व्हिलेज डायरी भाग ३ – शेतीचं ऑडीट

व्हिलेज डायरी भाग ३ – शेतीचं ऑडीट

टनामध्ये विकणाऱ्याचं दुःख - व्यथा ग्रॅममध्ये खरेदी करणाऱ्याला समजत नसतात जाणवत नसतात.

व्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस
व्हिलेज डायरी – भाग ६
व्हिलेज डायरी – भाग २

प्रत्येक शेतकऱ्यामागे सरासरी २ कृषी तज्ज्ञ राज्यात निर्माण झालेले आहेत .
कॉफी टेबल पासून टपरी पर्यंत
पिज्जा खाता खाता ते पार्टी पर्यंत
खळखळणाऱ्या ग्लास आणि सरकारी खर्चावर ईमानं उडवत उदंड जाहले तज्ञ वगैरे म्हणू शकतो
आकडेवारीच द्यायची झाली तर..
शेतीसासाठी लागणारं बियानं ख़त विज पाणी यांची बेरीज ही येणाऱ्या उत्पनाला मिळणाऱ्या किमतीच्या ७०-८०% जास्त आहे. उत्पन्न कितीही वाढवलं तरी त्याचा मोबादला नाही वाढला तर माती खायची का?
शेतीचं ऑडिट
देतोय थोडक्यात, वाचा : –
जे करायची दानत कोनात नव्हती, नाही ना नसेल.
ज्यानं आमच्या पिढ्या पिढ्यांचं नुकसान नागडं पडेल..
अश्लीलतेच्या पलीकडची शेतकऱ्याची ती नग्नता हा समाज भोगतोय कैक पिढ्यांपासून..
शेतीतला रुपया येतो कसा न जातो कसा किंबहुना रुपया न येताच १०० पट परत जातात कसे.
तूट भरून निघते ती केलेल्या आत्महत्यांनी न जमिनी लिलावात विकून देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांनी  !
                                                                   ……
“कांद्याचा रुपये रुपये चा हिशोब देतोय, वेळ मिळाला, जमलं तर वाचा, ऐकणाऱ्या प्रत्येकाला सांगा.
(शेतातला मागच्या २ हंगामात मातीत गेलेला कांदा आणि उत्पन्न, १० मिनीटं माझ्यासोबत शेतीचा अनुभव घ्या.)
हे पंचगंगा आहे पाटीतलं.
(कांद्याचं बी आहे, तुम्हाला जर वाटत असेल पात लावुन कांदा येतो तर तुम्ही थोर आहेत!)
१ शेर बी – १२०० ते १५०० ₹
१ शेरात सर्वसाधारन (ण) ७ ते ८ सारे लावून होतात रोप तयार करायला.

