शतमूर्खांचा लसविरोध

शतमूर्खांचा लसविरोध

अमेरिका म्हणजे पुढारलेपण, अमेरिका म्हणजे बुद्धीची श्रीमंती, अमेरिका म्हणजे विवेकाचे माहेरघर असा गोड गैरसमज बाळगणाऱ्यांची तोंडं पडावीत, असे सध्याचे अमेरिकेचे वर्तन आहे. बरं हे काही आजचं नाही, तर याला अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धापासूनचा जवळपास तीनेक शतकांचा ‘समृद्ध’ इतिहास आहे. या इतिहासात डोकावले, तर विज्ञानाला तसंच विज्ञानाची देणगी असलेल्या लसींना विरोध करणाऱ्या महामूर्खांची, पढतमूर्खांची जंत्रीच हाती लागते. महासत्तेच्या घरातला हा अडाणीपणा जगाच्या दारात पोहोचला तर काय आक्रित घडू शकतं, या विचाराने सुबुद्धांची झोपही उडू शकते...

बीडमध्ये एकाच रुग्णवाहिकेत २२ शवांना स्मशानात नेले
शिक्षक, शिक्षकेतरांचे लसीकरण आवश्यक
भय, अनिश्चितता : लॉक डाऊनचा पहिला दिवस

सध्या युरोपमध्ये लसविरोधात “सुंदर’’ जाळपोळ चालली आहे. जशी गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये झालेली जाळपोळ होती तशीच! युरोपमध्ये एवढा तीव्र लसविरोध असणं ही तशी आश्चर्य वाटण्यासारखी घटना आहे, कारण युरोप हा इंग्लंड-अमेरिकेपेक्षा अधिक प्रागतिक मानला जातो. विज्ञानावर त्यांचा विश्वास आहे. इंग्रजी-भाषिक देशांच्या तुलनेने धर्म-अंधश्रद्धा यांपासून तो लांब आहे. सार्वजनिक फसवणूक (Hoax) आणि त्यातून उत्पन्न होणारे भावनोद्रेक हे दुसऱ्या महायुद्धानंतर तरी कमी झाले आहेत.

अमेरिकेतलं दृश्यही प्रेक्षणीय आहे. बच्चेकंपनी आपापल्या आयांबरोबर शाळेत निघाली आहेत. सर्वांच्या चेहऱ्यांवर मुखपट्टी आहे. त्यांच्या मागून तरुण-वृद्ध, स्त्री-पुरुष त्यांची टिंगल करत येताहेत. काहींच्या हातात फलक आहेत. काही जण आयांच्या रस्त्यात त्यांच्या समोर येऊन त्यांना जाब विचारत आहेत, “या लहानग्यांच्या तोंडावर मुखपट्ट्या बांधताना तुम्हाला जराशी शरम वाटली नाही?” “शरम सोडून द्या.” दुसरा म्हणतो. “कमीत कमी मुलांची दया? त्यांचा प्राणवायू अडवलात तर ती तडफडून मरणार नाहीत का?” मोठ्यांचा असा दंगा पाहून मुलं भेदरून गेली आहेत, हे दृश्य आता सर्वत्र दिसायला लागलंय. इंटरनेटवर अशी नाटकं उदयाला येतात, पसरतात.  

अमेरिकी धर्मवेड

अमेरिकेतील विज्ञानविरोध हे एक आगळंवेगळंच प्रकरण आहे. विज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत अमेरिका अग्रस्थानी असल्यामुळे ही गोष्ट वरवर तरी विसंगत वाटते. खरं म्हटलं तर विज्ञानविरोध हा अमेरिकेच्या जन्मापासून आहे. अमेरिकेत सुरुवातीस स्थायिक झालेल्या लोकांची प्रेरणा धर्माधिष्ठित राज्यस्थापना करणं ही होती. तसंच विज्ञानविरोध व धर्मवेड हातात हात घालून फिरतात या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे, या विसंगतीची फोड करणं कठीण नाही. इतिहासात मागे वळून बघितलं तर अमेरिकेतील धर्मवेड भरती-ओहोटीसारखं वरखाली झाल्याचं दिसून येईल. पण जेव्हा जेव्हा धर्मवेड खाली जायला लागतं, तेव्हा तेव्हा धर्मरक्षकांची तीव्र प्रतिक्रिया होते. अशा प्रतिक्रियांना महान जागृती (Great Awakening) असं नाव आहे आणि त्यांनी रस्ता चुकलेल्या मेंढ्यांना परत कळपात आणलं हे दिसून येतं.

