राफाएल नदालने त्याचा पहिला फ्रेंच ओपन चषक २००५ साली वयाच्या १९ व्या वर्षी जिंकला. त्यानंतर आजवर त्याने हा चषक १३ वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. म्हणजेच गेल्या १५ वर्षात तो फक्त दोन वेळा पराभूत झाला आणि एका वेळी तो फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळू शकला नव्हता.
एडमंड हिलरी आणि शेर्पा तेन्सिंग नोर्गे या दोघांनी सर्व प्रथम एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर पार केले. त्या नंतर देशोदेशीच्या शेकडो गिर्यारोहकांनी हे शिखर गाठले.
इतर सगळ्या क्षेत्रात देखील वेगवेगळी शिखरे गाठण्याचा प्रयत्न करणे ही माणसाची सहज प्रवृत्ती तसेच उद्दीष्ट असते.
अगदी तसेच टेनिसमध्ये रॉजर फेडरर याने दोन वर्षांपूर्वी वयाच्या ३७ व्या वर्षी त्याचे २० वे ग्रँड स्लॅम जिंकून करून दाखवले होते. हे शिखर कुणी गाठू शकणार नाही असे वाटत होते, मात्र राफाएल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे दोघे ते करतील असे अनेक टेनिस पंडितांना वाटत होते. गेल्याच आठवड्यात राफाएलने फ्रेंच ओपन या स्पर्धेचे विजेतेपद जिंकून ते करून दाखवले. जोकोविचला मात्र हे शिखर गाठायला जरा वाट पहावी लागणार.
रॉजर फेडररने अजूनही अनेक रेकॉर्ड केले आहेत. ते सगळे कदाचित कुणी गाठू शकणार नाही.
तसेही टेनिसचा ओपन इरा (open era) चा इतिहास बघता सर रॉड लेव्हर यांनी अनेक रेकॉर्ड केले. त्यातील ग्रँड स्लॅम्सचा रेकॉर्ड मोडला गेला. त्यांच्यानंतर बियॉन बोर्गने सर्वाधिक स्लॅम्सचा रेकॉर्ड केला. तो पीट सॅम्प्रस याने मोडत १४ स्लॅम्सचा रेकॉर्ड केला तो रॉजर फेडररने मोडला.
मुद्दा हा आहे की रेकॉर्ड करणे आणि पुढील पिढीतील खेळाडूंनी तो मोडणे हेच आजवर घडत आले आहे. आणि पुढेही तसेच होईल. पण म्हणून रेकॉर्ड करण्याचं महत्त्व अजिबात कमी होत नाही.
उलट असे दिसून येते की रॉजर फेडरर, राफाएल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे तर आता रेकॉर्ड करणे म्हणजेच इतिहास घडवण्यासाठीच प्रेरित होऊन, अनेक तज्ज्ञांची मदत घेऊन अतिशय फोकस ठेवून खेळतात आहेत.
२०-२० — रॉजर आणि राफा: भिन्न प्रकृतीचे आणि शैलीचे सुपर स्टार्स
रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल हे टेनिसचे राजदूत आणि सुपर स्टार्स. जगभरातील टेनिस प्रेमी आणि क्रीडारसिकांचे ते लाडके खेळाडू तसेच दैवतं आहेत.
रॉजर हा आक्रमक खेळणारा खेळाडू असला तरी तो अतिशय नजाकतीने, सौंदर्याने परिपूर्ण असं कलात्मक टेनिस खेळतो. तर राफाएल हाही तसा आक्रमकच. मात्र उत्तम बचावात्मक खेळात त्याचा कुणी हात धरू शकत नाही. अतिशय झुंजार आणि चिवटपणे खेळणारा हा खेळाडू.
एकाकडे अत्त्युकृष्ट शारीरिक क्षमतेबरोबरच कलात्मकता आणि सौंदर्यपूर्ण कसब आहे तर दुसर्याकडे अत्त्युकृष्ट शारीरिक क्षमतेबरोबरच दुर्दम्य आकांक्षा, अतिशय चिवट खेळ करून कडवी झुंज देण्याची क्षमता आहे.
