पुणे पोलिसांचा भयंकर अनुभव

पुणे पोलिसांचा भयंकर अनुभव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रस्त्यावर सीएएच्या विरोधात सह्या घेणाऱ्या कार्यकर्तीचा भयानक अनुभव त्यांच्याच शब्दात.

लोकशाही उत्सव समितीतर्फे सीएएच्या विरोधात स्वाक्षरी घेण्याचा आम्ही एक उपक्रम सुरु केला आहे. तर तशा सह्या आम्ही अनेक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून किंवा सभेच्या ठिकाणीही घेतोय. दि.५ फेब्रुवारीला पुणे कँप भागात सीएए-एनआरसी विरोधकांची एक रॅली निघणार असे कळले होते. त्या ठिकाणी जाऊन स्वाक्षऱ्या घेता येतील अशा उद्देशाने मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कँप या भागात जायचे ठरवले आणि तसे आमच्या लोकशाही उत्सवच्या ग्रुपवर कळवले.

प्रत्यक्ष त्या दिवशी म्हणजे ५ फेब्रुवारीला सकाळी सव्वा अकरा वाजता मी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कँप या ठिकाणी पोचले, तेव्हा तिथे बरेच पोलिस दिसले. मात्र मोठ्या संख्येने आंदोलक दिसले नाहीत. आयोजकांपैकी जे कोणी तिथे उपस्थित होते त्यांच्याकडे चौकशी केली असता समजले, की आदल्या दिवशी रात्रीच पोलीसांनी रॅली काढण्यास मनाई केली होती. त्यानंतर रॅली निघणार नाही, असे निरोप अनेकांना सांगण्यात आले. मात्र बदललेला कार्यक्रम अनेकांना ठाऊक असेल नसेल, काहीजण कार्यक्रमस्थळी पोचतील, म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी आयोजक कार्यक्रमस्थळी थोडा वेळ थांबणार होते.

यावेळी मी माझ्या येण्याचा उद्देश सांगितला. उपस्थित आयोजक आणि स्वयंसेवकांनी त्या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. मी रस्त्यावरील इतर नागरिकांशीही बोलत होते. ज्यांना मराठी निवेदन कळत नव्हते. त्यांना त्याचा अनुवाद करून सांगत होते. कोणाच्या शंका निरसन करत होते. माझ्याशी बोलणारे नागरिक पाहून पोलीसांनी मी काय करत आहे, याची विचारणा केली. तेव्हा, त्यांना मी लोकशाही उत्सव समितीतर्फे काढलेल्या विनंती अर्जाचा कागद दाखवला.

माझा नागरिकांशी संवाद आणि स्वाक्षरी घेण्याचे काम सुरू असतानाच मला दिसले, की आयोजकांमधील काहीजण आंबेडकर पुतळ्याला हार अर्पण करीत आहेत. नंतर ते खाली उतरले तेव्हा पुतळ्याच्या पायथ्याशी पोलीस त्यांच्याशी बोलत आहेत. मात्र मध्ये असलेली रहदारी आणि माझे एका बाजूला सुरू असलेले काम, यामुळे मला पुतळ्याच्या पायथ्याशी नेमके काय सुरू होते ते कळले नाही. पण मी त्या दृश्याचा फोटो माझ्या कॅमेरात काढला. ती वेळ होती, सकाळी पावणेबाराची.

तेवढ्यात तेथे तीन तरूणी आल्या आणि मी त्यांना स्वाक्षरीविषयी विचारणा केली. त्यांनी माझे निवेदन आणि पेन घेतले आणि त्या मला त्यातील निवेदन अनुवादित करून मागू लागल्या. मी त्यांच्याशी बोलत होते. त्या स्वाक्षरी करत होत्या. तेव्हा पोलीसांनी मला बोलावून गाडीत बसण्याचा आदेश दिला. काय कारण असे विचारले असता, तिथे उपस्थित असणारे रसाळ नावाचे अधिकारी अतिशय उद्दामपणे बोलू लागले. महिला पोलीसांनी माझे कपडे ओढत मला गाडीकडे खेचायला सुरूवात केली. माझे कागद-पेन ज्या मुलींकडे होते, ते मला दिले नाही. पोलीसांनी माझे म्हणणे ऐकण्याचीही तयारी दर्शवली नाही आणि गाडीत घालून मला नेले.

त्यानंतर मी लगेच आमच्या लोकशाही उत्सवच्या ग्रुपमध्ये संबंधित घटना कळवली. मात्र पोलीस ठाण्यात नेल्यानंतर आमच्याकडून आमचे फोन्स काढून घेण्यात आले. ते संध्याकाळी आमची सुटका झाल्यावरच देण्यात आले.

पोलीसांनी इतर आंदोलकांना अटक करून जे कलम लावले ३७(१) ते मलाही लावले. जामीन, कोर्टात खटला ही त्यापुढची प्रक्रिया. त्यातील जामीनावर सुटका काल झाली, आता पुढे न्यायाळयात सुनावणी होईल.

COMMENTS