‘पॅरासाईट’ – नवउदारमतवादी जगाचा भेसूर चेहरा

‘पॅरासाईट’ – नवउदारमतवादी जगाचा भेसूर चेहरा

दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाईट’ या चित्रपटाला नुकत्याच झालेल्या ७७व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट परदेशी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले.

मतदारसंघ पुनर्रचनेत जम्मूला ६ तर काश्मीरला १ नवी जागा
‘सुल्ली डील्स’अॅप बनवणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग २

‘पॅरासाईट’ म्हणजे जगण्यासाठी इतर जीवावर अवलंबून असणारा, दुसऱ्या जीवाच्या पोषकद्रव्यांचं शोषण करून जिवंत राहणारा जीव, परजीवी.

८०च्या दशकापासून मोकाट सुटलेला बाजारी अर्थव्यवस्थेचा वारू साधारण गेली ४० वर्षे चौफेर उधळत होता. त्याने नवे तंत्रज्ञान दिले, प्रचंड उत्पादनवाढ केली हे नक्की पण त्यासोबत सर्वसमावेशक विकासाचे जे स्वप्न दाखवले गेले होते त्यालादेखील तितक्याच वेगाने उधळून लावले.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘पॅरासाईट’ हा बॉन्ग जून हो (Bong Joon Ho) दिग्दर्शित साऊथ कोरियन सिनेमा या व्यवस्थेवर अतिशय मर्मभेदी टिपणी करतो.

दक्षिण कोरियामधील सोलमध्ये हे कथानक घडते. या अतिशय महागड्या महानगरातील एका गरीब वस्तीमधील छोट्याशा तळघरात राहणाऱ्या किम कुटुंबियांची ही कथा. बेताच्या परिस्थितीमध्ये मिळेल ते काम करून गुजराण करणार हे जुगाडू कुटुंब. कुटुंबातील मोठ्या मुलाला अचानक एक दिवशी त्याच्या मित्रामुळे एक तात्पुरत्या नोकरीची संधी चालून येते. महानगरातील अतिश्रीमंत अशा पार्क कुटुंबातील मुलीला शिकवण्याचं काम त्याला मिळतं.

त्यानंतर त्याच्या आधारे बाकीचे किम कुटुंबीय त्या अतिश्रीमंत घरात आपला शिरकाव करून घेतात आणि मग सुरू होतो जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असणाऱ्यां परजीवींचा खेळ.

डावीकडून चोई वू शिक (पात्र - किम कि वू), सॉन्ग कांग हो (पात्र - किम कि टेक), चान्ग हे जीन (पात्र - किम चुंग सुक) आणि पार्क सो डॅम (पात्र - किम कि जुंग)

डावीकडून चोई वू शिक (पात्र – किम कि वू), सॉन्ग कांग हो (पात्र – किम कि टेक), चान्ग हे जीन (पात्र – किम चुंग सुक) आणि पार्क सो डॅम (पात्र – किम कि जुंग)

एकीकडे राहण्यासाठी खास डिझाईन करून घेतलेला प्रचंड घर जणू आधुनिक किल्ला तर एकीकडे खुराडं. जगण्यातील विसंवादी प्रतीकात्मकता इथेच संपत नाही. किम कुटुंब स्वस्तात मिळणाऱ्या अन्नावर त्यांची गुजराण करत आहेत आणि कामाचे थोडे पैसे आले की टॅक्सी चालकांसाठी सबसिडी असणाऱ्या बुफे रेस्टॉरंटमध्ये खाऊन आनंद साजरा करत आहेत. याउलट, पार्क त्यांच्या फ्रिजमध्ये निव्वळ पाण्याचे वेगवेगळे  प्रकार बाळगून आहेत, त्यांच्या कुत्र्यांनासुद्धा उच्च दर्जाचे सेंद्रिय अन्न आणि जपानी क्रॅबस्टिकस वगैरे खायला देतात. उत्पन्नाची तुटपुंजी साधनं असणारं किम कुटुंबीय दक्षिण कोरियाच्या कामगार वर्गाचं प्रतीकात्मक रूप म्हणून समोर येतं. आणि याच्या संपूर्ण उलटं चित्र म्हणजे प्रचंड श्रीमंत असणारे पार्क कुटुंबीय, ज्यांना जणू जगण्याचे विशेष अधिकार देऊ केले गेले आहेत.

