प्रदूषणाचे जगात दरवर्षी ९० लाख मृत्यू; लान्सेटचा निष्कर्ष

प्रदूषणाचे जगात दरवर्षी ९० लाख मृत्यू; लान्सेटचा निष्कर्ष

दी लान्सेट कमिशन ऑन पोल्युशन अँड हेल्थने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे तब्बल ९० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या लोकसंख्येशी

पहिले इलेक्ट्रिक वाहन राजशिष्टाचार विभागात दाखल
पर्यावरण मंत्रालयाच्या नव्या वन संरक्षण नियमांमुळे वनहक्कांवर गदा
माणूस झाला छोटा, निसर्ग झाला मोठा!

दी लान्सेट कमिशन ऑन पोल्युशन अँड हेल्थने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये जगभरात प्रदूषणामुळे तब्बल ९० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या लोकसंख्येशी याची तुलना केल्यास प्रत्येक सहा व्यक्तींच्या मृत्यूंमध्ये एकाचा मृत्यू प्रदूषणामुळे झाल्याचे लान्सेटचे म्हणणे आहे. २०१५नंतरची ही दरवर्षीची आकडेवारी आहे.

भारतासंदर्भात हे चित्रही भयावह आहे. २०१९मध्ये भारतात प्रदूषणामुळे २३ लाख ५० हजार जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १६ लाख ७० हजार मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले असून जगातल्या अन्य देशांच्या तुलनेत भारतातील ही आकडेवारी अधिक आहे. तर ६ लाख १० हजार मृत्यू हे घरगुती प्रदूषणामुळे झाले आहेत.

जगभरात २०१९मध्ये प्रदूषणामुळे झालेले मृत्यू हे आधुनिक प्रकारच्या प्रदूषणामुळे झाल्याचे लान्सेटचे म्हणणे आहे. आधुनिक प्रदूषण म्हणजे हवेतील विषारी वायू आणि विषारी रसायनांमुळे होणारे प्रदूषण. या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यामुळे गरीबीमुळे होणाऱ्या प्रदूषण मृत्यूंचे कमी झालेले प्रमाणदेखील झाकोळून गेले आहेत. (उदाहरणार्थ, घरातली प्रदूषित हवा आणि पाण्याचे प्रदूषण).

लान्सेटने दिलेल्या माहितीनुसार प्रदूषण हे आजार व अकाली मृत्यू यांच्यासाठी अधिक कारणीभूत ठरले आहे. हे मृत्यू विशेषत: कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आढळलेले आहेत.

२०१९मध्ये प्रदूषणामुळे मृत झालेल्या एकूण ९० लाख मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू हवेच्या प्रदूषणामुळे झाले आहेत. तर १८ लाखाहून अधिक मृत्यू हे विषारी रासायनिक प्रदूषणामुळे (शिशासह) झाले आहेत. प्रदूषणाच्या बळींचे हे प्रमाण जागतिक पातळीवर सर्व मृत्यूंच्या १६ टक्के इतके आहे. २००० सालापासून या प्रमाणात ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हा नवा अहवाल दि लान्सेट कमिशन ऑन पोल्युशन अँड हेल्थ (१) चा अपडेट असून तो दी लान्सेट प्लानेटरी हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे.

या अहवालाचे लेखक रिचर्ड फुल्लर सांगतात की, ‘प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम प्रचंड आहेत. कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न असलेले देश या परिणामांमुळे होरपळून निघत आहेत. प्रदूषणामुळे आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम होत असले तरी आंतरराष्ट्रीय विकासाच्या अजेंड्यावर मात्र प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.’

तर या अहवालाचे सहलेखक आणि बोस्टन कॉलेजच्या ग्लोबल पब्लिक हेल्थ प्रोग्राम अँड ग्लोबल पोल्युशन ऑब्झर्वेटरीचे संचालक फिलिप लाँड्रिगन यांच्या मते, मानवी समाज, पर्यावरण याला सर्वाधिक धोका प्रदूषणामुळे आहे. या प्रदुषणामुळे आधुनिक मानवी समाजाचे निरंतरत्वही धोक्यात आले आहे. प्रदूषणाला आळा घातला व त्याची तीव्रता कमी केल्याने हवामान बदलाची प्रक्रिया मंदावत जाते त्याशिवाय पर्यावरण आरोग्यही सुधारते. आणि जीवाश्म इंधनावर अवलंबून असलेला हा मानवी भार वेगाने स्वच्छ व अक्षय ऊर्जेकडे स्थलांतरित होतो.

आफ्रिकेत २००० सालापासून पारंपरिक प्रदूषणापासून (कोळसा, लाकडे आदि जाळल्याने होणारे घरगुती वायू प्रदूषण आणि दुषित पाणी) होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली आहे. पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या सुविधांमधील सुधारणा, प्रतिजैवके आणि उपचार आणि स्वच्छ इंधने यामुळे हे शक्य झाले.