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

हा सारा म्हणजे ढोबळ भाषेत ४-५ फूट रुंद आणि १२ ते १५ फूट लांब असा वाफा असतो. हे वाफे ट्रॅक्टर किंवा बैलावर तयार केले जातात, अर्थातच ते फुकट होत नाही. या साऱ्यांमध्ये बी विखुरलं जातं आणि त्याचं रोप तयार केलं जातं. ते काही दिवसात ( आता एक्साक्ट किती सगळं डिटेल करेक्ट सांगून टाकल्यावर तुम्ही शेती करायचा आणि आम्हाला भिकला लावायचा ) चिमटून घ्यावं लागतं त्याला साधारण ४ बायांचा रोजगार जातो दिवसभराचा म्हणजे ८०० रुपये!त्यातील सगळंच उगवत नाही, आणि त्यालाहि खुरपून घ्यावं लागतं निदान एकदा, त्याचा रोजगार साधारण ८०० चं धरू!
हे रोप ज्याने तयार केलं नाही त्याला ते दुसऱ्याकडून विकत घ्यावं लागतं ८००-१०००-१२०० रुपयाला एक सारा ( उपलब्धतेवर अवलंबून ) तर आपण रोप तयारच केलं आहे त्यामुळं सोडून देऊ सारा विकत घ्यायचा प्रश्न. या नंतर वेळ आहे ती कांद्यासाठी रान तयार करायची, त्यालाही १००० रुपये खर्च येतो या आपण केलेल्या ८ साऱ्यात जेवढा लावता येईल त्यासाठी. सध्या आपल्याला कांदा बोधावर लावणं परवडतं आणि उत्पन्न जरा हाताला लागतं म्हणून बोधावर लावू . म्हणजे याचं प्रमाण साधारण असं आहे, सरीवर २ एकर कांद्यासाठी जेवढं रोप लागेल तेवढं १/२ म्हणजे अर्धा एकर बोधावर लावण्यासाठी लागेल. म्हणजेच कमी रानात उत्पन्न जास्त आणि रोजगार थोडाफार वाचेल .
हे ८ सारे लावण्यासाठी १५ बाया लागल्या ( १ गडी रोपं काढून कापून बायांपर्यंत पोचवायला );
(बाया जास्त लागतील पण आपली घरातली ४ माणसं सोबत राबत आहेत);
आणि अशा प्रकारे दिवसाकाठी आपला अर्धा एकर कांदा बोधावर लावून निघाला आहे, आणि त्यावर आपण ड्रिप ( एकदम हलकं पेप्सी ड्रिप ) टाकलं आहे. ज्याचे १० बंडल लागले.
आत्तापर्यंत चा पहिल्या टप्प्यातला एकूण खर्च ( कमीत कमी ) –
बी                      –         १,२०० ₹
बैल/ट्रॅक्टर मेहनत –       १,००० ₹
बायकांचा रोजगार –       ८००+८००+३,००० ₹
(
लावायचा रोजगार २५०आहे, आपण २०० धरला )
ड्रिप                    –        २,५०० ₹ (२५० ₹ ला एक बंडल )
__________________________________________
एकूण                 =        ९,३०० ₹
या नंतर १ वेळा खतं, लिक्विड खतं, आणि २-३ फवारणी यांचा सर्वसाधारण खर्च ७००० रुपये.
एक खुरपनं साधारण ३००० रुपये.
मजुराची मेहनत सोडून देऊयात, रोजचं पाणी, त्याचं लाईटबिल सोडून देऊ.
आपला उत्तम कांदा तयार झालेला आहे, आणि पाती पाडायला आपण सुरुवात केलेली आहे.
हा जवळ जवळ १०० ठिकी कांदा आहे म्हणजे ५० क्विंटल म्हणजे ५००० किलो.
हा कांदा आपण घरातचं काढला आहे म्हणजे तुम्ही मी आपल्या भावांनी मिळून.
(४ एकर कांदा बोधावरचा म्हणजे १००० पोती कांदा घरात काढलेला, निम्मा पुन्हा शेतात टाकला.)
आता काढलेला कापायला बाया लागतील, एक बाई दिवसात २ ठिकी कशीबशी हाता पाया पडल्यावर आपली कीव आली तर कापते. १०० ठिकी कांदा कापायला बाया भरतात ५० टोटल.
त्यात मग आपण कापणं आणि ठिक्यात / पोत्यात / बारदाण्यात भरणं धरू .
बारदाणा सगळ्यात मेन, तो असतो दोन प्रकारचा. भारीतली तांबड्या जाळीची पिशवी ५५-६० रुपयाला एक , आपली वाहतूक लांबची नाही आपण साधा बारदाणा घेऊ, १२-१५ रुपयाला एक पिशवी वाला.
वाहतूक फक्त २० किलोमीटर आहे आपली, १०० पिशव्या आपणचं चढवला आणि उतरवला तरी हमाली कट हुनार आहेच.
