या राम मंदिरासाठी माती खाऊ नका…

या राम मंदिरासाठी माती खाऊ नका…

देव, धर्म त्यातही विषय रामाचा-राम मंदिराचा असेल तर भलेभले लोक बुद्धीची कवाडे बंद करून घेतात, हा आजवरचा इतिहास आहे. त्याच प्रवाहाला जागत हिंदी साहित्यातले प्रगतीशील, अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले लेखक उदय प्रकाश यांनीही शरणागती पत्करली, तेव्हा मीडिया-सोशल मीडियावर कार्यरत पुरोगामी विचारांच्या मंडळींमध्ये एकच हडकंप माजला. मुद्दा, उदय प्रकाशांनी राम मंदिराला दिलेल्या देणगीची अपराधीभाव न ठेवता जाहीर वाच्यता केल्याचा होताच, पण रामाच्या नावावर देशाची वीण उसवणाऱ्या विध्वंसक घटकांना एकप्रकारे मान्यता देण्याचाही होता...

केरळात ई. श्रीधरन भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
नियमनाच्या अभावामुळे खाजगी रुग्णालयांद्वारे रुग्णांचे शोषण
केरळ, पुद्दचेरीत भाजपचे दुर्लक्ष?

उसाच्या मूळ लागवडीच्या तुलनेत खोडव्याचे पीक दुय्यम येते अशी महाराष्ट्रातील धारणा आहे. पण इतर राज्यांमध्ये एकदा नव्हे तर अनेक वेळा खोडव्याचे विक्रमी पीक घेतले जाते, असे जाणकार सांगतात.

भाजपच्या दृष्टीने राममंदिर हा असाच खोडवा आहे. हे तणवर्गीय पीक गेल्या शतकात लावले. ते अजूनही हात देते आहे. सध्या पाचव्या की सातव्या खोडव्याच्या कापणीची लगबग सुरू आहे.

पुढील वर्षी उत्तर प्रदेशात तर त्यानंतर दोन वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका आहेत. अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाचे वेळापत्रक याच्याशी नीट जुळवण्यात आले आहे. सध्या देशभर मंदिरासाठीच्या देणगी-वसुलीचा उडवून दिलेला बार त्याला साजेसा आहे.

या देणग्या जमा करणारांच्या टोळ्या सध्या चारही दिशांनी फिरत आहेत. देणग्यांसाठी छोटे मेळावे, जास्त पैसे देणाऱ्यांचे कौतुक सोहळे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात गुढीपाडव्याला काढतात तशीच एक कृतज्ञता मोटारसायकल मिरवणूक काढण्यात आली. देणग्या देणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी. एकूण मंदिर-देणगी प्रकाराभोवती वलयामागून वलये चढवली जात आहेत.

या सगळ्यात भाजपचे कार्यकर्ते व नेते आघाडीवर आहेत. त्यांना बहुधा वसुलीची विशिष्ट उद्दिष्टेही ठरवून देण्यात आली असतील. पण तरीही हा भाजपचा राजकीय कार्यक्रम नव्हे तर सर्व देशाच्याच जिव्हाळ्याचा काहीतरी विषय आहे असे भासवण्याचा प्रयत्न चालू आहे.

अर्थातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचे याबाबतचे कसब नामांकित आहे. सतत हिंदू-मुस्लिम, हिंदू-मुस्लिम बोलायचे, जयप्रकाशांच्या आंदोलनात भाग घ्यायचा पण तरीही आम्ही राजकारणात नाही असे संघाने सांगायचे. किंवा, राममंदिरासाठी रथयात्रा काढायच्या, संसद बंद पाडायची आणि अयोध्येत मशीद पाडण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवायचे आणि तरीही राममंदिर हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम आहे, आमच्या राजकीय अजेंड्यावर नाही असे भाजपने सांगायचे. हे पूर्वापार चालू आहे.

