संशोधनक्षेत्रातील विषमता

संशोधनक्षेत्रातील विषमता

"भारतीय स्त्रियांकरिता संशोधक बनणे तुलनेने अधिक कठीण आहे, पण संशोधनासाठी त्या जे विषय निवडतात त्यामध्ये मात्र फार तफावत नाही.”

जवाहरलाल नेहरूंनी स्वत:लाच भारत रत्न घेतले होते का?
त्राता तेरे कई नाम
व्यंगचित्रकार मंजुल ‘नेटवर्क-18’मधून निलंबित

भारतामध्ये संशोधन प्रबंधाच्या प्रथम लेखकांमध्ये महिला आणि पुरुष यांचे प्रमाण एकास तीन इतके विषम  आहे.

भारत आणि यूकेमधील काही अभ्यासकांनी संशोधनक्षेत्राबाबत अलिकडेच एक अभ्यास केला. भारतामधील संशोधनक्षेत्रातील प्रकाशनांमध्ये पुरुष संशोधकांचे वर्चस्व आहे असे त्यात आढळून आले. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येणाऱ्या लिंगभाव विषमतेशी तुलना केली असता भारतामध्ये अधिक समानता आहे असे दिसून आले.

एखाद्या संशोधकाकरिता प्रबंधाचा प्रथम लेखक असणे फार महत्त्वाचे असते – विशेषतः विद्यार्थ्यांकरिता. प्रथम लेखक असणाऱ्या व्यक्तीने प्रबंधात सर्वाधिक योगदान दिले आहे असेच बहुतेक वेळा मानले जाते. पण नेहमीच असे असेल असे नाही. भारतातील पीएचडी विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळण्याआधी किमान एका संशोधनपर प्रबंधाचे लेखक किंवा सहलेखक असणे आवश्यक असते.

जर्नल ऑफ इनफर्मेट्रिक्स मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे प्रमुख लेखक माईक थेलवॉल म्हणाले, “लिंगभावातील असंतुलन हे काही क्षेत्रांमध्ये इतर क्षेत्रांपेक्षा अधिक का असते याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे”. त्यांनी यापूर्वी अमेरिकेमध्ये अभ्यास केला आहे आणि त्यांना भारतात अभ्यास करायचा होता. “मी ब्रिटनमधील अनेक भारतीय स्त्री वैज्ञानिकांना भेटलो. या स्त्रिया कम्प्यूटिंगसारख्या परंपरेने पुरुषांचे अधिक वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये काम करतात. कदाचित भारत आणि अमेरिकेमधला हा सांस्कृतिक फरक असू शकतो असे यातून सूचित होते.” असे त्यांनी द वायरला सांगितले.

भारतातील समाज हा विषम आहे. इथली लिंगभाव विषमता सुद्धा अनन्यसाधारण आहे. २०१५ मध्ये यूएनच्या लिंगभाव विषमता निर्देशांकात भारताचा क्रमांक १५९ मध्ये १२५ होता. १५ वर्षांच्या वरील केवळ २७% भारतीय महिलांना रोजगार आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण ७९% इतके आहे. भारतामध्ये स्त्रीभ्रूणहत्या कमी करण्यासाठी आणि मुलींना शाळेत दाखल केले जावे यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही महिलांमध्ये रोजगार मिळण्याची क्षमता आणि श्रमांमधील सहभाग खूपच कमी आहे.

२०१८ मधील यूएन मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक १८९ देशांमध्ये १३०वा होता. त्यामधून देशातील माध्यमिक शाळा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मुलामुलींचे प्रमाण (मुलींमध्ये ३९% तर मुलांमध्ये ६४%) आणि श्रमशक्तीतील सहभागामध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण (स्त्रियांमध्ये २७.२% तर पुरुषांमध्ये ७८.८%) यामध्ये अजूनही मोठी विषमता असल्याचे दिसून आले. भारतातील स्त्रियांचा संसदेतील सहभाग ११.६% आहे. हे प्रमाण ‘मध्यम मानव विकास’ असलेल्या देशांमध्ये सर्वात कमी प्रमाणांपैकी एक आहे.

परंतु काही गोष्टी सकारात्मकही आहेत. एका युनेस्को अभ्यासामध्ये २०१६मध्ये प्रथमच महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांनी पुरुषांची बरोबरी केली.

लिंगभाव विषमता याद्यांमध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली नसली तरीही संशोधनपर प्रबंधांची निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २०१७ मध्ये पाचवा होता. भारतातील संशोधनपर प्रबंध प्रकित करणाऱ्या पुरुष आणि स्त्री लेखकांचे हे पहिले मोठ्या प्रमाणातील विश्लेषण आहे. त्यांना तीन प्रश्नांचे उत्तर शोधायचे होते. भारतातील लेखकांच्या प्रकाशनांमध्ये पुरुष आणि स्त्री असे असंतुलन कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये दिसते? भारतीय लेखकांनी वेगवेगळ्या जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये कोणते विषय आणि पद्धतींमध्ये लिंगभावी विषमता दिसते? आणि या दोन प्रश्नांची उत्तरे यूएसमधल्या परिस्थितीशी किती मिळतीजुळती आहेत?