यार्डात आपला माल पोहोचला आहे.
आता इथपर्यंत चा दुसऱ्या टप्प्यातला खर्च काढू
खतं / फवारण्या     –      ७,००० ₹
खुरपनं रोजगार      –     ३,००० ₹
कापायची मजुरी     –      १०,००० ₹ ( २०० रुपये ने ५० बाया )
बारदाणा               –      १,५०० ₹
वाहतूक                –       ७०० ₹  ( ७₹ पिशवी )
_____________________________________
एकूण दुसरा टप्पा    –     २२,२०० ₹
_____________________________________
एकूण संपूर्ण खर्च    = ९,३०० +२२,२०० = ३१,५०० ₹
लिलावाचा दिवस उजाडलाय.
हलाल करायला व्यापारी येतायत समोरून धावत घोळका करून. पोती फोडून पडलीयत. त्यातला प्रत्येक शेतकऱ्याजवळच्या पोत्यांच्या थडीतला खाली पडलेला, दबून पिचलेला कांदा उचलतायत पटकन. आडती भाव पुकारतोय .. ५०-१००-२००-३०० .. ३०० म्हणलं कि व्यापारी माना हालवतायत नाही  म्हणून, आडती एकमेव असतोय शेतकऱ्याचा सख्खा तिथला, तो तसाच चढवतोय २०० वर व्यापारी पुढं सरकतायत. त्याचा एक नंबर २०० नं गेलेला असतोय. आपलं कान गरम झालेलं असतात, डोळं लाल झालेलं असतात, छाती धडधड करायला लागलेली अस्तिय जसाजसा तो गोंधळ जवळ येईल तसा..
आपल्या समोर सगळे येऊन थांबतात, आपली आपल्या आडत्याशी नजरानजर होतेय, केविलवाणा भाव लपवायचा आपण प्रयत्न करतो, आडती थोडाफार संबंधातला असतोय आपल्या २ पिढ्यांपासून. लावतानाच तो १५० पासून लिलाव सुरु करतो, आपल्या मेंदू चा विस्फोट झालेला असतो, डोक्यातून धूर निघायला लागलेला असतो. पुढंच आपल्या कानात शिरत नाही, आडती चिट्टी देतो हातात २५० नं निम्मा अन निम्मा २०० नं गेल्याची. (५ पैसा किलो गेल्यावर फास लावून घ्यावा.) आपण घाम पुसत बाहेर येतो. यार्डाबाहेरच्या कॅन्टीन वर थांबतो..
पट्टी असते हातात ५० क्विंटल कांद्याची ११,२५० ₹ !
६ किलोमीटर चालत निघतो आपण स्टॅन्ड वर, बाया मजुरीसाठी थांबलेल्या असतात, १० हजार बायांना दिऊन, बारदाण्याची उधारी द्यायची तर २५० रुपये कमी पडत असतात… रडता येत नाही चार चौघात म्हणून मान खाली घालुन आपण निघतो… पुढची गणितं जुळवत… २० हजार नुकसान उचलून आपण स्वतःचा लिलाव केलेला असतो !
हा हिशोब याच्या किमान ५ पटीत करा कारण कमीत कमी तेवढं उत्पन्न आम्ही काढतो. संपूर्ण वर्षाचं उत्पन्न बरबाद झालेलं असतं. रोजचा खर्च भागवायचा कसा आणि शेती करायची कशी !
                                                                       ……
कांदा काढून कापल्यानंतर सुद्धा त्याला कमीत कमी १०० वेळा हात लागतो…
किलोत १० तर कांदे बसतात तसे, हजार वेळा त्या किलोभाराला स्पर्श झालेला असतो. भाव किती क्विन्टलला तर ५० रुपये, म्हणजे किलोला ५० पैसे …
हे स्पर्श तसे समाजाची आग भागवायला आम्ही करून घेतलेले असतात..
प्रत्येक स्पर्शात एक हुंकार निघतो, निराशेचा, आवेगाचा, अपरिहार्यतेचा, येऊ घातलेल्या दुःखाचा.
तो कांदा ते पिक अब्रू इज्जत इभ्रत असत त्या क्षणाला आमची…
तिचा सरेआम बाजारात लिलाव होतो, अन भाव किती मिळतो ? ५० पैसे किलो…
१००० स्पर्शाचे ५० पैसे ….
यापेक्षा कैकपटीने वेश्येला मिळतात.
आम्ही तर चिरंतन आग भागवतो की पोटाची.
वेश्येवर राग नाही माझा.
या समाज जीवनात सगळ्यात जास्त आदर मला वेश्येचा आहे.
ती प्रामाणिक आहे, नैतिकतेचे बुरखे पांघरून वरबडून खाणाऱ्यातली नाही.
