अनवट मार्गावरले शिक्षण

अनवट मार्गावरले शिक्षण

निलेश निमकर १९९४ पासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. ‘क्वेस्ट’ -Quality Education Support Trust (QUEST), या संस्थेच्या माध्यमातून ते सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षणही देतात. आजूबाजूच्या परिसराबद्दल पुरेपूर भान ठेवून निमकर आपल्या कामाची पद्धत ठरवतात, आवश्यक साधनसामग्री जमवतात आणि मुलांबरोबरच्या संवादासाठी नवनवीन मार्ग आखत राहतात.

इंटरनेटअभावी ४० कोटी मुले शिक्षणापासून वंचित
शिक्षणावरील खर्चाची तरतूद वाढवली
डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य

भारतभरात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. एका बाजूला, विस्तारलेल्या सरकारी व्यवस्थेच्या शाळा-व्यवस्थेच्या मर्यादा प्रकर्षाने समोर येत असतानाच त्यातील समस्यांना भिडत सकारात्मक भूमिका ठेऊन नवे काही निर्माण करण्याचे मोठे प्रयत्न होत आहेत. मग, कर्नाटकातील ‘कली-कलीसु’ योजना, राजस्थानमधील ‘दिगंतर’ शिक्षण संस्था, पाभळचा ‘विज्ञानाश्रम’, अनुताई वाघ आणि रमेश पानसे यांचा ‘ग्राममंगल’चा प्रेरणादायी प्रयोग, ‘क्वेस्ट’ या संस्थेचे बालशिक्षण, शिक्षक- प्रशिक्षण कार्यातील योगदान, ‘प्रथम’ सारखी संस्था जी आपल्याला त्यांच्या लहान मुलांसाठीच्या साहित्यनिर्मितीसाठी माहिती आहे, कोल्हापूरची ‘सृजनआनंद’ आणि पुण्यातली ‘अक्षरनंदन’.

या शिवायही, मला माहिती नसलेल्या कितीतरी व्यक्ती, संस्था असतील. खाजगी क्षेत्रातही प्रचंड मोठ्या मोठ्या बदलातून बालशिक्षण जात आहे. कार्पोरेट कंपन्यांचा सहभागातून नवे भांडवल आणि नवे विचारही अवलंबले जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर, वाढत्या मध्यम वर्गातल्या आर्थिक सबलीकरणातून नवा पालक वर्ग आपल्या मुलामुलींसाठी शिक्षणाचे नवे मार्ग शोधताना दिसत आहे. नव्या सुबत्तेबरोबर नवे काही करू पाहण्यातून अनौपचारिक शिक्षण, होमस्कुलिंगसारखे रिस्क टेकिंग मार्ग आता स्थिरावताना दिसत आहेत. त्यातून, एका बाजूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या शाळा उभ्या राहिल्या त्याच बरोबर अनौपचारिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करणारी शैक्षणिक केंद्रेही मोठ्या शहरातून दिसू लागली. जगभरात चाललेल्या शिक्षणविषयक विचार आणि उपक्रमांची देवाणघेवाण होऊ लागली आहे. शिक्षणशास्त्रात पदवी घेऊन शिकवणाऱ्यांच्या मर्यादा आजपावेतो दिसत आल्या. पण, अशी पदवी ना घेतलेले पण थोडी भाषा, थोडे गणित, थोडे विज्ञान, थोडे आहारज्ञान, थोडे योगासन, थोडे अध्यात्म, थोडी जागा, थोडे पैसे आणि मोठ्ठा उत्साह असणारे लोक ‘न शिकवण्याची’ नवी परिभाषा आपल्या coterieमध्ये मांडून बालशिक्षणाचा विकास करत आहेत की ते trivialise करत आहेत? असा प्रश्नही समोर उभा राहत आहे. दोन-चार वर्षे काम केले, मुलांबरोबर गोड बोलले आणि कुटुंबात खचलेल्या पालकांच्या सुखदुःखावर हळुवार फुंकर घातली की फेवर मिळवता येतो असेही गल्लोगल्ली उदयाला येणाऱ्या नव्या शैक्षणिक केंद्रातून दिसून येऊ लागले आहे. मग अभ्यास न करता, बदलत्या शिक्षणातल्या पद्धतींचे आकलन न करून घेता, सो कॉल्ड मेनस्ट्रीमला दूषणे देत आपण जे करू तेच शिक्षण असा विचार फोफावू लागला आहे. मग चुरुचुरु बोलता येणाऱ्या, अतिआत्मविश्वासू मुलांना पुढे करून स्वतःचे मार्केटिंग साधण्यात आनंद मिळवणारे शिक्षण-तज्ज्ञ लोक शहरात दिसू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर, निलेश निमकर आणि त्यांच्यासारख्या विचारी मंडळींच्या कामाचे महत्त्व अधोरेखित करता येईल. विशेष करून, ते ज्या सामाजिक आणि आर्थिक वर्गात बालशिक्षणाचा वेगळा विचाराचा पोहचवत आहेत आणि वैविध्यपूर्णतेने शिक्षक-प्रशिक्षण राबवत आहेत ते मला महत्त्वाचे वाटते. आजूबाजूच्या परिसराबद्दल पुरेपूर भान ठेवून निमकर आपल्या कामाची पद्धत ठरवतात, आवश्यक साधनसामग्री जमवतात आणि मुलांबरोबरच्या संवादासाठी नवनवीन मार्ग आखत राहतात.

