नवी दिल्लीः इस्रायल कंपनी एनएसओच्या पीगॅसस स्पायवेअरच्या जाळ्यात जगातील १४ देशांचे प्रमुख वा सरकारे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये फ्रान्सचे
नवी दिल्लीः इस्रायल कंपनी एनएसओच्या पीगॅसस स्पायवेअरच्या जाळ्यात जगातील १४ देशांचे प्रमुख वा सरकारे असल्याची माहिती उघडकीस आली आहे. यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, द. आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामाफोसा, मोरोक्कोचे राजे मोहम्मद, आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे अध्यक्षांची नावे आहेत.
पीगॅसस स्पायवेअरमार्फत पाळत ठेवल्याचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी या स्पायवेअरच्या माध्यमातून ५० हजारांवर पाळत ठेवल्याचा डेटाबेस फ्रान्सस्थित विना नफा तत्वावर काम करणारी वृत्तसंस्था फॉरबिडन स्टोरीजने उघडकीस आणला होता. या डेटाबेसचे फोरेन्सिक विश्लेषण अमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने केले होते. त्यात ही माहिती उघडकीस आली आहे.
या माहितीनुसार सौदी अरेबियातील सरकारविरोधात भूमिका घेणारे वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार दिवंगत सौदी पत्रकार जमाल खशोगी यांची पत्नी व प्रेयसीचा मोबाइल क्रमांक पीगॅसस स्पायवेअरसाठी निश्चित करण्यात आला होता. त्याच बरोबर इराकचे अध्यक्ष बरहाम सलीह, इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मॅडबाउली, मोरोक्कोचे प्रमुख साद-इदीन अल ओथमनी, लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी, युगांडाचे माजी पंतप्रधान रुहाकाना रुगुंडा, अल्जेरियाचे अध्यक्ष नरुद्दीन बेदुईनी, बेल्जियमचे प्रमुख चार्ल्स मायकेल यांचे मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा मोबाइल क्रमांक २०१९मध्ये पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. तर २०१७-१९ या काळात भारतातील शेकडो मोबाइल क्रमांक, ज्या मध्ये विरोधी पक्षांचे नेते, केंद्रातील मंत्री, न्यायाधीश, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचे मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.
२०१९मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता व भारताने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या काही प्रदेशामध्ये घुसून हवाई हल्ले केले होते, त्याला पाकिस्ताननेही प्रत्युत्तर दिले होते.
इस्रायलची कंपनी एनएसओचे पीगॅसस स्पायवेअर सॉफ्टवेअर हे लष्करी हेरगिरीसाठी वापरण्यात येते व ते फक्त देशांना विकले जाते. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाइल फोनमधील सर्व प्रकारच्या फाइल्स, फोटो, संभाषणाची यादी, मेसेज व अन्य डेटा मिळवता येतो. हे स्पायवेअर मोबाइल फोनमधील कॅमेरा व मायक्रोफोनवरही नियंत्रण ठेवू शकते.
मूळ बातमी
COMMENTS