अपेक्षा एवढीच आहे तेवढे १०० स्पर्श करून घेतलेल्या त्या प्रत्येक कांद्याच्या किमान १००० नग असलेल्या १०० किलोच्या क्विंटलला…
१,००,००० स्पर्शाना तिच्या एका स्पर्शा इतका तरी भाव मिळावा…!                                                                         ……
किमान फायदा जगण्यापूरता घर चालवण्यापूरता पिकातून शिल्लक राहिला नंतर उर्वरित रकमेतून कर्जवसुली व्हावी, अन्यथा ते कर्ज अनुदान या प्रकारात मदत भांडवल किंवा अन्य आशयाखाली द्यावं.
चीन पासून इजराईल पर्यंत हेच होतं.
कामगाराला ९-१२ हजार किमान वेतन मिळतं, अल्पभूधारक तर सोडाच मध्यम शेतकरी वर्गाला सुद्धा एवढं मिळत नाही. दिवसाला ३ रुपये ६० पैसे मजुरी शेतकऱ्याला मिळते २४ तास राबायची. शेतमजुरांना कमीत कमी ३०० रुपये ६ तासाची !
शेतमजूर आत्महत्या का करत नाहीत तर त्यांचा पगार उभ्या आडव्या भारतात कोणी बुडवला नाही.
एखाद्या कंपनी मधल्या मजुरांचे शोषण होतं शेतातल्या नाही. पाहुण्यातल्या एकाला खुरपायला लावलेल्या बायांच्या मागं काम करून घ्यायला बसल्यानंतर बीपी वाढून ऍटॅक आला, जागी गेला.
मजुरी वाढते दर वर्षी, दर सिझनला. भाव वाढतो? किंबहुना भाव मिळतो?
खतांची किंमत वाढते, बियाणांची वाढते, कपडालत्ता दवाखाना किराणा वाहतूक सर्व वाढतं,
रोज रोज रोज पिकांचा भाव वाढतो?
शेतकरी विरोधी वृत्ती नीच आहे या एकंदर बुद्धीवाद्यांची! त्यातून शेतमजुराला शेतकाऱ्यांविरोधात उभा करायचा. बुद्धिभेद सतत केला जातो, पण शेवटी हे दोघे सख्खे भाऊ आहेत, एकमेकांवर अवलंबून आहे हे यांना समजतं.
का शेतमजूर कंपन्या, MIDC मध्ये जात नाहीत?
शहरालगताचा हद्दवाढ भाग टीम करून पळतो गावोगाव शहरातला रोजगार परवडत नाही म्हणून.
तुमच्या कामवालीला पगार किती देता महिन्याचा? ३००-५००-१०००-२०००…
फार फार तर एखाद्या घरात २४ तास राबणाऱ्याला ३ ते ४ हजार.
गावाकडं बाई लावली की तिला काम भांडी घासायचं द्या नाहीतर काहीही, मजुरी दिवसाला १७५ ते २२५ !
शेतकरी मजुरांशी वाकडं घेत नाही, या बाया-बापे टोकाचे शोषण करतात शेतकऱ्यांचे…
असो त्यावर मला इतक्यात बोलायचे नाही.
तर शेतकऱ्याला म्हणजे चांगल्या मध्यम बागायतदार म्हणता येईल अशा ४-५ एकरात डाव मांडलेल्या सधन शेतकऱ्याला दिवसाला किती रुपये मिळतात त्याच्या कामाचे, कष्टाचे, राबणुकीचे?
३ रुपये ६० पैसे !!
कामाच्या तासांचा हिशोब देतोय :
८ तास आणि फक्त ५ दिवस राबवून घ्यायचा कायदा आहे.
लागणीपासून म्हणजे सप्टेंबर एन्ड पासून ते आज जून ७ पर्यंत डीपी जळणं, लाईट कट करणं ४-४ दिवस पाणी सोडलं की मग तासभरच लाईट सोडणं वगैरे सगळं सोडून टोटल रात्रपाळ्या आल्या सरासरी ९०.
दिवसाची कामं चालूच असतात सकाळी ५ पासून ते रात्री ७ पर्यंत आणि त्या नंतर रात्रपाळी असेल तर रात्री १२.०० पासून पहाटे ५ पर्यंत. टोटल वर्किंग अवर्स १९ तास. एका दिवसाचे.
असे ९० दिवस.
९० x १९ = १७१० तास.
लागण सोडून देऊ, ऑक्टोंबर ते मे एन्ड संपूर्ण ८ महिने. जवळ जवळ २४० दिवस अविरत कामाचे होतात, मधले १०-१५ दिवस खतं फवारण्या बाजार वगैरे आणायसाठी गेले.
९० दिवस हे असे रात्रपाळी जोडून असलेले वजा झाले, राहिले १५०.
त्यातल्याही महिना ३ दिवस म्हणजे २४-२५ दिवस मार्केट यार्डात माल नेणं वगैरे निव्वळ टाईमपास केला समजू. (जे कामात येतं खरंतर पण आपण ट्रिप समजू ती!)
