महाराणी एलिझाबेथ यांचे पती फिलिप यांचे निधन

महाराणी एलिझाबेथ यांचे पती फिलिप यांचे निधन

नवी दिल्लीः ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रिन्स फिलिप यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. प्रिन्स फिलिप हे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांचे पती होते. काही दिवसांपूर्वीच ते कोविड-१९मधून बरे झाले होते.

ब्रिटनच्या राजघराण्यात प्रिन्स फिलिप यांना अधिकृतपणे अशी भूमिका नसली तरी ७० वर्षांच्या ब्रिटनच्या राजघराण्याच्या इतिहासात ते एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश राजघराण्यात आधुनिकता आली.

ब्रिटनच्या राजघराण्याच्या बाबतीत एक गोष्ट विशेष म्हणजे सम्राटाच्या प्रत्यक्ष वंशजालाच सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. पुत्र असेल तर तो राजा म्हणवला जातो. कन्या असेल तर ती राणी. राणीचा नवरा राजा होऊ शकत नाही. राजाची पत्नी राणी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रिन्स फिलिप हे ब्रिटनचे राजे होऊ शकले नाहीत.

प्रिन्स फिलिप यांनी १९३९मध्ये ऱॉयल नेव्हल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी दुसर्या महायुद्धात युद्धनौकांवर काम केले होते.

१९३४मध्ये चुलत भावाच्या लग्नात प्रिन्स फिलिप यांची एलिझाबेथ यांच्याशी पहिली ओळख झाली. त्यानंतर ५ वर्षानंतर राजकन्या झालेल्या एलिझाबेथ डार्टमाऊथ येथे आल्या असता या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रिन्स फिलिप यांनी एलिझाबेथ यांच्या एकूण प्रवासाला सोबतच केली.

१९५३मध्ये एलिझाबेथ यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा टीव्हीवर प्रक्षेपित व्हावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते. ब्रिटनचे राजघराणे जनतेप्रती अधिक जबाबदारीचे असावे म्हणून त्यांचे प्रयत्न होते. त्यामुळे टीव्हीला मुलाखत देणारे ते ब्रिटनच्या राजघराण्यातील पहिले व्यक्ती होते.

प्रिन्स फिलिप व एलिझाबेथ यांना प्रिन्स चार्ल्स, प्रिन्सेस अनी, प्रिन्स अँण्ड्र्यू व प्रिन्स एडवर्ड अशी चार मुले आहेत.

प्रिन्स फिलिप यांना मधल्या काही काळात अनेक टीकांनाही तोंड द्यावे लागले. प्रिन्स चार्ल्स यांची पत्नी डायना यांचा घटस्फोट व तिचे मोहम्मद अल फायेद या लंडनमधील धनाठ्यशी असलेले संबंध प्रिन्स फिलिप यांना मान्य नव्हते. त्यातून डायनाचा खून करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचा आरोप होता. पण नंतर हे सर्व आरोप न्यायालयाद्वारे फेटाळण्यात आले.

जगातील अण्वस्त्रधारी राष्ट्रे ते निसर्ग संवर्धन अशा अनेक विषयांवरच्या त्यांच्या भूमिकेवरून ते नेहमी वाद ओढवून घेत. वर्ल्ड वाइड फंडच्या मोहिमेतील त्यांच्या सहभागावरून अनेक टीकाकार त्यांना दांभिक म्हणत असतं.

मूळ बातमी

COMMENTS