कॅप्टन अमरिंदर सिंगांचा भाजपात प्रवेश

कॅप्टन अमरिंदर सिंगांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकांच्या काही महिने आधी मुख्यमंत्रीपद व काँग्रेस पक्षाचा त्याग करून स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री कॅप्ट

बंगालमध्ये तृणमूल, पण ममतादीदींचा पराभव
शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय !
मणिपूर सरकार नमले; न्यूज पोर्टलवरील नोटीस मागे

नवी दिल्ली: पंजाब विधानसभा निवडणुकांच्या काही महिने आधी मुख्यमंत्रीपद व काँग्रेस पक्षाचा त्याग करून स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोमवारी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. नरिंदर सिंग तोमर व किरेन रिज्जू यांसारख्या भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांचा पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) हा नव्यानेच स्थापन केलेला पक्षही भाजपात विलीन केला.

भाजपा राष्ट्रीय सुरक्षेप्रती दाखवत असलेल्या बांधिलकीबद्दल त्यांनी पक्षाची प्रशंसा केली आणि आपण भाजपात प्रवेश करण्यामागे हेच कारण आहे, असे ते म्हणाले. कॅप्टन सिंग यांचे पुत्र रानींदर सिंग व कन्या जयइंदर कौर यांनीही यावेळी भाजपात प्रवेश केला.

८० वर्षीय सिंग यांची गेल्या वर्षी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून मानहानीकारक गच्छंती झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पीएलसीची स्थापना केली होती. मात्रत्यानंतर लगेचच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यांना स्वत:ला पटियाला शहर भागातून पराभव पत्करावा लागला होता.

सिंग यांच्यासह पंजाब विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अजिब सिंग भट्टी, माजी संचालक अम्रिक सिंग अलीवाल तसेच हरचंद कौर, हरिंदर सिंग ठेकेदार, प्रेम मित्तल यांसारख्या माजी आमदारांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. सिंग यांचे माजी सल्लागार बीआयएस चहल यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

आपल्या पाठीच्या शस्त्रक्रियेपूर्वी पीएलसीच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली असता, पंजाबच्या भवितव्यासाठी काही करायचे असेल, तर भाजपात प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे मत पडले. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

सिंग यांच्या पत्नी प्रेनीत कौरही भाजपात प्रवेश करत आहेत का असे विचारले असता, “नवऱ्याने जे केले तेच बायकोने केले पाहिजे का,” असा प्रश्न त्यांनी विचारला.

पंजाब हे सीमेलगतचे राज्य असून, सीमेपलीकडील पाकिस्तानकडून राज्याला धोका आहे. अशा परिस्थितीत भाजपाचे केंद्रातील सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्य काम करत आहे, असे ते म्हणाले. यूपीए सरकारमध्ये ए. के. अँटनी संरक्षणमंत्री असताना, भूदल, नौदल व हवाईदलासाठी एकही शस्त्र खरेदी करण्यात आले नाही, असा आऱोप सिंग यांनी केला. मात्र, भाजपा देशाची सुरक्षितता भक्कम करण्यासाठी खूप काही करत आहे, असे ते म्हणाले.

भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती.  आता लवकरच ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कायमच राष्ट्रहिताला प्राधान्य दिले आहे. त्यांचे आम्ही भाजपामध्ये स्वागत करतो, असे केंद्रीयमंत्री तोमर यावेळी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0