उरलेले १२५ दिवस हे कुत्र्यासारखं मरमर काम, पाण्यापासून खळ्यापर्यंत.
सकाळी ५ पेक्षा या दिवसांसाठी सकाळी ७ पकडू. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ म्हणजे १२ तास.
१२५*१२ = १५०० तास.
Total working hours till today from cultivation = १७१०+१५०० = ३२०० hours.
उरलेल्या ४ महिन्यांचे याच कमीत कमी काम आहे
एकही रात्रपाळी करावी लागणार नाही अशा अपेक्षेने ते धरू :
१२०*१२ = १४४० तास
Total working hours from whole year = ३२००+१४४० = ४६४० hours. ढोबळ.
हे कमीत कमी पकडलं आहे.
एवढं कुटूंबातला प्रत्येकजण राबतो, आणि सगळ्याचा पगार मिळून वर्षभरात ५-५० हजार मिळतात.
कसल्याही प्रकारचा ओव्हरटाईम मिळत नसताना,  ओव्हरटाईम काय, आहे या पिकाला भाव नाही.
दिवसाची शेतकऱ्याची स्वतःची मजुरी कधी निघत नाही. ती न धरतात उत्पन्न धरलेलं असतं.
चतुर्थश्रेणी नोकरदार कामगार वगैरे ची पगार १५-१८ हजार कमीत कमी आहे.
विचारवंतांचा सहाव्या आयोगाचा पगार म्हणजे आमचं वर्षभराचं उत्पन्न. असो
तर ५ दिवसांचा आठवडा असलेल्या या वर्गाचे वर्षात दिवस भरतात २६० .
कसल्याही सण वाराच्या सुट्ट्या रजा न धरता.
२६०*८ = २०८० तास वर्षाचे.
फक्त मजुरी पकडली तर तासाला चतुर्थश्रेणी नोकरदाराला कमीत कमी १०० रुपये तासाला आहे.
शेतकऱ्याची या हिशोबाने ४६४० तासांची ४,६४,०००/- रुपये फक्त मजुरी होईल.
मिळते किती?
२००० रुपये महिना जर ठीकठाक भाव लागला तर.
“९ महिने राबलेल्या पिकाचा मोबदला आहे २० हजार,
९ महिने कष्ट आणि केलेला खर्च किती? तर ३० हजार.
हमीभावात विकला गेला असता माल तर ५००० रुपये नफा झाला असता
९ महिन्याच्या ५ माणसांच्या राबनुकीचा मोबदला ५००० रुपये.
प्रत्येकी १००० रुपये ९ महिन्यांसाठी.
प्रत्येकी दर महिना ११० रुपये.
‘भिक जास्त मिळते यापेक्षा रोज.’
तुमची पोट भरणार्‍याला उत्पन्न किती तर महिना ११० रुपये !”
आबे १२ महिने काम नसतं सांगणाऱ्या भाडोत्री तज्ज्ञांनो मानवी हक्कांचं उल्लंघन दिसत नाही का इथे?
जास्तीत जास्त मानवाने काम करावं २०८० ते २२०० तास कायद्याच्या हिशोबात.
आम्ही माणूस नाही का?
Minimum wages act अप्लाय होत नाही का आम्हाला?
यात कुठेही मेडिकल लिव्ह पकडली नाही, कारण त्या प्रकाराला आम्ही अस्पृश्य आहोत अजूनही,
निसर्ग रजा मेल्याशिवाय देत नाही.
३ रुपये ६० पैसे रोज !!!!
३ रुपय ६० पैशात खायचं कितीचं ?
३ रुपय ६० पैशात अंगावर झाकायचं काय ?
गांड पुसायला वापरता तो टिश्यू याहून महाग आहे बे.
.…..
एका संपूर्ण समाजभागाचा जगण्याचा हक्क काढून घेणारा तुमचा देश देशभक्ती लोकशाही राजकारण, समाजकारण अन संस्कृती समद्याची त्या आमच्या जळलेल्या पिकात भावनेत जगण्यात राख हुईल.
आपल्याला कित्येक करोड वर्षांनी माणूस म्हणून जीवन मिळालय, प्रत्येकाचं माणूसपण मान्य करायची दानत तरी दाखवा ?
या शोषणाचा शेवट आम्ही करणार आहोत.
एका एका मिनिटांची किंमत लावून भाव ठरवला तर खाणं परवडणार नाहीच एवढं फक्त लक्षात ठेवा.
तुमच्या ढुंगणाची चरबी वाढवायला, आमच्या बापजाद्याच्या मेलेल्या आतड्याचा बरगड्या शिल्लक राहिलेल्या शरीराचा हिशोब मागतील आम्ही मेलो तरी; आमच्या पुढच्या पिढ्या.
या देशात कोणी मागास असेल आजच्या घडीला तर तो फक्त आणि फक्त कुणबी समाज, मग कुठल्याही जाती धर्माचा वाड्या वस्तीचा तांड्या पाड्याचा असेल.
…….

