कोरोना आणि औषधशास्त्र

कोरोना आणि औषधशास्त्र

कोरोना-कोव्हिडसंदर्भात औषधोपचार या विषयावर फार्माकॉलॉजी विषयातील तज्ज्ञ डॉ. पद्माकर पंडित यांची मुलाखत ’ऐसी अक्षरे’मध्ये प्रसिद्ध झाली होती. ही मुलाखत ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत. ही मुलाखत प्रसिद्ध करण्याची परवानगी दिल्याबद्दल डॉ. पद्माकर पंडित व ‘ऐसी अक्षरे’च्या टीमचे आभार.

कोरोना संकटाचे गांभीर्य नेतृत्वाला होते का?
आयआयटी मद्रासमध्ये १०० विद्यार्थ्यांना कोरोना
निजामुद्दीन मरकज : ४४१ जण कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू

प्रश्न – २०२०च्या जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्या आधी काही बातम्या येत होत्या. ‘ह्यांना करोना झाला आहे’ म्हणून रुग्ण तुमच्याकडे पोहोचतात तेव्हा तुम्ही जो औषधोपचार सुरू करता, तेव्हापासूनची पुढची गोष्ट आम्हांला सांगा.

उत्तर – वैद्यकीय तज्ज्ञाकडे एखादा रुग्ण येतो तेव्हा तो कोव्हिडचाच असेल असं नाही. त्याला (कोव्हिडची) काही लक्षणं असतील असंही नाही. तीन-चार प्रकारचे रुग्ण संपर्क करतात. एक तुम्ही म्हणालात तसं, कोव्हिडची चाचणी केलेली आहे – त्वरित प्रतिजन (रॅपिड अँटिजेन) चाचणी किंवा आरटीपीसीआर. बाहेरगावांमध्ये ह्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचण्या फार मुबलक प्रमाणात उपलब्ध नसतात; किंवा घशा-नाकातला नमुना दिल्यानंतर अहवाल यायला ३-४ दिवस एवढा जास्त वेळ लागतो; त्यांच्याकडे निदानाकरता एचआरसीटी ही पद्धतसुद्धा वापरली जाते. घशातल्या किंवा नाकातल्या नमुन्यांत विषाणूचं प्रथिन सापडलं असे एक प्रकारचे; किंवा छातीची एचआरसीटी चाचणी केलेले. त्यातून नक्की कोव्हिड झालेले लोक समजतात. दुसऱ्या प्रकारचे रुग्ण म्हणजे ज्यांना लक्षणं आहेत असे. ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, मानदुखी, क्वचित पचनसंबंधित काही तक्रारी – मळमळ, जुलाब, उलटी अशी काही. ताप काही लोकांना विशेष ओळखीचं लक्षण वाटतं. आम्ही डॉक्टर लोक असं गंमतीनं म्हणतो की गर्भधारणा आणि हाड मोडणं हे दोन अपवाद वगळता बाकी कुठलंही लक्षण असलेला रुग्ण कोव्हिडचा म्हणून येऊ शकतो. ज्यांना शंका येते, ते संपर्क साधतात.

त्यात आम्हां डॉक्टर लोकांना संशय आला की यांना कोव्हिड नसेल – कारण तुमचा कुठल्या कोव्हिड रुग्णाशी संपर्क आलेला नसेल, प्रवास केला नसेल, कामावर जात नसाल – या माहितीनुसार अंदाज घेता येतो. मग त्यानुसार चाचणी करायची की नाही ते ठरतं. असंही होतं की ज्यांना लक्षणं नाहीत त्यांना कोव्हिड असतो. चाचणी करून घेतली तर ती पॉझिटीव्ह येते.

दुसराही प्रकार होतो, आम्हांला वाटतं की यांना कोव्हिड असेल म्हणून चाचणी करावी तर ती निगेटीव्ह येते. तिसरा प्रकार असा की, मला लक्षणं नाहीत, मी कुणाच्या संपर्कातही नाही, पण एक चाचणी करून घ्यावी बुवा. म्हणजे करोनाचा संसर्ग झालाच असेल तर उशीर व्हायला नको. कारण वर्तमानपत्रांमध्ये वगैरे छापून येत असतं की कुठलीही लक्षणं नसली तरी तुम्हाला करोना असू शकतो. अशा निरनिराळ्या प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात.

रुग्ण आला की आम्ही आधी समजावून सांगतो, काळजी करायचं खूप कारण नाही. आपलं वय कमी असेल, इतर कुठले आजार नसतील, फार गंभीर लक्षणं नसतील तर कोव्हिड हा आजार घरच्या घरी उपचारांनी पाच-सात दिवसांत बरा होऊ शकतो. खूप तपासण्या कराव्या लागत नाहीत; रुग्णालयात जावं लागत नाही. मात्र हे सगळं करण्यासाठी रुग्णांना काही सूचना पाळाव्या लागतात.

रुग्णांना स्वतः काही तपासण्या कराव्या लागतात. रक्तदाब आणि शरीराचं तापमान मोजणं, बोटाला लावायचं पल्स ऑक्सिमीटर नावाचं यंत्र आहे, ते वापरून रक्तातलं प्राणवायूचं साधारण प्रमाण मोजत राहावं लागतं. ते प्रमाण ९५ पर्यंत असेल तोवर काळजीचं कारण नाही. ९५ च्या खाली जायला लागलं तर दोन गोष्टी करायच्या असतात. पालथं झोपायचं. उताणं झोपल्यावर पाठ खाटेला, गादीला टेकलेली असते, त्यामुळे ती पूर्ण प्रसरण पावू शकत नाही. त्यामुळे श्वासावाटे फुफ्फुसांत हवा जाण्याचं प्रमाण कमी होतं. पालथं झोपणं ही उपचारपद्धती प्राणवायूचं प्रमाण २-४% वाढवण्यासाठी उत्तम आहे. अगदी पालथं झोपायचा कंटाळा आला तर कुशीवरही झोपता येतं. किंवा टेबलावर पुढे वाकून किंवा पाठीला टेकून बसू शकतो.

ज्यांचं प्राणवायूचं प्रमाण कमी व्हायला लागलं आहे, त्यांनी संपूर्ण विश्रांती घेणं आवश्यक. आमचा डॉक्टर मंडळींचा असा अनुभव आहे की आजारी असणारे रुग्णसुद्धा जास्त त्रास नसेल तर काही ना काही तरी शारीरिक आणि/किंवा मानसिक काम करत असतात. स्वयंपाक, झाडलोट, आवराआवर, चादर झटकणं, कुणाला तरी औषध-गोळ्या द्यायला वरखाली जातील, कार्यालयीन कामकाज इ. करतील. प्राणवायूचं प्रमाण कमी झालेल्या माणसांनी १००%, पूर्णपणे विश्रांती घेत पालथं झोपलं पाहिजे.

लोकांना कोव्हिडसोबत इतर सहव्याधी (कोमॉर्बिडीटी) आहेत का, याची चौकशी केली जाते. माझ्या अनुभवात काही गर्भवती स्त्रिया होत्या, काही स्तनपान देणाऱ्या माता होत्या; मधुमेह आणि/किंवा उच्च रक्तदाब असणारे लोक होते; वयस्कर लोक होते – काही ८०च्या आसपासचेही होते. त्यांना घरीच उपचार करायला सांगितलं कारण त्यांना सहव्याधी नव्हत्या. रुग्णाला सल्ला देताना असे अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात.

बरेचदा माध्यमं, वृत्तपत्रं किंवा लेखांमधून सल्ले मिळतात, त्यांत सरसकटीकरण (जनरलायझेशन) असतं. सगळ्यांना एकच ठोकताळा असला तरी प्रत्येकाला तो बदलून द्यावा लागतो. उदाहरणार्थ, एक रुग्ण माझ्याकडे आले ते वयस्कर होते. औषधशास्त्र म्हणतं, वयानुसार मूत्रपिंडं (किडनी) आणि यकृताची (लिव्हर) क्षमता कमी होते. आपण घेतो ती सगळी औषधं आपल्या शरीरात आधी रक्तात शिरतात. शरीरभर पसरतात. जिथे त्यांचं काम असतं तिथे गेली की काम करतात, नंतर यकृतात जाऊन त्यांचे तुकडे होतात, अपचय होतो (मेटॅबोलिझम). किंवा ती मूत्रपिंडांत जाऊन लघवीवाटे बाहेर पडतात. याला आम्ही फारमॅको-कायनेटिक्स म्हणतो. जिथून औषध दिलेलं आहे तिथून ते रक्तात जाणं, शरीरभर पसरणं, आपल्या कार्यस्थळी जाणं, कार्यभार साधणं, पुढे यकृत किंवा मूत्रपिंडांत जाऊन तिथून बाहेर पडणं हे प्रमाण वयस्कर लोकांत कमी झालेलं असतं. ५०-६० वर्षांच्या पुढच्या लोकांसाठी औषधांच्या मात्रा कमी कराव्या लागतात. औषधोपचाराला अपवाद काही लहान मुलं आणि गर्भवती. यांच्यामध्ये काही लक्षण नसेल तर औषध न देताही रुग्ण बरे झाले आहेत.

समजा एक औषध घेऊ, फाव्ह‌िपिराव्हिर. या औषधाची मात्रा अशी की २०० मिलिग्रॅमची गोळी असेल तर सकाळी ९ आणि संध्याकाळी ९ अशी सुरुवात होते. ४०० मिलिग्रॅमची असेल तर त्याच्या अर्धी, साडेचार. हे औषध देताना एका घरातल्या तरुण व्यक्तीला ९+९ अशा दिल्या. आणि त्याच घरातल्या वयस्कर व्यक्तीला ६+६+६ अशा दिल्या. अगदी वयस्कर गृहस्थ आले तेव्हा १८ च्या जागी १६ च दिल्या. त्याही ४+४+४+४ अशा दिल्या. असे सूक्ष्म, बारके बदल आहेत. ते पुसून टाकले, एकजिनसी (होमोजीनियस ) केले, आणि सगळ्यांना सारखेच डोस दिले तर औषधं कमी प्रभावी, अधिक त्रासदायक ठरू शकतात.

