पँथर राजा ढाले यांचे निधन

पँथर राजा ढाले यांचे निधन

दलित पँथरचे एक संस्थापक आणि विचारवंत राजा ढाले यांचे आज सकाळी मुंबईमध्ये विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी  निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्

रिलायन्स जिओची ‘ट्राय’कडे धाव
मुख्यमंत्र्यांवर मानहानी, फसवणुकीचे खटले चालणार
बाय बाय टाईपरायटर

दलित पँथरचे एक संस्थापक आणि विचारवंत राजा ढाले यांचे आज सकाळी मुंबईमध्ये विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी  निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत उद्या दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता विक्रोळी पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार असून, अंत्ययात्रा विक्रोळीहून दादर येथील इलेक्ट्रीक स्मशानभूमी येथे दुपारी पोहोचणार आहे.

आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, बंडखोर लेखक आणि कवी, लढाऊ कार्यकर्ते आणि चळवळीचे मार्गदर्शक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी नामदेव ढसाळ आणि अरुण कांबळे यांच्या मदतीने दलित पँथरची स्थापना केली होती. त्याआधी ते भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये होते.

भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर १९९९ मध्ये राजा ढाले यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. २००४ साली यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. पण ते निवडून आले नव्हते. परखड विचारांसाठी आणि आक्रमकतेसाठी प्रसिध्द असणाऱ्या ढाले यांनी सत्यकथेमधून लिखाण केले. भारतीय स्वातंत्र्याला प्रश्न करणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा त्यांचा लेख गाजला होता.

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग आणि ज.वी. पवार यांच्यासमवेत राजा ढाले.

माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रतापसिंग आणि ज.वी. पवार यांच्यासमवेत राजा ढाले.

तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुअनियतकांमध्ये राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन ठिकठीकाणी प्रसिद्ध झाले आहे.

बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, ‘रिपब्लिकन चळवळीतील नेतृत्व हरपले’, अशा शब्दात श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणतात, “फुले-आंबेडकरी चळवळीचा इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार, ६०-७० च्या दशकात नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी दलित पँथर उभी केली. या संघटनेने आंतराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधले. राजाभाऊ ढाले यांनी दलित साहित्यात संशोधनाचे काम मोठ्या प्रमाणावर केले. चळवळीतील वास्तव, संघटनात्मक लिखाणाचेही काम त्यांनी केले. आंबेडकरी चळवळ ही विचारांची असली पाहिजे असं मानणारे राजाभाऊ ढाले होते. आणि त्याचे विश्लेषण करण्यात राजाभाऊ यांचे मोठे योगदान आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठं नुकसान झालं आहे.”

ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी सोशल मिडीयावर लिहिले आहे, “राजा ढाले विद्वान होते.
त्यांच्या लिखाणाला आणि वाचनाला शिस्त होती. दलित पँथर हा शब्द त्यांनी घडवला. अमेरिकेतील ब्लॅक पँथरवरून प्रेरणा घेऊन. त्या चळवळीचा अभ्यास त्यांनी केला होता. पुढे कम्युनिस्टांनी ही चळवळ हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ढाले नेहमीच कम्युनिस्टांचे कडवे टीकाकार राहिले. साधना साप्ताहिकात त्यांनी लिहिलेल्या लेखाने वादळ उठलं होतं. ही गोष्ट साठच्या दशकातील.
दलितांच्या दृष्टीतून भारतीय स्वातंत्र्यदिन आणि तिरंगा कसा दिसतो हे त्यांनी मांडलं. हा विद्रोह पुढे दलित साहित्याची निशाणी बनली. नामदेव ढसाळ यांच्या कवितांची पहिली समीक्षा राजा ढाले यांनीच एका भाषणात केली होती. दलित पँथर नावाचं वादळ महाराष्ट्रात निर्माण करण्यात या दोघांची भाषा आणि भूमिका महत्वाची ठरली. “

“राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक, दलित पँथरचा महानायक हरपला आहे”, अशी भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0