नवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ पसरत असल्याचा धोका पाहता खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने सर्व विभागात धावणाऱ्या आपल्या रेल्वेच्या एसी डब्यातील ब्लँकेट
नवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ पसरत असल्याचा धोका पाहता खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने सर्व विभागात धावणाऱ्या आपल्या रेल्वेच्या एसी डब्यातील ब्लँकेट व पडदे हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे ब्लँकेट महिन्यातून दोनदा व पडदे दर १५ दिवसांनंतर धुतले जातात. ते रोज धुतले जात नाहीत पण उशांचे अभ्रे, चादरी व टॉवेलसारख्या वस्तू रोज धुण्यास नेल्या जातात असे रेल्वेचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने एसी डब्यांमधील तापमान २४-२५ अंश सेल्सियस पर्यंत ठेवण्यास सांगितले आहे.
हे सर्व उपाय कोरोना विषाणूची साथ पसरू नये यासाठी असून प्रवाशांनी आपल्यासोबत स्वत:चे ब्लँकेट आणावे असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहेत. रेल्वे प्रशासन आपल्या एसी डब्यातील प्रवाशांना साबण, नॅपकीन रोल व जंतुनाशक रसायन देणार आहे.
सध्या वापरात असलेले सर्व ब्लँकेट, पडदे यांना रेल्वेच्या धुलाई गृहात नेण्यात यावेत व नंतर ते वाळवून एका सीलबंद पॅकेटमध्ये ठेवण्यात यावेत असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हँडल, विंडो ग्रिल, बाटल्यांची झाकणे, चार्जिंग पॉइंट अशा सर्व जागांची योग्य रितीने साफसफाई करावी असेही आदेश दिले आहेत.
मुंबईत लोकल ट्रेनची साफसफाई
कोरोना विषाणूची साथ पाहता मुंबईत धावणाऱ्या सर्व उपनगरी ट्रेन व मुंबईबाहेर जाणाऱ्या व मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व ट्रेनची साफसफाई सुरू केली आहे. उपनगरी ट्रेनच्या आतील हँडल, दरवाजे, दरवाज्यांच्या कड्या, प्रवेश दार, खिडक्या, स्वीच, पंखे अशा सर्व वस्तूंची साफसफाई रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू झाली आहे.
त्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील सर्व प्रसाधनेही स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
टूर ऑपरेटर्सना बंदी
कोरोना विषाणू संक्रमणाची शक्यता पाहता मुंबई पोलिसांनी देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या सर्व टूर ऑपरेटर्सना आपल्या सहली बंद करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी समूह सहली रोखण्यासाठी १४४ कलमही पुकारले आहे. जो कोणी टूर ऑपरेटर कायद्याचा भंग करेल त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल, पण ज्यांना सहली न्यायच्या असतील त्यांनी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
भारत-बांगलादेश रेल्वे सेवा स्थगित
कोरोना विषाणूची साथ पाहता कोलकाता ते ढाका व खुलनादरम्यान धावणारी मैत्री व बंधन एक्स्प्रेस रेल्वे सेवा रविवारी स्थगित करण्यात आली आहे. ही स्थगिती १५ एप्रिलपर्यंत असेल असे रेल्वेच्या पूर्व विभागाने स्पष्ट केले आहे. या काळात या मार्गावरील सर्व स्थानकांची स्वच्छता करण्यात येणार आहे, तसेच रेल्वेची रुग्णालये, कारखाने व अन्य कार्यालयांची साफसफाई करण्यात येणार आहे.
मूळ बातमी
COMMENTS