सहकाऱ्यांद्वारे पुनरावलोकन केल्या जाणाऱ्या साहित्याच्या एका मोठ्या ऑनलाईन डेटाबेसचा आधार घेऊन या अभ्यासकांनी भारतामध्ये २०१७मध्ये १८६ क्षेत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या २७,७१० प्रबंधांचा शोध घेतला. सर्व प्रथम लेखकांच्या नावांची यादी केली आणि बाळांसाठी भारतीय नावांची यादी करणाऱ्या वेबसाईटचा संदर्भ घेऊन त्यांचे लिंग निश्चित केले. काही प्रकरणांमध्ये, त्यांनी त्यांच्या संस्थात्मक वेबपेजवर लेखकांची चित्रे तपासून खात्रीही करून घेतली. दोन्ही लिंगांमध्ये आढळणारी नावे त्यांनी वगळली.

त्यानंतर त्यांनी प्रथम लेखकांमध्ये स्त्री आणि पुरुष यांचे गुणोत्तर शोधण्यासाठी २६ ढोबळ क्षेत्रांचे विश्लेषण केले. अंतिमतः त्यांनी यूएसमधून मिळवलेल्या डेटाशी त्याची तुलना केली. समोर आलेले निकाल काहीसे अनपेक्षित होते. “वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लिंगभावी तफावत अमेरिकेपेक्षा अधिक असेल असे मला वाटले होते, म्हणूनच बरोबर उलटे सत्य असल्याचे समोर आले तेव्हा ती मोठी आश्चर्याची गोष्ट होती.” थेलवॉल म्हणाले. “भारतीय स्त्रियांकरिता संशोधक बनणे तुलनेने अधिक कठीण आहे, पण संशोधनासाठी त्या जे विषय निवडतात त्यामध्ये मात्र फार तफावत नाही.” थेलवॉल पुढे म्हणाले, “अमेरिकेबरोबरची तुलना जाणूनबुजून केली होती त्याचे कारण एवढेच की शैक्षणिक क्षेत्रातील लिंगभावी तफावतींकरिता जगात सर्वात जास्त अभ्यास त्या देशातच झाला आहे.”

अभ्यासात असे आढळले की भारतात अमेरिकेच्या तुलनेत स्त्री प्रथम लेखकांची संख्या कमी आहे. मात्र, दंतवैद्यक, अर्थशास्त्र आणि गणित अशा काही क्षेत्रात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. या क्षेत्रांमध्ये भारतात अमेरिकेपेक्षा जास्त स्त्रिया होत्या.

लेखकांनी एक प्रचलित निरीक्षणाबाबतही चर्चा केली: ते निरीक्षण असे की पुरुष ‘वस्तूंच्या विषयीच्या’ क्षेत्रांना प्राधान्य देतात, तर स्त्रिया ‘माणसांशी संबंधित’ करियर निवडतात. मात्र डेटामधून ते काही प्रमाणात खरे तर काही प्रमाणात खोटे असल्याचे दिसते. माणसे – आणि आरोग्यसेवांवर आधारित क्षेत्रे, जसे की नर्सिंग, मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे यांमध्ये सरासरीपेक्षा स्त्री प्रथम लेखकांची संख्या अधिक होती. पण वैद्यकशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन आणि अकाऊंटिंग यासारख्या इतर तशाच प्रकारच्या क्षेत्रांकरिता ते तसे नव्हते. सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जनुकीय शास्त्रे यासारख्या प्रयोगशाळेवर आधारित जीवनविषयक शास्त्रांमध्येही सरासरीपेक्षा स्त्री प्रथम लेखकांची संख्या अधिक होती.

पुरुष आणि स्त्री लेखकांद्वारे वापरल्या गेलेल्या संज्ञांमध्येही अपवाद आढळले. “अनेक पुरुषाभिमुख संज्ञा वस्तूंशी– धातूकाम, स्टील, इंजिने – किंवा वस्तूंचा समावेश असलेल्या प्रक्रियांशी – उष्णता, द्रवपदार्थ, उत्पादन प्रक्रिया, अल्गोरिदम यांच्याशी संबंधित आहेत. शल्यक्रिया हे क्षेत्र त्याला अपवाद आहे. त्या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व असले तरी ते लोकाभिमुख आहे.” असे संशोधन प्रबंधामध्ये नमूद केले आहे.

