जिथे पुस्तके जाळली जातात,  तिथे माणसेही जाळली जातील

जिथे पुस्तके जाळली जातात, तिथे माणसेही जाळली जातील

व्हॉट्स-अॅपचे जग व्यापून असलेल्या, आपल्या तरुण, सोशल मिडियामध्ये प्राविण्य असणाऱ्या, भगव्या हस्तकांमध्ये व बर्लिनमध्ये त्या रात्री द्वेषाने भरलेल्या त्या नाझी दहशतवाद्यांमध्ये असलेले साम्य जाणवून थरकाप होतो. ८५ वर्षांपूर्वी नाझी जर्मनीत झालेल्या पुस्तकांच्या होळीतून आजचा भारत बरेच काही शिकू शकतो.

आयर्लंड आणि ब्रिटन : दुर्दशांची मीमांसा करणारी पुस्तकं.
प्रत्येक जिल्ह्यात साकारणार ‘पुस्तकांचे गाव’
‘झेंगट’ : तरुणाईचा समृद्ध कॅनव्हास

उन्हाळ्याच्या सुरुवातीचा, बर्लिन शहरामधील तो एक आल्हाददायक दिवस होता. संध्याकाळ झाली आणि हलका पाऊस सुरु झाला. त्यामुळे बहुतांशी बर्लिनवासी घरातच होते. तरीही, तरुण मुला-मुलींचे जथ्थे (ज्यात मुलींपेक्षा अधिक मुलेच होती) ओपर्नप्लात्झवर जमा होऊ लागले. ओपर्नप्लात्झ ही बर्लिनकरांची एकत्र येण्याची आवडती जागा. हळूहळू प्लाझामध्ये जवळजवळ ४०,००० लोक जमा झाले.

तो सुट्टीचा दिवस नव्हता पण लोकांचा मूड उत्सवी म्हणावा असा होता. लोक घोषणा देत होते, राष्ट्रीय समाजवादी गाणी गात होते आणि ढोल वाजवित होते. मायक्रोफोनवर तरुण मुले लोकांना प्लाझाच्या मधली गोलाकार जागा मोकळी ठेवावी असे आवाहन करत होती.

मध्य-बर्लिनच्या केंद्रामध्ये कुठल्यातरी खास कार्यक्रमाची तयारी सुरु होती. तारीख होती १० मे, १९३३. नाझी विद्यार्थी संघटनांनी त्यादिवशी पूर्ण जर्मनीमध्ये ‘शुद्धीकरण’ मोहीमेची घोषणा केली होती. या भव्य प्रकल्पाची सुरुवात ‘थर्ड रीच’च्या मुख्य शहरात, बर्लिनमध्ये, होणार होती व संपूर्ण जर्मनीतील विद्यापीठे असणाऱ्या शहरांनी एकाच वेळी हा उत्सव साजरे करणे अपेक्षित होते.

संध्याकाळी उशिरा, हिटलरचे प्रचार मंत्री जोसेफ गेबल्स यांचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. गेबल्स त्यांच्या खास शैलीमध्ये बोलू लागले. त्यांनी ‘महान जर्मन आत्म्या’ला साद घातली आणि जर्मन तरुणाईला आवाहन केले की “देशाला पोखरणाऱ्या रोगांपासून आपल्या महान देशाला आपण मुक्त करायला हवे. हे रोग म्हणजे ज्यू, कम्युनिस्ट, शांततावादी, भटके व समलिंगी…”  ज्वलंत परंतु छोटे असे ते भाषण संपले तशा बंद मुठी उगारून सलामी देण्यात आली व ‘हेल हिटलर’चा जयघोष झाला.

मग सभेच्या मुख्य आकर्षणाचे अनावरण करण्यात आले. प्लाझाच्या मध्यभागी मोकळ्या करण्यात आलेल्या जागेमध्ये अनेक पुस्तकांनी भरलेली पोती होती. उत्साही शुद्धीकर्त्यांनी ही पोती उलटी केली व त्यातून पुस्तके प्लाझाच्या फरशीवर विखुरली. ही पुस्तके म्हणजे काळजीपूर्वक निवडलेली २०,००० ‘अ-जर्मन’ पुस्तके, जी सरकारी ग्रंथालयांमधून, खाजगी व शैक्षणिक संग्रहांमधून लुटून आणली गेली होती.

