‘शामुआजो’च्या क्रुजोला आजूबाजूच्या जनावरांमध्ये देखिल ‘त्या’ व्यक्तीचा भास होतो. ‘ईल’ने क्रुजोला वरावे, तसेच क्रुजोला त्याचे मनुष्यत्व त्या अदृश्य व्यक्तीने परत बहाल करावे, ही त्याची ठणकणारी आशा त्याला एका वेगळ्याच वाटेवर नेते. ही वाट डफोच्या क्रुजोने चोखळली नाही, कारण त्याला तेथिल अ-मानवी जीवांशी युती बांधणे आणि रहात असलेल्या भूमीशी गुजगोष्टी करणे, म्हणजे मनुष्यत्वाची हानी वाटली. ‘डॅनिएल डफो’ने १७१९ साली लिहिलेल्या ‘रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा’, या इंग्रजीतील आद्यकादंबरीची जगामध्ये अनेक भाषांमध्ये अनेक रूपांतरणे झाली. फ्रेंच भाषेमध्ये ‘पात्रिक शामुआजो’ने ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, या नावाने २०१२ साली कादंबरी लिहिली. या कादंबरीतील ‘रॉबिन्सन क्रुजो’, हा अतिशय वेगळा आहे. त्याची जीवनमूल्ये आणि जगण्याची आसोशी वेगळी आहे.
‘या बेटावरुन माझी सुटका होत नसल्याने आणि मरणाला सहजासहजी कवटाळता येत नसल्याने, माझ्या हातात फक्त काळाचा एक लांब दोरखंड तेवढा शिल्लक होता; त्याला मी हवे तेव्हा लांब खेचू शकत होतो किंवा हवे तेव्हा गुंडाळून ठेवू शकत होतो…. मी केलेल्या काळावरच्या अशा करणीमुळे, माझे कवचात आक्रसून झोपी गेलेल्या कासवात रुपांतर झाले आहे, की काय असे मला वाटायचे ….; आणि म्हणूनच की काय या बेटावर मी जिथे जाईन तिथे मला कासवे दिसत, खरं तर किनाऱ्यावरील पाऊलखुण पाहिल्यापासून मला आनंदाच्या उकळ्या फुटणं बंद होत नव्हतं, या बेटावर लपून बसलेल्या त्या व्यक्तीला शोधून, तिला फुलासारखे खुडून माझ्यासमोर ठेवायला आणि तिच्या बरोबरील संवादातून माझ्यातल्या गाढ तळघरात दडी मारलेल्या मनुष्यत्वाला बाहेर काढायला मी आसुसलो होतो, त्या कासवांना मात्र कुठलीच घाई नव्हती… ती अत्यंत सावकाश चालीने गोड्या पाण्याकडे जात असत, त्यांना ना कसली शंका होती ना कसली वखवख, डोक्यात तळ्याकडे जाणारा एक मार्ग निश्चित करुन ती जूनी कासवं शांत आणि निराग्रही मनाने चालत जात…. तळ्यातल्या गोड्या पाण्याच्या हाकेला ओ देत एखाद्या भिख्खू प्रमाणे हळूहळू पावलं टाकत…..परमेश्वरा, एकांताची शिक्षा भोगत असताना ही भूमीच तर माझ्या मदतीला येत असे; तिनेच तर मला शिकवले…. धीर धरायला आणि संथपणातील सौंदर्य निरखायला….’
या उताऱ्याने लेखाची सुरुवात करुन, हे नमुद करावेसे वाटते, की ‘शामुआजो’च्या नायकाची स्वत:ला शोधण्याची धडपड दोन व्यक्तींवर अवलंबून आहे. एक म्हणजे त्या पाऊलखूणेचा मालक आणि दुसरी म्हणजे जिथे तो बंदीवासी आहे, ते बेट! ‘शामुआजो’च्या क्रुजोसाठी बेट, ही एक व्यक्ती आहे. फ्रेंचमध्ये बेट नपूसकलिंगी नसून स्त्रिलिंगी आहे. (Île- ‘ईल’ म्हणजे आयलंड/बेट)) त्यामुळे तो रहात असलेल्या बेटाचा उल्लेख तो ती/ तिला/तिचे असा करत असतो. त्याचे कथन वाचताना वाचकाला बऱ्याचदा तो बेटाविषयी बोलत आहे, की एका स्त्रीविषयी बोलत आहे, असा संभ्रम पडतो. खरे तर त्याचे बेटाला स्त्री सदृश्य उल्लेख करणे, हा एक केवळ भाषिक अपघात नाही. ‘रॉबिन्सनेड’ (Robinsonade) या प्रकारामध्ये (जॉनर) वेगवेगळ्या भाषेत लिखाण केलेल्या कीत्येक कथा-कादंबऱ्यांमध्ये उष्णकटीबंधिय बेटावर एकाकी पडलेल्या पुरुषांनी स्वत: राहत असलेल्या बेटाला एका जीवंत माणसासारखी वागणूक दिली. आणि तो जीव बहुतांशी स्त्रिलींगी मानला गेला होता. उदाहरणार्थ, या तर्हेच्या साहित्यिक फाफटपसाऱ्याचा जनक डॅनिएल डफो याच्या कादंबरीत देखिल क्रुजोसाठी, त्याचे बेट ही एक खजिन्याने ओतप्रोत भरलेली, त्याला सतत गूंगारा देणारी आणि त्याचे समाज प्रस्थापित करण्याचे सर्व प्रयत्न सतत निष्प्रभ करणारी एक स्त्री होती, असेच म्हणावे लागेल.
