माझी दोनतृतीयांश कारकीर्द भाजपच्या काळात-रघुराम राजन

माझी दोनतृतीयांश कारकीर्द भाजपच्या काळात-रघुराम राजन

भारतातील बँकिंग व्यवस्थेला वाईट परिस्थितीचा सामना करण्यामागे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची कारकीर्द जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाला रघुराम राजन यांनी, रिझर्व्ह बँकेतील गव्हर्नरपदाच्या माझ्या कारकिर्दीची सर्वाधिक दोनतृतीयांश वर्षे भाजपच्या राजवटीत खर्च झाली होती आणि यूपीए-२ सरकारच्या काळात ती केवळ आठ महिने होती, असा टोला हाणला आहे.

‘मी काँग्रेसप्रणित यूपीए-२ सरकारच्या शेवटच्या आठ महिन्याच्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद स्वीकारले होते. पण नंतर केंद्रात आलेल्या मोदी सरकारच्या काळात २६ महिने मी या बँकेचा गव्हर्नर होतो, असे सीएनबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले. मला या विषयीच्या राजकीय चर्चेच खोलवर शिरायचे नाही. मला इतकेच सांगायचे आहे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद स्वीकारल्यानंतर बँकिंग व्यवस्था सरळ, पारदर्शी करण्याचा आम्ही वेगवान प्रयत्न केला आणि बँकांना भांडवल समृद्ध केले. आताच्या बँकिंग व्यवस्थेतील गोंधळाचे बीज २००८च्या जागतिक आर्थिक मंदीच्या अगोदर असून त्याकाळात गुंतवणुकीचा भ्रम तयार करण्यात आला. त्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली व नंतर तिच्यामध्ये मंदी आली. त्यामुळे कर्जबुडवे तयार झाले. त्यांना शिस्त लावण्याचे काम आम्ही केले, असे राजन म्हणाले.

काही मंडळी आम्हाला विचारत होते की बँकिंग सुधारणा तुम्ही का हाती घेतल्या, त्यावर आमचे उत्तर होते, बँकांची कर्जे थकवणाऱ्यांची संख्या वाढत गेली त्यामुळे बँकांकडून कर्जे देण्यावर मर्यादा आल्या. अशा परिस्थितीत ही व्यवस्था साफ करणे गरजेचे होते, त्यांची पुनर्रचना करणे त्यांना भांडवल पुरवठा करणे हे क्रमप्राप्त होते, ते आम्ही केले.

मूळ बातमी

COMMENTS