आणखी एक उदाहरण सांगतो. ते कोव्हिडचं नाही. मध्यंतरी माझ्याकडे एक रुग्ण आले, त्यांना क्रोअन्ज डिसीज नावाचा आजार आहे. हा आतड्याचा आजार अत्यंत चमत्कारिक आहे. त्यांना पोटात आणि शौचाला खूप दुखत होतं. नेहमीप्रमाणे त्यांना वेदनाशामक गोळ्या दिल्या. पण ते म्हणाले, “या गोळ्या घेऊनही मला अजिबात बरं वाटत नाही.” त्यांचं वजन होतं ११५ किलो. लक्षात घ्या, पुस्तकातल्या सगळ्या औषधांच्या मात्रा ६० किलो वजनाच्या माणसांसाठी असतात. रुग्णाचं वजन एवढं असेल तर सगळी औषधं दुप्पट लागणार; आणि ५० किलोची व्यक्ती असेल तर ती ५/६ लागतात. ११ वर्षांची ३० किलोची मुलगी असेल तर तिला अर्धीच मात्रा लागणार. अगदी लहान मुलांना गोळी नाही, पातळ औषध लागतं. (औषधं देण्याची) एक चौकट जरी ठरलेली असली, तरीही रुग्णांना अशा प्रकारे वेगळी औषधं, मात्रा आणि वेगळा सल्ला द्यावा लागतो.

ड जीवनसत्त्व करोनासाथीच्या काळात खूप वापरलं गेलं. “६०,००० एककं घ्या”, म्हणजे आठवड्याला दर रविवारी इतकं घ्या, असा शिरस्ता आहे. गेली काही वर्षं सर्रास सुरू आहे की रक्तातलं ड जीवनसत्त्वाचं प्रमाण मोजायचं, आणि कमी असेल तर ते द्यायचं. कोव्हिडपेक्षा ड जीवनसत्त्वाची कमतरता अधिक महत्त्वाची वाटावी, असं सुरू आहे. हे जीवनसत्त्व पाण्यात विरघळत नाही, मेदामध्ये (फॅटमध्ये) विरघळतं. त्यामुळे ते (ब आणि क जीवनसत्त्वांसारखं) घेतलं आणि लघवीतून निघून गेलं असं होत नाही. शरीरात साचून राहतं. त्यामुळे कुणाची ड जीवनसत्त्वाची पातळी अपेक्षित वा जास्तच असेल आणि त्यांना याचे बाहेरून डोस दिले तर ड जीवनसत्त्वाची विषबाधा (टॉक्सिसिटी) होईल.

असंच आहे एचआरसीटीबद्दल. (परवा मी याबद्दल एक लेखही लिहिला होता.) छातीचा एक्स-रे हे फुफ्फुसाचं द्विमितीय चित्र असतं, पाठून पुढे. पण त्याऐवजी जेव्हा एचआरसीटी प्रतिमांकन केले जाते तेव्हा फुफ्फुसाच्या ५०-१०० प्रतिमा घेतात. कुठेही बारीकसं काही रोगाचं चिन्ह असेल तर त्यावरून निदान होऊ शकतं. आता वाद हाच सुरू आहे, दिल्ली एम्सचे संचालक म्हणतात की हा किरणोत्सर्ग एक्स-रेच्या ३०० पट आहे. वारंवार एचआरसीटी केल्यामुळे त्या लोकांना समजा दहा वर्षांनी कुठला कर्करोग झाला तर याला जबाबदार कोण? तेव्हा इतकं सरसकटीकरण (जनरलायझेशन) करू नये.

सर्वसामान्य लोकांना सरसकट काय सूचना द्याव्यात?

मास्क वापरा, नाक-तोंड झाका (विशेषतः ज्यांच्याकडून उधार-उसनवारी केली आहे, त्यांच्यासमोर तर मास्क वापराच :-), सहा फूट अंतर ठेवा – सरसकटीकरण अशा प्रकारचं असेल तर ठीक. पण त्याचाही अतिरेक होतो. समजा, एका घरातल्या पाच माणसांपैकी दोघांना कोव्हिड आहे, तिघांना नाही. तर जे कोव्हिड पॉझिटीव्ह आहेत त्यांना संसर्ग झाला हे नक्की. ज्यांची चाचणी झालेली नाही, किंवा निगेटीव्ह आलेली आहे, त्यांनाही संसर्ग झालेला असू शकतो. तो चुकून निगेटिव्ह आलेला असू शकतो. सर्व पॉझिटिव्ह लोकांनी एकत्र राहायला अडचण नाही. त्यांनी मास्क लावायची, सामाजिक अंतर पाळायची गरज नाही. कारण दोघांनाही संसर्ग झालेला आहेच. तेव्हा हे जे काही बारकावे आहेत, ते लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे कुटुंबातील प्रत्येकाची सद्यस्थिती काय आहे यानुसार वेगवेगळे उपचार करण्यात यावेत. कारण प्रत्येकाच्या सहव्याधी वेगळ्या असल्या, तर त्यांच्यावर करायचे उपचारही निराळे असणार.

प्रतिमा आंतरजालावरून साभार.

प्रतिमा आंतरजालावरून साभार.

प्रश्न – उपचार सुरू करावे लागतात आणि प्रत्येक रुग्णाची प्रकृती बघून ते बदलावे लागतात. तर सुरुवातीपासून नक्की औषधोपचाराची दिशा कशी बदलते?

उत्तर – कोव्हिडचे उपचार तीन-चार वेगळ्या प्रकारचे असतात. हे फक्त औषधांबद्दल. सगळ्यांत महत्त्वाची ती विषाणूरोधी औषधं. ही औषधं विषाणूचा पेशींना संसर्ग होण्यापासून मज्जाव करतात. जर विषाणू पेशीत शिरला असेल तर पेशीची यंत्रणा वापरून तो विषाणू स्वतःचं पुनरुत्पादन सुरू करतो. यात ती पेशी मरते. विषाणूरोधी औषधं यालाही प्रतिबंध घालतात. यांतलं एक महत्त्वाचं औषध आहे, जे किरकोळ आजारांसाठीही वापरलं जातं, फाविपिरावीर. ते दोन-तीन कंपन्यांचं आहे. २००-४००-८०० मिलीग्रॅम अशा मात्रांमध्ये येतं. सुरुवातीला ते मोठ्या प्रमाणावर द्यावं लागतं, २०० मिग्रॅच्या ९-९ गोळ्या; सकाळी आणि संध्याकाळी. औषधशास्त्रात एक संकल्पना आहे, आणि फार कमी औषधांच्या बाबतीत ती असते. त्याला म्हणतात, लोडिंग डोस. हे औषध तोंडावाटे घेतल्यावर, पचनसंस्थेमार्ग रक्तात आणि शेवटी सर्व अवयवांकडे जातं. तेव्हा काही अवयव औषध स्वतःकडे खेचून घेतात, आणि साठवून ठेवतात. त्यामुळे त्या औषधाची रक्तातली पातळी कमी होते. या साठा करणाऱ्या अवयवांची क्षमता पूर्ण होईस्तोवर औषधाची रक्तातली पातळी विषाणूंना विरोध करण्याएवढी जास्त असत नाही. हे प्रारंभिक उच्च मात्रा (लोडिंग डोस) देण्याचं शास्त्रीय कारण.

रुग्णांना सांगताना आम्ही सांगतो, “तुमच्या शरीरात १०० विषाणू आहेत. सुरुवातीलाच त्यांतले जास्तीतजास्त, समजा ७०-८०-९० %, मारायचे आहेत. म्हणून जास्त डोस आहे.” कधी कधी लोकांशी बोलताना, विज्ञानाचा अवमान न करता, सुलभीकरण करणं गरजेचं असतं, त्यातून लोकांना पटतं, रुचतं, समजतं.

याहून वेगळा मेंटेनन्स डोस असतो. दुसऱ्या दिवसापासून द्यायचा. त्याची मुदत जास्त असते. सुरुवातीला आम्ही १४ दिवस औषध देत होतो. आता लक्षात आलंय की धडधाकट तरुण पाचेक दिवसांत बरे होतात. मी पाच दिवसांनी रुग्णांना विचारतो, “तुमच्या काही तक्रारी आहेत का?” तक्रारी नसतील तर औषध बंद करतो. काही लक्षणं असतील तर मग औषधं सुरू ठेवतो. काहींना पाच दिवस, काहींना सात दिवस औषधोपचार लागतो. तरीही लक्षणं राहिली, तर ती विषाणूमुळे आहेत का विषाणूनं निर्माण केलेल्या आजारामुळे शरीरात तयार झालेल्या शोथकारक रसायनांमुळे (इन्फ्लमेटर्स) – म्हणजे फेरीटिन, डी डायमर, सी. आर. पी. आय एल 6, एल डी एच, प्रोकॅल्सिटोनीन; वगैरे. हे शोधण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात.

जर रुग्णाला दम, धाप लागत असेल तर मग एचआरसीटी किंवा एक्स-रे केलेला बरा. तक्रारींनुसार काय करायचं ते ठरवावं लागतं. कोव्हिडनंतरचा आजार आता वाढलेला दिसत आहे. पहिल्या आठवड्यात लक्षणं दिसली, चाचणीत संसर्ग दिसला तर विषाणू शरीराबाहेर पडायला एक आठवडा लागतो. तेवढा काळ विषाणू शरीरात असतात. त्यानंतरचा पुढचा आठवडा, ७-१४ दिवस, यात विषाणूंनी पेशींवर हल्ला केल्यानंतर त्याला प्रतिसाद द्यायला पेशी जी रसायनं निर्माण करतात ती अधिक प्रमाणात निर्माण झाल्यावर ती आपल्याच अवयवांवर विपरीत परिणाम करतात. त्यांमुळे शरीरात शोथ (इन्फ्लमेशन) निर्माण होतो. त्यामुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो; ती अपारदर्शक होतात. पुरेसं काम करू शकत नाहीत. त्याला एक २५ पैकी स्कोअर दिला जातो, ८ पर्यंत स्कोअर आला तर किरकोळ, ८-१३ म्हणजे मध्यम आजार, १३-१५ हा तीव्र मध्यम आणि १५ च्या वर आला तर फुफ्फुसं खूपच खराब झाली आहेत असं समजायचं. त्यासाठी संसर्ग हा शब्द वापरला जातो, पण हा तसा संसर्ग नसतो. ती फुफ्फुसाला संसर्गामुळे आलेली सूज, लाली असते. तो स्कोअर १३-१५ मध्ये आला आणि लक्षणं दिसून आठव‌डा उलटून गेला नसेल तर रेमडेसिव्हिर दिलं जातं.

