आपची लाट नव्हे सुनामी

आपची लाट नव्हे सुनामी

चंदीगडः पारंपरिक राजकीय पक्षांच्या राजकारणाला वैतागून  पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीच्या झोळीत भरभरून मतदान केले आणि या पक्षाला दुसऱ्या प्रयत्नात सत

४० टक्क्याहून मुस्लिम टक्केवारीचे ५ मतदारसंघ ‘आप’कडे
दंगलग्रस्त जहांगीरपुरी भागात अतिक्रमण विरोधात बुलडोझर कारवाई
कोविड उद्रेक: काँग्रेस, सपाकडून प्रचारसभा रद्द

चंदीगडः पारंपरिक राजकीय पक्षांच्या राजकारणाला वैतागून  पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीच्या झोळीत भरभरून मतदान केले आणि या पक्षाला दुसऱ्या प्रयत्नात सत्तेवर आणले. आप पक्षाने ११७ पैकी ९२ जागा मिळवल्या आहेत. स्पष्ट बहुमताला ५९ जागा हव्या होत्या पण आप त्या पुढेही गेला आहे. पंजाबच्या इतिहासात आजपर्यंत असे यश कोणत्याही राजकीय पक्षाने मिळवले नव्हते, ती किमया आपने करून दाखवली आहे.

पंजाबात आपची लाट एवढी जबरदस्त होती की त्यात शिरोमणी अकाली दल, काँग्रेससारख्या जुन्या पक्षाचे धुरंधर नेते, राज्याचे पाचवेळा झालेले मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, काँग्रेसचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू, काँग्रेसचे बंडखोर नेते अमरिंदर सिंग, अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल अशांचा दारुण पराभव झाला.

आपचा हा केवळ दणदणीत विजय म्हणता येणार नाही तर ती सुनामी असल्याचे मत जमशेद खान या राजकीय विश्लेषकाचे आहे.

आपचे प्रमुख नेते व आता होणारे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी धुरी मतदारसंघातून ५० हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. आपला मिळालेल्या यशानंतर मान यांनी एक छोटे भाषण दिले. या भाषणात त्यांनी मला केवळ एक महिना द्या, त्यानंतर तुम्हाला राज्यात वेगाने बदल दिसतील असे विधान केले. राज्यात पहिल्यांदा बेरोजगारीचा मुद्दा हाती घेतला जाईल, आमचे सरकार मोठ्या बंगल्यातून, प्रासादातून नव्हे तर खेड्यांतून चालेल असा टोला त्यांनी अमरिंदर सिंग व बादलना उद्देशून मारला. पूर्वी सामान्य माणसाला त्याच्या कामासाठी सरकारी ऑफिसच्या गेटवर यायला लागायचे आता सरकारी ऑफिसचे सामान्य माणसाच्या दारात येईल, असेही त्यांनी आश्वासन दिले.

आपचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सामान्य माणसाला दुर्लक्ष करू नका, तो कोणत्याही प्रभावशाली नेत्याला घरचा रस्ता दाखवू शकतो, असे प्रतिपादन केले. पंजाबच्या जनतेने आमच्यावर भरभरून विश्वास दाखवला आहे, त्याने भयभीत व्हायला होतेय पण आम्ही अहंकारी राहून कारभार करणार नाही असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांनी व्यवस्था बदलण्यासाठी परिवर्तनाची गरज असते असे म्हटले होते, ते परिवर्तन आता होत असल्याचे केजरीवाल म्हणाले.

पारंपरिक पक्ष गारद

आपने पंजाबमध्ये सर्व भागात मुसंडी मारली आहे. माळवा, माझा, दोआब हे प्रदेश सर करत, अमृतसर, लुधियाना सारखे काँग्रेस-भाजपाचे अनेक वर्षाचे असलेल्या गडांनाही खिंडार पाडले आहे.

१९६६ नंतर पंजाबमध्ये अकाली दल व काँग्रेस यांचीच सत्ता कायम राहिली आहे. पण यंदा ही परंपरा आपने मोडीत काढत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकात काँग्रेसला सर्वाधिक मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे. २०१७मध्ये ७७ जागा मिळवलेल्या या पक्षाला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागत आहे. पक्षाचे मातब्बर नेते पराभूत झाले आहे. चन्नी यांचा दोन ठिकाणाहून पराभव झाला आहे. तर मंत्रिमंडळातील ८ मंत्री ज्यात अर्थमंत्री मनप्रीत बादल, उपमुख्यमंत्री ओ. पी. सोनी यांचा पराभव झाला आहे. आपच्या लाटेत सुखजिंदर सिंग रंधवा (डेरा बाबा नानक), त्रिप्ट सिंग बाजवा, राणा गुरजित सिंग (कपूरथळा), राजा वॉरिंग, अरुणा चौधरी (दिना नगर) या मंत्र्यांनी मात्र स्वतःच्या जागा जिंकल्या आहेत.

