राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक राजकीय नेता म्हणून राहुल गांधी यांना बालीश म्हणत असला आणि 'पप्पू’ संबोधून तुच्छ लेखत असला, तरी प्रत्यक्षात मात्र संघी राहुल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक राजकीय नेता म्हणून राहुल गांधी यांना बालीश म्हणत असला आणि ‘पप्पू’ संबोधून तुच्छ लेखत असला, तरी प्रत्यक्षात मात्र संघी राहुल यांच्यामुळे पछाडलेले आहेत. राहुल यांच्यावर उपरोधिक टीका करण्याची आणि त्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी संघी सोडत नाहीत. राहुल यांच्या भारत जोडे यात्रेने संघींना संधींचे कुरणच दिले आहे.
राहुल यांच्या नेतृत्वाखालील या यात्रेत काँग्रेस नेते-कार्यकर्ते १५० दिवसांहून अधिक काळात कन्याकुमारी ते काश्मीर असा पल्ला गाठणार आहेत. समाजाचे ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, एकात्मतेवर प्रकाश टाकणे, हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे. या मार्गात स्थानिक जनता सहभागी होत आहेत आणि स्त्री-पुरुष, लहान मुले राहुल यांना येऊन भेटत आहेत, ते त्यांना मिठीत घेत आहेत, त्यांच्याकडे बघून हसत आहेत असे फोटो अपरिहार्यपणे येत आहेत. काहीशी उशिराने तल्लख झालेली काँग्रेसची सोशल मीडिया टीम हे फोटो सर्वत्र पोहोचतील याची व्यवस्थित काळजी घेत आहे. मुख्य धारेतील माध्यमांनी एकतर राहुल यांच्या यात्रेकडे दुर्लक्ष केले आहे किंवा सत्ताधाऱ्यांचाच सूर आळवण्यात ती धन्यता मानत आहेत. मात्र, या माध्यमांना वळसा घालून सोशल मीडियाद्वारे हे फोटो प्रसृत होत आहेत.
सत्य किंवा तथ्यांची फारशी चाड न बाळगण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपाच्या ‘आयटी’ विभागाने राहुल यांच्यावर बंदुका रोखल्या आहेत. प्रथम त्यांच्या ४१,००० रुपये किमतीच्या टी-शर्टवर कमालीच्या एकाग्रतेने हल्ला चढवण्यात आला. यातील मुद्दा तसा मोघमच होता पण राहुल यांची भपकेबाज राहणी भाजपाला दाखवायची होती. अर्थात काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या १० लाख रुपये किमतीच्या मोनोग्राम्ड सूटचा मुद्दा मांडून भाजपाचा हा मुळात कमकुवत प्रयत्न पार हाणून पाडला. संपूर्ण लांबीमध्ये ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे सोन्याच्या तारेने विणण्यात आलेला सूट पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान परिधान केला होता. त्यावेळीही यावरून मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली होती, राहुल यांनी ‘सूट बूट की सरकार’ या भाषेत पंतप्रधानांच्या सूटवर टीका केली होती. ती जिव्हारी लागून मोदी यांनी सूट विक्रीला काढला आणि गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने ४.३१ कोटी रुपयांना तो विकत घेतला. याची नोंद तत्काळ गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. मोदी यांच्या महागड्या डार्क ग्लासेसवर तसेच अन्य सरंजामावरही काँग्रेसने बोट ठेवले आहे.
काँग्रेसच्या प्रसिद्धी व सोशल मीडिया टीमला नव्यानेच धार आली आहे आणि क्षणाचीही वाट न बघता ही टीम प्रतिहल्ले चढवू लागली आहे. अर्थात कितीही लज्जाहनन झाले तरी भाजपाचा अविश्रांत आयटी विभाग व त्यांचे अनेक पाठीराखे नेटाने ट्रोलिंग सुरू ठेवत आहेत, यात खोटी माहिती पसरवण्याची वेळ आली तरी ते मागेपुढे बघत नाहीत.
राहुल एका क्रॉप्ड केस असलेल्या तरुणीला आलिंगन देत असल्याचा फोटो आणि त्याच्या बाजूला आणखी एक स्त्रीचा फोटो लावून ‘काळजीपूर्वक बघा, हे भारत जोडो नाही, तर भारत तोडो आहे!’ अशा मजकुराचे ट्विट भाजपाच्या आयटी सेलने केले होते. यातील दुसरा फोटो अमूल्या लिओना नोरोन्हा या बंगळुरूस्थित कार्यकर्तीचा होता आणि या कार्यकर्तीला फेब्रुवारी २०२० मध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा दिल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र, राहुल गांधी यांना भेटलेली तरुणी अमूल्या नव्हतीच, ती युवक काँग्रेसची कार्यकर्ती मिवा जॉली होती. भाजपाचे हे ट्विट पोस्ट झाले त्याच दिवशी हॉलिवूड अभिनेते जॉन क्युसॅक यांनी राहुल यांना पाठिंबा देणारे ट्विट केले आणि चुकीची माहिती पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न फोल ठरला.
भाजपाच्या ट्रोलिंगने आत्तापर्यंत फारसा फरक पडलेला नाही पण तरीही राहुल यांना लक्ष्य करणे विरोधक थांबवणार नाहीत, कारण, ते पछाडलेले आहेत. भाजपाच्या ‘काँग्रेसमुक्त भारता’च्या योजनेत गांधी कुटुंबाचा मोठा अडथळा आहे. या कुटुंबाला संपवले म्हणजे काँग्रेस संपली असा भाजपाचा डाव आहे.
आता यात्रेभवतीचे प्रश्न कायम असले, तरी यात्रा पुढे जात आहे. धार्मिक मुद्दयांवरून देशात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याशिवाय या यात्रेमागे अन्य हेतू कोणता असू शकतो? राहुल पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर हा त्यांच्यासाठी मैदान तयार करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस हा सेक्युलर मूल्यांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे याकडे यात्रेच्या माध्यमातून लक्ष वेधायचे आहे का? की अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या सहभागातून काँग्रेसमधील एकात्मता दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे?
यात मात्र विसंगती आहे, कारण, एकीकडे यात्रेने वेग घेतलेला असताना, राजस्थानमधील काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. हा मुद्दा नीट हाताळला गेला नाही, तर काँग्रेसच्या हातातील एकमेव मोठे राज्य निसटू शकते.
अगदी आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत मुख्यालयात गेले, तर त्यांच्या जागी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा भाजपाला तोंड देऊ शकेल अशा नेत्याकडे सोपवावी अशी स्पष्ट मागणी गेहलोत यांच्या समर्थकांनी केली आहे. अन्यथा सामूहिक राजीनाम्यांचा इशारा दिला आहे. पक्षश्रेष्ठींनी पुढे केलेले सचिन पायलट मुख्यमंत्री म्हणून नको आहेत असे गेहलोत समर्थकांनी स्पष्ट केले आहे.
पायलट यांनीही बंड केले होते पण राहुल यांनी त्यांचे मन अखेरीस वळवले. तरीही पायलट व गेहलोत यांच्यातील ताण पूर्णपणे निवळलेलाच नाही आणि बहुसंख्य आमदार गेहलोत यांच्या बाजूने आहेत. पायलट यांना पुढे करण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय पक्षावरच उलटू शकतो. यातून गेहलोत यांची त्यांच्या भागातील पकड तर दिसतेच, शिवाय, पक्षासाठी ते किती महत्त्वाचे आहेत हेही स्पष्ट होते. काँग्रेसप्रती निष्ठेबाबत स्पष्ट असलेल्या मोजक्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत पण अधिक ताणल्यास व्यवस्थेला हलवून टाकण्याची क्षमताही त्यांच्यात आहे.
गेहलोत यांनी पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली असल्याने आता राजस्थानातील स्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे. मात्र, यामुळे सचिन पायलट नाराज होणार आहेत. पक्षाने गेहलोत यांच्या ब्लॅकमेलिंगला बळी पडून त्यांना राजस्थानात कायम ठेवले आणि त्यामुळे आपल्या नेत्याला असलेली मुख्यमंत्रिपदाची संधी गेली, असा विचार पायलट समर्थक करू शकतात. यातून गेहलोत व पायलट यांच्यातील संबंध आणखी बिघडणार हे नक्की. पायलट यांचे समर्थक संख्येने कमी असले, तरी आहेतच आणि पुढील उपाययोजनाही ते नक्कीच आखतील. भाजपा पैशाच्या जोरावर सरकार उलथवण्याची संधी शोधत असल्यामुळे तो धोकाही आहेच. हे प्रकरण अत्यंत सफाईने हाताळून राजस्थानमधील सरकार वाचवण्याची गरज आहे.
काँग्रेसची सत्ता असलेली अनेक राज्ये भाजपाच्या हातात गेली आहेत. काही ठिकाणी काँग्रेसचा निवडणुकीत पराभव झाला, तर काही ठिकाणी आमदारांनी एका रात्रीत पक्ष बदलून भाजपाचा आसरा घेतला आहे. महाराष्ट्रात अन्य पक्षांच्या साथीने असलेले सरकार शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामुळे अचानक पडले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार कोसळले आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यातून दूर झाले. पंजाबमध्ये काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना निवडणुकीच्या काही दिवस आधी पक्षातून काढून टाकण्यात आले आणि राज्यात काँग्रेसची सत्ता जाऊन आपची सत्ता आली. बंडानंतर अल्पकाळासाठी स्वत:चा पक्ष वगैरे काढून अमरिंदर सिंगांनी अखेरीस भाजपात प्रवेश केला.
आता काँग्रेसला आपल्या घराची घडी बसवणे आवश्यक आहे. उचित प्रक्रिया पूर्ण करून नवीन अध्यक्ष नेमला जाणे स्वागतार्ह आहे आणि त्यातून पक्षाची पुनर्बांधणी सुरू झाली पाहिजे. अर्थात हे करण्यासाठी अध्यक्षाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. ‘हाय कमांड’च्या छायेत त्याला काम करावे लागू नये.
मात्र त्याहीपूर्वी काँग्रेसने राजस्थानातील गोंधळ सोडवावा. याची निष्पत्ती यशस्वी असेल तर एक प्रकारची शिस्त लागेल आणि आमदार व खासदार पक्षातच राहतील. कदाचित भारत जोडोप्रमाणेच काँग्रेस जोडो यात्रेची आवश्यकता आहे.
COMMENTS