अतिद्रुत लयीत आनंद व उत्साहाचा परमोच्चबिंदू गाठत मैफलीची सांगता होत असे. शिवाय पंडितजींनी त्यांच्या सादरीकरणात उपशास्त्रीय संगीताचा देखील समावेश केला होता. ‘खमाज’, ‘काफी’, ‘मांड’ अशा रागांमधील धुनांचा समावेश त्यांच्या वादनात अगदी हमखास असायचा. शास्त्रीय ख्याल झाल्यानंतर अशा रचना सादर केल्या जात. इथे देखील संतूर ह्या नव्याने रचलेल्या वाद्याची लवचिकता व बहुतेक सर्वप्रकारच्या संगीतप्रकाराशी जुळवून घेण्याची क्षमता आपल्याला लक्षात येते. हे वाद्य इतके लोकप्रिय झाले की, दूरदर्शनच्या किंवा आकाशवाणीच्या दोन कार्यक्रमांमधील ‘जागा’ भरायचे काम पं. शिवकुमार शर्मांच्या ‘खमाज’ किंवा ‘काफी’सारख्या रागातील धुनांनी अनेक वर्ष केले!

परंतु त्यांना सर्वाधिक फर्माईश जर कशाची होत असे तर ती ‘पहाडी’ची! साहजिक, पं. शिवकुमार शर्मा ज्या प्रदेशाचे होते तिथला सांगीतिक वारसा व प्रभाव त्यांच्याकडे होताच! जम्मू-काश्मीरच्या डोगरी लोकधून, तिथल्या प्रदेशातील पहाडी रागाशी संबंधित धून हे सर्व त्यांनी व्यासपीठावर आणले. तसं, पहाडी राग हा अनेक गायक वादकांच्या प्रस्तुतीमुळे रसिकांना परिचित आहेच. परंतु शिवकुमार शर्मा ह्यांच्या संतूरमुळे त्याला एक खास ‘काश्मीर स्पर्श’ मिळाला यात शंकाच नाही! माझ्या मते या सादरीकरणाला एक विशेष महत्त्व आहे. आपण वाजवतो ते वाद्य ज्या प्रदेशातून विकसित झाले आहे त्या प्रदेशातील संगीत त्याच वाद्याद्वारे रसिकांसमोर सादर करणे ही लोकसंगीताला दिलेली सर्वात मोठी दाद आहे! इंग्लिशमध्ये जसे going back to the roots म्हणतो तसेच! असं केल्याने शास्त्रीय संगीत व लोकसंगीत यातील दरी आपोआप कमी होऊ लागते व दोन्ही प्रभाव व्यासपीठावर नांदू लागतात.

त्यामुळे एकाच मंचावरून संतूर या वाद्याद्वारे शास्त्रीय राग, उपशास्त्रीय रचना आणि क्षेत्रीय संगीत हे एकत्र प्रस्तुत होऊ लागलं. आणि म्हणूनच पं. शिवकुमार शर्मा हे रसिकांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले व प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवात हे वाद्य हमखास दिसत असे आणि ते देखील अनेक ज्येष्ठ गायक व वादक त्यांच्या उमेदीत असताना! या वाद्याने इतर वाद्यांशीही चांगलेच जुळवून घेतले व त्याची झलक पं. शिवकुमार शर्मा यांच्या १९६७ मधील ‘कॉल ऑफ द व्हॅली’ या निर्मितीद्वारे रसिकांना मिळाली. काश्मीरमधील एका धनगराच्या दैनंदिन आयुष्यावर आधारलेल्या या रचनांमध्ये हरिप्रसाद चौरासिया (बासरी), ब्रिजभूषण काब्रा (गिटार) आणि माणिकराव पोपटकार (तबला) होते. भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘सिम्फनी’ असे स्वरूप असलेल्या या या ‘अल्बम’ला प्रचंड लोकप्रियता लाभली व आजही त्याची जादू कायम आहे. विशेष म्हणजे तेव्हा शिवकुमार शर्मा यांचं वय केवळ ३० होतं. त्यांनी विशीत असताना विकसित केलेले हे वाद्य लगेचंच आपली छाप सोडू लागलं होतं हेच ह्या उदाहरणाद्वारे आपल्यासमोर येतं.

एवढी वैशिष्ट्य असताना या वाद्याने चित्रपट संगीताच्या क्षेत्रात प्रवेश केला नसता तरंच नवल! पं. शिवकुमार शर्मा स्वतः अनेक मोठ्या संगीतकारांच्या ‘ऑर्केस्ट्रात’ पार्श्वसंगीत वाजवत असतं. शिवाय त्यांनी हरिप्रसाद चौरासिया यांच्याबरोबर काम करत ‘शिव-हरी’ या नावाने ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘लम्हे, ‘डर’ या चित्रपटांना संगीतही दिले.

त्यांचा मुलगा राहुल शर्माने (जो त्यांचा प्रमुख शिष्य व आजच्या घडीचा लोकप्रिय वादकही आहे ) संतूरचा फ्युजन संगीतात देखील वापर केला आहे व त्याचे ‘अल्बम’ लोकप्रिय देखील ठरले आहेत. म्हणूनच हे पुन्हा नमूद करावेसे वाटते की, संतूरचे शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावर प्रस्थापित होणे इथपासून त्याचे फ्युजन संगीताशी जुळवून घेणे, हा सारा प्रवास पं. शिवकुमार शर्मा ह्यांच्या डोळ्यादेखत पार पडला. आणि म्हणूनच हा प्रवास अद्भुत, चमत्कारिक व क्रांतिकारी आहे!

सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे नव्या संगीतप्रकाराला व्यासपीठावर पोचण्यासाठी व तिथे प्रस्थापित होऊन टिकाव धरण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु त्याची परंपरा तयार होण्यासाठी शिष्य घडवावे लागतात. राहुल शर्मा, सतीश व्यास, मदन ओक, ताकाहीरो अराई यांच्यासारखे शिष्य तयार केल्यामुळे संतूर आज देशभरात व जगभरातही गाजत आहे. म्हणूनच पं. शिवकुमार शर्मा ह्यांच्या शैलीचे आता परंपरेत रूपांतर झाले आहे असं म्हणायला वाव आहे.

वसंतराव देशपांडे एकदा स्वतःबद्दल म्हणाले होते तसेच पं. शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल म्हणता येईल, त्यांचे घराणे हे त्यांच्यापासूनंच सुरू झालेलं आहे.

आशय गुणे, शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0