‘अग्निपथ’ लष्कराला बरबाद करेलः परमवीर चक्र विजेत्याची खंत

‘अग्निपथ’ लष्कराला बरबाद करेलः परमवीर चक्र विजेत्याची खंत

नवी दिल्लीः भारतीय लष्कराची अग्निपथ भरती योजना देशाच्या लष्कराला बरबाद करेल, याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल व त्याचा फायदा चीन-पाकिस्तानला होईल, असा इशारा परमवीरचक्र पुरस्कार विजेते निवृत्त कॅप्टन बाना सिंह यांनी दिला आहे.

द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तात ७३ वर्षाच्या बाना सिंह यांनी चार वर्षांची अग्निपथ योजना भारतीय लष्करासाठी योग्य नाही, ही योजना देशाचे लष्कर उध्वस्त करेल, भारत अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे, असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारताचे तरुण हे मातृभूमीचे भविष्य आहे. या योजनेचा शत्रूला फायदा होईल. सैनिक तयार करणे हा खेळ नाही, अनेक वर्षांचे प्रशिक्षण त्यासाठी लागते. केवळ सहा महिन्याच्या प्रशिक्षणाने त्यांना काय मिळणार असा सवाल बाना सिंह यांनी उपस्थित केला आहे. या योजनेवर सर्व देशाने बोलले पाहिजे, एकट्याने बोलून काही फरक पडणार नाही, याची किंमत मोठ्या प्रमाणात चुकवावी लागेल. ही योजना ज्यांनी बनवली आहे, त्यांना भारतीय लष्कराची माहिती नाही. सैन्यासोबत असे खेळ करणे अयोग्य आहे. चीन व पाकिस्तानसारखे देश याचा सर्वाधिक फायदा उचलतील. चीन आपल्या सीमाभागात घुसखोरी करेल, असा इशाराही बाना सिंह यांनी दिला आहे.

परमवीर चक्र विजेते बाना सिंह

जून १९८७मध्ये तेव्हा भारताच्या लष्करात कार्यरत असलेल्या बाना सिंह यांनी २१ हजार फूट उंचीवरील सियाचेन भागात पाकिस्तानच्या एका चौकीवर हल्ला केला होता. यात त्यांनी ६ पाकिस्तानी जवानांना ठार मारले होते व ही चौकी ताब्यात घेतली होती. बाना सिंह यांच्या या शौर्याचा गौरव म्हणून या चौकीचे नाव बाना पोस्ट असे ठेवण्यात आले आहे. बाना सिंह यांना त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून १९८८मध्ये भारतीय लष्करातील सर्वोच्च वीर पुरस्कार परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते. बाना सिंह सेवानिवृत्त होत असताना सुभेदार मेजर पदावर होते पण निवृत्त झाल्यानंतर त्यांना कॅप्टन पदाने गौरवण्यात आले होते.

बाना सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अग्निपथ योजनेवर टीका करणारे ट्विट केल्यानंतर खळबळ उडाली होती. या ट्विटनंतर त्यांना अनेक लोकांकडून फोन येण्यास सुरूवात झाली, त्यानंतर त्यांनी आपले ट्विट हटवले पण त्यांनी आपल्या मनात जे आहे ते बोलून दाखवणार असल्याचा निश्चय जाहीर केला. भारतीय लष्कराच्या हिताचे आपण कायम बोलत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

मूळ वृत्त  

COMMENTS