दोघातही शास्त्रशुद्ध सरावाचे सातत्य आहे. महत्त्वाचे म्हणजे इतके प्राविण्य, कसब असतांनाही सतत नवीन शिकणे तसेच त्यांचा खेळ निर्दोष आणि परिपूर्ण करण्याचा ध्यास आहे.
दोघांचे टेनिस कोर्टावरील तसेच वैयक्तिक आयुष्यातील संयमित वर्तन आणि नेमस्त, जबाबदार आचरण यामुळे हे दोघेही लाखो तरुणांचे रोल मॉडेल नसतील तरचं नवल म्हणायचे.
दोघेही तिशीत असले तरी त्यांची विजिगीषू वृत्ती आणि सळसळता उत्साह हा टेनिस प्रेमी, रसिक आणि जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
म्हणूनच खेळण्याच्या शैली भिन्न असल्या तरी रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल या अतिशय गुणी आणि नम्र खेळाडूंच्या विषयी अत्यंत अचंब्याने असे म्हटले जाते की हे दोघेही कुठल्यातरी वेगळ्या ग्रहावरील आहेत!
क्ले कोर्टाचा अजिंक्य आणि अनिभिषिक्त सम्राट – राफाएल नदाल
विश्लेषक असे म्हणतात की युरोपातील बहुतेक खेळाडू हे क्ले कोर्टावर जास्त चांगला खेळ करतात. अगदी खरे आहे. ते सगळे बर्यापैकी यशस्वी खेळाडू असतात याचे कारण ते उत्तमपणे टॉपस्पिनचे तंत्र वापरू शकतात.
राफाएल नदालचा टॉपस्पिन हा टेनिस जगतातील सगळ्यात शक्तिशाली शस्त्र आहे. त्याच्या टॉपस्पिनची सरासरी ३२०० (rpm) असते. तर तो अनेकदा ३६०० ते ५००० आरपीएमपर्यंत टॉपस्पिन करू शकतो. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला त्याचा बॉल परतवणे अनेकदा अशक्य असते. कारण बॉल जड तर होतोच तसेच त्याच्या गतीमुळे तो टप्प्यातच येऊ शकत नाही किवा आलाच तर तो बराच खाली आल्याने परतवणे अवघड असते.
१४ ग्रँड स्लॅम जिंकणारा पीट सॅम्प्रस आणि आठ ग्रँड स्लॅम जिंकणारा आंद्रे अगासी या दोन्ही अमेरिकन खेळाडूंचा टॉपस्पिन १८०० – १९०० आरपीएम असे. तर फेडरर या स्विस म्हणजेच युरोपियन खेळाडूचा टॉपस्पिन २५०० ते २७०० आरपीएम असतो.
राफाएलने त्याचा पहिला फ्रेंच ओपन चषक २००५ साली वयाच्या १९ व्या वर्षी जिंकला. त्यानंतर आजवर त्याने हा चषक १३ वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
म्हणजेच गेल्या १५ वर्षात तो फक्त दोन वेळा पराभूत झाला आणि एका वेळी तो फ्रेंच ओपन स्पर्धेत खेळू शकला नव्हता.
फक्त दोन खेळाडूंनी त्याला फ्रेंच ओपन या स्पर्धेत हरवले आहे. रॉबिन सोडार्लिंगने त्याला २००९ साली चौथ्या फेरीत हरवले. तर २०१५ मध्ये जोकोविचने त्याला उपांत्यपूर्व खेळीतच हरवले होते.
अनेक उत्कृष्ट टेनिसपटू फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकू शकले नाहीत, जसे की पीट सॅम्प्रस, जॉन मॅकॅन्रो, जिमी काँनर्स, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मार्टिना हिंगिस आणि व्हीनस विलियम्स इत्यादी.