पूर्वी भाजपला राजकारणात मित्र मिळवणे कठीण होते. त्यासाठी ही मायावी चालबाजी गरजेची होती. वाजपेयींनी असाच मुखवटा धारण करून जॉर्ज फर्नांडिसांपासून ते ममतांपर्यंत तमामांचा पाठिंबा मिळवला. आता भाजप सर्वशक्तिमान आहे. तरीही जुना पवित्रा कायम आहे. कारण तो वेगळ्या फायद्यासाठी वापरता येतो.

राममंदिराचे काम हे देशाचे व धर्माचे काम म्हटले की लोक गप्प बसतात. भाजपने आजवर या निमित्ताने ज्या ज्या राजकीय व बाकीच्या भानगडी केल्या त्याविषयी कोणी प्रश्न विचारत नाही. विचारलेच तर त्यांना लोकद्रोही किंवा धर्मद्रोही ठरवता येते. सध्या याचाच दुसरा अर्थ देशद्रोही हादेखील आहे.

तेलंगणात काय घडले पाहा. तेलंगण राष्ट्र समिती हा तिथला सत्तारुढ पक्ष आहे. याचे एक आमदार विद्यासागर राव यांनी राममंदिरासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेवर टीका केली. या देणगी-वसुलीच्या निमित्ताने भाजप जातीय विद्वेष पसरवत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. अयोध्येसाठी देणग्या कशाला देता, तुम्ही थोडेच अयोध्येला जाणार आहात रामाच्या दर्शनासाठी, त्याऐवजी तुम्हीच आपापल्या गावात रामाचे देऊळ बांधा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला.

ही टीका म्हणजे भाजपच्या शेपटावरच पाय होता. त्यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला. राव यांच्या घरावर मोर्चे काढण्यात आले. राव यांना पाठिंबा देणाऱ्या धर्मा रेड्डी या दुसऱ्या एका आमदारांच्या घरावर दगडफेक झाली. राव, रेड्डी आणि त्यांचा पक्ष हिंदूविरोधी असल्याचा प्रचार सुरू केला. राव गांगरले. त्यांचा पक्षही त्यांच्या मागे उभा राहिला नाही. त्यामुळे त्यांनी सारवासारव केली. मी हिंदू आहे आणि लवकरच अयोध्येत राममंदिरात जाणार आहे असे त्यांनी जाहीर करून टाकले.

तेलंगण राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या प्रश्नी भूमिका घेण्याचे टाळले. उलट, विनाकारण वाद निर्माण करू नका असा सल्ला त्यांनी आपल्याच लोकांना दिला.

वास्तविक त्यांचा पक्ष अतिशय बलशाली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला ४६ टक्के मते आणि जवळपास तीन चतुर्थांश जागा मिळाल्या. ११९ पैकी ८८. त्यावेळी भाजपला केवळ एक जागा मिळाली होती. राव यांचा करिश्मा जबरदस्त आहे. ते लोकप्रिय वक्ते आहेत. त्यांचा कारभारही ठीकठाक आहे. अनेक आयटी व औषधी कंपन्यांना बंगलोरपेक्षाही हैदराबाद आपलेसे वाटते.

राव यांचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते अतोनात धार्मिक हिंदू आहेत. उठसूठ यज्ञ करीत असतात. स्वतंत्र तेलंगण राज्य स्थापन झाल्यावर त्यांनी एक अतिभव्य चंडी यज्ञ केला होता. २०१८ ला जिंकून आल्यावर त्यांनी पाच दिवस चालणारा अति-अतिमहायज्ञ केला. शेकडो-हजारो यज्ञकुंडे आणि भटजी, लाखो लिटर तूप-दूध-मध असा त्याचा सरंजाम होता. अर्थातच राव यांचे पक्षातले सवंगडी हे याच प्रकारचे हिंदू आहेत.

एकूण, राव आणि त्यांच्या पक्षाला जनतेचा सज्जड पाठिंबा आहे. शिवाय, रोजच्या आयुष्यात ते इतके हिंदू आहेत की तितके तर अडवानी किंवा वाजपेयीदेखील नसतील. पूर्वी निवडणुकांच्या प्रचारात तर राव स्वतःच हे वारंवार सांगत असत. मी मोदींच्या दसपट अधिक हिंदू आहे असं ते म्हणत. पण हा हिंदूपणा त्यांच्या काही कामी आला नाही.

