अ‍ॅना कारेनिना : लिओ टॉल्स्टॉयची महाकादंबरी

अ‍ॅना कारेनिना : लिओ टॉल्स्टॉयची महाकादंबरी

काही वर्षांपूर्वी एका संस्थेने सर्व्हे केला. त्यात असंख्य समीक्षक, लेखक, वाचक यांना १० सर्वकालीन महान अभिजात कादंबरी कोणती असे विचारण्यात आले. त्यात ‘अ‍ॅना कारेनिना’ या कादंबरीला सर्वांनी प्रथम स्थान दिले.

आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
असहमतीचे आवाज

सारी सुखी कुटुंबं एकसारखी असतात, प्रत्येक दुःखी कुटुंबाची कथा मात्र त्यांच्या तऱ्हेनं निराळी असते.

लिओ टॉल्स्टॉय यांच्या अ‍ॅना कारेनिना या कादंबरीतील ही पहिलीच ओळ आहे. कादंबरीच्या सुरवातीलाच एवढी ताकदीची ओळ वाचताच आपल्या हातात एक महान कलाकृती असल्याचा प्रत्यय येतो. अर्थात ही कादंबरी आपण उत्सुकतेने वाचून पाहावी म्हणून हाती घेत नाही तर विश्ववाङ्मयात तिने प्राप्त केलेल्या अढळ स्थानामुळे घेतो हे उघड आहे. मात्र विविध तऱ्हेच्या वाचकांच्या प्रकृती आणि वाचनाच्या आवडीनिवडी ध्यानात घेता साऱ्याच महत्त्वाच्या साहित्यकृती साऱ्यांनाच आवडतील असे नाही. दस्तयेवस्कीची ‘ब्रदर्स कारमाझफ’ ही कादंबरी वाचून झपाटून जाणारे आणि लेखकाच्या कायमस्वरूपी प्रेमात पडणारे जसे वाचक आहेत, तसेच अरे ही काय कादंबरी झाली? मला दहा पानेही वाचवली नाहीत. तिला ग्रेट का म्हणतात ते समजत नाही. अशा प्रतिक्रिया देणारेही वाचक आहेत.

लिओ टॉल्स्टॉय

लिओ टॉल्स्टॉय

टॉल्स्टॉयच्या अ‍ॅना कारेनिनाचे मात्र तसे होत नाही. कादंबरीचे नाव वाचकाला ठाऊक असते. विश्वसाहित्यातील ती एक अत्यंत महत्त्वाची साहित्यकृती आहे हे त्याने ऐकलेले असते. सुमारे हजार पानांची कादंबरी तो साशंक मनाने हातात घेतो. आणि वाचायला सुरुवात करताना पहिल्याच ओळीला त्याला मनमोकळी दाद द्यावी लागते. त्यानंतर मात्र कादंबरी वाचणे त्याच्या दृष्टीने अपरिहार्य ठरते.

वरवर पाहता या कादंबरीची कथा सामान्य अशी आहे. कुठल्याही देशातील, कुठल्याही एका प्रदेशात सर्वकाळ घडू शकेल अशी एक घटना आहे. अ‍ॅना कारेनिना ही विवाहित स्त्री काऊंट रोंस्कीच्या प्रेमात पडतो आणि पुरुष प्रधान समाजात तिची कशी फरफट होते, अखेरीस स्वतःचा जीव देऊनच या क्लेशदायी परिस्थितीतून तिला स्वतःची सुटका करून घ्यावी लागते एवढीच ही कथा आहे. मात्र टॉल्स्टॉय यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर या सामान्य कथेला महाकाव्यसदृश्य परिमाण बहाल केले आहे. कादंबरीच्या शीर्षकावरून सूचित होते तशी ही कथा अ‍ॅना  कारेनिनाची आहे हे स्पष्ट आहे. मात्र ती अ‍ॅनापुरती मर्यादित राहात नाही. उलट या कथेत इतकी सारी पात्रं येतात की पुढे कादंबरीचा खरा नायक कोण असा प्रश्न निर्माण होतो.

आता आपण पुन्हा कादंबरीच्या पहिल्या ओळीपाशी येऊ. “सारी सुखी कुटुंबं एकसारखी असतात, प्रत्येक दुःखी कुटुंबाची कथा मात्र त्यांच्या तऱ्हेनं निराळी असते.’ या ओळीवरून ही कुटुंबाची कथा आहे हे उघड आहे. अ‍ॅना कारेनिनाचं कुटुंब, डॉली आणि स्तिवाचं कुटुंब, किटी आणि लेविनचं कुटुंब या तीन प्रमुख कुटुंबांची ही कथा आहे. सामाजिक व्यवस्थेत कुटुंबाचं स्थान, कुटुंबाची अखंडता आणि तिची प्रतिष्ठा यांची ही कथा आहे तशीच ती स्त्री-पुरुषांतील बदलते नातेसंबंध, परंपरागत जुन्या मूल्यांचे संस्कार आणि आधुनिक जाणिवांचा वाढता प्रभाव यांमधील विविध ताणेबाणे यांचीही कथा आहे.