१३ वा फ्रेंच ओपन चषक जिंकताना, नदालने रोलँ गॅरोस म्हणजेच फ्रेंच ओपनच्या परिसरातील त्याची शंभरावी (१००) मॅच जिंकली. गेल्या १५ वर्षात, या मैदानावर फक्त २ वेळा हरला आहे. यावरून हेच सिद्ध होते की तो फ्रेंच ओपन किवा रोलँ गॅरोसचा अनिभिषिक्त सम्राट आहे.
टेनिसचा बॉल गेम बदलावणारा राफाएल नदाल
कुठलेही क्षेत्र किंवा व्यवसाय यात एकाच गोष्टीचे सातत्य आहे ते म्हणजे बदलाचे. टेनिससारखा रम्य खेळदेखील याला अपवाद नाही. दर काही वर्षे किंवा दशकांनी त्याचा बॉल गेम बदलत असतो.
साठीतले टेनिस वेगळ्या प्रकारे खेळले जाईल. सत्तर आणि ऐंशीच्या दशकातले सर्व्ह आणि व्हॉली असा जलद खेळ तो होता. गेली दोन दशके मात्र तो बेसलाईनवरून शक्तिशाली ग्राऊंडस्ट्रोक्स मारत किंवा तडफदार सर्व्ह करून बराच वेळ प्रत्येक गेम खेळला जातो.
खेळाडूंनी हा खेळ आता अतिशय कमाल शारीरिक पातळीवर नेला आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे टेनिस या खेळाचा बॉल गेम बदलायला आयोजकांचे बॉलचे वजन जरा वाढवणे तसेच रॅकेट मोठी करणे हेही आहेच.
थोडक्यात हा खेळ आता गतिमान राहिला नसून तो स्टॅमिनाचा खेळ झाला आहे. त्यामुळेच आयोजक आणि प्रेक्षकांना अडीच, तीन, साडेतीन किंवा चार, पाच किंवा सहा तासांच्या मॅचेसची सवय लागली आहे.
त्यामुळेच खेळाडूंची शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच फिटनेस आणि अॅथलेटिसिझमला अतिशय महत्व आले आहे. यातील स्टार्स आणि विशेषत: सुपर स्टार्स म्हणजेच रॉजर फेडरर, राफाएल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी देखील टेनिसच्या प्राविण्याबरोबरच उच्च प्रकारची शारीरिक क्षमता निर्माण केली आहे.
यातही राफाएल नदालची शारीरिक क्षमता क्ले कोर्टवर जरा अधिक सरस आहे कारण त्यावर तो अनेक तास खेळू शकतो, त्याच्या विरुद्ध पॉईंट्स मिळवणे हे तसे अवघडच. तसेही त्याला क्ले कोर्टावर हरवणे हे मोजक्याच खेळाडूंना साध्य झाले आहे. फ्रेंच ओपनच्या कोर्टवर आजवर तो फक्त दोनदा हरला आहे. यातच त्याची क्ले कोर्टावरील टेनिसची जबरदस्त पकड लक्षात येईल.
रॉजर फेडररला तीनही फायनल मॅचमध्ये नदालने सरळ तीन सेट्स मध्येच पराभूत केले होते. नंतर एका उपांत्य फेरीत त्याला चार सेट्स मध्ये पराभूत केले होते. तेव्हा फेडरर म्हणाला होता की फ्रेंच ओपनच्या मंद क्ले कोर्टावर जिंकायचे असेल तर तुम्हाला अति भक्कम “पाय” हवेत ज्यामुळे तुम्ही मातीवर खूप धावू शकता.
असे असले तरी माद्रिदच्या गतिमान क्ले कोर्टवर फेडररने त्याला लीलया हरवले आहे.
राफाएल नदाल – एक परिपूर्ण युरोपियन खेळाडू
राफाएल नदाल लहानपणी स्पॅनिश मुले खेळतात तसे फुटबॉल खेळत असे. त्याचा एक काका फुटबॉल खेळाडू होता. त्यामुळे लहानग्या राफाएलला फुटबॉलचे आकर्षण होते. रोंनाल्डो हा ब्राझिलियन खेळाडू त्याला विशेष आवडत असे.