नुकत्याच झालेल्या हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला. गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ असे लोक नगरपालिकेच्या प्रचारासाठी आले. त्यांनी हैदराबादचे नाव भाग्यनगर करू असे जाहीर केले. तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष हिंदूविरोधी असल्याची राळ उडवून देण्यात आली. परिणाम असा झाला की, तेलंगणा राष्ट्र समितीच्या जवळपास ४४ जागा कमी झाल्या आणि त्या सर्व भाजपला मिळाल्या.

त्यामुळे राव आता भाजपच्या हिंदुत्वबाजीपुढे दबून गेले आहेत. आपण व आपला पक्ष हिंदूविरोधी ठरू अशी भीती त्यांना वाटते. राममंदिराच्या मुद्द्यावरून बखेडा नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

उदय प्रकाश यांची अंत में प्रार्थना

उदय प्रकाश

उदय प्रकाश

हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक उदय प्रकाश यांचा किस्सा पाहा. प्रकाश यांनी अयोध्येतील राममंदिरासाठी देणगी दिली. आपल्या फेसबुक खात्यावर देणगीची एक पावती डकवली. ती खरी की खोटी असा संभ्रम आधी निर्माण झाला. कारण त्यात देणगीदाराच्या नावात नेमकी चूक असून उदय प्रताप खोडून उदय प्रकाश करण्यात आले होते. पण नंतर ही देणगी आपणच दिल्याचा खुलासा त्यांनी केला.

उदय प्रकाश एका वाहिनीशी बोलताना म्हणाले की, मी एका गावात राहतो. आमच्या कुटुंबाचे पूर्वापार येथे नाव आहे. देणगी मागण्यासाठी लोक येत असतात. त्यात सर्व धर्माचे लोक असतात. राममंदिरासाठी आलेले तरुणही ओळखीचेच होते. त्यांचे बाप-चुलते माझ्या परिचयाचे वा बरोबरीचे होते. म्हणून देणगी दिली. राम हा धार्मिक किंवा राजकीय विषय होऊ शकत नाही. तो एका सुसंस्कृत समाजाचे प्रतीकचिन्ह आहे. हा सर्व एक वैयक्तिक मामला आहे. त्याचे राजकीय अर्थ काढले जाऊ नयेत.

प्रकाश यांनी राममंदिराला देणगी द्यावी ही हिंदी प्रांतातील मोठी बातमी झाली. असंख्यांना धक्का बसला. नाराजी, आश्चर्य, खंत, चीड सर्व काही घडले. अनेकांनी, अंत में प्रार्थना, अशी खोचक टीका त्यांच्यावर केली.

उदय प्रकाश हे प्रगतीशील, पुरोगामी विचारधारेचे मानले जातात. त्यांचे साहित्य हे त्याच धाटणीचे व बुद्धिमानांना आवडणारे आहे. (जयप्रकाश सावंत यांनी मराठी वाचकांना त्यांच्या साहित्याचा उत्तम परिचय घडवलेला आहे.) १९९२ च्या सहा डिसेंबरची आठवण म्हणजे हजारो सुया एकाच वेळी टोचाव्यात अशी वेदना त्यांनी एका कवितेत व्यक्त केली होती. एम एम कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ २०१५ मध्ये त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. त्यातूनच पुरस्कार-वापसीची एक लाट देशभर उसळली होती.

अशा उदय प्रकाश यांना राममंदिराचे राजकारण ठाऊक नाही असे कोण म्हणेल. आपण काय करतो आहोत हे त्यांना समजत नाही असे कोण म्हणेल.

