अशोक गेहलोत भाजपला खिंडीत पकडतील का?

अशोक गेहलोत भाजपला खिंडीत पकडतील का?

राज्यसभा निवडणुकीत भाजपने दोन उमेदवार उभे केले आहेत त्यातील एकाची जागा पक्की आहे पण दुसर्या उमेदवाराला १० मतांची गरज आहे.

राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय
बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड : गेहलोत
राजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन

राजस्थानमध्ये राज्यसभेच्या ३ जागा आहेत आणि या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपने सत्तारुढ काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. गेल्या बुधवारी काँग्रेसने आपले सर्व आमदार व अपक्ष आमदार जयपूरच्या बाहेर एका हॉटेलमध्ये नेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला व विवेक बन्सल हा आमदारांसोबत हॉटेलमध्ये आहेत.

कर्नाटक, म. प्रदेश, गुजरातमधील उदाहरणे पाहता राजस्थानमध्येही आमदारांचा घोडेबाजार होणार या भीतीने राजस्थान विधानसभेत व्हीप काढणारे काँग्रेसचे नेते महेश जोशी यांनी अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक अलोक त्रिपाठी यांना एक पत्र लिहून आमदारांचा घोडेबाजार होण्याची तक्रार केली आहे. भाजपकडून लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असून लोकशाही व घटनात्मक मूल्यांना पायदळी तुडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप महेश जोशी यांनी पत्रात केला आहे.

राजस्थानमधून राज्यसभेच्या ३ जागांसाठी काँग्रेस व भाजपने प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात उभे करण्याचे ठरवले आहे. भाजपकडून राजेंद्र गहलोत व ओंकार सिंग लाखावत तर काँग्रेसकडून नीरज डांगी व के. सी. वेणुगोपाल यांची नावे निश्चित झाली आहेत. पण भाजपने दोन उमेदवार उभे केल्याने ही लढत काँग्रेससाठी अटीतटीची करण्याचे ठरवलेले आहे. आपला आणखी एक उमेदवार देऊन भाजपने काँग्रेसला गोंधळात टाकले आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वोरा यांनी द वायरकडे व्यक्त केले.

वोरा म्हणतात, अशा परिस्थितीत जे अपक्ष उमेदवार उभे असतात ते सत्ताधार्यांवर दबाव टाकत असतात. राजस्थानमध्ये गेहलोत यांच्या सरकारला अजून बराच काळ व्यतित करायचा आहे, त्यामुळे काँग्रेसचे आमदार त्यांच्याशी दगाफटका करतील अशी शक्यता वाटत नाही. त्याचबरोबर काँग्रेसने आपले सर्व आमदार हॉटेलमध्ये ठेवल्याने आमदार फुटण्याच्या शक्यताही कमी झाल्या आहेत.

राजस्थान विधानसभा ही २०० आमदारांची असून ३ राज्यसभा जागांसाठी तेथे निवडणूक होत आहेत. प्रत्येक उमेदवाराला ५१ आमदारांची मते आवश्यक आहेत.

काँग्रेसचे १०७ आमदार असून १३ अपक्ष आमदार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलचे एक आमदार सुभाष गर्ग सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे सत्तारुढ पक्षाकडून एकूण आकडा १२१ इतका आहे. त्यामुळे काँग्रेसला आपले दोन उमेदवार सहज निवडून आणता येणे शक्य आहे.

पण भाजपने या निवडणूकीत दोन उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे संख्याबळ ७२ असून त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो पण त्यानंतर त्यांची २१ आमदारांची मते शिल्लक राहतात.

भाजपला आपला दुसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर त्यांना अन्य ३० आमदारांची मते आवश्यक आहेत. ही मते त्यांना काँग्रेस व त्यांच्याशी युती केलेल्या पक्षातून मिळणे शक्य नाही. पण भारतीय आदिवासी पार्टीचे २, माकपचे २, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे ३ व अपक्ष १३ आमदारांकडून ही मते मिळवण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. ही सर्व मते मिळाली तरी भाजपला १० आमदारांची मते कमी पडतात. त्यासाठी भाजपने काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

गेले दोन वर्षे राजस्थान काँग्रेसमध्ये व सरकारमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची नाराजी अनेकवेळा दिसून आलेली आहे. या नाराजांचा गट भाजपच्या बाजूला जाऊ नये याची खबरदारी काँग्रेसला घ्यावी लागत आहे.

हॉटेलमध्ये कोण आमदार नाहीत?

माकप व भारतीय आदिवासी पार्टीच्या आमदारांबरोबर काँग्रेसचे काही आमदार हॉटेलमध्ये नाहीत. त्यात राज्याचे अन्न व नागरी सुविधा, ग्राहक संरक्षणमंत्री रमेश चंद्र मीना व पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंग यांचा समावेश आहे. या दोन मंत्र्यांनी सरकारच्या विरोधात काही वादग्रस्त विधाने केली होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता न आल्याने रमेश चंद्र मीना यांनी राज्य काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तर विश्वेंद्र सिंग यांनी भरतपूर येथील सरकारी रुग्णालयात एका गर्भवती मुस्लीम महिलेस तिच्या धर्मावरून दाखल करून घेतले नाही, या मुद्द्यावर सरकारवर टीका केली होती.

काँग्रेसचे एक मंत्री भंवरलाल मेघवाल हे आजारी असल्याने हॉटेलमध्ये गेलेले नाहीत तर बहुजन समाज पार्टीचे आमदार वाजिद अली हे नंतर काँग्रेसकडे गेले ते सध्या परदेशात आहेत.

गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी राज्यातल्या या सत्तासंघर्षाबाबत म्हटले की, ज्योतिरादित्य सिंदियासारखे प्रकरण येथे घडणार नाही. काँग्रेसकडे बहुमत असल्याने अपक्ष आमदारही सरकारसोबत आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे दोन राज्यसभा उमेदवार सहज विजयी होतील.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0