त्याचे दुसरे काका टोनी, हे टेनिस कोच होते. त्यांना राफाएलमध्ये एक प्रतिभावान खेळाडू होण्याची लक्षणे दिसली. वयाच्या तिसर्या वर्षी त्यांनी त्याला टेनिस शिकवायला सुरुवात केली.
आठव्या वर्षीच त्याने १२ वर्षाखालील मुलांची टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे टोनी काकांनी त्याला जास्त ट्रेनिंग देणे सुरू केले. तसेच डाव्या हाताने टेनिस खेळायचा सल्ला त्यांनी दिला कारण डावखुर्यांना टेनिस खेळतांना बराच फायदा असतो. डाव्या हाताने खेळण्याचा सराव त्यांनी राफाएलकडून करून घेतला. त्याचा पुढे त्याला प्रचंड फायदा झाला.
डावरा खेळ त्यामुळे बॉल वेगळ्याच अँगलने दुसर्याच्या कोर्टात पडतो. मुख्य म्हणजे अधिकांश खेळाडू उजव्या हाताने खेळतात. त्यामुळे त्यांना त्याचा बॉल परतवणे मुळातच अवघड होते.
तसेच नदाल मुळचा युरोपियन त्यामुळे टॉपस्पिन हा हाताचा मळ, त्यामुळे नदालने ज्युनिअर फ्रेंच ओपन जिंकली होतीच.
तो जसा व्यावसायिक टेनिस खेळाडू म्हणून खेळू लागला तेव्हाच अनेक अभ्यासक आणि मोठ्या प्रथितयश खेळाडूंचे त्याने लक्ष वेधून घेतले.
केप्री पॅन्ट्स आणि स्लिव्हजलेस टी शर्ट, जवळ जवळ खांद्यापर्यंत लांब केस, अगदी हिस्पॅनिक दिसणारा आणि चिवट खेळणारा राफाएल एखाद्या समुद्री चाचासारखा दिसत असे.
त्यातून तो प्रतिस्पर्ध्याला दमवून दमवून शेवटी गेम वर गेम जिंकत असे त्यामुळे त्याची एक चिवट आणि झुंजार खेळाडू म्हणून प्रतिमा तयार व्हायला लागली होती.
२००५ साली त्याने पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आणि त्यानंतर त्याच्या विजयांचा चढता आलेख राहिलेला असला तरी त्यानेही खेळातील आणि आयुष्यातील असंख्य चढउतार पाहिले आहेत.
तीन-चार वेळा त्याला दुखापतींमुळे खेळणे बंद करावे लागले होते. बराच मोठा काळ विश्रांती घ्यावी लागली होती. त्यातही दोनदा त्याच्या गुडघ्याच्या दुखापतींमुळे तो पुढे खेळू शकेल की नाही अशी आशंका निर्माण झाली होती.
पण हरेल किंवा नामोहरम होईल तो नदाल कसला? हळूहळू करून खूप खाली गेलेले रेटिंग स्वीकारून तो पुन्हा नव्या हुरूपाने खेळू लागला. आणि पुन्हा जगातला पहिल्या नंबरचा खेळाडू बनला. मग फेडरर परत क्रमांक एकचा खेळाडू झाला, पुढे परत नदाल प्रथम क्रमांकावर होता. सध्या २८० आठवडे जोकोविच प्रथम क्रमांकावर आहे.
१० वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद आणि इतर ७ ग्रँड स्लॅम मिळवल्यावर त्याने टोनी काकांना त्याची अकादमी सांभाळायला दिली आहे. आता त्याचा मुख्य कोच ग्रँड स्लॅम विजेता कार्लोस मोया आहेत.
मोयांनी राफएलच्या खेळातील अनेक दोष काढून त्याला एक परिपूर्ण खेळाडू बनवले आहे.
