भारताचा १६ वर्षांचा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याला एअरथिंग मास्टर्स स्पर्ध
भारताचा १६ वर्षांचा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसन याला एअरथिंग मास्टर्स स्पर्धेत पराभूत करून धक्का दिला.
कार्लसने आपले तीन सामने पूर्वीच जिंकले होते पण प्रज्ञानंदने तीन सामने गमावले होते. त्यामुळे प्रज्ञानंद-कार्लसन लढत एकतर्फी होईल असे वाटत होते. पण प्रज्ञानंदने केवळ ३९ चाली खेळत कार्लसनला पराभवाचा धक्का दिला.
कार्लसनने या पूर्वी पाचवेळा जगज्जेतेपद मिळवले आहे, पण १६ वर्षाच्या प्रज्ञानंदच्या वेगवान चालींना उत्तर देताना मात्र त्याच्याकडून अनेक चुका झाल्या. कार्लसनचा पराभव करण्याची किमया याआधी भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद व पी. हरिकृष्ण यांनी दाखवली होती, त्यानंतर प्रज्ञानंद हा तिसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे.
बुद्धिबळ जगतात प्रज्ञानंदच्या खेळाची या पूर्वी चर्चा झाली होती. २०१६मध्ये वयाच्या १० व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर झाला होता. त्यामुळे तो भविष्यात मोठे आव्हान ठरू शकेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रज्ञानंदला सातव्या वर्षी त्याला फिडे मानांकन मिळाले होते. २०१८मध्ये प्रज्ञानंदने वयाच्या १२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब जिंकून विश्वनाथ आनंदचा विक्रम मोडला होता. २०२१मध्ये बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत तो सहभागी झाला होता पण चौथ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले होते.
कार्लसनवरच्या विजयानंतर प्रज्ञानंदवर अनेक थरातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. विश्वनाथ आनंद याने प्रज्ञानंदच्या गुणवत्तेचा अभिमान असल्याचे ट्विट केले. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानेही प्रज्ञानंद याच्या विजयावर ट्विट केले. प्रज्ञानंदाची कामगिरी अद्भूत आहे. काळ्या सोंगट्यासह त्याने केलेली खेळीही जादूई होती. त्याने भारताची मान अभिमानाने उंचावणारी कामगिरी केली आहे. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, असे ट्विट केले आहे.
COMMENTS