समजा हाताला काही जखम झाली. ती जखम भरून येताना तिथे व्रण निर्माण होतो. त्याला म्हणतात फायब्रोसीस – तंतूमयता. तशा प्रकारची तंतूमयता फुफ्फुसांत कायमची येऊ शकते. फुफ्फुसांचं काम आहे हवा आत घेणं. तेव्हा वायुकोष पूर्ण उघडले, फुलले पाहिजेत. त्या वायुकोषांमध्ये तंतूमयता आली, तर त्यांची लवचिकता जाते व ते पूर्णपणे उघडत नाहीत. त्यामुळे कायमस्वरूपी श्वसनरोग होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा शोथकारक पदार्थांचं प्रमाण रक्तात जास्त सापडतं, वा धाप लागते तेव्हा स्टिरॉईड्स किंवा इतर काही औषधं दिली जातात. ती औषधं तंतूमयता कमी करतात.

प्रश्न – गेल्या वर्षी (२०२०) ट्रम्पनं हायड्रोक्सिक्लोरोक्वीनची बरीच भलामण केली होती. आणि तेव्हा वाटत होतं की हीच ती कोव्हिडवरची संजीवनी. त्याचं काय झालं? हायड्रोक्सिक्लोरोक्वीनपासून सुरुवात होऊन आता गेल्या एका वर्षात कोव्हिडविरोधात जी विविध औषधं वापरली गेली, ती ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीनं वापरली गेली का? ही औषधं का वापरली गेली? आणि नंतर यातली काही औषधं वापरणं का बंद झालं? आताचा प्रोटोकॉल कसा तयार केला? औषधशास्त्राचा यामागचा विचार काय आहे?

उत्तर – वैद्यकीय क्षेत्राची अवस्था अशा साथीच्या वेळी बिकट असते, पुस्तकी ज्ञान असतं पण व्यवहार निराळा असतो.

कुठलाही नवा आजार पूर्णतया नवा नसतो. तो काही प्रमाणात नवीन असतो आणि काही प्रमाणात जुनासुद्धा असतो. कोव्हिडचं उदाहरण बघायचं तर करोना हा एक आरएनए विषाणू आहे. विषाणू आजार निर्माण करतात, हे आपल्याला माहीत आहे. विषाणूजन्य आजारांवर औषध काढण्याआधी विषाणूविरोधी लसी निघाल्या. आपण देवी, गो‌वर, पोलिओ अशा अनेक विषाणूजन्य आजारांवर प्रतिबंधक मात केली. कुठलाही जंतू-परजीवी संसर्ग असला तर त्याविरोधात लस निर्माण करता येईल का, हा एक भाग झाला.

आता औषधांच्याबाबतीत विचार करायचा झाला तर विषाणूविरोधी औषधाची चौकट तयार आहे. आपल्याला हे माहीत आहे की कुठलाही विषाणू मानवी शरीरात शिरला की मानवी पेशींना आपला गुलाम बनवतो. पेशीची यंत्रणा वापरून विषाणू आपलं पुनरुत्पादन करतो, आणि पेशीला मारतो. आपल्याला हेही माहीत आहे की विषाणू पेशीत शिरतो तेव्हा पेशीच्या आवरणावरच्या ठरावीक भागाला – रीसेप्टर्स (ग्रहक) – चिकटून आत शिरतो. हे ग्रहक कुठले हे आपल्याला शोधता येतं. त्यांच्या रचना, आकारानुसार, कुठलं रसायन विषाणूला अडवेल आणि आत शिरू देणार नाही, अशी रसायनं शोधता येतात. हे कुलूप-किल्लीसारखं असतं.

विषाणू पेशीत शिरल्यावर त्याचं पुनरुत्पादन कसं होतं, हे आपल्याला माहीत आहे. त्याची केंद्रकी आम्लं (न्यूक्लिक अॅसिडस्) असतात, वेगवेगळे भाग असतात, असेंब्ली लाईन असल्यासारखी, आणि मग ते सगळे जोडले जातात. विषाणू जरा जास्तच भाग जोडतो, आणि मग नको असलेले भाग कापून काढतो. या प्रक्रियेत जे विकर (एन्झाईम्स) अंतर्भूत असतात, ते शोधता येतात. त्या विकरांची रचना बघून, त्यांना अडवून, बांधून ठेवतील असे पदार्थ तयार होतात. विषाणूरोधी औषधं अशा प्रकारची असतात.

तर हे तीन भाग झाले. एक तर पेशीत विषाणूला शिरूच द्यायचं नाही. शिरला तर पुनरुत्पादनासाठी जे सुटे भाग तयार करतो ते भाग बनवण्याला किंवा ते जोडायला किंवा जोडल्यावर कापून नेमका वंशज विषाणू तयार व्हायला प्रतिबंध करायचा. हे साधारण १९९०च्या दशकात HIV आला तेव्हा आपल्याला जास्त चांगलं समजलं. त्यावर तेव्हा औषध नव्हतं. मग जे औषध तयार केलं गेलं, त्यामुळे अशी यंत्रणाच तयार झाली. कुठलाही विषाणू यापुढे आला, तरी या चौकटीचा वापर करून विषाणूरोधी औषधं तयार करता येतात. हे झाली सध्याची संशोधनाची स्थिती. प्रत्येक नव्या विषाणूनुसार याला काही आठवडे ते महिने काळ लागेल, तेवढाच.

तोवर काय करायचं? विषाणूविरोधी औषधं दोन प्रकारची असतात. काही नेमक्या विषाणूच्या विरोधातली, विषाणूविशिष्ट असतात. उदाहरणार्थ, नागीण (हर्पिस) येते किंवा ज्वर उमटतो. या दोन्हींचे विषाणू म्हणजे नागिणीच्या विषाणूच्या दोन जाती. त्यावर असायक्लोव्हिर नावाचे जे औषध आहे ते फक्त या नागीण विषाणूविरोधातच काम करते. त्याउलट व्हिडारॅबिन नावाचं औषध आहे. ते आरएनए आणि डीएनए अशा दोन्ही प्रकारच्या विषाणूंची वाढ थांबवू शकतं. तेव्हा इन्फ्लूएन्झा प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी औषधं कोव्हिडवर उपयोगी पडतात का ते पाहायला म्हणून ओसेल्टामिव्हीर
(टॅमिफ्लू) वापरलं. कारण हा फ्लूसारखाच विषाणू आहे. म्हणून फाविपिराव्हिर, रेमडेसिव्हिर वापरलं. शिवाय मॉल्न्यूपिराव्हिर येतंय; मोनोक्लोनल अँटिबॉडिज येत आहेत; विषाणूला इतर प्रकारे विरोध करणारे एस इनहिबीटर्स (ACE-inhibitors) आहेत, आयव्हरमेक्टिन, ॲझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लीन, क्लोरोक्वीन आहेत. विषाणूचा विरोध फक्त पुनरुत्पादन थांबवणं एवढाच मर्यादित न ठेवता, इतर प्रकारे त्याच्या आजार निर्माण करण्याला, पेशीत शिरण्याला विरोध करणारी ही सगळी औषधं.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा कोव्हिडवर फायदा होऊ शकतो, या विचाराचा जन्म कसा झाला? हा निरीक्षणजन्य अभ्यास (observational study) होता. हे औषध मलेरियाविरोधी आहे, पण त्यातलं मूळ औषध आहे क्लोरोक्विन. ते जास्त असुरक्षित आहे. मलेरियासाठी दहाच गोळ्या वापरतात, त्यामुळे तिथे ते फार विषारी ठरत नाही. हे क्लोरोक्विन अशा काही विकारांवर वापरतात की ते अनेक महिने, वर्षं द्यावं लागतं. हे चमत्कारिक विकार आहेत स्वप्रतिकारशक्तीमुळे होणारे (autoimmune disorders). बरेचदा हे आजार तरुण स्त्रियांना होतात, आणि सहसा बरे होत नाहीत. त्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन वापरतात, कारण क्लोरोक्विन वापरलं तर विषबाधा होते. डोळ्यांना त्रास होतो, हृदयावर परिणाम होतो. हे ‘क्विन’ ज्यांत येतं ती सगळीच औषधं सहा महिने, वर्षभर घेतली तर डोळे आणि हृदयाला इजा पोहोचवू शकतात.

परदेशात असे कोविड रुग्ण होते, ज्यांना या स्वप्रतिकारशक्ती विकारासाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सुरू होतं. त्यात दिसलं, जे लोक ते औषध घेत आहेत; त्यांना कोव्हिड होत नाहीये, झाला तर तो फार गंभीर होत नाहीये. वेगळ्या विकारासाठी वा आजारासाठी एखादं औषध वापरलं जात असताना ते आणखी कुठल्या विकारासाठी, आजारासाठी उपयुक्त सिद्ध झालं; अशी खूप उदाहरणं आहेत. जसे दुरुपयोग असतात, तसे हे कदाचित निराळे उपयोग. जेव्हा जंतूसंसर्गावर आपल्याकडे औषधंच नव्हती तेव्हा आधुनिक केमोथेरपीचा जनक पॉल एरलिच आणि पुढे डोमॅक यांनी सल्फा औषधांचा शोध लावला. तुम्ही हे नाव कदाचित ऐकलं असेल. ते हल्ली फारसं वापरात नाही. १९३०-६० या दशकांत आपल्याकडे सल्फा औषधं ही जिवाणू मारण्याची जालीम औषधं होती. अत्यंत परिणामकारक. तेव्हा घसा आला, टॉन्सिल्स सुजले तर सल्फा औषधं द्यायचे. तेव्हा लक्षात आलं की ह्या औषधांमुळे मधुमेही लोकांची साखर कमी होते आहे. मग त्यातून मधुमेहाची औषधं आली. शिवाय समजलं, त्यातून थायरॉईड ग्रंथीमधून थायरॉक्सिन स्रवण्याचं प्रमाण कमी होतंय. मग त्यातून प्रतिथायरॉइड औषधं आली; वगैरे. अशी अनेक उदाहरणं आहेत.

