प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाला नकार

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाला नकार

नवी दिल्लीः निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश करणार नाही, असे मंगळवारी अखेर स्पष्ट केले. आपल्या काँग्रेस प्रवेशापेक्षा पक्षाला सक्षम नेतृत्व व पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी पक्षाच्या संरचनेतील समस्या दूर करणाऱ्या सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे, असे विधान प्रशांत किशोर यांनी ट्विटरवर केले.

किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या नकारावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी व्यक्त होताना किशोर यांनी केलेले प्रयत्न व सूचना यांचा आभारी असल्याचे मत प्रदर्शित केले. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावर पक्षात बरेच मंथन चालले होते. अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक समिती स्थापन केली होती, या समितीत किशोर यांनी प्रवेश करावा व काम करावे असे त्यांचे मत होते. पण किशोर यांनी ही विनंती फेटाळली. पण त्यांनी काँग्रेसमधील सुधारणांबाबत केलेल्या सूचना व प्रयत्न याबद्दल आभारी आहोत, असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

दरम्यान प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीने तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्रसमितीसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला काही बड्या काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तेलंगण राष्ट्रसमितीची लढत थेट काँग्रेसशी असताना किशोर यांचा काँग्रेस प्रवेश हितसंबंधांचा प्रश्न उपस्थित करतो, असे मत काँग्रेसच्या नेतृत्वाकडून उपस्थित झाले होते. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाला प्रियंका गांधींसह काही नेत्यांचा पाठिंबा होता. सोनिया गांधींचीही किशोर यांनी आपल्यासोबत काम करावे अशी इच्छा होती. पण दिग्विजय सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याला आक्षेप घेतला होता.

मूळ बातमी

COMMENTS