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या वेळी तशीच परिस्थिती आली होती. जॉर्ज वॉशिंग्टनपासून एकजात सर्व राष्ट्रपिते धर्मविरोधी होते. त्याला प्रतिक्रिया म्हणून महान जागृतीची दुसरी लाट आली. त्यातून सर्व देशाला पुन्हा धर्माच्या साखळीनं बांधण्यात आलं. सध्याची, गेल्या चाळीस वर्षांतली ‘पुनर्जन्मित ख्रित्यांची’ लाट तिसरी आहे. अमेरिकेतील ३० टक्के  लोक स्वत:ला पुनर्जन्मित ख्रिती (Born-again Christian) समजतात. लसीवर किंवा विज्ञानावर विश्वास म्हणजे दैवी हस्तक्षेप किंवा येशूची मध्यस्थी यांच्यावर अविश्वास, असं हे लोक मानतात. म्हणून यांचा लसीला पराकोटीचा विरोध. 

अमेरिकी खुळांची ब्रिटिश मुळं

अमेरिकेतल्या लसविरोधी खुळाची मुळंसुद्धा इंग्लंडमध्ये शोधता येतील. (अमेरिका ही तशी अनेक अर्थांनी इंग्लंडची मानसकन्या आहे!) जेव्हा एडवर्ड जेनरनं ऐतिहासिक देवी प्रतिबंधक लस तयार केली (१७९९) तेव्हा अमेरिका हा देश बच्चा होता आणि लस तशी वैचित्र्यपूर्णच गोष्ट होती. धर्ममार्तंडांना अजून ठाम भूमिका सापडायची होती. पण इंग्लंडमध्ये देवीच्या लसीविरुद्ध नंगानाच घातला गेला. (त्या १९व्या शतकातल्या नंग्या नाचात आणि २१ व्या शतकातील अमेरिकेतल्या कोव्हिडच्या लसीविरुद्ध चाललेल्या नंग्या नाचात फारसा फरक नाही.) मोर्चे, घोषणाबाजी, जेनरची प्रतिमा जाळणं, एवढंच काय पण लहान मुलाची लुटपुटीची प्रेतयात्रा-सर्व साग्रसंगीत! आधुनिक जगातील सत्याग्रहासारखे प्रकारही हाताळून झाले. ब्रिटनमध्ये सक्तीचं लसीकरण प्रथम १८५३ मध्ये झालं. पण खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनीच ते त्यावेळी फारसं मनावर घेतलं नाही.

१८६४-६८ या वर्षी देवीची लक्षणीय साथ आली आणि सरकारला लसीकरणाचं गांभीर्य कळलं. ज्या प्रमाणात सरकारची जबरदस्ती वाढली त्याच प्रमाणात लोकांमधला प्रक्षोभ वाढत चालला, आणि १८८५ मध्ये त्याचा स्फोट झाला. लीस्टर हे गाव त्याच्या केंद्रस्थानी होतं. तिथे एक लाखाच्या वर माणसं जमली. कायदेभंग करून तुरुंगात जायला लागली. इकडे देवीही संतापली. तिने पटापट माणसं गिळायला सुरुवात केली. हळूहळू माणसं दमली आणि त्यांनी लस टोचून घ्यायला सुरुवात केली. काय जादू झाली कळत नाही, पण देवीची साथ नाहीशी झाली! 

अमेरिकी संघपण लसविरोधी

विल्यम टेबसारखे ब्रिटिश लसविरोधक १८७९ मध्ये अमेरिकेत पोचले. त्यांनी लसविरोधी संघ स्थापन केला. त्याच्या शाखा १८८० च्या दशकात बॉस्टन, न्यूयॉर्क अशा मोठ्या शहरात पसरल्या. याच्या मागची विविध लोकांची कारणं विविध होती. काहींची धार्मिक, काहींची राजकीय, काहींची स्वच्छतेपोटी, तर काहींची शास्त्रीय सुद्धा! अमेरिकेतील लोक त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टापर्यंत पोचले. त्यांच्या दुर्दैवाने कोर्टाने सक्तीचं लसीकरण घटनेत बसतं असा निर्णय दिला. देवीचं प्रकरण अशा रीतीनं संपुष्टात आलं.