डफोच्या क्रुजोची कहाणी तेव्हा सफल होते, जेव्हा तो त्या बेटरुपी स्त्रीच्या मुसक्या आवळून तिला आपल्या कह्यात आणतो व आपल्या उपयोगासाठी तिच्या जंगलांचा आणि खनिजांचा पुरेपूर वापर करुन घेतो. नैसर्गिक सृष्टीला स्त्री सदृश समजून तिला आपल्या नियंत्रणाखाली आणून माणसाने तिचे शोषण करणे, हा विचार नवीन नाही. अनेक स्त्रीवादी आणि जेन्डर स्टडीच्या अभ्यासकांनी यावर लिहिले आहे. अजूनही तो विचार आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये जाणवतो. आजकाल काश्मिरमधील विकासाच्या सबबी खाली त्यावरील नियंत्रण जास्तच घट्ट केले जात असताना तिथल्या निसर्गावर आणि स्त्रियांवर एकत्र हक्क गाजवू पाहणाऱ्या सोशल मिडियावरील पोस्टस् पाहील्या की हा पुरुषी वर्चस्वाचा प्रभाव आपल्याला लक्षात येतो. (जणू काही काश्मिर मध्ये निसर्ग आणि स्त्रिया यांच्याशिवाय बाकी समाजच नाही.)
जेसन मूर आणि राज पटेल यांनी आपल्या ‘History of the World in Seven Cheap Things’ या पुस्तकात पुरुषी आणि भांडवली वर्चस्वाची पुन्हा आठवण करुन दिली आहे. फ्रान्सिस बेकन या सोळाव्या शतकातील विचारवंताने म्हंटले, “माणसाने विज्ञानाचा वापर सृष्टीचे हाल करुन तिची गुपिते काढून घेण्यासाठी करावा. माणसाला तिचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर त्याला तिच्या गाभ्यात प्रवेश करावा लागेल….” डफोच्या क्रुजोसाठी तो रहात असलेले बेट ही वापरात आणण्यासाठी उपलब्ध असणारी अशी एक स्त्री होती, असे म्हणता ये’ईल’. उधळलेल्या गायीला मुसक्या बाधूंन घरी आणल्यावर तिला दावणीला बांधून तिच्या दूधाची रोज धार काढावी, तसे त्याने त्याच्या बेटाचे रुपांतर संपत्ती (manageable asset) मध्ये केले. कादंबरीच्या सुरुवातील ‘शामुआजो’च्या क्रुजोचे बेटही त्याच वर्गात मोडते, परंतु त्याची ‘‘ईल’’ विकासाच्या मुसक्या बांधल्यावर गप्प बसून राहणाऱ्यातील नव्हती. कधी भयाण तर कधी नितांत सूंदर आणि कामूक, तर कधी एखाद्या विशाल शिळेप्रमाणे मख्ख व कठोर अशी तिची अनेक रुपे ‘शामुआजो’च्या क्रुजोला सतत अचंबित करतात. ‘शामुआजो’चा क्रुजो त्याच्या ‘‘ईल’’ समोर शरण जातो. परंतु त्याच्या शरणागतीची सुरुवात एका पाऊलखुणेने होते.
