पवारांचे घर राजकीय चर्चांचे केंद्र

पवारांचे घर राजकीय चर्चांचे केंद्र

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घर सध्या राजकीय चर्चांचे केंद्र बनले आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधी आघाडीच्या सतत बैठका होत असून, त्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत.

देशाला लोकसंख्या नियंत्रणाची नव्हे; रोजगारनिर्मितीची गरज
नेहरूंची काश्मीर ‘चूक’ दुरुस्त करायची तर…….!
चेंजमेकर ‘ नंदीग्राम’

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे घर सध्या राजकीय चर्चांचे केंद्र बनले आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधी आघाडीच्या सतत बैठका होत असून, त्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आहेत.

बुधवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी ९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या वतीने यशवंत सिन्हा, समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी, राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विनय विश्वम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निलोत्पाल बसू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीद मेमन, वंदना चव्हाण आदी नेते उपस्थित होते. शिवाय, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, पटकथा लेखक जावेद अख्तर, काँग्रेसचे माजी प्रवक्ते संजय झा, जनता दल (संयुक्त)चे माजी सदस्य पवन वर्मा, निवृत्त न्या. ए. पी. शहा, के. सी. सिंग आदी मान्यवरही होते.

या बैठकीनंतर बिगरभाजप-बिगरकाँग्रेस तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली. मात्र, द्रमुक, बसप, तेलुगु देसम, तेलंगण राष्ट्र समिती तसेच अन्य भाजपविरोधी पक्ष या बैठकीला उपस्थित नव्हते. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती.

या बैठकीनंतर बोलताना, ही बैठक राजकीय नव्हती. काँग्रेसला बाजूला सारून पवारांनी राजकीय पाऊल उचललेले नाही. पवारांच्या घरी ही बैठक झाली असली तरी तिचे आयोजन यशवंत सिन्हा यांनी केले होते, पवारांनी नव्हे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी स्पष्ट केले. या बैठकीला शिवसेनेलाही निमंत्रण देण्यात आलेले नव्हते.

काँग्रेसला डावलून भाजपविरोधात महाआघाडी तयार करण्याचा कोणताही प्रयत्न सुरू नाही, असे स्पष्टीकरण ‘राष्ट्र मंच’तर्फे यशवंत सिन्हा यांनी पवार यांच्या निवासस्थानाबाहेर दिले.

काँग्रेसचे कपिल सिबल, अभिषेक मनू सिंघवी, विवेक तन्खा, मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा या पाच काँग्रेस नेत्यांना बैठकीचे निमंत्रण होते; पण ते वैयक्तिक कारणांमुळे येऊ शकले नाहीत. काँग्रेसवर बहिष्कार टाकून राजकीय चर्चा केलेली नाही. ‘राष्ट्र मंच’ हे काँग्रेसविरोधी व्यासपीठ नाही. समविचारी सर्व पक्षांना सहभागी करून घेतले जाईल, असे मेमन म्हणाले.

दिल्लीत एकीकडे शरद पवारांनी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. गेल्या ४८ तासांतील शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यातील ही दुसरी भेट असून १५ दिवसांतील तिसरी भेट आहे. या भेटींमुळे पुन्हा एकदा पवार यांचे निवासस्थान चर्चेत आले आहे. सोमवारी पवारांनी निवडणूक प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केली होती.

भाजपाविरोधात लढताना आम्ही वेगवेगळ्या राज्यांमधील राजकीय परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. भाजपाला टक्कर देताना कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या गोष्टी काम करु शकतात आणि कोणत्या नाही यावर आमची चर्चा झाली. सध्या आम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करत नसल्याचे प्रशांत यांनी सोमवारी चर्चेनंतर स्पष्ट केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0