देवी गेल्या आणि दुसऱ्या एका रोगाने डोकं वर काढलं. याचं नाव पोलियो! हाही विषाणूने (व्हायरस) होणारा रोग होता. पोलियो विषाणू माणसाच्या, विशेषत: लहान मुलांच्या, मज्जारज्जूवर हल्ला करतो. त्यामुळे माणूस लुळापांगळा होतो आणि बरेच वेळा दगावतो. १९२१ मध्ये अमेरिकेचे भावी अध्यक्ष रोझव्हेल्ट यांना तो झाला. त्या वेळी ते चाळीस वर्षांचे होते. त्यामुळे त्यांना पोलियो नसावा, असं निदान काही डॉक्टरांनी केलं. (त्यांचा अंदाज बरोबर होता. अध्यक्षसाहेबांना झाला होता गिले-बरे सिंड्रोम.) पण डॉक्टरांचं बहुमत पडलं पोलियोच्या बाजूने. ते एका अर्थी बरं झालं, कारण जेव्हा रोझव्हेल्ट राष्ट्राध्यक्ष झाले, तेव्हा हा महाभयानक रोग लोकांच्या दृष्टिपथात आला. रोझव्हेल्ट यांना सुरुवातीस श्वासोच्छ्वासाकरता कृत्रिम पोलादी फुप्फुसं लागत. त्यामुळे या रोगाची महाभयानकता लोकांच्या मनावर बिंबवली गेली.    

दहेलींचा पाऊस

१९३२ मध्ये रोझव्हेल्ट अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९३८ मध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे ‘दहेलींचा मोर्चा’ (The March of Dimes) या नावाचा नावीन्यपूर्ण निधी चालू केला. या उपक्रमात लोकांनी प्रत्येकी १ डाइम (म्हणजे १० सेंट्स) पोस्टाच्या पाकिटात (किंमत ३ सेंट्स) टाकून ती व्हाइट हाउसला पाठवायची. जमलेल्या निधीचा उपयोग पोलियोच्या लसीच्या संशोधनासाठी करायचा. बघता बघता दिवसागणिक हजारो दहेल्या यायला लागल्या. इतक्या यायला लागल्या की व्हाइट हाउसचं नेहमीचं टपाल त्यात बुडून जायचं. या पैशाच्या प्रवाहाला गमतीने ‘चंदेरी भरती’ असं नाव पडलं. काही वर्षांतच २५ लाख डाइम, म्हणजे अडीच लाख डॉलर, जमा झाले (आजच्या हिशेबाने पन्नास लाख डॉलर). १९४५ मध्ये रोझव्हेल्ट यांचा मृत्यू झाला. एक वर्षाने त्यांच्या वाढदिवसाला डाइम या नाण्यावर त्यांची प्रतिमा आली. 

लससंघर्ष

१९५२ मध्ये पोलियोची मोठी लाट आली. नेहमी जिथे दरवर्षी २० हजार मुलांचा बळी जायचा तिथे या वर्षी ५० हजार मुलं बळी पडली. आता लस शोधणं निकडीचं झालं. पैशांची कमतरता मिटली होती. वेगाने कामाला सुरुवात झाली. (ट्रम्पच्या भाषेत ‘Warp Speed’) बघता बघता दोन यशस्वी लसी तयार झाल्या. एकीत मृत विषाणू, तर दुसरीत अशक्त केलेले जिवंत विषाणू होते. पहिलीचे जनक होते जोनस सॉल्क, तर दुसरीचे अ‍ॅल्बर्ट सेबिन. सॉल्क यांचा डोस  टोचायचा. सेबिन यांच्या संशोधनप्रमाणे पोलियोचे विषाणू मज्जासंस्थेच्या आधी पचनसंस्थेवर हल्ला करतात. त्यामुळे तो डोस प्यायचा. दोन्ही बाजूच्या समर्थकांत जुंपली. सुरुवातीस अमेरिकेतील अधिकृत संस्थांनी दोन वर्षं आधी आलेल्या सॉल्क यांच्या लसीला मान्यता दिली.