जगातील १० महागड्या शहरांपैकी एक असलेल्या सोलमध्ये कष्टकरी वर्गाला जास्त कॅलरी मिळवण्यासाठीचा एक स्वस्त मार्ग म्हणून आज या अशा रेस्टॉरंटमध्ये जावं लागतं. हे केवळ सिनेमाच्या कथानकातील एक प्रतिक म्हणून उरत नाही.

आपल्या देशात आज याहून भयंकर परिस्थिती आहे ही बाब अलहिदा. कष्टकरी वर्गाला स्वस्तात उपलब्ध असणाऱ्या बीफवर बंदी आणून, आपण एका मोठ्या लोकसंख्येच्या पौष्टिक आहारावर घाला घातला आहे.

कथानकाला अनेक पदर आहेत पण केंद्रस्थानी आहेत ते किम कुटुंबीय. स्टोरी टेलिंगचा एक उत्तम नमुना म्हणून या सिनेमाकडे पाहावे लागेल. ज्या क्षणी तुम्हाला वाटते की सिनेमाला जे सांगायचं आहे ते सांगून झालंय त्या क्षणी अजून एक पदर तुमच्यासमोर उलगडतो.   

चो येओ जेओंग (पात्र - पार्क योन क्यो) 

चो येओ जेओंग (पात्र – पार्क योन क्यो)

समाजातील नाही-रे वर्गाचं चित्रण करताना बरेचदा त्याला एका सुपरफिशिअल पातळीवर आणून त्यांचं टाईप कास्ट केलं जातं. ते कसे गरीब आहेत, बिच्चारे आहेत, वगैरे म्हणत राहायचं पण त्यांच्या गरिबीचं मूळ कारण आपण करणाऱ्या शोषणात आहेत हे बिनदिक्कत विसरून जायचं. अशा जाणिवेतून मग ‘There is always room at the top’ किंवा गरिबी म्हणजे फक्त संधीचा अभाव अशी जणांची ‘भाबडी’ समजूत होऊन बसते.

समाजातील बहुतांश संपत्ती ताब्यात ठेवणारा मूठभर लोकांचा आहे-रे वर्ग जेव्हा ज्यावेळी नाही-रे वर्गाला जगण्याचे धडे देऊ बघत असतो तेव्हा त्यातून निर्माण होणारा क्रूर विनोद हा बघण्यासारखा असतो. पण बॉन्ग जून हो आपल्याला त्या गरीब तळघरात उतरवतो, श्रीमंत किल्ल्यातून फिरवतो, खेळवतो, हसवतो आणि आपल्या दांभिक भाबड्या जाणिवांची लक्तरं हळुवार काढत राहतो.

सिनेमात एका सीनमध्ये हे किम कुटुंबीय शेजाऱ्यांच फ्री मिळणार वायफाय बंद झाल्याने चिंतीत आहेत, त्यावेळी अजून कोणते दुसरे फ्री वायफाय मिळेल याच्या शोधात ते घरातला कानाकोपरा पालथा घालतात आणि शेवटी त्यांना ते संडासात मिळतं. यात म्हणावं तर काहीच विशेष घडलेलं नाही तरीही एकूणच सध्याच्या इंटरनेट युगावर एक सटीक भाष्य जाणवतं. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या दारुड्यांनी मुतारी म्हणून रस्त्यावरचा एखादा कोपरा शोधणे समजू शकतं पण त्या कोपऱ्याच्या समोर जी खिडकी आहे तिच्या खाली दुसऱ्या कोणाचं स्वैपाकघर आहे हे आपल्याला त्या तळघरातल्या घरातून बाहेर बघितल्या शिवाय कळत नाही.

सिनेमात एका सीनमध्ये रस्त्यावर रोगराई पसरू नये म्हणून सरकारतर्फे औषध फवारणी सुरू असते. अशावेळी किम कुटुंबीय आपल्या रस्त्यालगतच्या खिडक्या उघड्या ठेवतात कारण त्यांना त्यांच्या घरातील किडे, जंतू फुकट मारून मिळणार असतात. धूर आत आल्यानंतर नकळत एक हसू उमटते, आपण हसतो तो त्यांच्या मूर्खपणाला कारण दिग्दर्शक तसा भास निर्माण करतो पण तुम्ही थोडं खोल पाहिलं तर दिग्दर्शकाला नेमकं काय म्हणायचं आहे ते जाणवतं आणि तुम्ही धुरामध्ये गुदमरून जाता. ते गुदमरतात, आपण हसतो, आपण दांभिक असतो. प्रेक्षकांना हसण्यामध्ये गाफील ठेऊन त्यांना सतत थपडा देण्याचं काम हा दिग्दर्शक करतो. कामगार वर्गाच्या आत्मसन्मानाविषयी, सामाजिक स्थानाविषयी त्यांच्या एकूण जगण्याविषयी या नवउदारमतवादी भांडवली जगाला वाटणारी शून्य आस्था दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवण्यात अतिशय यशस्वी होतो.