एका औषधात बदल करून, रेणूरचना किंचित बदलून वेगळ्याच रोगासाठी, विकारासाठी औषध मिळालं अशीही उदाहरणं आहेत. गोल भोक तर गोल खुंटी; चौकोनी भोक तर चौकोनी खुंटी. हिंदी सिनेमात कसे जुडवा भाई आणि फसवणूक वगैरे चालते, तशी ही औषधं विषाणू किंवा जीवाणूंची फसवणूक करतात.

आता हे नवीन औषध आलंय २ डी ग्लुकोज ते काय आहे? तर ग्लुकोजच्या रेणूमध्ये सहा जागी हायड्रॉक्सिल (OH) असतं; त्यातल्या दोन ठिकाणचा O काढून टाकला. नुसताच H राहिला की झाला 2DG तयार. ज्या पेशींना संसर्ग झालेला असतो त्यांच्यामधला चयापचय वाढलेला असतो; म्हणून त्यांना ग्लुकोजची गरज जास्त असते. (ग्लुकोजचे विघटन – ग्लायकॉलिसिस होऊन पेशींना उर्जा मिळते.) त्या पेशी ग्लुकोज समजून हे औषध शोषून घेतात आणि त्यांची फसवणूक होते.

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन निरुपयोगी आहे अशातील भाग नाही, पण आता त्याच्यापेक्षा चांगली, जास्त परिणामकारक औषधे आली आहेत. त्याची विषबाधा, अनुषांगिक परिणाम (साईड इफेक्ट्स) जास्त आहेत. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन द्यायचं तर आधी ईसीजी काढावा लागतो. मग जिथे इतर औषधं नाहीत, तिथे हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन वापरायला हरकत नाही.

प्रश्न – हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनवरून आपण पुढे गेलो. मग आयुष मंत्रालयानं पर्यायी औषध पद्धती दिली – आर्सेनिक आल्बम, पतंजलीनं कोरोनील आणलं. शास्त्रशाखा म्हणून औषधशास्त्र या पद्धतींकडे कसं बघतं?

उत्तर – सगळ्या पर्यायी पद्धती एकाच तराजूत तोलू नयेत. त्यांचे गुणावगुण आहेत. मला कोणी विचारलं तर मी उत्तर देतो, “मी कुठल्याही पर्यायी औषधपद्धतींबद्दल मतप्रदर्शन करत नाही”. कारण मी त्यांतला तज्ज्ञ नाही.

आधुनिक वैद्यक पुराव्यांवर आधारित आहे. संशोधन केलं जातं, पुरावे शोधले जातात, चाचण्या होतात. आधुनिक वैद्यक सगळ्यांत शास्त्रीय आहे, यांत काही वाद नाही. आमचा आग्रह असा असतो, पर्यायी उपचारपद्धतींच्या उपचारांची आधुनिक वैद्यकाच्या पद्धतीनं चाचणी व्हावी. त्या लोकांचं म्हणणं असतं, आमच्या मूळ धारणाच निराळ्या आहेत, आमचा अभ्यासक्रम निराळा आहे, पद्धती निराळी आहे तर तुमची परीक्षापद्धती कशी स्वीकारणार!

मला वाटतं, प्रत्येक औषधाला एक शास्त्रीय प्रतिमा असते, शिवाय एक राजकीय आणि एक लोकप्रियतेची प्रतिमाही असते. त्यावर आजार आणि बाजार यांचं संतुलन अवलंबून असतं. ज्यांना पटतं त्यांनी घ्यावं, ज्यांना नाही पटत त्यांनी घेऊ नये. हा शेवटी रुग्णाच्या निवडीचा प्रश्न आहे!

भलेभले आजारी पडतात, तेव्हा ते आधुनिक वैद्यकाकडे येतात, हे मात्र खरं.

प्रश्न – आधुनिक वैद्यकाचा एक भाग करोनाकाळात दिसला. जी औषधं घ्यायला सांगितली जात होती, ती बाजारात नव्हती. म्हणून काही डॉक्टरांनी इतर काही औषधं द्यायला सुरुवात केली, स्वतःच प्रयोग करत. हे डॉक्टर त्यांच्या व्यावसायिक मित्रमंडळात याबद्दल चर्चा करत असतील. पण अनेक डॉक्टरांनी औषधांचा नको तसा वापर केला काय, अशी शंका येत होती. शिवाय, आपल्याकडे शेड्यूल एच औषधंही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. याबद्दल तुमचं काय मत आहे?

उत्तर – या प्रश्नाचे मी तीन भाग करेन. एखाद्या आजारासाठी जे मानक उपचार (standard of care) शासन वा शास्त्रीय संस्थांनी प्रमाणित केलेलं नाहीत, अशी औषधं वापरावीत का, हा पहिला मुद्दा. त्याचं उत्तर – नक्की वापरावीत. याला ऑफ लेबल यूज म्हणतात. जेव्हा ही मान्यता शासन किंवा शासकीय संस्थांकडून येते, तेव्हा ते कसे वापरावं याचे निकषही दिलेले असतात. पण जर एखाद्या मान्यताप्राप्त पदवीधारक डॉक्टरांनी वेगळं काही ठरवलं – उदाहरणार्थ, कोव्हिडच्या रुग्णांसाठी दम्याचे रुग्ण ज्या प्रकारचे श्वसन फवारे (इन्हेलर्स) वापरतात, ते मी वापरायला सांगतो. स्टिरॉईड्स जर तोंडावाटे किंवा रक्तावाटे दिली तर त्यांची पातळी वाढून जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात. त्या ऐवजी ती थेट फुफ्फुसात दिली तर त्यांचा फायदा जास्त होईल आणि डोस कमी करता येईल. हा झाला ऑफ लेबल यूज. हे का, तर ही औषधं वारंवार अनेक रुग्णांमध्ये, इतर आजारांसाठी वापरली गेलेली असतात. त्यांची ओळख चांगली झालेली असते. त्यांचं काम कसं चालतं, परिणाम कसा होतो, दुष्परिणाम कोणकोणते, हे सगळं माहीत असतं. अशाच औषधांचा ऑफ लेबल वापर करता येतो. कुठल्याही डॉक्टरला जे औषध बाजारात नाही, मान्यताप्राप्त नाही, ते असं वापरता येत नाही.

आणखी एक उदाहरण. काही डॉक्टरांनी मेथिलीन ब्लू वापरलं. अत्यंत स्वस्त औषध आहे. त्याला काही संदर्भ आहेत. ते तोंडावाटे घेता येतं, इंजेक्शन देता येतं, हुंगून देता येतं. विंचूदंशावर संशोधन करणारे डॉ. हिंमतराव बावस्कर, त्यांनी ते कोव्हिडसाठी वापरलं. पुलंनी एकदा विनोदानं म्हटलं होतं, डॉक्टर नेहमीच प्रॅक्टिस करतात, नेहमीच रंगीत तालीम असते. आम्ही जो प्रत्येक रुग्ण पाहतो, ती एक प्रकारे चिकित्सा (क्लिनिकल) चाचणीच आहे – औषध वापर सुरु झाल्यानंतरचा अभ्यास (पोस्ट मार्केटिंग सर्वेलंस). प्रत्येक रुग्ण निराळा असल्यामुळे तो एक प्रयोगच असतो. यात काही अत्यल्प मोजकी जोखीम (calculated risk) आहे.

या चर्चेत जुन्या औषधांच्या नव्या वापराचाही समावेश होतो. हे करताना काळजी घेतली पाहिजे. या औषधामुळे रुग्णाला मिळणारा फायदा किती, आणि तोटा किती. हा फायदा जेवढा मोठा तेवढा तो औषध वापरण्याचा (डॉक्टरचा) अधिकार जास्त. हा पहिला भाग.

दुसरं, या ऑफ लेबल वापराचा हिशोब आपल्याकडे ठेवला जात नाही. ज्या देशांत केंद्रीय आरोग्यपद्धती आहेत, तिथे प्रत्येक रुग्णाची प्रत्येक नोंद ठेवली जाते, तिचं वेळोवेळी विश्लेषण होतं. कोव्हिडच्या उपचारांमध्ये वेळोवेळी जे बदल झाले ते अशा विश्लेषणामुळेच झाले. उदा. रेमडेसिव्हिर सगळ्या रुग्णांत उपयोगी नाही, किंवा फाव्हिपिरावीर आजार कमी असतानाच दिलं गेलं पाहिजे. आताही बाजारात जी औषधं येत आहेत, ते या प्रयोगांमधूनच ठरत आहे. हे २ डीजी आलंय, ते फक्त गंभीर रुग्णांसाठीच आहे. त्या रुग्णाला इतर सर्व औषधे सुरू ठेवूनच हे औषध द्यायचं असतं. त्यामुळे हॉस्पिटलमधला मुक्काम कमी होईल; दहाऐवजी सातच दिवसांत घरी जाता येईल. ऑक्सिजनचा वापर कमी होईल. कुठल्याही औषधाचा वापर कसा व्हावा, हे संशोधनाच्या उद्देशातच स्पष्ट केलेलं असतं. मग कुठल्या प्रकारचे रुग्ण, औषधाची मात्रा, परिणाम, अनुषांगिक दुष्परिणाम, काळजी काय घ्यायची, हे सगळं त्यात येतं.

तिसरा तुमचा मुद्दा योग्यच आहे. औषधांचा अतिवापर, गैरवापर होतोच. खर्चिक औषधं वापरली जातात. अधिक दुष्परिणाम होणारी औषधं वापरली जातात, हे खरंच आहे. पृथ्वीवरच्या मनुष्यप्राण्यांस होणाऱ्या आजारांपैकी बऱ्यापैकी प्रमाण उपचारांमुळे होणाऱ्या आजारांचं आहे. त्यात गंभीर आजारही आहेत. याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. यासाठी औषधदक्षता (फार्माकोव्हिजीलन्स), लसदक्षता (व्हॅक्सीन व्हिजीलन्स) असतो. आम्ही हे वारंवार त्यासाठीच शिकतो. कित्येक औषधं बाजारात आली, पण तोटाच जास्त असल्यामुळे गेली. कित्येक औषधं देण्याचे प्रकार बदलले. दम्यासाठी एक सालब्युटामॉल नावाचं औषध वापरलं जातं, त्यामुळे बारीक श्वासनलिका मोठ्या होतात. ते आधी तोंडावाटे दिलं जायचं. मग त्याचे दुष्परिणाम दिसले : हात थरथरणं, हृदयाची गती वाढणं, घबराट वाटणं. आता मग ते श्वासाच्या मार्गानं दिलं जातं. हे असं सतत सुरू असतं.