सेबिन आपली लस घेऊन सोविएत यूनियनमध्ये गेले. तिथे मिखाइल चूमकॉव्ह नावाच्या शास्त्रज्ञाने तिची सुधारित आवृत्ती रशिया आणि पूर्व युरोपमध्ये वापरून त्या भागात पोलियोचा नायनाट केला. कालांतराने अमेरिकेत दोन्ही लसी वापरायला सुरुवात केली. सेबिन यांची लस तोंडी घ्यायची असल्याने निर्जंतुक सुयांची गरज लागत नसे. इंजेक्शन दिल्यानंतर हात दुखणं किंवा इतर प्रतिक्रिया नसत, या गुणधर्मांमुळे अविकसित देशांना ती फार पसंत पडली. आणि ती साखरेचा क्यूब किंवा गोड गोळ्यातून देत असल्याने लहान मुलं ती आवडीनं घेत. 

लसविरोधकांची कावकाव

सॉल्क यांच्या लसीला एक अपघात झाला. लसीच्या एका तुकडीत काही जिवंत विषाणू गेले. चाळीस हजार मुलांना निष्कारण पोलिओ झाला. ती लुळी पडली आणि त्यातली २०० मृत्यूमुखी पडली. लसविरोधकांनी लगेच कावकाव करायला सुरुवात केली. सुदैवाने तेव्हा इंटरनेट नव्हते. त्यामुळे कावकाव फार लांब पसरली नाही. लसींची तपासणी अधिक कठोरपणे चालू झाली. पुन्हा कधी अपघात झाला नाही. १९७९ मध्ये अमेरिकेतला पोलियो नष्ट झाला. इतरत्र जगात मात्र तो अजूनही तुरळकपणे सापडतो. खास करून पाकिस्तान आणिं अफगाणिस्तानमध्ये. या देशातल्या काही धर्मवेड्यांना लस टोचणं हराम वाटतं.  देवीच्या बाबतीत मात्र पाकिस्तान सरकारनं धर्मवेड्यांना न जुमानता कठोर भूमिका घेतली. याचा परिणाम म्हणजे  १९८० मध्ये जगातला देवी हा रोग मुळासकट नाहीसा झाला! देवीचा समूळ नायनाट हा विज्ञानाचा, विशेषत: वैद्यकीय शास्त्राचा, मुकुटमणी मानला जातो. 

लसीकरणाचं सुवर्णयुग

विसावं शतक हे सर्वार्थानं लसीकरणाचं सुवर्णयुग ठरलं. १९१४ मध्ये डांग्या खोकला, १९२६ मध्ये घटसर्प आणि १९३८ मध्ये धनुर्वात या रोगांच्या रथी-महारथींवर लसी निघाल्या. त्या १९४८ मध्ये लहान मुलांना देण्याकरता एकत्र केल्या. ही तिहेरी लस (DPT) आपल्या सर्वांना परिचित आहे. या तिन्ही लसींचा प्रभाव कालांतराने हळूहळू कमी होत जातो, म्हणून काही वर्षांनी वर्धक द्यावा लागतो. सर्व मात्रा शास्त्रानुसार होऊ लागल्या आणि बालमृत्यूचं प्रमाण धाडकन खाली उतरलं. नुसत्या डांग्या खोकल्याचा विचार जरी केला तर लसीकरणाच्या आधी-उदा, १९४० च्या दशकात-ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांमध्ये या रोगाचं प्रमाण ७० टक्के होतं. ते २० वर्षांच्या लसीकरणानंतर जवळजवळ नगण्य झालं. हे सगळं दृष्ट लागावं असं चाललं होतं आणि शास्त्रज्ञ एकमेकांचं अभिनंदन करण्यात गर्क असताना एका गॉर्डन स्टुअर्ट नावाच्या ब्रिटिश डॉक्टरानं त्यात मिठाचा खडा टाकला. 