क्रुजोला त्या पाऊलखुणेचा मालक पुरुषच आहे, अशी प्रथमद्रशनीच खात्री पटते. (आपल्याला जबरदस्त आव्हान देणारा तो पुरुषच असला पाहीजे, हा ही त्यामागील सूचक विचार असावा.) जेंव्हा क्रुजोला ती पाऊलखुण दिसते, तेंव्हा त्याला प्रथम भीतीने धडकी भरते. हा कुणी नरबळी देणाऱ्यांतला असेल तर? अशा विचाराचे तो थरारतो. पण “तो” समोर येतच नाही, हे पाहताच दातओठ खाऊन तो स्वत:च त्याचा शोध घेऊ लागतो. त्याच्या शोधामध्ये तो आपल्या ‘‘ईल’’च्या प्रत्येक गाभ्यांचे, कडेकपारींचे निरिक्षण करतो. या अनोळखी माणसाचे बेटावर आगमन होताच, एरवी ‘‘ईल’’च्या सौंदर्यावियषी उदासीन असलेला क्रुजो, ईर्षेमुळे झडझडून जागा होतो. “त्या” ला आपली ‘‘ईल’’ कशी वाटत असेल बरं? तो आपल्या बेटावर कुठे रहात असेल, आपल्याच शेतातले कुठले धान्य व भाजीपाला खात असेल, आपल्या ‘‘ईल’’च्या कुठल्या कुशीत तो झोपत असेल, या विचारांनी क्रुजो पछाडतो. आणि या ईर्षेमुळेच की काय ‘त्या’ चा शोध घेत असताना क्रुजो हळूहळू ‘‘ईल’’च्याही प्रेमात पडतो. अर्थात ‘‘ईल’’वरचे क्रुजोचे प्रेम हे तिच्यावर हक्क गाजवू पाहणाऱ्या नवीन पाहूण्यामुळेच जागे झाल्याने, ते त्या पाहुण्याशीही निगडीत असतेच.
त्याला स्वत:ची एक माणूस म्हणून ओळख, ‘तो’ च करुन देऊ शकेल, या आशेने क्रुजो त्याकडे आपसूकच ओढला जातो. अशा प्रकारे क्रुजो, तो आणि त्यांची ‘‘ईल’’ असा प्रेमाचा त्रिकुट तयार होतो. इंग्रजीमध्ये जसा जोडी किंवा जोडपे या शब्दांशी संलग्न डायड (dyad) असा शब्द वापरतात आणि जर तीन जणांचे त्रिकुट असेल तर त्याला ट्रायड (triad) असा शब्द वापरतात, तसे या कादंबरीची प्रेमकहाणी डायडवर आधारीत नसून, ट्रायडवर आहे. पण या तीन जणांच्या प्रेमप्रकरणात ‘तो’ कोण आहे, हा प्रश्न बराच काळ अनुत्तरीत राहतो. क्रूजो ‘त्या’चा शोध घेता घेता ‘ईल’ला नव्याने पाहू लागतो. तिची असंख्य रुपे डोळ्यांत साठवतो. ‘ईल’चे गंध आसूसून भरून घेतो, तिच्या प्रत्येक झाडा-पानांची ओळख करुन घेतो, तिचे झरे चाखतो, तिच्या प्राण्यांचे आपापसात चालेलेले बोलणे, भांडणं, त्यांची प्रणयाची मैफील ऐकत राहतो आणि आपल्याशी असे कधी कुणी बोलेल, का या विचाराने खंतावतो. मात्र हे सगळे जगत असताना ‘तो’ आपल्याला लपून पहात आहे, या खात्रीने त्याला धरते. एके दिवशी हजारो कासवांचा समूह ‘ईल’ वरील नदीकडे अलगद स्थलांतर करीत असताना, क्रूजोला त्या महोत्सवात भाग घ्यावासा वाटतो. तो त्या कासवांच्या गर्दीचा भाग होण्याकरीता त्यांच्या मध्येच उघडा झोपतो. कासवही क्रुजोला आपल्या गर्दीत सामावून घेऊन त्याच्या अंगावरून चालू लागतात. काही काळातच क्रुजो त्या हजारो कासवांचा भाग बनतो. त्यांच्या अंगावरील शेवाळे, चिकट स्त्राव यांनी तो लडबडतो. हे सगळे ‘तो’ पाहत आहे, या कल्पनेने क्रुजो सुखावतो.