मी लोकं पाहिलीयत…

यार्डात रात्री माल नेल्यावर हलका डोळा लागला की
भरलेली ठिकी पळवणारी,
रस्त्यात कांद्याचं पिकाप पलटी झाल्यावर
स्कोडा फोर्ड होंडा मारुती थांबवून
डिक्यात भरता यील तेवढा कांदा भरून सुसाट सुटणारी…

यार्डातनं स्टॅन्ड कडं चालत निघाल्याला
चिकुल लागल्याल्या मळक्या ईजारवाल्याला हायवे वरनं चालायला लावणारी,
हेडफोन वाली जॉगिंग करून फुटपाथ व्यापणारी,
तो दिसून न दिसल्यासारखा करत घासत गाडी रेमटणारी,
बघून चाल की आईघाल्या म्हणणारी …

पहाटंपसनं तंगडं तोडत
शेतातनं माळवं ईकायला आलेल्या म्हाताऱ्याला
कमी दिसतंय म्हणून पैसं कमी देणारी,
त्याच्या म्हातारीच्या फाटक्या लुगड्यात बांधलेलं माळवं
नजर चुकवून काढून घेणारी…

मी लोकं पाहिलीयत ..
मातीतल्या माणसावर,
घरा-दारावर,
संसारावर त्याच्या जगण्यावर मुतुन थुकणारी…
मी लोकं पाहिलीयत…
….

क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0