राफाएल ची शस्त्रे आणि अस्त्रे
राफाएल जरी आक्रमक (aggressive) खेळ खेळत असला तरी टेनिस मधील तो उत्कृष्ट बचाव करू शकणारा (defender) खेळाडू आहे.
त्याचा नेट क्लियरन्स नेहमी नव्वदीच्या आसपास असतो. नेटची उंची मधोमध ३ फुट (३६ इंच) असते. मोठे खेळाडू त्यामुळे जास्तीत जास्त उंचीवर बॉल नेण्याचा प्रयत्न करतात. फेडररचा नेट क्लियरन्स ७० आहे तर अँडी मरीचा ५९ असतो.
जितका नेट क्लियरन्स अधिक तितका कमी धोकादायक खेळ. बहुतेक खेळाडू याच्या अगदी उलट म्हणजे नेटच्या जवळून तसेच बर्यापैकी सपाटपणे (flat) बॉल परतवतात त्यामुळे ते इतर खुबीने खेळणार्या खेळांडूच्या पुढे निष्प्रभ होतात.
जबरदस्त फोरहँड टॉपस्पिन हे सगळ्यात मोठे अस्त्र नदालकडे आहे. अभ्यासक म्हणतात की नदालने हे अस्त्र अगदी शास्त्रीय तत्वांवर आधारित करत त्यावर प्रभुत्व मिळवलं आहे.
कोर्टवर अचूक ठिकाणी पडणार्या त्याच्या प्रचंड उसळत्या चेंडूच्या कोड्याच्या तीन बाजू आहेत- विलक्षण ताकद लावून, किंचित वेळ घेऊन मग निर्माण केलेला टॉपस्पिन.
नदाल नेहमी पायात अंतर ठेवून उभा असतो. त्यामुळे साहजिकच त्याची ऊर्जा हाताकडे वळते. पुढे तो विशिष्ट अँगलने रॅकेट मागे घेतो, त्यामुळे बॉल अधिक मागे जातो आणि मग तो त्याच्या मनगटाचा वापर मोठ्या युक्तीने करून, बॉलला एखाद्या भोवर्याला द्यावा तशी फिरकी (टॉपस्पिन) देतो. त्यामुळे तो बॉल वेगाने गरगरत प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टवर इतक्या वेगाने येतो की त्याला तो परतवणे अशक्य होते किंवा त्यामुळे तो चुकीचा शॉट वापरुन पॉइंट घालवून बसतो.
क्ले कोर्ट हे मंद गतीचे कोर्ट आहे. त्यामुळे त्यावर ३६०० ते ५००० आरपीएम अशी फिरत किंवा टॉपस्पिन मारण्याच्या नदालच्या कौशल्यामुळे तो क्ले कोर्टावर जास्तीत जास्त विजय मिळवू शकला आहे.
उच्च कोटीची शारीरिक क्षमता आणि खेळातील चढउतार एखाद्या योद्ध्यासारखे पचवत, विलक्षण चिवट आणि झुंजार खेळ खेळणे या सगळ्या त्याच्या जमेच्या बाजू आहेत.
त्याला हार्ड कोर्टवर तसेच लॉनवर खेळणे पूर्वी फारसे उत्तम जमत नसे मात्र त्या दोन्ही कोर्टांवर तो उत्तम खेळ खेळू शकतो हे त्याने ७ ग्रँड स्लॅम विजय मिळवून सिद्ध केले आहे.
३४ व्या वर्षी बहुतेक टेनिसपटू निवृत्ती घेतात. रॉजर फेडररप्रमाणेच राफाएल नदालने “वय” नामक अडसर सर्वोत्तम खेळताना येऊ शकत नाही हे सिद्ध केले आहे.