कथानक :

अ‍ॅना कारेनिना आपला भाऊ आणि वहिनी यांच्यातील बिघडलेले नातेसंबंध पूर्ववत करता येतात का ते पाहावे म्हणून मॉस्कोला येते. स्टेशनवर तिची काऊंट रोंस्कीसोबत भेट होते आणि आणि पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यादरम्यान स्टेशनवर एक दुर्दैवी घटना होते. एक मनुष्य ट्रेनच्या आड येऊन मरण पावतो. अ‍ॅना आणि रोंस्कीच्या पुढच्या नातेसंबंधाची ही घटना सूचक आहे.

अ‍ॅनाला भेटण्याआधी रोंस्की किटीचे प्रणयाराधान करत असतो. मात्र अ‍ॅनामुळे कीटी रोंस्कीच्या आयुष्यातून जणू अदृष्य होते. विवाहित अ‍ॅनाला या गोष्टीची कल्पना येते आणि अधिक गुंतागुंत टाळण्यासाठी ती परत पिट्सबर्गला निघून जाते. अ‍ॅनाच्या प्रेमात पूर्ण बुडालेला रोंस्की तिथेही तिच्या मागोमाग येतो. तू जिथे जाशील तिकडे मी येईन असे अ‍ॅनाला सांगतो. अ‍ॅना वरवर त्याला रोखण्याचा प्रयत्न करते मात्र हळूहळू आपणही रोंस्कीच्या जाळ्यात अडकत चाललो आहोत याची तिला जाणीव होते. अ‍ॅना वस्तुतः मनोमन त्याला पाहण्यासाठी तळमळत असते. पिट्सबर्गमध्ये अनेक भेटींतून दोघांचे प्रेम बहरू लागते. एका प्रसंगी तर अ‍ॅना तिच्या नवरा अलेक्सेई समक्ष स्थळाकाळाचे भान हरपून रोंस्कीच्या हातात हात देऊन गप्पा मारत राहते. आपल्यावर खिळलेल्या अनेक नजरांचे आणि उपस्थित नवऱ्याचेही तिला भान राहत नाही. या घटनेने अलेक्सेई विलक्षण अस्वस्थ होतो. लग्नाच्या पवित्र नात्याने आपण बांधले गेलो आहोत आणि त्याचं पावित्र्य जपणं आपलं कर्तव्य आहे याची आठवण करून देतो. अ‍ॅनावर मात्र त्याचा काही परिणाम होत नाही. रोंस्कीसोबत तिच्या गुप्तभेटी पुढेही चालूच राहतात. अ‍ॅना रोंस्कीच्या प्रेमात पूर्णपणे गुंतून जाते. तिचा लाडका मुलगा सिर्योझा, त्याकडेही तिचे दुर्लक्ष होऊ लागते. तशात रोंस्कीपासून आपल्याला गर्भ राहिलेला आहे हेही तिच्या ध्यानी येते. रोंस्की तिला तिच्या पूर्वायुष्याचे सर्व पाश तोडून आपल्यासोबत येण्यास सांगतो. मात्र अ‍ॅना अजूनही द्विधा मनस्थितीत सापडलेली असते. तिच्या एकुलत्या मुलापासून दुरावण्याचे साहस तिच्याने होत नाही. अ‍ॅनाची स्थिती अजूनच केविलवाणी बनते.

मात्र फार काळ या स्थितीत राहणेही तिला शक्य नसते. अखेरीस घोड्यांच्या शर्यतीदिवशी ती अलेक्सेईला स्पष्ट सांगून टाकते, की माझे तुझ्यावर प्रेम नाही. मी आता रोंस्कीची प्रेयसी आहे आणि तिचीच पत्नी आहे. तुझे माझे संबंध संपलेले आहेत. अलेक्सेई दुखावून शहराबाहेर गावी जातो. ऑफिसच्या कामात स्वतःला निर्दयपणे बुडवून घेतो. इकडे अ‍ॅनाच्या प्रसूतीची वेळ जवळ येते. अ‍ॅनाची मनस्थिती आणि तिची प्रकृती संपूर्ण बिघडून जाते. यातून आपण जगत नाही हे तिला पक्के ठाऊक होते. आपल्या दुष्कृत्यांचा तिला पश्चाताप होतो. आणि अलेक्सेईला तातडीने येण्यास तार करते. त्याची क्षमायाचना करते. अलेक्सेई मुळातच क्षमाशील वृत्तीचा. तो अ‍ॅनाची मनोभावे सेवा करतो. अ‍ॅना अलेक्सेईला आयुष्यभर निष्ठेने राहण्याची शपथ देते. मात्र रोंस्की यामुळे हादरून जातो. पुढचे आयुष्य अ‍ॅनाशिवाय कंठायचे ही कल्पनाही त्याला असह्य बनते आणि छातीवर बंदूक ठेवून तो गोळी उडवतो. गोळी हृदयाचा वेध न करता छातीतून पार होते. रोंस्कीचे प्राण वाचतात मात्र तो गंभीर जखमी होतो.