मिठाचा खडा

सर्वप्रथम म्हणजे हा डॉक्टर स्टुअर्ट मुळातच लसविरोधक होता. त्याने त्याच्याकडे आलेल्या रुग्णांच्या तपासणीवरून तिहेरी लसीचा मुलांच्या मज्जासंस्थेच्या रोगांशी (neurological disorders) संबंध लावला. सर्वत्र गदारोळ आणि गोंधळ माजला. ते एक प्रकारे वैद्यकीय जमातीला आव्हान होतं. JCVI नामक यू. के. मधील वैद्यकीय संस्थेने ते स्वीकारलं. तिने वय २ते ३६ महिन्याच्या वयोगटातील मज्जासंस्थेचा रोग झालेल्या एकूण एक मुलांची पाहणी केली. त्यावरून स्टुअर्टच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही या निष्कर्षाप्रत JCVI येऊन पोचली. तरीसुद्धा व्हायचं ते नुकसान झालंच. ब्रिटनमध्ये लस घेण्याचं प्रमाण उतरलं आणि त्या प्रमाणात रोग्यांची संख्या आणि बालमृत्यूंची संख्या वाढली.

वरील गोष्ट १९७८ मधली. हा धागा १९८२ मध्ये  अमेरिकेत एका दीडशहाण्या वार्ताहर बाईने पकडला आणि ब्रिटनमधली कहाणी अतिशय सनसनाटी पद्धतीने NBC या वाहिनीवर सादर केली. (कोण म्हणतो Fake news ही फक्त ट्रंपच्या काळातलीच गोष्ट आहे?) आज जरी NBC फारसं कोणी बघत नसलं, तरी त्या काळात तीन राष्ट्रीय वाहिन्यांपैकी ती एक होती. या माहितीपटाला तिनं नाव दिलं होतं, लस एक जुगार! या कार्यक्रमात तिने डॉ. स्टुअर्टची वारेमाप स्तुती केली. तो इंग्लंडमधील औषध सुरक्षा समितीचा सदस्य आहे, अशी त्याची ओळख करून दिली. (तो नव्हता.) त्याचे निष्कर्ष चुकीचे होते आणि त्याबद्दल तो त्याच्या देशात बदनाम झाला आहे, हे लपवून ठेवलं. आम्हाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही? NBC ने उलट प्रश्न केला. 

लसविरोधकांना बळ

झालं! एवढं निमित्त बिळात लपून बसलेल्या लसविरोधकांना पुरलं. ते खोऱ्यानं बाहेर पडले. या कार्यक्रमामुळे एक फायदा झाला, एका विरोधकानं उद्गार काढले. प्रत्येक पालकाला जे वाटत होतं की आपल्या मुलाची बाब ही अपवादात्मक आणि विचित्र आहे. तसं नसून आपल्यासारखे असंख्य लोक आहेत. अनेकांनी कोर्टाचा मार्ग स्वीकारला. (१९८६ पासून अमेरिकेत एक विशेष Vaccine Court स्थापन केलं आहे!) काहींनी DPT च्या लसीविरुद्ध DPT (Dissatisfied Parents Together) या नावाचा गट तयार केला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे लसीकरणाचं प्रमाण कमी झालं आणि डांग्या खोकल्यानं मेलेल्या बालकांची संख्या झपाट्याने वाढली.

DPT या तिहेरी लसीनंतर प्रसिद्ध झालेली दुसरी तिहेरी लस म्हणजे, MMR ची. हे तीन रोग म्हणजे गोवर, गालगुंड, जर्मन गोवर. हे तिन्ही विषाणूंमुळे होतात आणि ते प्रचंड विध्वंसक नसले तरी त्यांच्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची वर्षाला दशसहस्रांपर्यंत असे. यांच्यावर अनुक्रमे १९६३, १९६७ आणि १९६९ मध्ये लसी शोधल्या गेल्या. १९७१  मध्ये या एकत्र केल्या गेल्या. त्यांचा वापर चालू झाल्यापासून हे रोग जवळजवळ हद्दपार झाले. ब्रिटनमध्ये ही लस १९८८ मध्ये पोचली आणि इथून राड्याला सुरुवात झाली. या लसीचा आत्मकेंद्रीतता किंवा एककल्लीपणा (Autism) या रोगाशी  संबंध लावला गेला.

