शौर्य चक्र सन्मानित बलविंदर सिंह संधू यांची हत्या

शौर्य चक्र सन्मानित बलविंदर सिंह संधू यांची हत्या

अमृतसरः पंजाबमधल्या दहशतवादाविरोधात लढणारे शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित बलविंदर सिंह संधू (६२) यांची तरणतारण जिल्ह्यातल्या भीखीविंड गावातील त्यांच्

नरसिंहानंदकडून ‘हर घर तिरंगा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जाहिरातीत पंतप्रधानांचा फोटा अनिवार्य: हायकोर्ट

अमृतसरः पंजाबमधल्या दहशतवादाविरोधात लढणारे शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित बलविंदर सिंह संधू (६२) यांची तरणतारण जिल्ह्यातल्या भीखीविंड गावातील त्यांच्या कार्यालयात शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या मारून हत्या केली. गेल्या वर्षी पंजाब सरकारने त्यांना देऊ केलेले पोलिस संरक्षण मागे घेतले होते.

हे हल्लेखोर मोटार सायकलवरून आले होते आणि त्यांनी संधू यांच्यावर ४ गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर संधू यांना रुग्णालयात नेले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

८० च्या दशकांत पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तानसाठी दहशतवादाने उग्र रुप घेतले असताना संधू त्याविरोधात आपल्या प्राणाची बाजी लावून उभे राहिले होते. त्यांच्यावर यापूर्वी ६२ दहशतवादी हल्ले झाले होते. तरीही संधू यांच्या कुटुंबियांचा निर्धार संपला नव्हता. संधू व त्यांच्या कुटुंबियांची दहशतवादविरोधातील लढाई पाहून पंजाबमध्ये अनेक कुटुंबांना दहशतवादाविरोधात लढण्याची प्रेरणा झाली होती.

१९९३मध्ये संधू यांना शौर्य चक्र देण्यात आले होते. या पुरस्काराच्या प्रमाणपत्रात संधू व त्यांचे भाऊ रणजितसिंह संधू यांच्या शौर्याचे कौतुक करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी संधू व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी ११ महिन्यात १६ वेळा प्रयत्न केले होते. ३० सप्टेंबर १९९०मध्ये एकावेळी तर त्यांच्यावर १० ते २०० दहशतवाद्यांनी हल्ला केला होता पण संधू यांनी तो हल्लाही परतावून लावला होता. ही चकमक पाच तास चालली होती. दहशतवाद्यांनी रॉकेट लाँचरमधून हल्ले केले होते. हा हल्ला करताना दहशतवाद्यांनी संधू यांना पोलिसांची मदतही मिळू नये यासाठी त्यांच्या घराभोवती सुरुंग पेरले होते पण संधू व त्यांच्या पत्नीकडे पिस्तुल व स्टेनगन होती जी सरकारने त्यांना दिली होती. याच्या बळावर या कुटुंबाने दहशतवाद्यांचा हल्ला निष्फळ ठरवला होता. या हल्ल्यात केवळ संधूच नव्हे तर त्यांची पत्नी जगदीश कौर संधू यांनीही कमालीचे शौर्य दाखवले होते.

गेल्या वर्षी तरण तारण जिल्हा पोलिसांनी संधू यांचे पोलिस संरक्षण मागे घेतले होते. पण त्यांच्या कुटुंबांला दहशतवाद्यांच्या धमक्या मिळत होत्या असा आरोप संधू यांच्या कुटुंबियांनी केला होता. आम्ही पोलिसांना याची माहिती दिली होती तरीही पोलिस संरक्षण मागे घेतले होते असे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

संधू यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी व तीन मुले गगनदीप, आर्शदीप व प्रदीप आहेत.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणी विशेष पोलिस दलाची स्थापना केली असून हल्लेखोरांना लवकरच पकडण्यात येईल असे सांगितले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0