इकडे अ‍ॅनाला एक सुंदर मुलगी होते. अलेक्सेईच्या सुश्रुषेने तिची प्रकृती सुधारू लागते. आता सारे काही ठीक झाले असे अलेक्सेईला वाटत असतानाच अ‍ॅना पुन्हा रोंस्कीच्या आठवणींनी व्याकूळ होऊ लागते. आता मात्र अलेक्सेई पूर्ण दुखावला जातो आणि अ‍ॅनासोबत नाते तोडून टाकण्याचे ठरवतो. काही दिवसांनी अ‍ॅना नवऱ्याचे घर सोडून रोंस्कीकडे राहायला जाते. आपल्यासोबत मुलगा सिर्योझाला येऊ देण्यासाठी अलेक्सेईची विनवणी करते. अलेक्सेई ते मान्य करत नाही. अखेरीस लहानग्या मुलीला घेऊन अ‍ॅना रोंस्कीसोबत राहायला जाते. त्यामुळे समाजातील तिचे स्थान डळमळीत बनते. अलेक्सेईची, एका सरकारी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून तिला पिट्सबर्गच्या उच्चभ्रू वर्तुळात वरचे स्थान असते. आता रोंस्कीसोबत ती उघडपणे राहू लागल्यावर तिची ओळख रोंस्कीची रखेल अशी निर्माण होते. या लज्जास्पद स्थितीतून स्वतःची सुटका करून घ्यायचा एकच मार्ग तिच्यापुढे असतो. रोंस्कीसोबत लग्न करणे. मात्र कायद्याने ती अजूनही अलेक्सेईसोबत बांधलेली असते. रोंस्कीसोबत लग्न करायचे तर पहिल्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेणे तिला कायद्याने बंधनकारक ठरते. तशी मागणी ती अलेक्सेईकडे करते. मात्र अलेक्सेईचे ख्रिस्ती मन घटस्फोटासाठी तयार होत नाही. अ‍ॅनाला त्यामुळे उध्वस्त झाल्यासारखे वाटते.

एकीकडे प्रिय मुलाचा विरह, लोकांच्या तिरस्कृत नजरा झेलण्याच्या यातना आणि हळूहळू तिच्या आणि रोंस्कीच्या नात्यात निर्माण होऊ लागलेला दुरावा. अ‍ॅनाची परिस्थिती अत्यंत केविलवाणी बनते. तिचे मन थाऱ्यावर राहत नाही. सतत येणाऱ्या उलटसुलट विचारांनी तिची मनस्थिती अत्यंत नाजूक आणि कमालीची धोकादायक बनते. आपले सर्वस्व हरपल्याच्या जाणिवेने ती हतबल बनते. रोंस्कीने आपल्याला सोडून घराबाहेर कुठेही जाऊ नये असे त्याला विनविते. रोंस्की कामानिमित्त बाहेर पडतो. रोंस्कीचे आपल्यावर प्रेम उरलेले नाही, तो दुसऱ्या कुणाच्या प्रेमात अडकलेला असावा अशी शंका तिला येते आणि रोंस्कीच्या मागावर त्याच्या आईच्या घरी निघते. रेल्वे प्रवासात तिच्या डोक्यात शंका-कुशंका थैमान घालू लागतात. आणि एका स्टेशनवर गाडी थांबते तेव्हा चालत्या रेल्वेखाली अ‍ॅना स्वतःला फेकून देते. एका अत्यंत दुर्दैवी नात्याचा करूण अंत होतो. अ‍ॅनाची दुर्दैवी कथा येथे संपते. कादंबरी त्यानंतरही चालूच राहते. मात्र अ‍ॅनाच्या मृत्यूनंतरचा भाग अनावश्यक असल्याची टीका समीक्षक आजही करत असतात.

कादंबरीच्या अखेरच्या काही भागांत टॉल्स्टॉय ईश्वरावरील श्रद्धेची आणि तिच्या आवश्यकतेची सखोल चर्चा करतात. कादंबरीतील एक महत्त्वाचे पात्र लेविन, जो पूर्वायुष्यात अश्रद्ध असतो, आता आपल्या आयुष्याचे प्रयोजन काय? मी जन्माला का आलो? माझे इतिकर्तव्य काय? असे प्रश्न विचारू लागतो. त्याच्या विचारमंथनातून टॉल्स्टॉय यांनी मानवी जीवनात श्रद्धेची आवश्यकता विशद केली आहे. टॉल्स्टॉय यांनी साऱ्याच लेखनात ईश्वरावरील श्रद्धेला अनन्य महत्त्व दिले आहे.

काही वर्षांपूर्वी एका संस्थेने सर्व्हे केला. त्यात असंख्य समीक्षक, लेखक, वाचक यांना १० सर्वकालीन महान अभिजात कादंबरी कोणती असे विचारण्यात आले. त्यात ‘अ‍ॅना कारेनिना’ या कादंबरीला सर्वांनी प्रथम स्थान दिले. श्रेष्ठ कादंबऱ्यांची संयुक्तता ५० वर्षे एवढा दीर्घकाळ टिकून असते असे म्हटले जाते. अ‍ॅना कारेनिना लिहिली गेली त्याला १५० वर्षे उलटून गेली आहेत. आजही तिच्या तोडीच्या कादंबऱ्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1