आपला या निवडणुकात ४१ टक्के मते मिळाली आहेत. २०१७च्या निवडणुकांपेक्षा १७ टक्के जास्त मते मिळाली आहेत. माळवा प्रदेशात आपने ४७ टक्के मते मिळवली आहे. या प्रदेशातील ६९ पैकी ६६ जागा आपने कमावल्या आहेत.

तर काँग्रेस व अकाली दलला अनुक्रमे २२ व १८ टक्के मते मिळाली आहेत. भाजपची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे, त्यांना फक्त ६ टक्के मते मिळाली. नरेंद्र मोदी यांनी पंजाबात अनेक ठिकाणी सभा घेतल्या पण त्याचा फायदा भाजपला झालेला दिसत नाही.

दुसरीकडे संयुक्त समाज मोर्चा या शेतकरी आघाडीचा साफ धुव्वा उडाला आहे.

ध्रुवीकरणाला अपयश

भाजप व अकाली दलाने ध्रुवीकरणाचे प्रयत्न केले. मतदान चालू असताना नजीकच्या हरियाणा सरकारने बलात्कार व अन्य आरोपाखाली तुरुंगात असलेले डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांना जामीन देऊन ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. याला माळव्यातील सामान्य मतदाराने नाकारले. माळव्यात आपला मतदारांनी ६६ जागा दिल्या.

२० फेब्रुवारीला आपच्या विरोधात हिंदू मते जाण्याचीही खेळी खेळण्यात आली. आपचे माजी नेते कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक असल्याचा आरोप केला. त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केजरीवाल यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. केजरीवाल यांच्यावर आरोप केल्यानंतर कुमार विश्वास यांना केंद्र सरकार वाय प्लस दर्जाची सुरक्षा यंत्रणा दिली. या राजकीय चालींचा आपवर परिणाम झाला नाही.

आपची व्यूहरचना

पंजाबमधील आपच्या दमदार कामगिरीमागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सामान्य मतदार काँग्रेस व अकाली दल-भाजप या पक्षांच्या अनेक वर्षांच्या सत्तेला वैतागला होता. या पक्षांच्या एकूण प्रशासकीय कारभारावर जनतेमध्ये नाराजी होती. ही नाराजी आपला फायद्याची ठरली. पंजाबमध्ये अमली पदार्थ व्यापार व व्यसनाधीनता हा प्रमुख प्रश्न आहे. हा प्रश्न अद्याप कोणालाच सोडवता आलेला नाही. माफिया राजही पंजाबमधील प्रश्न आहे. हे प्रश्न आम्ही सोडवू असे आश्वासन आपने जनतेला दिले होते.

दुसरे कारण शेतकरी आंदोलनाचा फायदा आपने उठवला. वर्षभर सुरू असलेल्या या आंदोलनातला कार्यकर्ता हा राजकीय दृष्ट्या जागृत होता. या मतदाराला राज्यात बदल आवश्यक वाटू लागला होता. त्याने पर्याय म्हणून आपला जवळ केले.

तिसरे कारण काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व दुफळी. अमरिंदर सिंग यांची बंडखोरी आणि चन्नी व सिद्धू यांच्यातील शीतयुद्ध याचा राजकीय फायदा आपला मिळाला. काँग्रेसच्या दुफळीमुळे सर्वसामान्य मतदाराला उबग आला व त्यांनी आपच्या झोळीत भरभरून मतदान केले.

आपचा सकारात्मक प्रचार हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्ष कमजोर वाटत होता. अनेक आमदार काँग्रेसच्या वाटेवर गेले पण नंतर पक्षाने जोरदार ऑनलाइन व ऑफलाइन प्रचार केला व यश मिळवले. आपने दिल्ली मॉडेलला प्रचारात महत्त्वाचे स्थान दिले. महिला सबलीकरण, आरोग्य, शिक्षण यांना प्राधान्य दिले जाईल असे मुद्दे प्रचारात आणले. आपने आपल्या जाहीरनाम्यात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज व १८ वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा १ हजार रु.चा भत्त्याची घोषणा केली होती. ही आश्वासने मतदाराला महत्त्वाची वाटली.

आपच्या या विजयामुळे पंजाबमधील सरंजामदार राजकारणाला हादरा बसला असे काही विश्लेषकांचे मत आहे. या निकालानंतर राज्यात नवे नेते पुढे येतील असाही विश्वास काही विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

मूळ लेख   

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0