‘खास पुस्तकां’चा संग्रह मोठा लक्षवेधी होता. स्टीफन झ्वेग, थॉमस व हेनरिक मान, कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड, रोझा लग्झमबर्ग, फ्रांझ काफ्का, एरिक मारिया रेमार्क, ऑगस्ट बेबेल, बर्तोल्द बेख्त, अॅना सेगेर्स, क्लॉस मान, अर्नेस्ट हेमिंग्वे, हेनरिक हेन, उप्टन सिंकलेअर, आणि एरिक कॉस्टनर, असे सगळे एका ढीगामध्ये गोळा झाले होते. रंगत वाढविण्यासाठी फ्रेडरिक एंजल्स, अल्बर्ट आईनस्टाईन, मॅग्झीम गॉर्की, व्हिक्टरी ह्युगो, हेनरी बर्बस आणि व्लादिमिर लेनिन यांचीही पुस्तके या ढीगामध्ये फेकण्यात आली. मग या जमावाने गंभीर स्वरात एक मनस्वी प्रतिज्ञा घेतली: “नैतिक अधोगतीच्या विरोधात! कुटुंबांमधील व देशातील शिस्त व सभ्यतेसाठी! मी या ज्वालांसमोर प्रतिज्ञा घेतो…”

यानंतर होळी पेटविण्यात आली. प्रचंड सामुहिक नाद झाला. ज्वाळा राक्षसी लाल होऊन आकाशाकडे झेपावू लागल्या. याबरोबरच चमत्कारिक जल्लोष दिसू लागला. दाट धुराच्या लाटांमध्ये लोक नाचत होती, गात होती, रडत होती व एकमेकांना मिठ्या मारत होती. ते दृश्य अद्भुत होते.

आर्नोल्ड झ्विग हे महान युद्ध-विरोधी कादंबरीकार हे दृश्य दुरून पाहत होते. ते म्हणाले की “ज्या आनंदाने ही गर्दी जळणाऱ्या पुस्तकांना बघत होती, उद्या त्याच आनंदाने त्यांनी जळणाऱ्या माणसांकडेही बघितले असते.” आर्नोल्ड झ्विग यांनी त्याच रात्री देश सोडण्याचा निर्णय घेतला. स्टीफन झ्विग काही दिवसांनी निघून गेले व कधीच परत आले नाहीत. १९४२ साली, दूर रिओ-डी-जानेरोमध्ये त्यांनी एकाकी व निराश अवस्थेत आत्महत्या केली. होळी केली गेली तेव्हा आईनस्टाईन कॅलीफोर्नियामध्ये भाषण देत होते. त्यांनी जर्मनीतील सूर्योदय पुन्हा कधीच बघितला नाही. हे तिघेही ज्यू होते व ‘रीच’ने ज्यू लोकांच्या हत्या याआधीच सुरु केल्या होत्या. हिटलरने त्याची सत्ता मजबूत केली होती व सर्व विरोधाकांना मिटविण्यासाठी तो सज्ज झाला होता.

उपहासात्मक लेखन करणारे व लहान मुलांसाठी कथा लिहिणारे एरिक कास्टनर ज्यू नव्हते. पण त्यांच्या पुस्तकांना त्या निर्णायक संध्याकाळी ‘साफ’ करण्यात आले. याचे कारण म्हणजे त्यांची सर्वज्ञात शांततावादी मते. त्याची ‘फॅबिना’ ही कादंबरी आगीत फेकली गेली तेव्हा हा मृदू माणूस तिथे उपस्थित होता. त्याला ओळखले गेले, लोकांनी त्याचा धिक्कार केला, त्याला घाणेरडे टोमणे मारले. परंतु तो तिथेच उभा राहिला. शेवटपर्यंत कास्टनर बर्लिनमध्येच राहिले. त्यांनी बर्लिनचा काळाकुट्ट काळ बघितला, सर्व अपमान सहन केले, अवहेलना सोसली, त्यांचे ‘रायटर्स गिल्ड’चे सदस्यत्व काढून घेण्यात आले. तरीही इतक्या प्रचंड मानसिक छळानंतर, ते या अविस्मरणीय ओळी लिहून गेले:

सॅक्सनी प्रांतातील ड्रेसडनमधील मी एक जर्मन

माझी मातृभूमी मला जाऊ देत नाही

मी एका अशा झाडासारखा आहे, जे जर्मनीत उगवलंय

आणि तिथेच कोमेजेल

कास्टनर यांचे घर १९४४ साली मित्रराष्ट्रांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये उध्वस्त झाले. काही काळाने त्यांचे मूळ गाव ड्रेसडनही अशाच प्रकारे बेचिराख झाले.