Autism हा रोग वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी होतो. हे झालेला रुग्ण हा स्वत:च्या विश्वातच दंग असतो. कोणाबरोबर त्याला बोलणं-चालणं नको असतं. त्याला भाषा शिकण्यास त्रास होतो. लहानपणी एखादी मोडकीतोडकी भाषा त्याने आत्मसात केलीच असेल, तर तो ती हळूहळू विसरतो. दुर्दैवाने, रुग्णाची ही अवस्था आयुष्यभर राहते. हा विकार सोविएत यूनियन मधल्या एका स्त्री संशोधकाच्या प्रथम लक्षात आला.  

विघ्नसंतोषी संशोधकाचा बॉम्बगोळा

“येनकेन प्रकारेण प्रसिद्धो पुरुषो भवेत्” या अवस्थेची लागण सामान्य माणसांपर्यंत आहे, तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा एखादा महत्त्वाकांक्षी संशोधक-डॉक्टर याला बळी पडतो, तेव्हा राडा होतो. स्कॉटलंडमधला डॉ. अँड्रू वेकफील्ड हा एक प्रसिद्धीलोलूप इसम होता. मूळचा पोटाच्या विकारांचा डॉक्टर. क्रोनचा विकार नावाचा एक मोठ्या आतड्याचा रोग आहे. १९९३ मध्ये डॉ. वेकफील्डने MMR च्या लसीने क्रोनचा विकार होतो असा सिद्धांत मांडला. तो इतर संशोधकांनी खोडून काढला. ब्रिटनमध्ये, आणि इतर जगात, त्याच सुमारास Autism चे प्रमाण वाढत होते. १९९८ मध्ये डॉ. वेकफील्डने MMR च्या लसीचा आणि Autism चा संबंध आहे असा लेख ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकात छापून बाँबगोळा टाकला.

या विषयावर काही वर्षं संशोधकांत वादविवाद माजला. अधिक चौकशीनंतर वेकफील्डचं बिंग फुटलं. ‘लॅन्सेट’ने त्याचा लेख मागे घेतला. नंतर त्याचा डॉक्टरचा परवाना काढून टाकला. पण व्हायचं ते नुकसान झालं होतं. माकडाच्या हातात कोलीत द्यावं असं हे संशोधन लसविरोधक जमातीच्या हातात सापडलं. या घटनेला बारा वर्षे झाली तरी त्या प्रश्नाला फाटे-उपफाटे फुटून तो चिघळतच चालला आहे. आता इंटरनेटचा जमाना आहे. इंटरनेटने सर्व क्षेत्रांचं लोकशाहीकरण केलं आहे. तज्ज्ञ आणि अनभिज्ञ दोन्ही सारखे. या तत्त्वाचा उपसिद्धांत म्हणजे कोणत्याही विषयाची मांडणी समतोल पाहिजे. तज्ज्ञ आणि अनभिज्ञ दोघांना आपली भूमिका मांडायला सारखा वेळ मिळाला पाहिजे. या गोष्टीचा अतिरेक म्हणजे, तज्ज्ञ डॉक्टरांची मतं स्वत:ची विवस्त्र छायाचित्रं देऊन प्रसिद्ध झालेल्या थिल्लर मॉडेलच्या मतासमोर तुच्छ ठरतात. ती जास्त प्रसिद्ध, ती जास्त श्रीमंत म्हणजे ती जास्त हुशार असं समीकरण. अशा या उलट्यापालट्या दुनियेत २०१९ सालच्या शेवटच्या दिवशी कोव्हिडने पदार्पण केलं. 

व्यक्तिस्वातंत्र्याचा अमेरिकी अतिरेक

अमेरिकेत लसविरोध लोकप्रिय असायचं दुसरं कारण म्हणजे, लसविरोधाला असलेली व्यक्तिस्वातंत्र्याची झालर. हे माझं शरीर आहे, हे माझं आरोग्य आहे. माझ्यावर कुणाची जबरस्ती नको. माझं मला ठरवू दे. पण हा फक्त एका व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न नाही. सार्वजनिक आरोग्याचा आहे. हा युक्तिवाद अमेरिकन माणसासमोर फोल आहे. प्रत्येकाने वैयक्तिक हित बघितलं म्हणजे, सार्वजनिक हित आपोआप साधले जाईल हे तत्त्वज्ञान. मुळात, सार्वजनिक या शब्दावर अमेरिकन माणसाचा राग. सार्वजनिक म्हणजे हुकूमशाही, सार्वजनिक म्हणजे जुलूमशाही, सार्वजनिक म्हणजे गुलामगिरी. या सर्वांचं मूर्तिमंत रूप म्हणजे सरकार.