चुका सहसा अज्ञानातून होतात. आपल्याकडे औषधांचा वापर नको त्या लोकांकडून, नको त्या वेळी, नको तसा होतो. औषधं तज्ज्ञच देतात असं नाही, स्वतःला तज्ज्ञ म्हणवणारे तथाकथितही देतात. आपल्याकडे कुणीही स्वतःला तज्ज्ञ म्हणवून घेतात, नावामागे पदव्या लावतात. हे योग्य नाही.

प्रश्न – करोनाकुळातले ‘मर्स’ आणि ‘सार्स’ जेव्हा आले होते तेव्हा औषधांबद्दल काही संशोधन झालं होतं का? सार्स-कोव्ह-२ या विषाणूबद्दल औषधशास्त्राला नक्की काय समजलेलं नाही? कोव्हिडच्या संजीवनीपर्यंत पोहोचण्याच्या आड कुठल्या अडचणी आहेत?

उत्तर – अडचणी नाहीत, पण त्याला वेळ लागतो. रुग्णांवर उपचार करताना दोन-तीन विषाणूविरोधी औषधं वापरली जात आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो. आणि दोन-तीन येऊ घातली आहेत. मोनोक्लोनल अँटीबॉडिजचं मिश्रण, मॉल्युपिराव्हिर, इंटरफेरॉन अल्फा २ यांच्यावर काम सुरू आहे.

या सगळ्याला वेळ लागतो. कारण कुठलंही औषध बाजारात येण्याआधी त्यावर संशोधन करावं लागतं. त्याला खूप वेळ, श्रम, आणि पैसे लागतात. त्यात घाई करणं योग्य नाही, कारण दुष्परिणाम झाले तर ते फार वाईट ठरतं. आत्ता या संशोधनानं योग्य दिशा घेतली आहे. विषाणू हा मुळातच त्रासदायक प्रकार आहे. विषाणूविरोधी औषधांना येणारं यश मर्यादित स्वरूपाचं असतं. फार थोडे विषाणूजन्य आजार १००% बरे होतात. बऱ्याच विषाणूंविरोधात औषध नसल्यामुळे ते लसी वापरून रोखले जातात.

दुसरं, रुग्णांच्या उपचारात लाक्षणिक उपचार वापरले जातात; म्हणजे त्रास, लक्षणांवर उपचार होतो. तापाकरता पॅरासिटामोल; खोकला ओला किंवा कोरडा असेल तर त्याप्रमाणे; थुंकी पडत असेल तर चिकट आहे का नाही; अंगदुखी, पाठदुखी, पोट खराब होणं… अशा सगळ्यांवर आपल्याकडे प्रभावी औषध आहे. औषधं उलटून पडत असतील तर त्यावरही इलाज आहे.

समजा कुणाला ९ गोळ्या एकत्र गिळणं जमत नाहीये, भीती वाटत्ये तर हरकत नाही. ८ वाजता एक गोळी घ्या, साडेआठला दोन घ्या. अशा हळूहळू घेतल्या तरी चालतील. डॉक्टर या गोष्टी रुग्णापर्यंत कशा पोहोचवतात, ते महत्त्वाचं आहे. ते औषध पहिल्या चोवीस तासांत ३६०० मिलीग्रॅम जाणं महत्त्वाचं आहे. तासाला एक गोळी घेतली तरीही चालते. हे डॉक्टरचं आकलन रुग्णापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. एरवी कोण ९ गोळ्या एकत्र घेत! (सलग ९ दिवस आंघोळीच्या गोळ्या घेणं निराळं!)

लोकांच्या शंकांचं निरसन करणं महत्त्वाचं आहे. चोवीस तास डॉक्टर रुग्णांसाठी उपलब्ध असले पाहिजेत. फोन उचलता आला नाही, तर नंतर फोन करून कळवा. रुग्णांच्या सगळ्या समस्या डॉक्टर किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सोडवल्या पाहिजेत. लोकांना खूप शंका असतात. कालचं उदाहरण सांगतो –

आमच्या एका परिचितांना बंगळुरूमध्ये कोव्हिड झाला. मी त्यांच्या बायकोला म्हणालो, “बाळा, तू त्यांचं तापमान, श्वसनगती, रक्तदाब, ऑक्सिजनचं प्रमाण दर तासा-दोनतासांनी मोजून मला कळवत राहा.” माझी चूक झाली बोलताना. दर दोन तासांनी कळवत राहा, हे आलं नाही; आलं फक्त मोजत राहा. तिनं मला संध्याकाळी यादी पाठवली. दुपारपासून त्यांचा ताप १०० पासून वाढत संध्याकाळी पाचला १०५ फॅ. झाला होता. रुग्ण पाच तास अतिउच्च तापात होता. मग माझ्या लक्षात आलं सूचना कशा द्यायच्या की मोजमापं केल्यावर ॲबनॉर्मल असतील तर लगेच ती कळवा, संध्याकाळपर्यंत थांबू नका.

रुग्ण आमचे सर्वोत्तम शिक्षक असतात.

प्रश्न – पतंजलीचं कोरोनील आलं. मार्केटात धोशा सुरू झाला की लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही सुरू करू. त्यात मल्टीव्हिटॅमिन, च्यवनप्राश, काढे, आयुर्वेदिक औषधं असा बराच पसारा आला. याचा वापर आणि परिणाम याबद्दल काही सांगा.

उत्तर – जे विकतं ते पिकतं!!! टीव्ही लावा, सॅनिटायझरच्या जाहिराती पाहा किती आहेत! बहुतेक जाहिराती ९९% विषाणू मारणाऱ्या आहेत. नियंत्रणाचा भाग आपल्याकडे कागदावर आहे आणि पळवाट काढणारी माणसं आहेत.

सत्य अत्यंत निराळं आणि दूर असतं. या प्रकारांनी प्रतिकारशक्ती वाढते असं सिद्ध करता येत नाही, आणि वाढत नाही असंही सिद्ध करता येत नाही. पर्यायी उपचारपद्धतींचं वैशिष्ट्य पाहा – ज्याकरता आधुनिक वैद्यकात ठाम काही नाही, असे भाग त्यांनी पकडले आहेत. (थोडक्यात केंद्रशासित प्रदेश!) अ-कावीळ किंवा ‘हिपॅटायटिस ए’वर आधुनिक वैद्यकात औषध नाही. मग मंत्रतंत्र, पाण्यात हळदीचं पाणी वगैरे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम, शिस्तशीर आयुष्य, प्रथिनयुक्त आहार आणि या सगळ्यांत नियमितता लागते. लहान मुलांमध्ये कोव्हिडचं प्रमाण आणि गंभीर आजाराचं प्रमाण कमी आहे, याचं एक कारण आहे की लहान मुलांना अनेक लशी दिलेल्या असतात. गोवर आणि कोव्हिडच्या विषाणूत काही प्रमाणात साम्य आहे; लहान मुलांना ती लस दिलेली असते.

आमच्या काही लोकांनी सुरुवातीला बीसीजीची लस घेतली.

आपल्या प्रतिकारशक्तीचे दोन भाग करता येतील. सर्वसाधारण आणि जंतूविशिष्ट प्रतिकारशक्ती. सर्वसाधारण प्रकारात आनंदी राहा, हसा, ‘मला आजारच होणार नाही’ असं म्हणा, म्हणजे मानसिक गोष्टी येतात. चांगलं खाणं-पिणं, व्यायाम, वगैरे हे शारीरिक प्रकारातलं. जंतूविशिष्ट अशा प्रकारची प्रतिकारशक्ती बीसीजीमुळे मिळते. ती क्षयविरोधी लस म्हणून वापरात आहे. ती शरीरारतल्या लसिकापेशींना (लिम्फोसाईट्स) सशक्त करते. त्या लसीमुळे कुष्ठरोग, काही प्रकारचे कर्करोग थांबतात. बीसीजीमुळे करोनाविरोधात प्रतिकारशक्ती मिळते का हे सिद्ध व्हायचं आहे, पण बीसीजी लस घेण्यात तोटा काय आहे? ०. १ मिली इंजेक्शन घ्यायचं असतं. नुकत्या जन्मलेल्या बाळाला, एक दिवसाच्या आत आपण ते देतो. १०-१२% लोकांना किरकोळ ताप येतो, लाली-सूज येते; ५०० लोकांत एकाला आपोआप जाणारी गाठ येते; हजारात एखाद्याला थोडी आणखी मोठी गाठ येते ती औषधानं जाते; ज्या औषधाचं वर्तन, प्रभाव आणि सुरक्षितता या गोष्टी आपल्याला माहीत आहेत ते प्रभावी नसेल तरीही प्रभावी असलं तर? असं म्हणून घ्यायला काय हरकत आहे? ही टाळण्यातली चूक आहे का करण्यातली? पण समजा एखाद्या औषधाचा गंभीर दुष्परिणाम होत असेल, उदाहरणार्थ स्टिरॉईड्स. त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मी ती फारच कमी प्रमाणात वापरतो. रुग्णाच्या रक्तात कोव्हिडमुळे वाढलेली रसायनं वाढलेली दिसत नाहीत, किंवा त्याच्या एचआरसीटी मध्ये ८च्या वर आजार दिसत नाही तोवर स्टिरॉइड वापरण्याची गरज नाही. हे किती लोक, कसं पाळतात यावर आपल्याकडे नियंत्रण ठेवता येत नाही. जिथे सरकारी आरोग्य यंत्रणा असते तिथे हे नियंत्रण ठेवलं जातं.

