ममता रस्त्यावर, प्रियंकाचे धरणे, सोनियांची टीका

ममता रस्त्यावर, प्रियंकाचे धरणे, सोनियांची टीका

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याचा निषेध करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठ व अलिगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलिस कारवाईचे पडसाद राष्ट्रीय

‘बाबरीचा निकाल बिलकुल योग्य नाही’
पर्यावरणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदाराचा राजीनामा
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपची सरशी

नवी दिल्ली : नागरिकत्व कायद्याचा निषेध करणाऱ्या जामिया मिलिया विद्यापीठ व अलिगड विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलिस कारवाईचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही सोमवारी दिसून आले.

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात सोमवारी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसमवेत प्रचंड मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील मध्यवर्ती भागातून सुरू झाला व तेथून तो गुरुदेव टागोर यांचे निवासस्थान, जोरासांको ठाकूर बाडी असा आयोजित करण्यात आला. या मोर्चात ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी प. बंगालमध्ये केली जाणार नाही असे पुन्हा स्पष्ट केले. ‘मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या राज्यात एनआरसी लागू केली जाणार नाही. आपण माझे सरकार बरखास्त करू शकता, मला तुरुंगात टाकू शकता पण हा काळा कायदा प. बंगालमध्ये लागू करणार नाही. हा कायदा जोपर्यंत बरखास्त केला जात नाही तोपर्यंत घटनात्मक मार्गाने या कायद्याच्या विरोधात आपण उभे राहू’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्या संदर्भातील एक शपथही घ्यायला लावली.

राज्यात रेल्वेसेवा विस्कळीत

नागरिकत्व कायद्याचा विरोध करत हजारोंचा जमाव सोमवारी मिदनापूर, मुर्शिदाबाद जिल्ह्यात रस्त्यावर आला. या जमावाने सियालदाह-डायमंड हार्बर व सियालदाह-नमखाना सेक्टर मार्गावर धरणे धरल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली. दक्षिण पूर्व रेल्वेचा तामलुक-हल्दिया मार्गावरील बासुलीसुटहटा रेल्वे स्थानकावर निदर्शकांनी ठाण मांडले होते. तर हल्दिया-हावडा दरम्यानची ईएमयू लोकल सेवा निदर्शनांमुळे विस्कळीत झाली होती.

मालदा, उत्तर दिनाजपूर, मुर्शिदाबाद, हावडा, उत्तर २४ परगणा, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

प्रियंका गांधी यांचे इंडिया गेटवर धरणे

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात व जामियासह देशातील अन्य विद्यापीठात पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे धरले. नागरिकत्व कायदा हा देशाच्या आत्म्यावर हल्ला असून या कायद्याच्या विरोधात आपला पक्ष व आपण अखेरपर्यंत रस्त्यावर लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रियंका गांधी यांनी जामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या हल्ल्याचाही निषेध केला. विद्यार्थ्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा हक्क आहे. या मुलांच्या वयाएवढीच माझी मुले आहेत. हा देश सर्वांचा आहे, त्यांचा या देशावर हक्क असल्याचे त्या म्हणाल्या. प्रियंका यांनी जामियात पोलिसांनी केलेल्या तोडफोडीचाही निषेध केला. विद्यार्थी देशाचे भविष्य असतात, त्यांच्यावरचे हल्ले म्हणजे घटनेवरचे हल्ले असून विद्यार्थ्यांना अशाप्रकारे मारहाण लोकशाहीत कशी केली जाते असा सवाल त्यांनी केला. भारत हा लोकशाही देश आहे तो हुकुमशाहांचा देश नाही असेही त्या म्हणाल्या. देशात बलात्कार होत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींचे मौन का आहे असाही सवाल त्यांनी केला.

सोनिया राष्ट्रपतींची भेट घेणार

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे सर्व खासदार मंगळवारी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. देशभरातल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून होत असलेली कारवाई व नागरिकत्व विधेयक रद्द करण्याबाबत त्या आपले निवेदन राष्ट्रपतींना देणार आहेत.

दरम्यान, सोमवारी सोनिया गांधी यांनी नागरिकत्व कायद्यावरून भाजपवर टीका केली. या कायद्याने देशात हिंसाचार माजला असून त्याने देशातल्या तरुणांच्या भविष्याची राख होऊ शकते असे त्या म्हणाल्या. देशातले मोदी सरकार हिंसेला प्रवृत्त करत असल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनी सरकारमधीलच लोक देशात हिंसाचार घडवून आणत असतील, राज्यघटना पायदळी तुडवत असतील, विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करत असतील, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असतील तर देश कसा चालणार असा सवाल केला.

सोनिया गांधी यांनी जामिया प्रकरणावरही आपले मत व्यक्त केले. देशातील तरुण, विद्यार्थी जागे होतात तेव्हा परिवर्तन होत असते. आज पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार केला आहे त्यांना जबर मारले आहे हे दमनचक्र मोदी सरकारच्या अंताची सुरुवात आहे अशी टीका त्यांनी केली.

केंद्रातल्या मोदी सरकारकडून देशात अस्थिरता व हिंसा पसरवली जात असल्याचा आरोप करत सोनिया गांधी यांनी याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप केला. या सरकारचा उद्देश केवळ आणि केवळ देशात अस्थिरता निर्माण करण्याचा असून धर्माच्या आधारावर जातीयता वाढवणे, विद्यार्थ्यांवर हल्ले करणे त्यांचे अधिकार काढून घेणे यालाच हे सरकार प्राधान्य देत असल्याची टीका त्यांनी केली.

आसाम, त्रिपुरा, मेघालय जळत आहेत. आसाममध्ये गोळीबारात चार तरुण मृत्युमुखी पडले आहे. दिल्लीपासून प. बंगालपर्यंत हिंसाचाराचे लोण पसरले असताना गृहमंत्री अमित शहांमध्ये या भागाचे दौरे करण्याची हिंमत नाही असाही त्यांनी आरोप केला. नागरिकत्व कायद्यावरून उफाळलेल्या हिंसाचारामुळे बांगला देशचे मंत्री व जपानच्या पंतप्रधानांनी आपला भारत दौरा रद्द केला हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0