(बर्लिन सोडून) इतर ठिकाणी पुस्तके जाळण्याचा हा उत्सव, जर्मनीतील शुद्धीकर्त्यांना अपेक्षित होता तेवढा यशस्वी झाला नाही. याचे कारण इतर ठिकाणी पावसाने या खेळामध्ये विघ्न आणले. ओपर्नप्लात्झमध्येही, पाऊस वाढल्यावर आग तेवत ठेवण्यासाठी गॅसचा वापर करावा लागला. औपरोधिक गोष्ट ही की हे काम अग्निशामक दलाच्या लोकांनी केले. परंतु जो संदेश या जमावाला द्यायचा होता तो स्पष्टपणे प्रक्षेपित झाला होता: नाझी विचारांनी जर्मनीतील केवळ राजकीय सत्ता हस्तगत केलेली नव्हती तर तेथील सांस्कृतिक आकृतिबंधवरही ताबा मिळविला होता. या विचारांविरुद्ध आवाज उठविणे म्हणजे मृत्युला आमंत्रण देणे होते. पॉल सेलन यांच्या अविस्मरणीय शब्दांमध्ये – “मृत्यू, निळ्या डोळ्यांनी, एका नियंत्रकासारखा, जर्मनीहून येतो/शिसाच्या गोळीने तो लक्ष्याला भेदेल, तो तुलाही भेदेल.”

ओपर्नप्लात्झचे नाव बदलून आता बेबेलप्लात्झ ठेवण्यात आले आहे. महान जर्मन समाजवादी ऑगस्ट बेबेल (१८४०-१९१३) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे नाव ठेवण्यात आले आहे. बेबेल यांनी आजन्म कामगारांच्या हक्कासाठी आणि राष्ट्रवाद व अतिरेकी/प्रखर राष्ट्राभिमानाविरुद्ध लढा दिला. या ठिकाणी १९९५ साली पुस्तकांच्या होळीचे स्मारक (‘बुक बर्निंग मेमोरियल’) बनविण्यात आले, ज्याची रचना इस्त्रायली कलाकार मिशा उलमन हिने केली आहे. या स्मारकाची पहिली झलक मला पहिल्यांदा नोव्हेंबरच्या एका दिवशी दिसली, जेव्हा उन्हे उतरू लागली होती. जोरदार वारे माझ्या चेहऱ्याला भिडत होते व दाट ढगांआडून सूर्य लपंडाव खेळत होता.

हे स्मारक लक्षवेधक आहे पण मला ते सहज सापडले नाही. प्लाझाच्या मध्यभागी जबडा पसरून असल्यासारखा एक खोल खड्डा खोदलेला आहे व त्यावर काचेचे एक जाड झाकण आहे. काचेवरून परावर्तीत होणाऱ्या सूर्यप्रकाशाला एकदा तुमचे डोळे सरावले की तुम्हाला खड्डयामध्ये एकावर एक रचलेले पुस्तकांचे रिकामे शेल्फ शांतपणे उभे असलेले दिसतील. याच रिकाम्या बुकशेल्व्जनी १० मे १९३३चा संहार बघितला होता. हे शेल्व्ज २०,००० पुस्तके ठेवण्याच्या दृष्टीने बनविले गेले होते. आता ते एका रिकाम्या ग्रंथालयासारखे या खड्ड्यामध्ये बुडालेले दिसतात. या बोलक्या शून्यत्वाच्या बरोबर शेजारी, ग्रॅनाईटच्या एका काळ्या फरशीवर पांढऱ्या अक्षरांमध्ये जर्मन भाषेमध्ये हे गोंदलेले आहे:

बर्लिन येथील पुस्तकांच्या होळीचे स्मारक. Credit: Wikipedia

बर्लिन येथील पुस्तकांच्या होळीचे स्मारक. Credit: Wikipedia

ती केवळ नांदी होतीजिथे पुस्तके जाळली जाताततिथे शेवटी माणसेही जाळली जातील.

या ओळी १८२१ साली लिहिल्या गेलेल्या ‘अलमनसोर’ या हेन यांच्या शोकांतिकेतील आहेत. हेन हे एक ज्यू लेखक होते व त्या रात्री ज्या ‘अ-जर्मन’ लेखकांची पुस्तके जाळली गेली, त्यात त्यांची पुस्तके प्रामुख्याने होती. अभिलिखीत इतिहासामध्ये, एका संहारावरचे इतके स्तिमित करणारे निदान दुसरे उदाहरण सापडणे कठीण आहे. हिटलर आणि त्याची टोळी संपली, पण हेनरिक हेन अजूनही पाय रोवून उभा आहे – सुसंस्कृत जगाच्या मधोमध; आणि तो आपल्याला सावध करतोय, कट्टरतेच्या व लोकांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवण्याच्या सर्व धोक्यांपासून.