टेनिसचा एक दुर्दम्य राजदूत
टेनिसच्या कोर्टवर अतिशय जोरकस, दमदार आणि फिजिकल खेळ खेळणारा नदाल, एकदा मॅच संपली की अगदी नम्रपणे प्रतिस्पर्ध्याला भेटतो, त्याला शुभेच्छा देतो. मॅच खूपच चढउताराची झाली असेल, दोघांपैकी कुणीही जिंकू शकेल असे असतांना, जर नदाल जिंकला असेल तर तो प्रेमाने त्या खेळाडूला भेटतो आणि समजवतो.
प्रत्येक पॉइंट मिळवण्यासाठी धडपणारा नदाल, तो मिळाल्यावर त्याचे जोरदार प्रदर्शन करतो. असे असले तरी तो वचपा काढणारा किंवा धडा शिकवणारा खेळाडू नाही हे विशेष. गेल्या दोन अंतिम मॅचेसमध्ये त्याला जोकोविचने पराभूत केले होते. यावेळी फ्रेंच ओपनमध्ये जोकोविचला ६-०, ६-२, ७-५ असा सहज पराभव केला. तेव्हा तो म्हणाला की पराभवाचा बदला घेणे हे त्याच्या स्वभावात नाही.
कोर्टाबाहेर त्याचे वर्तन अतिशय नम्र असते. कुठल्याही वादग्रस्त गोष्टी त्याने केल्या नाहीत.
नाही म्हणायला अनेक वर्ष त्याने २५ सेकंदांत सर्व्ह करण्याचा भंग केला आहे. मात्र त्याला तेव्हा कुणी अंपायरने समज दिली नाही. फार क्वचित त्याला वार्निग मिळत असे. आता नियम कडक झाल्याने तोही अगदी २५ व्या सेकंदाला त्याची सर्व्ह करू लागला आहे.
टेनिस हा तर फार गतिमान खेळ. चटकन सर्व्ह करणे आणि गतिमान रित्या खेळणे असेच त्याचे स्वरूप होते आणि आहे. मात्र आयोजक आणि प्रेक्षक यांना आता दोन, तीन किंवा अधिक चालणार्या मॅचेस हव्या असतात त्यामुळे टेनिसची गती जरा मंदावली आहे हे नक्की.
उत्कृष्ट व्यावसायिकता, टेनिस प्रती समर्पितता आणि सर्वोत्तमचा ध्यास घेतलेला नदाल हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर म्हणजेच वडील, काका, बहीण आणि बायको यांच्याबरोबर असतो, प्रवास करतो. अनेकदा त्याची बायको झिस्का (Francisca) स्पर्धा बघायला येत नाही. अतिशय लाजरी-बुजरी आणि लो प्रोफाइल झिस्का म्हणते की त्यांचे नाते राफाएलच्या टेनिसच्या यशापशावर बेतलेले नाही. एरवी दोघेही अतिशय प्रसिद्धी पराङ्गमुख आहेत.
स्पेनमधील मायोर्का येथे त्याची टेनिस अकॅडमी आहे. तिथेच तो सराव करतो. तिथे त्याचे एक म्युझियम देखील आहे.
त्याच्या फाऊंडेशनद्वारे तो अनेक सामाजिक कामे करतो.
टेनिस या खेळाला वाहलेले आयुष्य जगणार्या राफाएल नदालने उत्कृष्टतेचा, सर्वोत्तमाचा ध्यास घेऊन क्ले कोर्टवरील त्याचे अढळपद निर्विवादपणे सिद्ध केले आहे. पुढे २० पेक्षा अधिक ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि इतरही स्पर्धा तो जिंकून अनेक रेकॉर्ड नक्कीच करू शकतो.
जगातील एक प्रेरणादायी खेळाडू आणि ग्लोबल आयकॉन असणार्या राफाएल नदालने पुढे अनेक वर्षे खेळत टेनिस रसिकांना, प्रेक्षकांना आनंद द्यावा आणि प्रेरणा देत रहावे.
गायत्री चंदावरकर,या इन्स्ट्रक्शनल डिझाइन कन्सल्टंट असून पुणे विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.
COMMENTS