मुद्दा असा, एखाद्या औषधाचे मोठे दुष्परिणाम नसतील तर घ्यावं. रुग्ण मला विचारतात, ताप नसेल तरी पॅरासिटामॉल घेऊ का? मी म्हणतो, घ्या; ताप येऊ नये म्हणून घ्या. कुणाला ताप आलेला चालणार असेल तर पॅरासिटामॉलची गरज नाही. रुग्णाच्या सवयी, स्वभाव, मानसिकता वगैरे गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. काही लोकांना औषधांमुळे ॲसिडिटी होते; मी त्यांना त्यासाठी औषधं लगेच देत नाही. त्रास झाला तर जरूर देईन.

याचंही शास्त्रीय कारण आहे. ॲसिडिटीकरता जेल्युसिल वगैरे लोक वापरतात. त्यात हायड्रॉक्साईड्स असतात. त्यातलं जेल इतर औषधांना आपल्या कवेत घेत, आणि मग ती औषधं अशीच खाली निघून जातात. मूळ औषधं रक्तात शिरतच नाहीत. आणखी एक उदाहरण पाहा. मधुमेही लोकांना क जीवनसत्त्व दिलं, ते लोक घेतात. चघळायच्या गोळ्यांत साखर असते. मधुमेही लोकांची साखर त्यातून वाढते. असा सूक्ष्म विचार करावा लागतो. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक कागद नीट वाचून, त्यांचा प्रत्येक शब्द नीट ऐकून मग उपचार केले पाहिजेत. तरच मनाजोगती फी लावा.

प्रत्येक रुग्ण आणि प्रत्येक आजार निराळे असतात. सरसकटीकरण हे सरसकटीकरणच ठरणार.

प्रश्न – लसीकरणाचा वेग नजीकच्या भविष्यात वाढेल अशी आशा करू. त्यातून प्रतिबंधात्मक उपाययोजना होतील. पण समजा अतिशय प्रभावी औषध मिळालं तरीही लशीकरण सुरू ठेवावं का?

उत्तर – यात वादाचा काही प्रश्नच नाही. कोणत्याही आजारासंदर्भात आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा आजाराला प्रतिबंध करणं नक्कीच श्रेयस्कर. लस हेच उत्तर.

देवी, पोलिओ, गोवर, गालगुंड, किती प्रमाणात दिसतात आता? लसीकरण हेच उत्तर आहे, यात काहीही शंका, वाद नाही.

लसीकरणाचा खर्च मात्र जास्त होतो. कारण सगळ्यांना लस द्यावी लागते. फक्त आजारी पडतील त्यांनाच लस देऊ, असं म्हणलेलं चालेल का? नाही. १०० पैकी ९० लोकांना विनाकारण लस दिली जाईल. त्यांना एवीतेवी संसर्ग होणारच नव्हता. पण लस न देण्यामुळे ज्या १० लोकांना संसर्ग झाला असता, तो त्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबांना, समाजाला, देशाला आणि संपूर्ण जगालाच परवडत नाही. त्यामुळे अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी लस शोधणं हेच कुठल्याही आजाराला तोंड देण्यासाठी श्रेयस्कर आहे. म्हणूनच आपण मलेरियावर किती तरी काळ लस शोधत होतो. मात्र ती लस प्रभावी आणि सुरक्षित असली पाहिजे. सुदैवानं जगातल्या सगळ्या लसी अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक, प्रभावी आहेत. काहींचा प्रभाव आयुष्यभर टिकतो, काहींचा तेवढा टिकत नाही. धनुर्वाताची लस दर ५ वा दहा वर्षांनी, वा दिवस गेल्यावर, वा शस्त्रक्रियेच्या आधी, वा जखम झाल्यावर घेतली पाहिजे.

प्रत्येक लसीचा वापरही निरनिराळ्या प्रकारे होतो. कुत्रा चावल्यानंतर श्वानदंशाचा विकार होऊ नये म्हणून घेण्याची लस कुत्रा चावल्यानंतरच घ्यायची असते – संसर्गपश्चात संरक्षण. अशी औषधंसुद्धा आहेत. समजा मी कुणा एचआयव्ही बाधिताची सेवा करतो आहे, आणि त्यात चुकून त्याचं रक्त घेताना ती सुई माझ्या बोटाला लागली तर माझ्या शरीरात तो विषाणू जाण्याची शक्यता आहे. तसं झालं तर मी औषधं घेतो, कारण त्यावर लस नाही. तेव्हा लस असेल तर लस, लस नसेल तर प्रतिबंधक औषध, आणि हे फक्त साथीच्या रोगासाठी लागू नाही.

वजन वाढलं, ताण वाढला, शरीराला पुरेसा रक्तपुरवठा करण्याची हृदयाची क्षमता नसेल, हृदयविकार झाला तर फक्त झटका येईल तेव्हाच तु्म्ही उपाय करत नाहीत. रोज कुठलीतरी गोळी घ्याल. हे का? तर पूर्वप्रतिरक्षा (प्रोफिलॅक्सिस) म्हणून. त्यात दोन प्रकार आहेत. औषधं घेऊन करण्याचा प्रतिबंध; आजार होण्यापूर्वीच औषधं घ्यायची. ह्यात लस येत नाही, लस म्हणजे प्रतिक्षमी प्रतिबंध (इम्युनोप्रोफिलॅक्सिस). कारण लशीमुळे विशिष्ट रोगाविरोधातच प्रतिकारशक्ती तयार होते. प्रतिजैविकांमुळे (अँटिबायॉटिक्स) वेगवेगळ्या जीवाणूंना प्रतिबंध होतो.

प्रतिबंध महत्त्वाचा. लसीनं होणारा प्रतिबंध सगळ्यांत महत्त्वाचा. त्या खालोखाल औषधांनी होणारा प्रतिबंध. या सगळ्याच्या आधी, जमेल त्या मार्गानं तब्येत ठणठणीत ठेवणं महत्त्वाचं. मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचं. तुम्ही किती फिट आणि किती स्नायू दिसतात यावर कुणाचीही रोगप्रतिकारशक्ती अवलंबून नसते.

याचं गणित नाही, मोजमाप नाही, चाचणी नाही. त्याला मार्केट चिकार आहे, पण ते शक्य नाही. आपली प्रतिकारशक्ती इम्युनोग्लोब्युलिन या स्वरूपाची असते, ती प्रथिनं असतात. त्यामुळे आहारातली प्रथिनं मात्र महत्त्वाची.

प्रश्न – सध्या जगभरात करोनाविरोधात ५-७ लशी आहेत. काही लसींचे डोस दरवर्षी घ्यावे लागतील अशीही शक्यता आहे. तर दरवर्षी लस घेण्यापेक्षा औषधांवर भरवसा ठेवणं अधिक स्वस्त पडेल का? तसंही पाश्चात्त्य देशांत जशी दरवर्षी फ्लूची लस घेण्याची पद्धत आहे, तशी आपल्याकडे नाही.

उत्तर – पाश्चात्त्य देशांसारखेच आपल्याकडेही आता न्यूमोकॉकल, आणि इन्फ्लूएन्झाच्या लसी घ्यायला सुरुवात झालेली आहे. कुठल्याही औषधाचा वापर एखादं राज्य, समाज किंवा देशाकरता करणं हा विषय सामाजिक आणि रोगप्रतिबंधक शास्त्रामध्ये येतो. त्यात राजकीय आणि आर्थिक गणितं वैद्यकाएवढीच, किंबहुना अधिक महत्त्वाची ठरतात. त्याची आवश्यकता तपासून बघितली पाहिजे.

फ्लू हा आजार अनेकांमध्ये किरकोळ प्रकारचा आजार आहे. फ्लू जर किरकोळ स्वरूपाचा असेल तर औषधंही वापरली जात नाहीत. इन्फ्लूएन्झा-ए या रोगाचे विषाणू मारणारी औषधं आहेत. या औषधांमुळे लक्षणं ७ ऐवजी ५ च दिवस राहतील; लोक दोन दिवस लवकर कामाला जातील. तर मग लोक म्हणतात की, घरी पडून राहतो. शिंका येतील, खोकला, ताप येईल. ते सहन करीन.
ही सहनशक्ती महत्त्वाची आहे.

हा संस्कृतीचा भाग आहे. खेड्यात माणूस झाडावरून खाली पडला तर आठवडाभर आराम करतो; दुखापत कमी होते, हाड जुळतं बऱ्यापैकी. आजाराला वेगवेगळ्या समाजांमध्ये, देशांमध्ये जी सांस्कृतिक प्रतिक्रिया येते, ती निरनिराळी असते.

 प्रश्न – गेलं वर्षंभर लसीच्या बाबतीत खूप चर्चा झाल्यामुळे अनेक सामान्य लोकांनाही लसीच्या प्रक्रियेची माहिती झाली आहे. लस प्रयोगशाळेत तयार होते; प्राण्यांवर चाचण्या होतात; चाचणीच्या तीन पायऱ्या होतात; किती लोकांवर होतात. पण औषधनिर्मिती, मान्यता, चाचण्या यांबद्दल फार चर्चा होत नाही. त्याबद्दल सांगाल का?

उत्तर – सोप्या भाषेत असं म्हणता येईल, नवीन औषध वा लसीचा जन्म कसा होतो? दोन्हींत फरक असा की औषध हे रसायन असतं आणि लस जैविक असते. आमच्या औषधशास्त्रात आधी लशीचा उल्लेख होत नसे, कारण ते जैविक आहे. लसी उपयुक्त असल्यामुळे आम्ही त्यांना आमच्यात ‘सामावून’ घेतलं आहे.