मात्र, ही मृत्यूदरात झालेली घट औद्योगिक प्रदूषणामुळे वाढलेल्या मृत्यूंमुळे झाकोळून गेली. वातावरणातील प्रदूषण, शिशामुळे होणारे प्रदूषण आणि अन्य प्रकारचे रासायनिक प्रदूषण आदींमुळे औद्योगिक प्रदूषणात गेल्या २० वर्षांत खूप वाढ झाली आहे. औद्योगिक प्रदूषणाची पातळी वाढत असलेल्या आग्नेय आशियात या प्रकारचे प्रदूषण पाहावयास मिळते. येथे औद्योगिक प्रदूषणासोबतच वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि प्रदूषणाची झळ बसलेल्या लोकांची वाढती संख्या या समस्याही आहेत.

२०१९ मधील ४.५ दशलक्ष मृत्यू, २०१५ मधील ४.२ दशलक्ष मृत्यू आणि २००० सालच्या २.९ दशलक्ष मृत्यूंसाठी सभोवतालचे वायू प्रदूषण जबाबदार आहे. विषारी रासायनिक प्रदूषित घटकांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण २००० साली ०.९ दशलक्ष वरून २०१५ मध्ये १.७ दशलक्ष, २०१९ मध्ये १.८ दशलक्ष वरून ते २०१९ मध्ये ९ लाख मृत्यूंपर्यंत वाढत गेले. औद्योगिक प्रदूषणामुळे गेल्या दोन दशकात मृत्यूंचे प्रमाण तब्बल ६६ टक्क्यांनी वाढले आहे. २००० मध्ये ते अंदाजे ३.८ दशलक्ष होते, ते २०१९ मध्ये ६.३ दशलक्ष इतके वाढले. रासायनिक प्रदूषित घटकांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे पडद्याआड राहिले कारण कारखान्यांमधील काही थोड्या उत्पादित रसायनांची चाचणी केली जाते. या रासायनिक द्रव्यांच्या विषारीपणाची सखोल चाचणी केली जात नाही.

प्रदूषणामुळे होणारे अतिरिक्त मृत्यू आर्थिक तोट्यालाही कारणीभूत ठरले आहेत. २०१९ मध्ये एकूण ४.६ ट्रिलियन यूएस डॉलरचे नुकसान झाले, हे प्रमाण जागतिक आर्थिक उत्पादनाच्या ६.२ टक्के होते. या अहवालातील निरीक्षणे प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या असमानतेकडेही लक्ष वेधते. प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंपैकी ९२ टक्के मृत्यू आणि आर्थिक नुकसानाचे ओझे देशांमधील कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्न गटावर पडते.

या नव्या अभ्यासाअंती लेखक आठ शिफारशी करतात. या शिफारशी लोकसंख्या आणि आरोग्याच्या लान्सेट आयोगाच्या अहवालावर आधारित आहेत. वातावरणातील बदलांसदर्भात एक स्वतंत्र, शासनाचे अंतर्गत पॅनेल / पॉलिसी पॅनेल, तसेच सोबतीला प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारकडून तसेच वैयक्तिक आणि डोनर्सकडून येणारी आर्थिक मदत आणि सुधारित प्रदूषण मापक आणि डेटा कलेक्शन आदींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील प्रदूषण रोखण्यासाठी विज्ञान आणि धोरणात्मक निर्णय यांच्यातील संबंध अधिक वृद्धींगत होण्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. रसायने, कचरा आणि वायू प्रदूषणापासून सुरुवात करत हवामान आणि जैवविविधतेपर्यंतच्या विषयांवर विज्ञान आणि धोरण यांच्यात परस्पर समन्वयाने काम केले जाऊ शकते.

‘प्रदूषण, हवामान बदल आणि जैवविविधतेची हानी यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. या संकटांना यशस्वीपणे नियंत्रणात आणायचे असेल तर एक जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त, विज्ञान आणि धोरणाची सांगड असलेले औपचारिक व्यासपीठ गरजेचे आहे, जेणेकरून हस्तक्षेप झाला तर त्याची माहिती देता येईल, प्रभावशाली संशोधन चालना मिळेल आणि निधी संकलनासाठी मार्गदर्शन मिळेल. प्रदूषण हा नेहमी एक स्थानिक विषय म्हणून हाताळला जातो आणि राष्ट्रीय, राज्यस्तरीय किंवा कधीतरी उच्च उत्पन्न असलेल्या क्षेत्रात स्थानिक धोरणाच्या अनुषंगाने तो चर्चेला येतो. पण हे स्पष्ट आहे की प्रदूषण हा पृथ्वीला असणारा धोका आहे, त्याची व्याप्ती, आरोग्यवरील परिणाम स्थानिक सीमा ओलांडून फैलावतात, त्यामुळे या गंभीर समस्येला जागतिक पातळीवरून हाताळण्याचीच गरज आहे. सर्व मोठ्या प्रमाणावरील आधुनिक प्रदूषित घटकांवर वैश्विक पावले उचलण्याची नितांत आवश्यकता आहे,’ असे मत ग्लोबल अलायन्स ऑन हेल्थ अँड पोल्युशनच्या कार्यकारी संचालक आणि सहलेखक रचेल कुपका व्यक्त करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0