उदय प्रकाश मध्य प्रदेशातील आहेत. या राज्यात इंदूर, मंदसौर, उज्जैन आणि धार भागात राममंदिराच्या देणग्या गोळा करण्यावरून छोटे दंगे झाले आहेत. मंदसौरमध्ये एक मशीद तोडण्याचा प्रयत्न झाला. काही जणांना अटकही झाली. इंदूरमध्येही असाच प्रकार झाला. बहुतेक ठिकाणी देणगी गोळा करण्यासाठी मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुद्दाम मशिदींच्या बाजूने नेणे, भडकाऊ घोषणा देणे हे तंत्र वापरले जाते, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

उदय प्रकाश या संदर्भात एका शब्दानेही बोललेले नाहीत. उलट या घटना घडल्यानंतरही त्यांनी ही देणगी दिली आहे.

६ डिसेंबर १९९२ ला एक आत्यंतिक गुन्हेगारी कृत्य घडले. सर्वोच्च न्यायालयानेही ही बाब नमूद केली आहे. बाबरी मशिदीजवळ लाखांची झुंड जमवली अडवानी, विश्व हिंदू परिषद इत्यादींनी. एक धक्का और दो अशा घोषणा झाल्या यांच्या देखत. मशीद पडली तेव्हा आनंद साजरा केला यांनीच. तरीही मशीद कोणी पाडली, हे आपणाला ठाऊक नाही असा पवित्रा आज हे लोक न्यायालयात घेतात. त्याच वेळी बाहेर ६ डिसेंबर हा पराक्रम-दिन म्हणून मिरवतात.

या देशात इतर अनेकांना- ज्यात असंख्य हिंदू आहेत-झाले हे योग्य झाले नाही असे वाटते. पण असे लोक भाजपसाठी धोकादायक आहेत. कारण, भाजपने मंदिराबाबत स्वतःची जी एक रामकथा रचलेली आहे ती हे लोक खोडून काढू शकतात. पर्यायी व खरी कथा सांगू शकतात.

भाजपला इतिहास बदलून टाकायचा आहे हे सर्वांना ठाऊक आहे. चौरीचौरा इथे आंदोलकांनी पोलिस चौकी जाळली. त्यात वीसहून अधिक लोक जळून मेले. गांधीजींच्या आंदोलनाच्या व्याख्येत ही हिंसा बसणारी नव्हती. त्यांनी आंदोलन मागे घेतले. आजवर इतिहासाच्या पुस्तकात आपण हेच शिकलो. पण पोलिस चौकी पेटवणारे लोक हे देशप्रेमी-वजा-हुतात्मे होते असे म्हणून भाजपने या घटनेची शताब्दी चालू केली आहे. गंमत म्हणजे या कार्यक्रमात गांधीजींचा चुकूनही उल्लेख करण्यात आलेला नाही.

सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल हे आमचेच होते असे संघवाले पूर्वीही म्हणत असत. पण आता तर तेच खरे नायक व नेहरू अतिकुटील खलनायक असे ठरवण्याचा प्रकल्प जोरात आहे. उद्या ते नेहरुंविरहीत इतिहासदेखील लिहू शकतील. गोळवलकर आणि त्यांच्या संघ स्वयंसेवकांनीच हा देश उभा केला असे सुद्धा म्हटले जाईल. याच मार्गाने आणखी १० वर्षांनी नथूराम गोडसेने केले ते योग्यच झाले असे पटेलांनी लिहून ठेवले होते, असे सुद्धा बाहेर येऊ शकेल.

पण या तशा दूरच्या इतिहासातील गोष्टी आहेत. त्याच्याशी संबंधित सर्व लोक वारले आहेत. त्यावेळी वयाने जाणती असणारी सामान्य जनतादेखील, असलीच तर, वारण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भाजप आताप्रमाणे सत्तेत राहिला तर हा जुना, दूरवरचा इतिहास बदलायला फार कष्ट पडणार नाहीत. बाबरी-कांडासारख्या आधुनिक घटनांमध्ये थोडीफार गोची होऊ शकते.

मुळात राममंदिर व्हावे ही काही या देशातील जनतेची तीव्र मागणी वगैरे अजिबात नव्हती. इथल्या कोट्यवधी जनतेला खरे तर आजही मंदिर झाले न झाले फरक पडत नाही. पण प्रचार कर-करून मागणी आहेच असे सांगितले गेले. मग सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या वचनाशी दगलबाजी करून मशीद पाडण्यात आली. दंगली झाल्या. भाजपचे राजकारण वाढत गेले.