निमकरांबरोबर माझी भेट २०१२ मधील – आम्हा दोघांना महाराष्ट्र फौंडेशनचे बक्षीस मिळालेले. मधल्या काळात गीतांजली कुलकर्णी या माझ्या नाटकातल्या मैत्रिणींमुळे त्यांच्या कामाबद्दल माहिती समजायची. शिवाय त्यांच्या ‘क्वेस्ट’ या संस्थेच्या फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मी शिफारस पत्र देताना त्यांच्या कामाची उजळणी व्हायची. मग दोन-एक वर्षांपूर्वी एका शैक्षणिक संस्थेचा कार्यक्रम पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होता त्यावेळेसही त्यांच्याशी शेकहॅण्ड केला नि त्यांचे शिक्षण विषयक विचार ऐकायची संधी मिळाली. पालघर जिल्ह्यातल्या सोनाळे गावी राहून निलेश निमकर १९९४ पासून शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. ‘क्वेस्ट’ -Quality Education Support Trust (QUEST), या संस्थेच्या माध्यमातून ते सरकारी शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षणही देतात.

निलेश निमकरांनी चोखाळलेल्या अशा अनवट मार्गांची ओळख अनवट वाट (The Road Less Travelled) या त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखनातून होते. आकर्षक छायाचित्रांचा आणि मुलांच्या कामाच्या प्रतिमांचा वापर करत इंग्रजी आणि मराठी भाषेत केलेल्या लेखनाद्वारे वेबसाईट देखणी केलेली आहे. ‘अनवट वाटे’ वरील मराठी भाषेतील त्यांचे लेखन बालशिक्षण, मोजच्या भट्टीवरून आणि संकीर्ण अशा तीन विभागात विभागलेले आहे. तर, इंग्रजी भाषेतील लेखन From the Brick Kiln या विभागाखाली येते. वेबसाईट उघडल्यावर त्यांच्याबद्दलची माहिती विस्तारपूर्वक वाचायला मिळाली असती तर ते वाचकांसाठी अधिक मदतीचे झाले असते.

माझे कार्यक्षेत्र उच्चशिक्षण असले तरी निमकर ज्या तऱ्हेने शिक्षक-प्रशिक्षक म्हणून आपले कार्यक्षेत्र विकसित करतात त्यातून नवे काही शिकण्याची संधी- विशेषतः भाषेच्या क्षेत्रात – मला मिळते. उदाहरणार्थ, ‘अंगणवाडीतले वाचनालय’ या ब्लॉग पोस्टमध्ये ते लिहितात : “मुलांना लिहायला वाचायला कधी आणि कसे शिकवायचे असा प्रश्न बरेच पालक विचारतात. जेव्हा पालक असा प्रश्न विचारत असतात तेव्हा ते बहुधा असे विचारत असतात की मुलांना लिपी कधी आणि कशी शिकवायची. आपल्याकडे वाचन-लेखन शिकणे हे लिपी शिकण्याशी घट्ट जोडले गेले आहे. लिपी शिकणे हा वाचन-लेखन शिकण्याचा महत्त्वाचा पण ‘लहानसाच’ भाग आहे याची जाणीव बऱ्याचदा या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही नसते.”