पशुवैद्यकशास्त्र हे आणखी एक क्षेत्र – ज्यामध्ये अमेरिकेच्या तुलनेत भारतात स्त्रियांची संख्या कमी होती. समाजशास्त्रांकरिता, ‘आरोग्य, शिक्षण आणि विकास या महिलाभिमुख क्षेत्रांमध्ये काळजी घेणे आणि पोषणाचे पैलू होते” तर ‘व्यवस्थापन आणि नियंत्रण (वाहतूक, भूगोल, नियोजन आणि विकास, राज्यशास्त्र) ह्या मध्ये पुरुषांचे वर्चस्व अधिक होते.

याला अपवाद म्हणजे वाचनालय आणि माहिती शास्त्र, ज्यामध्ये अमेरिकेमध्ये अधिक स्त्रिया होत्या, परंतु भारतात त्यामध्ये पुरुषांचे वर्चस्व होते. मात्र ही ‘लिंगभावी फरक असणारी क्षेत्रे आणि विषय’, खुद्द  लिंगभावाप्रमाणेच सामाजिक घडणीचा भाग असू शकतात. ‘हे काही सामाजिक विश्वासांमधून येते की स्त्रिया जैवविज्ञान इ. सारख्या विशिष्ट शाखांकरिता अधिक योग्य आहेत.” आयआयटी कानपूर येथील स्वतंत्र लिंगभाव अभ्यासक नम्रता गुप्ता यांनी द वायरला सांगितले. ‘शैक्षणिक बाबतीतील निर्णय हे भारतामध्ये कौटुंबिक निर्णय असतात.’ हे कौटुंबिक निर्णय बहुधा जितके लिंगभाव-निरपेक्ष असायला हवेत तितके ते नसतात.

पूर्वीच्या अनेक संशोधनपर प्रबंधांमध्ये भारतातील मुलींना ‘उच्च शिक्षण घेण्यापासून’ रोखणाऱ्या अनेक कारणांची यादी दिली आहे: शाळा आणि घरकाम दोन्ही सांभाळताना करावी लागणारी कसरत, मुलग्यांनाच शिक्षणाची अधिक गरज आहे असा पालकांचा पूर्वग्रह, कधीकधी शिक्षणाला फारसे प्राधान्य देण्याचीच आवश्यकता नाही हा विश्वास. गुप्ता यांनी सुरक्षेच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. उदाहरणार्थ, ज्या क्षेत्रांमध्ये बाहेर जाऊन काम करण्याची बरीच गरज असते अशा क्षेत्रांमध्ये जास्त स्त्रिया प्रयोगशाळेतील किंवा कार्यालयातील कामाची निवड करतात.

स्त्रीपुरुषांना वेगळे करणाऱ्या काचेच्या भिंतींना भारतात काही प्रमाणात तडे जाऊ लागले आहेत. २००३च्या अभ्यासामध्ये चार आयआयटींमध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात असताना स्पष्ट लिंगाधारित भेदभाव केला जात असल्याचे गुप्ता आणि इतरांनी अहवालांमध्ये नमूद केले होते. २०१२ मधील अन्य अभ्यासामध्ये, त्यांनी इंजिनियरिंग या ‘पुरुषी क्षेत्रामध्ये’ स्त्री पदवीधारकांची संख्या वाढत असल्याचे अधोरेखित केले.

शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील केंद्राचा २०१४ चा लिंगभाव विषमता डेटा एक पिरॅमिडसारखी रचना उभी करतो. खालच्या स्तरावर अधिक स्त्रिया आहेत, आणि मध्यस्तरावर त्यांची संख्या कमी होत जाते (४९% पदवीचा अभ्यास करणाऱ्या तर ४१% पीएचडीचा). पिरॅमिडचा वरचा अर्धा भाग – डॉक्टरेटच्या पुढचा अभ्यास करणाऱ्या स्त्रिया, प्रयोगशाळा/विभागांच्या प्रमुख आणि संस्थांच्या प्रमुख/संचालक – हा आणखी अरुंद आहे.

म्हणून मग स्त्रियांचा संशोधन क्षेत्रांमधील प्रवेश सुकर करणे पुरेसे नाही पण त्या संशोधनक्षेत्रात राहतील हे निश्चित करणेही गरजेचे आहे. भारतातील अनेक स्त्रियांकरिता, त्यांच्या पीएचडीची वेळ ही अनेकदा त्यांच्या विवाहाची वेळ असते. पीएचडी संपते आणि डॉक्टरेटनंतरचा टप्पा सुरू होतो त्या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात. अमेरिकन स्त्री वैज्ञानिकांपैकी ४०% स्त्रिया त्यांच्या पहिल्या मुलानंतर विज्ञानाचे क्षेत्र सोडतात. अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातआढळून आले आहे की भारतामध्ये हे आकडे आणखी जास्त असू शकतात.

रेणुका कुलकर्णीया एटीआरईई, बंगलोर येथे विज्ञान लेखक आहेत.

हा लेख मूळ इंग्रजी लेखाचाअनुवाद आहे.

अनुवाद – अनघा लेले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0