हिटलरच्या तरुण कार्यकर्त्यांनी हेनच्या (आणि गोथच्या आणि बेथोवनच्या) जर्मनीच्या हृदयात जो खड्डा खणला, तो बघून मला आता तीन वर्षे झाली. दुर्भाग्य असे की गेल्या तीन वर्षांमधील जगभरातील परिस्थिती बघता, हेनच्या चेतावणीला आणखीनच महत्त्व प्राप्त झाले आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, नेदरलँड्स, फ्रांस (हंगेरी, पोलंड आणि आता कालातीत झालेल्या ‘रेड ब्लॉक’चे माजी सदस्य धरून) सगळीकडेच टोकाचा राष्ट्रवाद व अलगतावाद फोफावतो आहे. यामुळे उद्बोधनाच्या (‘एनलाईटनमेंट’) काळातील जे काही अवशेष उरले आहेत, तेही आता धोक्यात आहेत. सैन्य-क्षमतेचा धाक दाखविणे ही आता केवळ सैन्यप्रमुखांची मक्तेदारी उरलेली नाही, हे डोनाल्ड ट्रम्प व बेंजामिन नेतन्याहू यांनी दाखवून दिले आहे. पुतीन यांच्या अधिपत्याखालील रशियामध्ये पुन्हा एकाधिकारशाही व धार्मिक सनातनवादाने मुळे धरली आहेत. धर्मांधतेची, असहिष्णूतेची सारी रूपे दिसू लागली आहेत व माणसांनी बनविलेले हे विश्व झपाट्याने बर्बरीय अवस्थेकडे जात आहे.

भारतामध्येही, आपण एका खोल दरीच्या कडेला उभे आहोत, असे वाटू लागले आहे. सरकारचा छुपा व उघडही पाठींबा असणाऱ्या हिंदुत्ववादी ब्रिगेड्च्या युद्धगर्जनेमध्ये, नाझी विद्यार्थी संघटनांनी १९३३ साली दिलेली घोषणा प्रतिध्वनित होते आहे: “राज्य काबीज झाले आहे, परंतु विद्यापीठे नाही. बुद्धिवादी निमलष्कर येत आहेत. तुमचे ध्वज आरोहित करा!”

गेल्या अनेक वर्षांमध्ये (विशेषतः गेल्या चार वर्षांमध्ये), सरकारने शैक्षणिक, सांस्कृतिक किंबहुना सर्वच लोकशाही संस्थांवर सातत्याने व निष्ठुरपणे अतिक्रमण केले आहे. पुस्तकांवर बंदी आणली गेली आहे, पुस्तके जाळलीही गेली आहेत, चित्रपटगृहांवर हल्ले झाले आहेत आणि या सगळ्यामध्ये माध्यमांनी कोपऱ्यात दबकून बसून राहण्याची भूमिका घेतली आहे. या शोकांतिकेतील सर्वात निराशाजनक बाब म्हणजे देशातील तरुणाईला या दंडुकेशाहीचा हस्तक बनविण्यात आले आहे – मग ते गोरक्षण असो, नैतिक बंधने लादणे असो वा विद्यापीठांमधील उदारमतवादी विचारांना विरोध करणे असो.

व्हॉट्स-अॅपचे जग व्यापून असलेल्या, आपल्या तरुण, सोशल मिडियामध्ये प्राविण्य असणाऱ्या, भगव्या हस्तकांमध्ये व बर्लिनमध्ये त्या रात्री द्वेषाने भरलेल्या त्या नाझी दहशतवाद्यांमध्ये असलेले साम्य जाणवून थरकाप होतो. कदाचित आपल्या देशी फासीवाद्यांनी पुस्तके (व त्यातील ज्ञान) नष्ट करण्याची अधिक प्रभावी पद्धत शोधून काढली आहे: त्यांचे पूर्णतः पुनर्लेखन करणे. या भयानक प्रकल्पाचे बळी आपल्या देशातील असमाधानी तरुण पिढी आहे. जी  पुढे पुस्तके जाळणारी पिढी बनू शकेल. भारतातील हिटलरच्या समर्थकांनी समाजाला एका विनाशकारी वाटेवर पाऊल ठेवले आहे. मानवजातीच्या सामुहिक इतिहासाच्या ज्ञानातूनच आपण हा प्रवास थांबवू शकतो. आपल्या तरुण मुला-मुलींनी इतिहासापासून शिकायला हवे आणि लवकर शिकायला हवे.

(छायाचित्र ओळी – हिटलर-समर्थक तरुण बर्लिनमध्ये त्या रात्री पुस्तके जाळताना.. Credit: World Archive/CC/Wikipedia)

सदर  लेख या https://thewire.in/history/nazi-book-burnings-lessons-for-india मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद: प्रवीण लुलेकर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0