भोंगे वाजले की हनुमान चालिसा म्हणाः राज ठाकरेंचे आदेश

भोंगे वाजले की हनुमान चालिसा म्हणाः राज ठाकरेंचे आदेश

मुंबईः मशिदींवर भोंगे वाजले तर त्या संदर्भात पोलिसांकडे १०० क्रमाकांवर तक्रार करा, मशिदींपुढे हनुमान चालिसा दुप्पट आवाजात म्हणा, असे आदेश मनसे अध्यक्ष

मार्च २०२३ मधील महागाईची झळ सोसण्यासाठी आपण सज्ज आहोत का?
धनुष्यबाण शिवसेनेचेच चिन्ह राहणारः उद्धव ठाकरे
जशी ‘निःपक्ष’ देशी पत्रकारिता, तसे ‘निष्पक्षपाती’ फेसबुक

मुंबईः मशिदींवर भोंगे वाजले तर त्या संदर्भात पोलिसांकडे १०० क्रमाकांवर तक्रार करा, मशिदींपुढे हनुमान चालिसा दुप्पट आवाजात म्हणा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना मंगळवारी उशीरा संध्याकाळी दिले. या आदेशामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्याना प्रत्युत्तर देण्यासंदर्भात तीन पानाचे एक पत्र सोशल मीडियात प्रसिद्ध केले. या पत्रातील संपूर्ण मजकूर खालील प्रमाणेः

उद्या ४ मे.
मशिदींवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होतं. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोंग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे, त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.”

ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे- लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी १० डेसिबल आणि जास्तीतजास्त ४५ ते ५५ डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या, १० डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि ५५ डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज.

प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसतं? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे, हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल.

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यांचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.

आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.

हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,

१. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.

२. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

३. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.

मला पूर्ण कल्पना आहे की, आपल्या देशात असे अनेक मुस्लिम नागरिक आहेत ज्यांना भोंग्यांचा त्रास होतो. पण कर्मठ धर्मगुरूंपुढे, कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलत येत नाही. ते असो. देशातल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी भोंग्यांविरोधात काम सुरू करावे. हा विषय एका दिवसात सुटणारा नाही, याचीही मानसिक तयारी ठेवावी. देशातल्या सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. आणि शेवटी एकच सांगतो, प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे; हे दाखवून द्यावे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या.

आता नाही, तर कधीच नाही

आपला नम्र

राज ठाकरे

राज ठाकरेंवर गुन्हे दाखल

दरम्यान, औरंगाबाद सभेत पोलिसांनी घातलेल्या १६ अटींपैकी काही अटींचे उल्लंघन झाल्या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कलम ११६, कलम ११७ व कलम १५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या अटींमध्ये सभेसाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या, लाउड स्पीकरचा आवाज, आक्षेपार्ह वक्तव्य न करणे, चिथावणीखोर विधाने न देणे अशा स्वरुपाच्या अटी होत्या. त्या अटींचे राज ठाकरे यांनी उल्लंघन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी सभेचे आयोजक असलेले राजीव जेवळीकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0