गूगलच्या जमान्यात सर्वजण सर्व विषयांचे पंडित. मोठमोठ्या, बऱ्याचशा निरर्थक, शब्दांची फेक करण्याइतपत तरी. मत, माहिती, प्रचार, हकिगत या सर्वांची गल्लत. एका वाहिनीवर एका वार्ताहरानं सांगितलं, की कोव्हिडच्या लसीमध्ये bioluminescent marker घातलेलं आहे . ज्यायोगे प्रत्येक माणसाचा मागोवा घेणं सरकारला सोपं जाईल. या सगळ्याचा शेवट कसा होतो, हे बायबलच्या अंतिम पुस्तकात यथास्थित दिलं आहे ते वाचा, असा सल्ला त्या वार्ताहरानं दिला. बायोलुमिनेसंट म्हणजे नक्की काय याचा बोध होत नसला, तरी त्यामानाने लोहचुंबक समजायला सोपा. एका लस टोचून घेतलेल्या नर्सनं ओहायो राज्याच्या विधानसभेत कोव्हिडची लस तुम्हाला चुंबकीय करते असं गुपित उघड केलं. ते सिद्ध करायला ती पिना घेऊन आली. दुर्दैवाने, त्या तिला चिकटेनात. 

खुळचटांचा बाजार

असलंच खूळ लागलेली एक महिला तर आणखी एक पाऊल पुढे गेली. कोव्हिडच्या लसीतला चुंबक 5 G टॉवरला विद्युतचुंबकीय किरणांनी जोडला जातो. (अमेरिकेत अजून 5 G आलेला नाही. पण 5 G म्हटलं की दुष्ट चीनचा वास येतो.) पुढे काय होतं हे फारसं स्पष्ट नाही. काहींचं म्हणणं आहे की लसीमधल्या विषाणूंच्या जनुकांमुळे मानवी शरीर विषाणू बनवणारा कारखाना बनेल! त्यांची मुलं अचेतन मानव (zombies) बनतील. असल्या सिद्धांताला फेसबुकवर आताच दहा लाख अनुयायी आहेत. बदमाश लोक स्वत:च्या फायद्याकरता या अनुयायांचा उपयोग करून घेत असतील असं म्हणण्यालाही काही अर्थ नाही. वेड्यांच्या इस्पितळात टाकायच्या लायकीच्या लोकांचा उपयोग तरी काय आहे?

मानसिक रोगाने पछाडलेल्या लसविरोधी मूर्खांना राजकारणात रस असतो, यात काही आश्चर्य नाही. आणि ते राजकारण सहसा सरकार आपल्या मागावर आहे अशा संशयाने झपाटलेल्या उजव्या पंथाचे असते. (याला अपवाद म्हणजे कोव्हिडच्या डबक्यात बुचकळी मारायला आलेले आणि अनेक वर्षं काही कामधंदा नसलेले रॉबर्ट केनेडीपुत्र डेमोक्रॅटिक पार्टीचे आहेत.) यांच्या मते, लसीमध्ये एक कंप्यूटर चिप आहे. ती CIA या अमेरिकेच्या हेरखात्याला सर्व माणसांच्या हालचालींबद्दल इत्थंभूत माहिती पुरवते. याची खरं म्हणजे गरज नाही; त्यांचे फोन ते काम केव्हापासून करताहेत! आणि CIA ला असल्या खुळचट माणसांवर पाळत ठेवण्यापेक्षा दुसरं काही काम नाही का?