क्रुजोची ही विकृती वाचकाला अनाकलनीय वाटली, तरी परदेशात राहताना तिथल्या समाजाचा, जमावाचा, निसर्गाचा भाग होऊ पाहण्याचा खटाटोप खूपजणांना नवीन नाही. नवीन प्रांतात आल्यावर बहुतांशी लोकांना नोकरी, विवाह, अपत्यप्राप्ती यातून एक समाजाची चौकट प्राप्त होते. तसे असूनही पाण्यात पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे उपरेपणाची थोडी जाणीव मागे राहतेच! परदेशात कुठल्याश्या लोंढ्यामध्ये एकरूप होऊन जाण्याचा आनंद मिळवण्याच्या अनिवार ईच्छेमुळेच, की काय तिथले भारतीय आपला धर्म, कुटुंब, मूल्यं, देशातील परंपरा व राष्ट्रवाद यांचा झेंडा उत्कटतेने फडकवत एका मोठ्या सामाजिक चौकटीचा भाग होऊ पाहतात. क्रुजोला अशा मूल्यांचे गाठोडे मिळाले नसल्याने त्याची कासवांच्या गर्दीचा भाग होण्यासाठीची तीव्र ईच्छा कुठल्याशा उत्सवात भाग घेण्यासारखीच आहे. या शोधामुळे ‘ईल’वरील जीवसृष्टीची माणूसकी क्रूजोच्या नजरेस पडते. कासवांच्या गर्दीचा तात्पुरता भाग होऊनही क्रुजोला ‘ईल’वरची जीवसृष्टी त्याचे मनुष्यत्व म्हणजे त्याची ओळख परत मिळवून देतील ही खात्री वाटत नाही. त्यामुळे त्याचा अदृश्य माणासासाठीचा शोध चालू राहतो. अथक प्रयत्नांनंतर क्रुजोला ‘तो’ दिसतो आणि क्रुजो आश्चर्याने स्तब्ध होतो.
‘तो’ माझ्या समोरच कुरणामध्ये उभा होता. आजूबाजूच्या बोरीचा पाला ओरबाडून तो चघळत होता. त्याचे वय बरेच असावे. कारण त्याचे केस पांढरे होत आले होते. त्याचे डोळे खिन्न आणि फिकट होते. त्याचा खालचा जबडा एका लयीत हालत होता, पण तो मात्र थंड आणि अलिप्त भासत होता. तो माझ्याकडे ना मैत्रीपूर्ण, ना आश्चर्यचकीत नजरेने निरखत होता. फक्त त्याचे चित्त भंग केल्याने, तो चिडल्यासारखा दिसत होता. त्याला अत्यंत अदबीने कुर्निसात केल्यावर, मी त्याच्याशी आदरपूर्वक बोलायला सुरुवात केली. तो शहारुन दोन पावले मागे सरला. मी अतीशय सौम्य आणि हळू आवाजात पुन्हा बोलायला सुरुवात केली. माझ्या हालचालीतला आदब वाढवून मी त्याच्यासाठी तयार केलेले जिन्नस त्याला दाखवायला सुरुवात केली. त्याने काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही, तेव्हा मी कुरणात बैठक मारुन, मी आणलेल्या भेटींमधील एक एक गोष्ट मी स्वत:च त्याला दाखवण्यासाठी खायला सुरुवात केली. खरं तर त्याच्या शरीराच्या तीव्र दर्पाने मी चमकून गेलो, पण त्याच्या डोळ्यातील अत्यंत शांत आणि ज्ञानी भाव बघून मी पुन्हा बोलायला सुरुवात केली. मी त्याला ‘ईल’च्या व तिच्यावर वास करणाऱ्या जीवसृष्टीच्या कहाण्या सांगितल्या. मी त्याला आणखी काही बाकी सांगायला लागणार, तेवढ्यात तो मागे मागे सरकू लागला आणि लांब जाऊ लागला…. आणि मग मला कळले… तो तर एक बकरा होता…. आणि आगतिकतेने व निराशेने मी हंबरडा फोडला….”
आरसे महालात अडकलेल्या माणसाला जसे भास होऊन आपली प्रतिमा कोणती व दुसऱ्याची कोणती यातील फरक समजणे बंद होते, तसे ‘शामुआजो’च्या क्रुजोला आजूबाजूच्या जनावरांमध्ये देखिल ‘त्या’ व्यक्तीचा भास होतो. ‘ईल’ने क्रुजोला वरावे, तसेच क्रुजोला त्याचे मनुष्यत्व त्या अदृश्य व्यक्तीने परत बहाल करावे, ही त्याची ठणकणारी आशा त्याला एका वेगळ्याच वाटेवर नेते. ही वाट डफोच्या क्रुजोने चोखळली नाही, कारण त्याला तेथिल अ-मानवी जीवांशी युती बांधणे आणि रहात असलेल्या भूमीशी गुजगोष्टी करणे, म्हणजे मनुष्यत्वाची हानी वाटली.
कादंबरीच्या शेवटी क्रुजोचा शोध संपतो, परंतु त्याच्या शोधयात्रेच्या अंतात एका नवीन कथेचा विस्तार होतो. आपल्याच शेपटीचा चावा घेणाऱ्या वेटोळ्या सापाप्रमाणे, ही कादंबरी सुरु तेंव्हा होते, जेंव्हा ती संपते.
क्रमशः
जाई आपटे, या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यात पी. एच्. डी करत आहेत. फ्रेंच भाषेतील साहित्यात प्रतित होणारे मानव आणि निसर्ग/पर्यावरण यांच्यातले संबंध, हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे.
COMMENTS