बॉन्ग जून हो त्याच्या सिनेमामध्ये समाजातील वंचित घटकांचे विषमते विरुद्धचे लढे विविध नॅरेशन पद्धती वापरून चित्रित करत आला आहे. ‘पॅरासाईट’मध्ये तो नवउदारमतवादी भांडवली समाजातील आर्थिक विषमतेवर उपहासात्मक भाष्य करू पाहतो. अशा प्रकारच्या सिनेमांमध्ये येऊ शकणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या क्लिशेपासून तो स्वतःला मुक्त ठेवतो. त्यामुळेच तो मेनस्ट्रीम व्यावसायिक सिनेमा तितकाच प्रायोगिक देखील ठरतो.

काहीच महिन्यापूर्वी आपल्याकडे पावसाने काय विध्वंस केला होता याचा प्रत्यक्षदर्शी असल्याने असेल कदाचित पण पावसाचे थोडे रौद्र रूप पाहिले, की सगळं डोळ्यसमोर उभं राहतं, भीती वाटायला लागते. सिनेमातला पाऊस एक महत्त्वाचा घटक आहे तिथून सिनेमाला एक पूर्ण वेगळे वळण लागते. प्रचंड पाऊस सुरू असताना पार्क कुटुंबाच्या उच्च घरातून किम्स कसेबसे पळ काढून ज्यावेळी त्यांच्या रस्त्याखालील घरात पोहोचतात त्यावेळी पावसाने केलेली दुर्दशा समोर येते. हे चढ-उतार केवळ भौगोलीक नाहीत त्याला सामाजिक परिप्रेक्ष्यात पाहावे लागेल.

बॉन्ग जून हो त्याच्या आधीच्या सिनेमांप्रमाणे (ओक्जा, स्नोपिअर्सर) हवामान बदलाचा संदर्भ इथंही मांडतो. पण इथे तो त्याच्या वर्गीय परिणामांवर अधिक लक्ष वेधतो. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये समाजातील खालच्या स्तरातल्या लोकांवर सर्वात गंभीर परिणाम होत असतो याकडे तो पुन्हा एकदा आपले लक्ष वेधतो.

‘पॅरासाईट’ केवळ गरीब आणि श्रीमंत यांच्यातल्या विरोधाभासाचं चित्रण नाही, इथे शोषित आपल्याला थोडं अधिक मिळावं म्हणून दुसऱ्या शोषितासोबत देखील लढतोय. आधीच कमी असलेल्या साधनांवर पहिला हक्क नेमका कोणी दाखवायचा याविषयी कष्टकरी वर्गामधल्या एकमेकांविरुद्धच्या असणाऱ्या स्पर्धेलादेखील दिग्दर्शक उघडपणे मांडतो.

सिनेमात लॅण्डस्केप्स, पायऱ्या, घराचं टेक्स्चर, खिडक्या, त्यातून येणारा प्रकाश यासारख्या आर्कीटेक्चरल एलेमेंट्सचा अतिशय प्रभावी वापर केला आहे. ज्यांच्याकडे साधने नाहीत त्यांना खिडकीतून येणारा एखादा कवडसा देखील अक्खा सूर्य मानून घ्यावा लागतो. उपभोक्तावादी जगण्याची किंमत ही ज्यांच्याकडे साधनसामुग्रीचा अभाव आहे त्यांनाच जास्त तीव्रतेने चुकवावी लागते.

अजून एका महत्वाच्या सीनविषयी थोडंसं बोलावं लागेल. पार्क ज्यावेळी सहलीला म्हणून बाहेर गेलेले असतात त्यावेळी किम कुटुंबीय पार्कच्या घरी एक पार्टी करतात. हा सीन सिनेमाचा एक टर्निंग पॉईंट म्हणून उलगडत जातो. त्यामध्ये काय काय होतं हे एकूणच पाहण्याची बाब आहे. त्यातील एक संवाद फार महत्त्वाचा आहे, त्यामध्ये किम की (किम कुटुंबातील बाप) म्हणतो की ‘ते (पार्क) श्रीमंत असले तरी चांगले आहेत’ यावर त्याची बायको म्हणते, ‘ते चांगले आहेत कारण ते श्रीमंत आहेत’.  या एका वाक्यावर सिनेमा बॅलन्स होतो असं मला वाटतं. स्टोरी म्हणून देखील आणि सिनेमाचं तत्व म्हणूनदेखील. याच्या आधी आणि नंतर सिनेमा एका साइन वेव्ह सारखा वागत राहतो.