माझ्याकडे- महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर- शिकायला येणारा विद्यार्थी वर्ग भाषिक अवलोकनाच्या आणि अभिव्यक्तीच्या प्रगत पातळीवर असतो. पण, तरीही त्याला/तिला मातृभाषेत वा द्वितीय भाषेत नीट व्यक्त होता येतेच असे नाही. यामागचे, मला जाणवलेले एक कारण म्हणजे लिपी शिकण्याची/शिकवण्याची लहानपणी केली गेलेली गडबड. लिपी शिकण्याबरोबरच/ शिकण्याआधी सजग वाचनक्षमता विकसित केलेली असणे अपेक्षित असते. पण, या सर्वांच्या बाबतीत ते तसे झालेले नसते. मला जे काही आजकाल दिसते त्यामध्ये दोन तऱ्हेचे शिक्षक किंवा (अपारंपरिक शिक्षण व्यवस्थेच्या भाषेत) दादा/ताई असतात. यामधला एक वर्ग असा असतो की ज्याला भाषा म्हणजे पाठांतर किंवा भाषिक रचनांची उजळणी वाटत राहते. यामध्ये, मुलाला काय वाटते यापेक्षा त्यांना ‘शिकवणाऱ्या’ व्यक्तीला काय वाटत असते हे महत्त्वाचे ठरते. मग, त्यातून दामटून भाषेतील स्टँडर्ड/शब्दकोशीय पुनर्निर्मिती करण्यावर भर असतो. पण, ते करत असताना त्यांचे आकलन बहुआयामी वा इंटरडिसिप्लीनरी नसते तर निव्वळ भाषिक उजळणीचे असते. त्यात मुलांच्या अभिव्यक्तीला कमी वाव असतो. दुसरा जो वर्ग असतो तो ‘ताईं-दादां’चा वर्ग. ज्याला वाटत असते मुलांचा प्रवास आहे तो त्यांनी करावा. खरंतर, मुलांच्या उपजत प्रेरणांना वाव देणारा हा सुंदर मार्ग असतो. पण असा मार्ग अवलंबणाऱ्याचा अभ्यास असावा लागतो आणि अंगी शिस्त असावी लागते. फक्त भाषेचेच नाही तर भाषानिर्मिती प्रक्रिया आणि त्यांच्या मांडणीचे सूक्ष्म असे भान असावे लागते. हे भान बी.एड., एम. एड. केलेल्यांकडे किंवा प्राध्यापक-डॉक्टर-इंजिनिअरकडे असेलच असे नाही. असावी लागते ते लिपी आणि बोलीपलीकडे भाषा समजून घेण्याची सर्जनशील आत्मीयता. पण बऱ्याच वेळा दादा-ताई मंडळी स्वतःवर फारच कॉन्फिडन्स ठेऊन असतात आणि स्वतःची भाषा तर बिघडवतात पण पुढच्या विद्यार्थ्याचीही बिघडवतात. त्यांच्यासाठी सोपा मार्ग असतो तो पॉवर पॉईंट करायला लावणे किंवा एखादा प्रकल्प देऊन त्यातून भाषिक शिक्षणाच्या शक्यता अजमावणे. प्रकल्प-केंद्रित अभ्यास पद्धत आता बऱ्यापैकी रुळली आहे. पण त्यात एक ना धड भाराभर चिंध्या हा प्रकारही असतो. हे मुलांना त्यांचा शोध घेण्यास प्रवृत्त करतात पण स्वतः निव्वळ व्यवस्थापनाचे काम करत राहतात. मुलांना वेळोवेळी ट्रिगर देण्यासाठी स्वतःच्या क्षमताचाही विकास करावा लागतो हे ते विसरलेले असतात. मग, ते व्हॉट्सअप विद्यापीठातले नसले तरी युट्युब आणि विकिपीडिया जाळात स्वतःची सुटका करून घेत असतात. अशा आव्हानांचे एक प्रगत स्वरूप मी लिबरल एज्युकेशनच्या रूपात उच्च शिक्षण क्षेत्रात पाहतोय. या विषयाची चर्चा दुसऱ्या एखाद्या करावी लागेल. आतापुरते, मला हे नमूद करायचे आहे की निमकरानी लिहिलेल्या ब्लॉगमुळे मी चर्चिलेल्या दोन प्रकारच्या शिक्षणविषयक आव्हानांची उजळणी करता आली. त्याचबरोबर, या दोन अभ्यास-पद्धतीतील मर्यादा निमकरांच्या मुलांबरोबरच्या प्रयोगातून – विशेषतः वीटभट्टीवरल्या मुलाबरोबरच्या त्यांच्या कामातून – अड्रेस करता येईल असे वाटते.