कुठल्याही औषधाचा जन्म गरजेपोटी होतो. समाजात आजार असतो, खूप प्रमाणात असतो किंवा गंभीर स्वरूप धारण करू शकतो, म्हणून समाजाला त्यावर औषधाची गरज असते. गरज निर्माण झाली की त्यावर संशोधन करणारे लोक वेगवेगळ्या प्रकारांनी सुरुवात करतात. जुन्या शास्त्रीय साहित्यात काही सापडतं का; जागतिक जडीबूटीमध्ये काही सापडतं का; पूर्वी अशा प्रकारच्या आजारांवर कुणी काही वापरून बघितलं होतं का; किंवा एखाद्या माणसाला काही नवीन कल्पना सुचते. म्हणजे हा आजार अशा प्रकारचा आहे तर त्यावर अमुक प्रकारे आपल्याला हल्ला करता येईल का. यांतला सगळ्यांत सोपा प्रकार असा की एखाद्या जुन्या औषधाची रचना बदलून ते वेगळ्या आजाराकरता वापरता येईल का. सगळ्यात आधी रेणू (मॉलेक्यूल), त्याची रचना तयार होते. ते पटापट होतं. संगणकामुळे रेणूमधले काही अणू, संयुगं बदलून तिथे वेगळे घटक आणायचे हे आता अगदी सहज करता येतं. हजार प्रकारच्या रचना करता येतात. आता या सगळ्या माहितीचं विश्लेषण संगणक करतो. औषधाची उपलब्ध माहिती वापरून नवं औषध किती उपयुक्त ठरेल आणि कसं त्रासदायक ठरेल याचा अभ्यास झटपट होतो. यात औषधासाठीचे ५०-६०% उमेदवार गळतात.

उरलेले रेणू, औषधं किती घातक हे तपासलं जातं, म्हणजे त्यांची विषबाधा किती होईल, हे औषध ठार मारू शकेल का, हे बघतात. मग उंदरांवर प्रयोग होतात. दहाच्या गटाला औषध देऊन चोवीस तासांत किती प्राणी मेले हे बघतात. हे वेगवेगळी मात्रा देऊन बघतात. त्यावरून औषधाचा थेराप्युटिक इंडेक्स ठरतो. प्राण्याला ठार करण्याकरता १००० मिलीग्रॅम लागतं, पण प्रभाव १ मिलिग्रॅममध्येच येतो. म्हणजे ते सुरक्षित आहे. ते मोजल्यानंतर औषधाच्या प्रभावाचा विचार होतो. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये तो आजार निर्माण करून, औषधामुळे तो आजार रोखला जातो का, किंवा बरा होतो का, याचा अभ्यास होतो. वेगवेगळ्या मात्रांमध्ये प्राण्यांना औषध देऊन कुठल्या मात्रेत ते उपयोगी ठरतं हे बघितलं जातं. याचं कोष्टक असतं. शरीराचं जेवढं क्षेत्रफळ आहे, त्यानुसार प्राण्यांच्या मात्रा माणसांमध्ये बदलल्या जातात. यात औषधासाठीचे ३०-४०% उमेदवार जातात.

यावेळी लसीचा अभ्यास माकडांवर झाला. कुठल्या औषधाला, रोगाला कुठले प्राणी वापरायचे याचंही गणित आहे. दोन-तीन प्रकारचे प्राणी घेऊन त्यांच्यावर औषधाच्या प्रभावाचा, रक्तातल्या प्रमाणाचा, मात्रांचा, दुष्परिणामांचा अभ्यास होतो. हा चिकित्सापूर्व (प्रीक्लीनिकल) अभ्यास. माणसाला औषध देण्याआधी केलेला अभ्यास. त्यात ह्या औषधाचा उपयोग होत आहे; ते असुरक्षित नाही; आधीच्या औषधांपेक्षा फार वाईट किंवा त्रासदायक नाही, आणि महाग नाही असं लक्षात आलं की ८-१० अत्यंत निरोगी, तरुण स्वयंसेवक घेऊन त्यांच्यावर प्रयोग होतो. त्यांच्याकडे अतिदक्षता विभागात लक्ष ठेवलं जातं. औषधामुळे त्यांना काही त्रास होतोय का, डोकं दुखतंय का, ऐकायला येणं कमी/बंद झालंय का, अर्धांगवायू येतोय का, डोळ्यांसमोर काजवे चमकतायत का, शेकडो गोष्टी. हे सगळं का, तर औषध सर्वसामान्य माणसाला देता यावं म्हणून. ही औषधाच्या चाचणीची पहिली पायरी. यात साधारण औषधासाठीचे १०% उमेदवार जातात.

दुसऱ्या पायरीत ५०-१००-२०० असे लोक निवडतात. ज्यांना हा संबंधित आजार वगळता इतर कुठलाही आजार नाही असे लोक. मधुमेह, रक्तदाब असे कुठलेही विकार नसणारे कोव्हिड झालेले लोक कोव्हिड औषधांच्या चाचण्यांसाठी निवडले. कारण या टप्प्यात सहसा फक्त त्याच आजारावरचा प्रभाव बघितला जातो. त्यातही रेमडेसिव्हिर विरुद्ध फाविपिराव्हिर किंवा एक औषध विरुद्ध दुसरं असा तुलनात्मक अभ्यास होतो. स्टँडर्ड, प्रमाणित उपचारपद्धती असेल तर तिच्या तुलनेत नवी पद्धती किती प्रभावी आहे, किंवा त्रासदायक, किंवा महाग, किंवा गैरसोयीची आहे, हे बघितलं जातं. या पायरीत औषधासाठीचे साधारण ५% उमेदवार गळतात.

यानंतरची आपत्कालीन पायरी असते, किंवा तशी नको असेल तर तिसऱ्या टप्प्यानंतर परवानगी मिळते. अनेक ठिकाणी चाचण्या आणि त्यात प्रत्येक ठिकाणी शेकडो रुग्ण, असं करतात. सहव्याधी असलेले लोकही त्यांत सामील असतात. यांचं विश्लेषण ८ दिवस, १५ दिवस, महिना, ३ महिने, ६ महिने कालावधीनंतर असं केलं जातं. हे अंतरिम विश्लेषण असतं. त्यातून होणाऱ्या आकलनातून काही आडाखे बांधले जातात. औषध फार प्रभावी असेल आणि दुष्परिणाम नसतील तर त्याला लगेच परवानगी मिळते. दुष्परिणाम जास्त असतील तर चाचण्या आणि वापर थांबवतात. तिसऱ्या पायरीच्या चाचणीत एखादं पुढे जातं. मग उरलेली औषधं बाहेर पडतात.

प्रयोग जपूनच, बिचकत केले जातात. काहीही आजार नसलेल्या लोकांत काय होतंय, एक आजार असेल तर काय, अनेक आजार असलेले लोक, वयस्कर लोकांचं काय असा अभ्यास होतो. यात सर्वसाधारणपणे गर्भवती स्त्रिया आणि बालकांचा समावेश असत नाही. जेव्हा ते औषध वापरात येतं तेव्हा गर्भवती स्त्रिया आणि बालकांमध्ये काही वेळा वापरावंच लागतं. ऑफ लेबल यूज. तेव्हा गर्भार स्त्रियांसाठी ते सुरक्षित आहे का, हे समजतं. उदा. फाव्हिपिराव्हीर गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित नाही.

गर्भावर दुष्परिणाम होत असतील तर ते औषध गर्भवती स्त्रियांसाठी वापरलं जात नाही. स्त्रीवर परिणाम होतो, हा पहिला भाग. पण त्या गर्भावर परिणाम होऊन ते बालक कायमचं अपंग होऊ शकतं.

औषधाच्या जन्माची प्रक्रिया ही अशी आहे. जग बदलणारं वगैरे औषध हवं असेल तर साधारण १० वर्षं, हजारो लोकांचं काम आणि अब्जावधी रुपये लागतात. एवढे स्रोत त्यासाठी लागतात, त्यामुळे सगळी औषधं सर्वगुणसंपन्न असतील असं नाही. तशी अपेक्षाच नाही. त्यांचा तोटा फायद्यापेक्षा जास्त असू नये, हे बघितलं जातं. रुग्णाला होणारा त्रास ही रुग्णानं बरं होण्याकरता मोजलेली किंमत आहे, अशी आधुनिक औषधशास्त्राची धारणा आहे. जी शास्त्रं असं म्हणतात की आमच्या औषधांचा काही दुष्परिणाम नाही, त्यांचा प्रभावही नसतो; असं आधुनिक औषधशास्त्र मानतं. 

प्रश्न – दोन-तीन महिन्यांपूर्वी ‘सॅनोटाईज’वर समाजमाध्यमावरची लोक फार खुश झाली होती, ‘रामबाण उपाय आला’ करत. गेल्या आठवड्यात तसंच डीआरडीओच्या औषधामुळे झालं आहे, ‘आला, आला’. त्यात काय तथ्य आहे? औषधाच्या मर्यादा दिसायला लागतील का?

उत्तर – ‘सॅनोटाईज’ हे नाकात घालायचे थेंब आहेत, त्यात नायट्रेट्स आहेत. ही औषधं अत्यंत कमी प्रमाणात दिली असता, विषाणूंचा थेट नायनाट करतात. करोनाचा विषाणू शरीरात नाकावाटे शिरतो. कुणा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संसर्गात आपण आलो असू, आणि वाटलं की विषाणू आपल्या नाकात शिरले आहेत, तर नाकात ते थेंब टाकले असता नाकात तिथेच राहिलेले विषाणू या औषधामुळे मरतील. हे त्या मागचं विज्ञान. मात्र हे विषाणू नाकातून श्वसनमार्गात पुढे फुफ्फुसांच्या दिशेला गेले असतील तर त्याचा फार उपयोग नाही. नायट्रेट हे स्थानिक वापराचं औषध आहे. नायट्रेट फार जास्त प्रमाणात वापरलं तर रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसतात, रक्तदाब उतरतो, चक्कर येऊ शकते, डोकं दुखतं, गोंधळ होऊ शकतो. झुरळांवर मारतात तशा प्रकारचं हे औषध आहे. करोना झुरळ आहे असं समजा.

डीआरडीओच्या औषधाची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी पूर्ण झालेली आहे. या औषधाचं सूतोवाच गेल्या वर्षीच झालं होतं. आपण जे काही अन्न खातो, ते ऊर्जा मिळण्याकरता खातो. शेवटी या अन्नाचं ग्लूकोजमध्ये रूपांतर होतं. ग्लूकोजमधून आपल्याला शक्ती मिळते. त्या ग्लूकोजसारखाच दिसणारा रेणू त्यांनी तयार केला आहे, २ डीऑक्सी ग्लुकोज – २ डीजी . त्यांतल्या ६ OHपैकी (हायड्रॉक्सिल) ४ ठेवले आणि दोन काढून टाकले. तिथे फक्त हायड्रोजन आहे, ऑक्सिजन काढून टाकला – डीऑक्सीकरण केलं. पेशी याला फसतात, त्यांना ते ग्लूकोज वाटतं आणि त्या ते घेतात. रचनेतल्या साम्यामुळे पेशी फसतात. पेशी फसतील तसे विषाणूसुद्धा फसतील.