राम हा सत्यवचनी होता. पण त्याचे मंदिर अशा घाणेरड्या राजकारणाच्या पायावर उभे राहणार आहे.

भाजपला काट्यासारखी टोचणारी बाब म्हणजे यातल्या बहुसंख्य घटना बहुसंख्य लोकांच्या स्पष्ट आठवणीत आहेत. तो सगळा काळ अलिकडच्या माध्यमांमध्ये ग्रथित आहे. न्यायालयाच्या दस्तावेजांमध्ये शाबूत आहे. एकूण हा ताजा आणि नजीकचा इतिहास पुसणे सोपे नाही. पण भाजपला ते करायचे आहे.

गांधीजींच्या खुनाला ७३ वर्षे झाली. तीन-चार पिढ्या गेल्या तरी नथूरामाच्या पापाचे पुण्य झालेले नाही. तसला प्रकार त्यांना पुन्हा होऊ द्यायचा नाही.

या हिंदुत्वबाजीचा माहोल तर जबरदस्त निर्माण झाला आहे. इतका की, तिच्याशी समोरासमोर भिडण्याची ताकद इथल्या मी मी म्हणणाऱ्या राजकारण्यांमध्ये नाही. तेलंगणातील उदाहरणावरून ते दिसते.

हेही खरं की, आजूबाजूचे लोक अद्भुत आहेत. करोनाने गेल्या दहा-अकरा महिन्यांची बरबादी केली. लाखो लोक आजारी पडले वा मेले. त्यांचे धंदे बुडाले. नोकऱ्या गेल्या. पण या स्थितीतही भाजप आणि संघवाले लोकांकडे मंदिरासाठी देणग्या मागायला जातात. त्या वसूल करतात.

लोक आपल्या बरबादीबद्दल कुरकुरत नाहीत. भाजपवाल्यांना प्रश्न विचारत नाहीत. करोनाच्या काळात श्वास लागून अनेक जण मेले. प्राणवायू मिळण्याची कृत्रिम यंत्रणा असती तर ते वाचले असते. मंदिरासाठी शेकडो कोटी रुपये गोळा होत आहेत. त्याऐवजी अशा यंत्रणांसाठी वा इस्पितळासाठी पैसे गोळा करूया असे कोणीही म्हणत नाही. अगदी मेलेल्यांचे नातेवाईकदेखील नाहीत.

मूळ मागणी लोकांचीच होती व आताही लोकांच्या देणगीतूनच मंदिर उभे राहिले असे कथन उभे राहते आहे. सामान्य लोकही नकळतपणे, अजाणता त्यात सहभागी होऊ घातले आहेत.

एकूण काळ कठीण आहे. पण सर्व मार्ग संपलेले नाहीत.

विचारी लोक आपली आठवण धड ठेऊ शकतात. ही आठवण पुढच्या पिढ्यांना वारशाने देऊ शकतात. अयोध्येच्या हकिगतीला चौकट पुरवू शकतात. म्हणायला मंदिर असले तरी ही प्रत्यक्षात एक राजकीय इमारत आहे हे सांगू शकतात. एका मोठ्या कारस्थानाचा ती भाग आहे हे दाखवू शकतात. या कारस्थानाची हकिगत पुढच्या पिढीत जाईल याचा बंदोबस्त करू शकतात. ज्यांची त्यांची पापे त्यांच्या त्यांच्या गळ्यात बांधता येऊ शकतील. आज स्थिती अनुकूल नसेल. पण उद्या होईल.

उदय प्रकाश यांच्यासारख्यांनी माती खाल्ली आहे. पण देणग्या न देणारे व आपली आठवण धड ठेवणारे लाखो जण आहेत. आपणही जागं राहावं. तेच सत्याची चाड असलेल्या लोकशाही परंपरेला धरून असेल.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार, भाष्यकार आहेत.)

(साभारः मुक्त संवाद नियतकालिक, १५ फेब्रुवारी २०२१)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: