राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी धुमसले राजकारण

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी धुमसले राजकारण

विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ नावांमध्ये दोन नावे राजकीय नेत्यांची असल्याची चर्चा आहे. त्याला राज्यपाल कोशियारी खो घालतील अशी शक्यता आहे.

मामाचं पत्र हरवलं..
राजभवन की राजकीय अड्डे !
राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता वाढला

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त १२ जणांची नावे विद्यमान महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे देण्यात आली आहेत. पण यातील काही नावावर कोशियारी यांची वक्रदृष्टी पडल्याचे खात्रीलायकरित्या समजते. त्यापैकी एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी ही दोन नावे रडारवर असल्याचे समजते. अथवा सर्व १२ नावे राज्यपाल अमान्य करतील अशीही शक्यता जोर धरत आहे.

विधान परिषदेवर १२ राज्यपाल नियुक्त सदस्य पाठविण्याचा मुद्दा गेली काही महिने राजकारणात चर्चिला जात आहे. विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर लगेचच झालेल्या घडामोडीमुळे राज्यपाल आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कटुता वेळोवेळी जाणवू लागली होती. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यात कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक होते. त्यातच कोरोनाचे संकट आणि लॉक डॉउन यामुळे कोणतीही निवडणूक होणे अशक्य होते. त्यासाठी पर्याय म्हणून राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीत ठाकरे यांचे नाव समाविष्ट करून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण राज्यपाल कोशियारी यांनी त्याला खो घातला. तसेच कोशियारी यांनी आपला ठाकरे विरोध विविध प्रसंग आणि घटना यामधून दाखवला. परिणामी या दोघांमध्ये कटुता वाढीस लागली. आणि त्यावर कळस ठरला तो राज्यातील मंदिर पुन्हा सुरू करण्याच्या प्रश्नांवरून. कोशियारी यांनी आपल्या पदाचा विसर करून उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली पण त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे यांनी कोशियारी यांना कोणी आम्हाला हिंदुत्व शिकविण्याची गरज नसल्याचा टोला हाणला होता.

राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्याला काही मर्यादा आहेत. राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री हाच कार्यकारी प्रमुख असतो. पण कोशियारी यांनी आपले सत्ता केंद्र सातत्याने सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ठाकरे व कोशियारी यांच्यातील दरी वाढत गेली

नियमानुसार राज्यपाल नियुक्त १२ सदस्य निवडणे आवश्यक आहे. ही नावे समाजातील राजकारण वगळता विविध क्षेत्रातील जाणकार अथवा तज्ज्ञ यामधून घेण्यात येतात. आणि ही नावे मुख्यमंत्री राज्यपालांना पाठवितात. ती नावे अंतिम करण्याचा प्रघात असतो.

राज्यपाल कोशियारी यांच्याकडे महाविकास आघाडीने गेल्या आठवड्यात १२ नावे अंतिम मंजुरीसाठी पाठवली आहेत. नावे दिल्यापासून १५ दिवसात त्यावर राज्यपाल यांनी निर्णय घ्यायचा असतो. ही मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत आहे. पण राज्यपाल या सर्व नावांना मान्यता देण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे समजते. विशेषतः राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे आणि शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी ही नावे त्यांना पसंत नसल्याची चर्चा आहे.

घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांच्या म्हणण्यानुसार कलम १६० नुसार राज्यपालांना ही नावे अंतिम करणे बंधनकारक असते. एकदा अमान्य केलेली नावाची यादी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे येते. आणि पुन्हा काही दिवसांनी दुसरी यादी पाठविण्यात येते. पण ही नावे त्यावेळी राज्यपालांना अमान्य करण्याचा घटनेनुसार अधिकार नसतो. कारण मंत्रिमंडळाने ही नावे अंतिम केलेली असतात.

राज्यपाल कोशियारी यांची एकूणच राजकीय कारकीर्द पाहता आजही ते हिमाचल प्रदेशच्या प्रमुख पदासाठी उत्सुक असल्याचे सांगण्यात येते. राज्यपालपदावर असूनही कोशियारी हे राजकीय भूमिकेत असल्याचे वारंवार पाहावयास मिळते. त्यामुळे जी १२ नावे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाठविली आहेत, त्याला ते मान्यता देतात की या सर्व १२ नावाचे बारा वाजवितात हे लवकरच समजेल.

अतुल माने, हे मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0