नवी दिल्लीः ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (एफटीआयआय)च्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील सक्र
नवी दिल्लीः ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ (एफटीआयआय)च्या प्रमुखपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून झालेल्या विद्यार्थी आंदोलनातील सक्रीय असलेल्या पायल कपाडिया या तरुणीच्या ‘ए नाइट ऑफ नोईंग नथिंग’ या डॉक्युमेंट्रीला ७४ व्या ‘कान चित्रपट महोत्सवा’त सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ‘ओईल डी’ओर’ (गोल्डन आय) पुरस्कार मिळाला आहे. पायल कपाडिया ही मुंबईतील चित्रपट निर्माती आहे.
‘ए नाइट ऑफ नोईंग नथिंग’ची कथा भारतातल्या एका विद्यापीठात शिकणार्या मुलीची असून ही मुलगी दूर जाणार्या एका प्रियकराला पत्र लिहीत असते. प्रियकराला लिहिलेल्या तिच्या अनेक पत्रांच्या रुपाने आसपासच्या घटनांमधील बदल, मानवी संबंधातील फरक, स्वप्ने, आठवणी, विरह व कल्पनारम्यता प्रेक्षकांपर्यंत पोहचते.
दिग्गजांचे आव्हान
पायलच्या डॉक्युमेंट्रिला अनेक दिग्गज निर्मात्यांचे आव्हान होते. यात टॉड हायनेस यांची ‘द व्हेलवेट अंडरग्राउंड’, अँड्रिया अरनॉल्ड यांची ‘काऊ’, ऑलिव्हर स्टोन यांची ‘जेएफके रिव्हिजिटेडः थ्रू द लुकिंग ग्लास’, मार्को बेलोचिओ यांची ‘मार्क्स कॅन वेट’, सर्गेई लोजनिस्टा यांची ‘बाबी यार कॉन्टेक्स्ट’, मार्क कजिन्स यांची ‘द स्टोरी ऑफ फिल्मः ए न्यू जनरेशन’ व राहुल जैन यांची ‘इनव्हिजिबल डिमन्स’ या डॉक्युमेंट्रीचा समावेश होता.
गेल्या शनिवारी रात्री कान चित्रपट महोत्सव मंडळाने पायलच्या डॉक्युमेंट्रीला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केले. ज्या फिल्म तज्ज्ञांनी पायलची डॉक्युमेंट्री निवडली त्यामध्ये फ्रान्सचे फिल्म निर्माते-दिग्दर्शक ज्युली बर्टुलुसी, फ्रान्स अभिनेते डेबोरा फ्रँक्वा, फिल्म समीक्षक आयरिस ब्रे, अमस्टरडॅम वृत्तचित्र फिल्मोत्सवचे संचालक ओरवा न्याराबिया यांचा समावेश होता.
विद्यार्थी आंदोलनातील अग्रणी
अनेक बी ग्रेड बॉलिवूड चित्रपट व लोकप्रिय ‘महाभारत’ टीव्ही मालिकेत काम करणारे गजेंद्र चौहान यांची एफटीआयआयच्या प्रमुख संचालकपदी नेमणूक झाल्यानंतर एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन अनेक दिवस सुरू होते. या आंदोलनात पायल कपाडियाने भाग घेतला होता. त्यामुळे तिच्यासह अन्य ३४ विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
या आंदोलनाच्या काळात एफटीआयआयचे तत्कालिन संचालक प्रशांत पाथराबे यांनी विद्यार्थ्यांच्या अपूर्ण असाइनमेंटवर ग्रेडिंग देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. त्या निर्णयाविरोधात पायल कपाडिया हिच्या समवेत अनेक विद्यार्थी आंदोलनात उतरले होते व या विद्यार्थ्यांनी पाथराबे यांच्या कार्यालयाची कथित मोडतोड केली होती, त्या मुळे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
२०१७मध्ये पायल कपाडिया हिच्या १३ मिनिटाच्या ‘ऑफ्टरनून क्लाउड्स’ या फिल्मची कान महोत्सवात निवड झाली होती. त्यावेळी पायलचा फ्रान्सला जाण्याचा खर्च उचलण्यास एफटीआयआयने होकार दिला होता. एफटीआयआयच्या अध्यक्षपदी त्यावेळी अनुपम खेर होते.
मूळ बातमी
COMMENTS