राज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे

राज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे

राज ठाकरेच्या इशाऱ्याकडे आघाडीनं लक्ष दिलं पाहिजे. अर्थात तो इशारा लक्षात घ्यायचा झाला तर त्याच्या अटी-शर्ती काय असतील त्याचा अंदाज करणे कठीण आहे. पेटीवर ठेवलेले आंबे पाहून भाव करायला जावे तर पेटीतले आंबे कधी कधी वेगळेही निघू शकतात!

भाजपवर निवडणूक आयोग मेहेरबान
फडणवीसांची बखर – २ : नवा साहेब
‘मोदी सरकारच्या बेपर्वाईमुळे कोविड महासाथीत ४० लाख मृत’
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

राज ठाकरे यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यात स्वारस्य नाही, हे उघड होते ते त्यांनी आता स्पष्टच केले आहे. मनसेच्या वर्धापन दिनी झालेले त्यांचे भाषण हे एखाद्या कुशल आंबे विक्रेत्याने  ग्राहकाला दाखवण्यासाठी दोन उत्तम आंबे निवडून पेटीच्यावर ठेवून द्यावेत तशा पद्धतीचे होते. परंतु सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्या पेटीतील अथवा पेटीवर ठेवलेल्या त्या आंब्यांकडे ज्यांचे लक्ष जाण्याची सर्वाधिक गरज आहे त्या काँग्रेस- राष्ट्रवादीने अजूनही त्यांच्याकडे गंभीरपणे पाहिलेले नाही. यात राज यांचे काहीच नुकसान नाही, काँग्रेस-राष्ट्रवादीचा मात्र झाला तर फायदाच होईल. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाड्यांच्या मोळ्या बांधता बांधता राहुल गांधींची दमछाक होत आहे. राज्यातल्या आघाडीची गाडीही रिझर्व्हवर आलेली आहे. ती पेट्रोल पंपापर्यंत तरी जाईल की नाही अशी आज घडीला स्थिती असतानाही, आघाडी सूस्त आणि अंतर्गत लाथाळ्यातंच मस्त आहे.
राज यांनी मनसे स्थापन केल्यानंतर दरवर्षी त्यांची राजकीय ताकद कमी कमीच होत आलेली आहे. त्यांच्या पक्षाचा एकमेव आमदार शिल्लक होता, त्या जून्नरच्या शरद सोनावणे यांनीही आता पक्ष सोडला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरचा सेनेचा आणि मनसेचा प्रवास पाहिला तर उद्धव यांनी राज ठाकरेंवर राजकीय मात केली हे दिसतेच आहे. परंतु अनेकदा पराभूत संघातील एखादा खेळाडू अधिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतो तसे राज यांचे  सध्या राज्याच्या राजकारणातले स्थान आहे. त्यांचा वैयक्तिक टीआरपी अजिबात कमी झालेला नाही. हा माणूस काही तरी करून दाखविल असा जो विश्वास राज यांच्याबद्दल लोकांना वाटतो, त्यातही घट झालेली नाही.
विश्वासाचाच विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात आज ज्याच्याविषयी लोकांना भरवसा वाटावा असा एकही नेता नाही. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, अजित पवार कोणाचेही नाव घ्या. काँग्रेसकडे राज्यव्यापी प्रभाव असलेले नेतृत्वही नाही. मोदी यांच्याविषयीचे असमाधान, नोटाबंदीचा झालेला नाहक त्रास, देशभक्तीच्या फुकट फुलबाज्या, धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असल्याबद्दलचा राग हा सगळा दारुगोळा खच्चून भरुन सत्ताधाऱ्यांवर मारा करायचा तर त्यासाठी आवश्यक असलेली लांब पल्ल्याची तोफ म्हणून माझा वापर करा, अशी अप्रत्यक्ष ऑफरच खरं तर राज ठाकरे यांनी परवा भाषणात दिली होती. ती आघाडीच्या नेत्यांना दिसत असूनही, वापरता येत नसेल तर पत्रकारांसमोरही मुख्यमंत्र्यांना ‘सर’ म्हणणाऱ्या विरोधीपक्ष नेत्याच्या जुनाट बंदुकीत फुसका बार भरत, सावज टप्पात येण्याची वाट पाहात त्यांना आणखी काही वर्षे बसून राहावे लागेल.