माझ्या निदर्शनास आलेली निमकरांच्या लेखनाची अजून एक बाब म्हणजे बालशिक्षण म्हणजे ते कौतुक सोहळ्याची बाब करत नाहीत. वेळोवेळी ते चिकित्साही करतात. उदाहरणार्थ, ‘परिपाठातील कृती २’ या ब्लॉगमध्ये ते लिहितात, “मुले काय बोलत आहेत याचा अंदाज घेऊन त्यांचे बोलणे वाढवण्यासाठी मदत करणे हे बरेच कौशल्याचे आणि संयमाने करायचे काम आहे. या व्हिडिओतील ताईंनाही ते अजून पूर्णपणे साधलेले नाही. त्यांनी प्रयत्न खूप चांगला केलाय, पण ही कृती करताना मुलांच्या बोलण्याचा विस्तार करण्याच्या अनेक शक्यता त्यांनी वापरलेल्याच नाही.” पण, फक्त टीका करून थांबत नाहीत तर एखादा विचार मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी कौशल्य विकासावर ते भर देत नवीन शक्यतांचा प्रस्ताव समोर ठेवत ते लिहितात, “तुमच्या लक्षात आले असेलच की गप्पागोष्टींच्या दरम्यान मुले बऱ्याचदा अगदी एकेका शब्दात उत्तर देत आहेत आणि ताई ते उत्तर स्वीकारून पुढच्या प्रश्नाकडे वळत आहेत. खरे तर ‘तुमच्या पैकी कोणी कोणी कलिंगड खाल्लंय आणि कुठे खाल्लंय हे मला सांगा’ असा प्रश्न विचारून ताईंनी थोडे थांबायला हवे. मुलांनी एका शब्दात उत्तर दिले तर ‘तुला काय म्हणायचे आहे ते पूर्ण वाक्यात सांगशील का?’ असे विचारून मुलांना बोलण्याचा अवकाश द्यायला हवा.

गप्पागोष्टीच्या दरम्यान स्वराने जेव्हा सांगितले की ‘कलिंगडाच्या ‘बी’ला चव नसते,’ तेव्हा ताईने तिला विचारायला हवे होते की तू कलिंगडाच्या बिया कधी आणि का चावल्यास? असा प्रश्न विचारून तिला अधिक बोलते करता आले असते. किंवा प्रणवने कलिंगडाच्या बिया लावल्याचा अनुभव सांगितल्यावर ताईने विचारायला हवे होते की तू बिया कशा लावल्यास, त्यासाठी काय काय तयारी केलीस ते जरा सगळ्यांना सांग. असे सांगितले असते तर प्रणवला आपले म्हणणे तीन-चार वाक्यांत मांडण्याची संधी मिळाली असती.”

लहान मुलांबरोबर वावरताना दरवेळी शेवटचा रिजल्ट काय असेल हा विचार मनात ठेऊन चालत नाही. इथे दोन बाबी समजून घ्याव्या लागतात. एक म्हणजे, शिक्षण देणे/घेणे ही एक प्रक्रिया असते आणि दुसरे म्हणजे, प्रक्रियेत वापरली जाणारी साधने मुलांच्या आयुष्याशी निगडित असली तर प्रक्रिया आनंददायी होऊ शकते. हेच आपल्याला निमकरानी चालवलेल्या वीटभट्टीवरील मुलांबरोबरचा उपक्रमातून दिसून येते.

पाककुत्री’ ही ब्लॉगपोस्ट एकदा नव्हे दोनदा वाचावी इतकी रोचक आणि विचारांना चालना देणारी झाली आहे.

खाद्यसंस्कृतीचा व्यवहार आणि त्याचा अभ्यास आज जगभरातल्या उच्चशिक्षणातील मानव्यशास्त्र विभागात महत्त्वाचा बनला आहे. खाद्य संस्कृती फक्त खाण्यापिण्याचा स्वयंपाकघरातला व्यवहार नसतो तर तो त्यापलीकडचा समाज, संस्कृती, भाषा, लिंगव्यवस्था, चालीरीती, सत्ताकारण आणि नातेसंबंधांचा जिताजागता दस्तऐवज असतो. मी ज्या विद्यापीठात काम करतो तिथे खाद्यसंस्कृतीबद्दल अभ्यासक्रम चालवला जातो. शिवाय, बरीच मुले इथे खानपानाशी संबंधित प्रकल्पही राबवत असतात.

