कोरोना महासंकटामुळे सिनेनिर्मिती उद्योगाचे किमान ४ ते ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सिनेमा ट्रेड संघटनेचे म्हणणे आहे. आता चित्रपटगृहे उघडली आहेत, पण चित्रपट नाहीत. अशा वेळी दीपावलीनंतर ईद आणि नाताळ या सणाला सुद्धा हा पडदा झाकोळलेला राहण्याची शक्यता आहे.
२२ मार्च २०२० ते थेट १५ नोव्हेंबर २०२० असा तब्बल ८ महिन्याचा कालावधी. या ८ महिन्यात रुपेरी पडदा चक्क अंधारात होता. चकाचक आणि विविध रंगात सातत्याने न्हाऊन निघणारा आणि दर्दी ते गर्दीमधील सर्वांची इच्छा पूर्ती करणारा हा रुपेरी पडदा पुन्हा एकदा सुरू होतोय पण या वर्षी तरी तो झाकोळलेला राहणार आहे. कारण अनेक बिग बजेट चित्रपट हे आता २०२१च्या जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत. त्यामुळे एरव्ही सणांचा राजा असलेल्या दीपावलीमध्ये सुद्धा हा पडदा प्रकाशमान होणार नाही.
कोरोनाच्या या जागतिक संकटात मनोरंजन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉक डॉउनमुळे देशभरातील सर्वच एक पडदा, तसेच मल्टिप्लेक्समधील सर्व दिवे मालवले गेले. वैविध्यपूर्ण रंगांनी नटलेले हे विश्व अंधारात लोटले गेले.
मुंबई ही बॉलीवूडची राजधानी. आणि याच राजधानीत कोरोनाचा हाहाकार उडालेला. त्यामुळे कधीही न झोपणारी मुंबई ही तब्बल ४ महिने पूर्ण झोपी गेली होती. आणि त्यामुळे बॉलीवूड ही कोमात गेले. ना चित्रीकरण ना काही काम. सिनेमागृह अंधारात. सर्वच ठप्प. त्यानंतर अनलॉक अंतर्गत ऑगस्टपासून व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. पण रुपेरी पडद्यावरील अंधार कायम होता. सिनेमागृहात होणारी गर्दी आणि त्यामधून कोरोना विषाणूचा होणारा संभाव्य प्रसार यामुळे सिनेमागृहाची दारे बंद राहिली. दरम्यान काही निर्मात्यांनी या सर्व कालावधीत आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले.
महाराष्ट्रमध्ये सिनेमागृह सुरू करण्यास ५ नोव्हेंबरपासून मान्यता देण्यात आली पण आतापर्यंत एकही एक पडदा अथवा मल्टिफ्लेक्स सुरू झालेले नाही .
लॉक डॉउनमुळे घरबसल्या लोकांना हे चित्रपट पाहता आले. पण बहुतांश निर्माते हे आपला चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करायचा यासाठी आग्रही राहिले. गुढीपाडवा मग गणपती असे मोठे सण तसेच गेले. किमान दीपावलीमध्ये आपण चित्रपट प्रदर्शित करू शकू असा काहींचा अंदाज होता. पण त्यालाही खो बसला. कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात आली तरी पण पुढील धोका लक्षात घेऊन मग नोव्हेंबरमध्ये राज्यात सिनेमागृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली पण ती निम्या प्रेक्षक संख्येने. मार्गदर्शक तत्वानुसार सिनेमागृह मग दीपावली काळात काहींनी सुरू करू असे सांगितले पण त्यालाही अपयश आले.
दीपावलीचा हमखास सीझन सुद्धा कोरडा गेला. आजमितीस मान्यता देऊनही राज्यातील सिनेमागृहे सुरू होऊ शकली नाही. आणि पुढील काही दिवस ते सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही.
झी प्रस्तुत ‘सूरज पे मंगल भारी’ हा एकमेव चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असला तरी त्याला कोणते सिनेमागृह अथवा मल्टिफ्लेक्स मिळाले याची माहिती नाही. महाराष्ट्रमध्ये अद्याप एकही सिनेमागृह सुरू झालेले नाही. प्रेक्षक ज्या चित्रपटांची वाट पाहात आहेत त्यामध्ये ‘सूर्यवंशी’, ‘छलांग’, ‘अतरंगी रे’, ‘आरआरआर’, तसेच सलमान याचा बहु चर्चित ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘टायगर 3’, ‘राधे’ हे चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होतील .
मुळातच निम्या प्रेक्षक संख्येने सिनेमागृहे सुरू केले तरी प्रेक्षक येणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे खर्च कसा परवडणार हाही कळीचा मुद्दा आहे. त्यातच सर्वच बिग बजेट चित्रपट नवीन वर्षात म्हणजे २०२१ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याने आता कोणते चित्रपट लावून सिनेमागृह सुरू करायचे हाही जटिल प्रश्न असल्याचे अनेक सिनेमागृह चालकांनी सांगितले.
या सर्व प्रकारात एकूणच संबंधित उद्योगावर किमान ४ ते ५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सिनेमा ट्रेड संघटनेचे म्हणणे आहे. दीपावलीनंतर ईद आणि नाताळ या सणाला सुद्धा हा पडदा झाकोळलेला राहण्याची शक्यता आहे. अथवा काही सिनेमागृह सुरू झाली तरी तिथे जुने हिंदी किंवा मराठी चित्रपट पुन्हा लावले जातील पण निम्या प्रेक्षक संख्येत सुद्धा त्या खुर्च्या तरी पूर्ण भरणार का ? हाही कळीचा मुद्दा आहे.
अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.
COMMENTS