शोषकांचा चांगुलपणा हा तोवरच असतो जोवर शोषित त्यांचे हक्क मागत नाहीत. सिनेमा जसजसा शेवटाकडे सरकतो त्यातील ‘ते’ आणि ‘आपण’ ही दरी वाढत जाते. सिनेमातील पात्रांना ती शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर त्रास देऊ लागते. आणि या सगळ्याचा विस्फोट पार्क कुटुंबातील लहान मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये होतो. आपला समाज कोणकोणत्या पातळीवर दुभंगला गेला आहे याचे उत्तम चित्रण दिग्दर्शक आपल्या समोर ठेवतो.

अनेक चढ-उतार पार करत आपण शेवटाकडे येतो. स्वतःच्या बापाला ‘कधीतरी एक दिवस मी ते घर घेईन’ असे पत्रातून लिहणाऱ्या किम कि वूच्या या स्वप्नाविषयी प्रेक्षकांना देखील एक आशा वाटत राहते पण पत्र संपता संपता कॅमेरा पुन्हा एकदा त्यांच्या तळघरातील खिडकीवरून खाली येत किम किव वू वर येऊन थांबतो आणि या असमान व्यवस्थेतील भाबडा आशावाद तिथेच विरून जातो.

तळघरातल्या या खिडकीला बहुआयाम आहेत. सगळी व्यवस्था तुम्हाला खाली दाबू पाहत असते त्यावेळी तुमच्या आतमध्ये कुठेतरी जिवंत राहण्यासाठी म्हणून कोणत्यातरी एका आशेची गरज असते. त्या आशेच प्रतीक म्हणून देखील तिच्याकडे बघितले जाऊ शकते. शोषितांना एक उमेद देण्याचं काम अशा छोट्या छोट्या खिडक्या करत असतात. लांबवर दिसणार सुखाला आपण कधीतरी शिवू शकू या एका आशेवर त्यांनी या खिडक्या उघड्या ठेवल्या असतात. पण मग अशावेळी त्यामधून आतमध्ये कधी विषारी गॅस आत येतो तर कधी प्रचंड पाणी आणि कधी काहीच नाही

२०व्या शतकाच्या सुरुवातीपासून भांडवली जगामध्ये जे काही बदल घडत गेले त्यातून जगाला नवउदारमतवाद मिळाला. लोकशाहीच्या चकचकीत कोंदणात बसवून उत्तमोत्तम जाहिरातींद्वारे तो जगाच्या गळी उतरवला गेला, जगभरात त्याचे अनेकांनी पायघड्या पसरून स्वागत देखील केले. पण पाहता पाहता त्याची पडझड सुरू झाली. सध्याचे चित्र लक्षात घेता नवउदारमतवाद म्हणजे एक सजवून ठेवलेलं निर्जीव प्रेत आहे की काय इतपत त्याची वाताहत झालेली दिसून येते आहे. ऑक्सफॅमच्या एका अभ्यासानुसार जगातील फक्त २६ व्यक्तींकडे जगातील ५०% गरिबांकडे असलेल्या संपत्ती इतकी संपत्ती आहे. गेल्या १० वर्षांत अब्जाधीशांची आणि वित्तीय घोटाळ्यांची संख्या दुपट्टीने वाढली आहे. ग्लोबल वेल्थ डेटा बुकनुसार जगातली ४५% संपत्ती ही जगातल्या १% व्यक्तींच्या मालकीची आहे.

हे आकडे आणि आपल्या भवतालातलं जगणं याची सांगड घालू म्हटलं तरी शक्य नाहीय. रोज करोडो माणसांचं शोषण करणारी भांडवली व्यवस्था हीच मुळात एक ‘पॅरासाईट’ म्हणून काम करत असते. ज्यावेळी सिनेमा बघून बाहेर पडतो त्यावेळी आपण याचा आपल्याशी असणारा संबंध शोधत असतो आणि हा ‘पॅरासाईट’ आपल्या उरल्या सुरल्या एनर्जीचं शोषण करत असतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0