महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 

महाराष्ट्रामध्ये संचारबंदी 

राज्यामध्ये १४४ कलम लावून, जमावबंदी केल्यानंतरही लोक रस्त्यावर दिसत असल्याने, अखेर आज महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

माध्यमे आणि विषाणू
राज्यात ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाचे ८ रुग्ण
लॉकडाऊन : केंद्राचे पॅकेज आणि तृतीयपंथी समुदाय

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर केले.
यामुळे आता चारपेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

याशिवाय महाराष्ट्रामध्ये जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कोणालाही जाता येणार नाही. जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. देशांतर्गत विमान वाहतूक करण्यास बंदी घालावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार केंद्राने ही मागणी मान्य केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

खाजगी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून, फक्त गरज असेल तर आणि जीवनावश्यक सेवेसाठी वाहतूक सुरु राहील. मात्र खासगी वाहनांमध्ये चालक अधिक दोन जण, तर रिक्षामध्ये चालक अधिक एक जण प्रवास प्रवास करू शकतील.

सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे बंद राहणार असून, धर्मगुरू अथवा पुजारी यांना नित्यउपक्रम करता येतील. तसेच जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यामध्ये अन्नधान्य, औषध, भाजीपाला, शेतीसाठी बी – बियाणे, जनावरांची औषधे आणि पाळीव प्राण्यांसाठी दवाखाने व अन्न उपलब्ध असणार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले, तसेच नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

१५ नवीन कोरोना बाधित रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ८९

राज्यात नवीन १५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे.

मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकट सहवासातील आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा – मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा. व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवताना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यांसारख्या शहरात ताकदीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0