इंटरनेटवर शास्त्रीय परिभाषा कानावर पडत असल्याने या मंडळींच्या प्रतिभेला पंख फुटले आहेत. अनेक जणांच्या मते, लस देण्याचा मुख्य उद्देश लोकांचा DNA बदलणं हा आहे. तो बदलून माणसाचा माकड बनवणं, किंवा जमावावर बेछूट गोळीबार करणारा खुनी बनवणं, किंवा राक्षसी अमिबा बनवणं, असे भरपूर पर्याय सुचवलेले आहेत. लस देणाऱ्या कुठल्याही डॉक्टरने रुग्णाच्या अंगावर प्रचंड केस वाढल्याचं आतापर्यंत कळवलेलं नाही. लस न घेतासुद्धा बेछूट गोळीबार करणारे पूर्वीपासून आहेत, त्यात नवीन शोधायचे कसे? त्यामुळे शक्यता अमिबाचीच आहे. पण ते गटारातून वाहून गेले असल्याने तोही पुरावा मिळत नाही. काही जण सरळ मुद्द्याला हात घालतात, लस घेतलीत तर तुम्ही मराल. मग इतक्या लोकांनी लस घेतली त्याचं काय? त्यांचे बहुदा अचेतन मानव (zombies) झाले असतील. तेव्हा त्यांना आपण मेलो हेच कळत नसेल! 

विषाणूंचे बेखबर निर्माते

असल्या मूर्ख लोकांपासून लांब राहणं शहाणपणाचं, असा सल्ला काही लोक देतात. काही दिवसांनी त्याचीही गरज भासणार नाही असं दिसतंय. लस घेतलेल्या पालकांपासून दूर राहा असा सल्ला फ्लॉरिडा या राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देत आहेत. त्याचं कारण असं दिलं जातं, की त्यांचे पालक आता विषाणू बनवायचे कारखाने झाले आहेत आणि त्यांच्या नाका-कानांतून, डोळे आणि तोंडातून विषाणू ढिगाने बाहेर पडताहेत. जे शिक्षक असा सल्ला देण्यात हलगर्जीपणा करतात त्यांना नोकरीवरून काढायची धमकी दिली जाते. सगळ्यात कहर म्हणजे, अशा शाळांत मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची रीघ लागली आहे!

इतक्या प्रचारानंतरही लोक जर लस घ्यायला जात असतील तर त्यांना नंपुसक व्हायची धमकी दिली जाते. शिवाय पुरुषांना त्यांचं वृषण सुजण्याची धमकी दिली जाते. “लस घेऊन माझ्या चुलत बहिणीच्या वेस्ट इंडिजमधल्या मित्राचं वृषण सुजलं,” असं एका सुप्रसिद्ध नटीने जाहीर केलं आहे. आणि ज्याअर्थी ही बातमी डॉक्टरने न देता नटीने दिली त्या अर्थी ती खरी असली पाहिजे असा सार्वजनिक समज आहे. डॉक्टरांवर एवढा अविश्वास का? या गोष्टीला बरीच कारणं आहेत. विज्ञानविरोध हे तर एक आहेच. बदमाश डॉक्टर हे दुसरं. औषध बनवणाऱ्या कंपन्यासुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहेत. बिल गेट्ससारखी तत्त्वच्युत माणसंही त्याला कारणीभूत आहेत.

सामान्य अमेरिकन माणसाची मनोवृत्ती अशी असण्याचं कारण त्याच्या मनात पिढ्यानपिढ्या भरवलेला कम्युनिस्टद्वेष. आणि कम्युनिस्ट म्हणजे नास्तिकता, अनैतिकता, जुलूमशाही, धर्मविरोध, थोडक्यात म्हणजे, अमेरिकन मूल्यांच्या बरोबर विरुद्ध, असं समीकरण मनात बिंबवलेलं. तेव्हा लस हा कम्युनिस्टांचा डाव आहे, असा समज होणं अगदी शक्य आहे. लस घेतलीत तर तुम्ही कम्युनिस्ट व्हाल असं वायोमिंग राज्यातल्या आरोग्यखात्याच्या प्रमुखानं सांगितलं. लस ही कम्युनिझम पसरवण्यासाठी रशिया आणि चीनने तयार केलेलं जैविक अस्त्र आहे, असं तो पुढे म्हणाला.

शास्त्रज्ञांनी सर्व प्रकारच्या रोगांवर लसी शोधल्या आहेत. पण त्यांना मूर्खपणावर अजून लस मिळाली नाहीय.

डॉ. मोहन द्रविड, हे फिजिक्समधील पीएच.डी. असून त्यांचे वास्तव्य अमेरिकेत आहे. त्यांचे ‘मुक्काम पोस्ट अमेरिका’ हे अमेरिकेचं सर्वांगीण दर्शन देणारे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

(१ जानेवारी २०२२ ‘मुक्त-संवाद’ नियतकालिकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0