राज-उद्धव यांचे मनोमिलन होईल आणि त्यामुळे मराठी माणसाची इन्स्टंट भरभराट होईल असे काही भोळसट आणि बाळबोध मराठी मतदारांना वाटत होते, त्यांनीही आता हे मनोमिलन कधीही होणार नाही, हे एकदाचे स्वीकारलेले आहे.  मुंबई महापालिकेतली सत्ता आणि चराऊ कुरणांमधला आपला वाटा कायम राखण्यासाठी उद्धव ठाकरे वाघाचे कातडे पांघरूण, कमळाबाईचा पदर तोंडात धरुन तिच्या मागे मागे फरफटत राहणार हे दिसतच आहे. या स्थितीत राज ठाकरे यांना राज्यात राजकारण करायचे असेल तर या किंवा त्या बाजूला जावेच लागणार आहे. सेना-भाजप यांची गाठ आताच सुटणार नाही हे एकदा निश्चित झाल्यावर आणि एकेकाळी केलेले मोदी यांचे कौतुक पुढे फारच महागात पडल्यावर आता राज यांनी आपली तोफ त्यांच्या विरोधकांसाठी उपलब्ध असल्याचा इशारा दिला आहे. तो समजून घेऊन, आजच्या क्षणाची गरज म्हणून आणि राजकीय हतबलता म्हणूनही आघाडीने तिचा वापर केला पाहिजे.
अर्थात राज ठाकरे हे काही आघाडीच्या प्रेमात वगैरे नाहीत. हा सरळ सरळ राजकीय सौदा आहे. राज ठाकरे यांना लोकसभेची निवडणूक लढण्यात रस नव्हताच, त्यांना तो असता तरी त्यासाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेनेप्रमाणेच मनसेनेही महाराष्ट्र हेच आपले कार्यक्षेत्र आहे याची खूणगाठ बांधलेली आहे. त्यामुळे लोकसभेत मी तुमच्यासाठी प्रचार करतो, विधानसभेत तुम्ही मला सामावून घ्या, असा हा हिशोब असावा. पण काय हरकत आहे?
मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी पुलाचा स्लॅब कोसळून सहा जणांचा जीव गेल्यावरही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची संधी साधता आलेली नाही. सूजय विखेंच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसचा शक्तिपात झाला आहे तर पार्थ पवार साठी शरद पवारांना माघार घ्यावी लागल्यानंतर राष्ट्रवादीचा आवाजही बंद झाला आहे. काल परवा एकमेकांवर केलेले हल्ले विसरुन फडणवीस आणि ठाकरे खुर्चीला खुर्ची लावून गुफ्तगू करत आहेत. भाजपवर सोडलेला संजय राऊत नावाचा बाणही सेनेने टोक तोडून बाजूला ठेवून दिलेला आहे. त्या बाणाचे टोकडिटॅचेबल आहे, हवे तेव्हा लावता- काढता येते. असाच राजकीय शहाणपणा आघाडीनेही आता दाखवला पाहिजे. सूजय विखेंच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरु असतानाही काँग्रेसच्या बैठका आणि निवडणूक स्ट्रॅटेजीची चर्चा विखे यांच्या सरकारी बंगल्यावर होत असंत, एवढा बेसावधपणा काँग्रेस नावाच्या पक्षाला अजिबात शोभत नाही.
लोकसभेत मनसेकडेच काय, आघाडीकडेही फार काही गमावण्यासारखे नाही. काँग्रेसच्या दोन जागा आहेत त्या अशोक चव्हाण यांच्या घरच्याच आहेत. उमेदवार कोणीही असले तरी त्या राखणे चव्हाण यांना फार अवघड नाही. राष्ट्रवादी आपला जोर आता बारामती आणि मावळ येथे लावणारच आहे. त्याशिवाय उर्वरित तीनपैकी सातारा तरी नक्कीच कायम राहील.  सहाच्या पाच झाल्या किंवा सहाच्या सात झाल्या तर आघाडीला कोणी दोष देणार नाही आणि कोणी पाठही थोपटणार नाही. परंतु मनसेशी हातमिळवणी केल्यानं दोन आकडी संख्या गाठून सहाच्या आघाडीच्या लोकसभेत दहा जागा जरी झाल्या तरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं एक नवं समीकरण जन्माला येऊ शकेल. आघाडीच्या मदतीनं मनसेनं २००९ मधला १३चा आकडा जर विधानसभा निवडणुकीत गाठला तर तिथली सगळी गणितं बदलतील. कदाचित महाराष्ट्रात सत्ताही स्थापता येईल आणि मनसेचा प्रतिनिधी आघाडीसोबत मंत्रिमंडळातही येऊ शकेल. अर्थात ही सगळी समीकरणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐनवेळी भाजपच्या मांडीवर बसणार नाही, सेना-भाजप यांचं एकमेकांशी गरजेवर आधारित असलेलं सख्य कायम राहील हे गृहित धरून मांडलेली आहेत. तेव्हा, राज ठाकरेच्या इशाऱ्याकडे आघाडीनं लक्ष दिलं पाहिजे. अर्थात तो इशारा लक्षात घ्यायचा झाला तर त्याच्या अटी-शर्ती काय असतील त्याचा अंदाज करणे कठीण आहे. पेटीवर ठेवलेले आंबे पाहून भाव करायला जावे तर पेटीतले आंबे कधी कधी वेगळेही निघू शकतात!

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0