मग चयापचयाकरता जे ग्लूकोज लागतं ते त्यांना मिळणार नाही. पेशी ग्लूकोजचे तुकडे करून त्यातून ऊर्जा मिळवतात, पण या रेणूमधून ऊर्जा मिळणारच नाही. कारण हा चिपाड झालेला ऊस आहे. विषाणू काय, आणि पेशी काय, त्यांचं मग पुनरुत्पादन होणार नाही. विषाणूला पुनरुत्पादन करण्यासाठी, सुटे भाग तयार करायला जी ऊर्जा, ग्लूकोज लागतात, तेच या औषधानं थांबवलं. हे औषध फक्त ज्या पेशींमध्ये विषाणू आहे तिथेच जातं. इतरत्र फारसे दुष्परिणाम निर्माण होणार नाहीत, असा दावा आहे. याबद्दल शंका घ्यायला जागा आहे.

याचे फायदे बघू. हे तोंडानं घ्यायचं औषध आहे, पाण्यात टाकायचं आणि प्यायचं. तीन ग्रॅम, ग्लूकोज घेतल्यासारखं. याची उत्पादनपद्धती साधी आहे. याची किंमत जास्त असणार नाही. घरच्या घरी घेता येईल.

ते जर घरीच दिलं तर आजार वाढणार नाही, आणि रुग्णालयात जावं लागणार नाही. ज्यांचा आजार बळावून रुग्णालयात जावं लागलं आहे त्यांना ऑक्सिजन द्यावा लागणार नाही. ऑक्सिजन द्यावा लागला तर वापर कमी होईल. रुग्ण १० दिवसांऐवजी ७ दिवसच हॉस्पिटलमध्ये असेल. खर्चही कमी होईल. आपल्या आधारभूत संरचनांचा (इन्फ्रास्ट्रक्चर) वापर कमी होईल.

मी सध्या पिंपरीच्या जंबो कोव्हिड सेंटरमध्ये काम करतोय. गेल्या आठ दिवसांत लक्षात आलं की ऑक्सिजन कमी आहे, मग खूप चांगल्या प्रकारे ऑक्सिजन बचत योजना राबवली. प्रत्येक रुग्णाला किमान आवश्यक ऑक्सिजनच देऊन, यंत्रामध्ये फेरफार करून आणि रुग्णांना योग्य सूचना देऊन ऑक्सिजन वाचवला. (म्हणजेच औषध न देताही आधारभूत संरचनांचा वापर कमी करता आला.)

या डीआरडीओच्या औषधाचा वापर खूप कमी कारणांकरता झालेला असल्यामुळे त्याचे फायदे आणि दुष्परिणाम समजलेले नाहीत. थायरॉईड कॅन्सरच्या केमोथेरपीबरोबरच ते वापरलेलं आहे.

हे औषध एकटं वापरायचं नाहीये. इतर सर्व स्टँडर्ड केअरबरोबर वापरायचं आहे, (इतर औषधे चालू ठेवून हे वापरायचे आहे) म्हणजे सगळं पान भरलेलं असताना हे औषध म्हणजे कोशिंबीर आहे. तेव्हा वाट बघूया.

 प्रश्न – समाजमाध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू झालेली आहे की पतंजलीच्या आचार्य बाळकृष्णांनी हे औषध उपयुक्त असल्याचं दाखवून दिलेलं होतं. त्यात कितपत तथ्य आहे?

उत्तर – त्यात तथ्य आहेच. तसं या औषधावर जगात अनेक लोकांनी काम केलेलं आहे. Modern Pharmacology deals with chemicals. ज्या रसायन, पदार्थाची रचना माहीत आहे ते आधुनिक वैद्यक झालं. ते पर्यायी वैद्यक असत नाही.

प्रश्न – दीर्घकालीन कोव्हिडवर उपचार करावे लागतील असं दिसत आहे. त्याबद्दल काही सांगा.

उत्तर – रुग्णांमध्ये ज्या काही कोव्हिडोत्तर समस्या निर्माण होत आहेत, त्याचा अंदाज ६-८ महिन्यांपूर्वीच आलेला आहे. शिवाजीनगर कोव्हिड सेंटरला पुणे मनपानं कोव्हिडोत्तर ओपीडीही सुरू केली होती.

७-८ प्रकारचे प्रश्न त्यात आहेत. काही लोकांच्या शरीरांत रक्तवाहिन्यांमध्येच रक्त गोठण्याची शक्यता निर्माण होते. त्यातून गुंतागुंत निर्माण होते, लकवा, शरीराचा एखादा भाग लुळा पडणं, हृदयविकाराचा झटका वगैरे. त्यावर प्रतिबंधक उपाय केले जातात. ॲस्पिरिनसारखी पेशिकारोधी (रक्त पातळ करणारी) औषधं आहेत. शरीरात रक्त गोठण्याला प्रतिबंध करणारी औषधं बरीच प्रभावी आहेत. सुरुवातीला लक्षात न आल्यामुळे काही लोकांमध्ये ती गुंतागुंत झाली.

काही लोकांना विषाणूजन्य तापानंतर, डेंग्यू, चिकनगुनियानंतर जशी अंगदुखी, सांधेदुखी होते तसा त्रास होतोय. त्यात वेदनाशामकांचा चांगला उपयोग करता येतो. रुग्णांच्या तब्येतीनुसार, आवडीनिवडीप्रमाणे ५० प्रकारची औषधं उपलब्ध आहेत. सगळ्यांत महत्त्वाचा भाग, फुफ्फुसांत तंतूमयता निर्माण झाली तर त्या व्यक्तीची हवा आत ओढून, शोषून घेण्याची, श्वासोच्छवासापैकी श्वासाची क्षमता कमी होईल; वायुकोषातली हवा रक्तात जाणार नाही; आणि त्या व्यक्तीला नेहमीच प्राणवायूचा तुटवडा राहील. अशा रुग्णांना दीर्घकाल ऑक्सिजन लावून घरीच ठेवता येतं. बऱ्याच लोकांची बाहेरून प्राणवायू मिळवण्याची गरज कमी होते. पहिल्या आठवड्यात १५ लिटर, तर पुढच्या आठवड्यात १० लिटर, मग २ लिटर, १ लिटर, आणि मग तो आम्ही काढून पाहतो. मग तो मनुष्य कदाचित ९०-९५% च्या पुढे प्राणवायू न देताही राहू शकतो. व्हेंटिलेटरवरच्या माणसाचं आम्ही जसं बघतो, व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेता येतोय का नाही, तेव्हाही गरज कमी करत बघता येतं.

आणखी एक गुंतागुंत आहे ती, म्युकर मायकॉसिस. हा एक बुरशी (कवक) संसर्ग आहे. मधुमेही, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, स्टिरॉईड्स दिलेली आहेत, त्यांना हा त्रास होतो. हाडांच्या पोकळ्या, सायनसेस, या भागांत संसर्ग होतो. यावरचे उपचार महाग आहेत. कधी सायनसचा भाग काढून टाकावा लागतो, कधी डोळा काढून टाकावा लागतो. दृष्टी जाते. आणि आपल्याला याला सामोरं जावं लागतंय!

एका वर्षात वैद्यकशास्त्रानं जी मजल मारली आहे, ती बऱ्यापैकी चांगली आहे. लोकांनी अंगावर लक्षणं काढली नाहीत. लवकर योग्य त्या तज्ज्ञाकडे गेले; लवकर चाचणी, तपासणी करून घेतली; तर कोविड फार काळजी करण्यासारखा नाही. गंभीर आजार जिथे होतोय तिथे व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, आरोग्यव्यवस्था, तिथले कर्मचारी यांच्या चुकीचा भाग आहे. एकदा उशीर झाला की काही करता येत नाही; मग कावळा बसतो आणि फांदी मोडते. वाईट वाटतं अशा वेळी!

चूक कुणाची आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न नाही. पण लोक वेळेवर उपचार करत नाहीत हे खरं. हा फक्त रुग्णांचा दोष नाही. कुटुंब, समाज, आरोग्यव्यवस्था, इतर व्यवस्थाही. म्हणजे औषध न मिळणं. स्मार्टफोनच्या जगात लखनौ, दिल्लीच्या रुग्णांची माहिती मिळते आहे. ऑक्सिजन आणि हॉस्पिटलचे बेड सोडाच, काही राज्यांमध्ये फाव्हिपिराव्हिर मिळत नाही. मग पर्याय द्यायचा! काही तरी आहे द्यायला!! काही तरी औषध मिळाल्याचं समाधान रुग्णाला असतं! शास्त्रात प्लासिबोबद्दल लिहिलेलं आहेच. डॉक्टर आपल्याशी बोलले, ही भावनाही बरं होण्यासाठी महत्त्वाची असतेच.

थोडक्यात, अशा चुका न करता वेळात योग्य उपचार घेतले तर आतापर्यंत उपलब्ध झालेल्या ज्ञानातून बरेचसे रुग्ण बरे करता येतायत. ही चांगली गोष्ट आहे. माझ्या वैयक्तिक अनुभवात जवळजवळ सर्व रुग्ण अनावश्यक चाचण्या न करता, घरच्या घरीच औषधोपचारांनी ठणठणीत बरे झाले आहेत.

[डॉ. पद्माकर पंडित हे बीजे मेडिकल कॉलेज, पुणे येथे ३५ वर्षांहून अधिक काळ फार्माकॉलॉजी हा विषय शिकवत होते. सध्याच्या काळात त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे सीओइपी येथील जंबो कोव्हिड केंद्रात ते कार्यरत होते. सध्या ते पिंपरी-येथील जंबो कोव्हिड केंद्रात आहेत.]

(मुलाखतीत सहभाग: भूषण पानसे, अबापट, ३_१४ विक्षिप्त अदिती, चिंतातुर जंतू, मंदार कुलकर्णी आणि डॉ. पंडित यांचे अनेक माजी विद्यार्थी)

साभारः ’ऐसी अक्षरे’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0