निमकर काकडीची भजी आणि तिळगुळ बनवण्याच्या कृतीतून खाद्यसंस्कृतीविषयीची चर्चा आपल्या मुलांमध्ये घडवून आणतात आणि मुलांच्या अनुभवांना लिपिबद्ध करतात हेही तितकेच महत्त्वाचे. बऱ्याच वेळा जेवण बनवण्याची चर्चा प्रेमाने खायला घालण्याऐवजी तयार केलेल्या पदार्थांची विक्री कशी करावी, त्याचे मार्केटिंग कसे करावे आणि उत्तम उद्योजक कसे व्हावे इथे येऊन थांबते. पण, निमकरांच्या मुलांमध्ये चवीबद्दल, पाककृती या लेखनप्रकाराबद्दल, भाषेबद्दल आणि भाषेतल्या ‘पाककुत्री’ गफलतींबद्दलही चर्चा होते. गंमत म्हणजे, “तिळगुळ बनवायच्या साहित्यात तिळगुळ कसा घेणार?” या प्रश्नाचीही नोंद होते. सर्व रियाज झाल्यावर निमकरांची नोंदच बरेच काही सांगून जाते:

“अमितने क्रमाने पायऱ्या लिहिल्या आहेत आणि भाषा ही स्वकेंद्री नसून बरीचशी औपचारिक भाषेसारखी आहे. काल पुस्तकातील पाककृती वाचून दाखवल्यावर त्यातील भाषा लक्षात आणून देताना मुलांनी ज्या प्रकारचा उदासीन प्रतिसाद दिला होता तो पाहता आजच्या दुसऱ्या खर्ड्यात ती इतकी प्रगती करतील असे वाटले नव्हते. अजून एक बाब म्हणजे आपले लेखन स्केचपेन वापरून सजवण्याची सगळ्यांना भारी हौस वाटते आहे. लिखाणाइतकाच वेळ त्यांनी या सजावटीत घालवला. ‘स्केचपेन सारखे साधन मुबलकपणे वापरायला मिळणे’ इतक्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीचे मुलांना वाटणारे अप्रूप पाहून माझ्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ सुरू झाला. सजावटीच्या निमित्ताने सगळे इतका वेळ एका जागी बसले याचा आनंद मानावा, की असले बारीक सारीक आनंदही आजवर त्यांच्यापर्यंत पोहचले नाहीत याचे वाईट वाटून घ्यावे? काही कळत नाहीये.

कोणत्याही प्रक्रियेचे लेखन करणे हा मुलाच्या लेखन प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असतो. आपण जे लिहितो आहोत ते वाचकाला नीट समजायला हवे हे उद्दिष्ट अशावेळी मुलांच्या समोर अगदी स्पष्ट असते. आता मुलांना विटा कशा बनवायच्या, गोट्या कशा खेळायच्या, चपला कापून त्याची गाडी कशी बनवायची असे छोटे छोटे विषय देऊन ‘प्रक्रिया लेखन’ करायला सांगायचे असे आम्ही ठरवले आहे. यातून लेखन विषयाचे नियोजन करणे, क्रम ठरवणे, अचूक शब्द निवडणे अशा काही बाबी साध्य होतील असे वाटते आहे.”

शिकणाऱ्या मुलांइतकाच शिकवणाराही गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जात असतो. निमकरांसारखे तळमळीने काम करणारे शिक्षक, प्रशिक्षक अशा प्रक्रियेतून जात असतात आणि नवे काही मांडू पाहत असतात. वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील मुलांबरोबरच्या शिक्षण प्रक्रियेबद्दल त्यांनी चर्चा केली असली तरी चर्चा तिथेच राहत नाही. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक वर्गात काम करताना कुणाही शिक्षकाला वा ताई/दादाला यातून बरेच काही समजून घेता येईल. आपल्या मुलांना समजून घेत, भवतालचे आकलन करून घेत आपले स्वतःचे प्रारूप मांडता येईल.

(छायाचित्रे: ‘अनवट वाट’ या ब्लॉगवरून साभार)

आशुतोष पोतदार नाटककार, कवी, कथालेखक आणि साहित्य – संस्कृतीचे अभ्यासक आहेत. ते फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे येथे साहित्य आणि नाटकाचे अध्यापन करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0