मॅगसेसे पुरस्काराचे सन्मानपत्र

मॅगसेसे पुरस्काराचे सन्मानपत्र

रविश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी पुरस्कार समितीने प्रसिध्द केलेले सन्मान पत्र.

गोव्यात ऑक्सिजन अभावी ४८ तासांत ४७ कोरोना रुग्णांचा मृत्यू
‘बॅटल ऑफ मदर्स’
मी आणि गांधीजी – ८

भारत, जगातील सर्वात मोठी लोकशाही. या देशात गेल्या काही वर्षांत स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश संकोच पावत गेला आहे. या मागे अनेक कारणे आहेत, माध्यमांची एकंदर संरचना बदलत्या माहिती तंत्रज्ञानामुळे बदलत गेली, मते आणि वृत्तांकन यांचे बाजारीकरण वाढत गेले, सरकारी नियंत्रण वाढत गेले आणि सर्वात चिंताजनक बाब म्हणजे वाढत्या धार्मिक, वांशिक आणि राष्ट्रवादी मूलतत्त्ववादामुळे एकाधिकारशाहीला लोकप्रियता लाभत गेली, आणि परिणामतः दुही, असहिष्णुता आणि हिंसाचाराचे सहज आचरण वाढत गेले.

हा सारा धोका वाढत चाललेला असताना टेलिव्हिजन पत्रकार रवीश कुमार यांचा आवाज महत्त्वपूर्ण आहे. उत्तर भारतातील हिंदी भाषक बिहार राज्यातील जित्वारपूर या गावात लहानाचे मोठे झालेल्या रवीश यांनीं इतिहास आणि नागरी घडामोडींच्या अभ्यासात रस घेतला आणि या विषयांत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९६ मध्ये त्यांनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन नेटवर्क (एनडीटीव्ही) या भारतातील प्रसिद्ध टीव्ही नेटवर्कमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. क्षेत्रीय वार्ताहर म्हणून सुरुवात करून त्यांची प्रगती होत गेली. भारतातील ४२ कोटी २० लक्ष प्रादेशिक भाषकांसाठी एनडीटीव्हीची एनडीटीव्ही इंडिया ही चोवीस तासाची हिंदी वृत्तवाहिनी सुरू झाल्यानंतर, त्यांना त्यांचा स्वतःचा असा प्राईम टाईम हा खास कार्यक्रम करायची संधी देण्यात आली. आजघडीला, एनडीटीव्ही इंडियाचे ज्येष्ठ कार्यकारी संपादक असलेले रवीश कुमार हे भारतातील सर्वाधिक प्रभावी टीव्ही पत्रकार आहेत.

मात्र, त्यांचे विशेष महत्त्व त्यांनी केलेल्या पत्रकारितेच्या स्वरुपामुळे ठरत गेले. माध्यमांच्या जगातील वातावरण सरकारी हस्तक्षेपामुळे, युद्धखोरीला डोक्यावर घेणाऱ्या पक्षीय भूमिकेमुळे, ट्रोल्स आणि खोट्या बातम्या पेरणाऱ्यांमुळे, बाजारू स्पर्धेसाठी केवळ निवडक व्यक्तीमत्वांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रवाहामुळे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी स्वस्तातले सनसनाटीकरण करण्यामुळे, पीत पत्रकारितेमुळे धोक्यात आलेले असताना, रवीश कुमार यांनी व्यावसायिक मूल्ये संयतपणे, संतुलित रीतीने, वास्तवावर आधारित वृत्तांकन करण्यावर सातत्याने भर दिला आणि तसे ते सातत्याने बोलून दाखवत राहिले. त्यांच्या प्राईम टाईम या एनडीटीव्ही इंडियावरील कार्यक्रमात सामाजिक प्रश्नांची दखल घेतली जाते आणि त्या प्रश्नांवर सखोल संशोधन करून, चर्चा करून मग त्यावर विसाहून अधिक भागांत कार्यक्रम सादर केला जातो.

हा कार्यक्रम फारशी दखल न घेतल्या गेलेल्या सामान्य लोकांच्या वास्तव जीवनावर आधारित असतो- त्या लोकांत गटारांत उतरून सफाई करणारे कामगार आहेत, सायकलरिक्शा ओढणारे कष्टकरी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत आणि विस्थापित शेतकरीही आहेत, अनुदान न मिळालेल्या शाळांचे प्रश्न आहेत आणि अकार्यक्षम रेलव्यवस्थेचेही प्रश्न आहेत. रविश अगदी सहजपणे गरीबांशी संवाद साधतात, विपुल प्रवास करतात आणि त्यांच्या श्रोतृवर्गाशी संपर्कात रहाण्यासाठी समाज माध्यमांवरही असतात. त्यातून मिळालेल्या माहितीतून आपल्या कार्यक्रमाची बीजे गोळा करतात. लोकजीवनात घट्ट पाय रोवलेली पत्रकारिता करण्यासाठी प्रयत्नशील असलेले रवीश आपल्या न्यूजरूमला ‘लोकांची न्यूजरूम’ म्हणतात.

रवीश नाटकीपणा करत नाहीत असे नाही, योग्य तो परिणाम साधेल असे वाटले तर ते ही नाट्याचा आधार घेतात, उदाहरणार्थ २०१६मध्ये त्यांनी टीव्ही वृत्तांकनातील विकृतीचे दर्शन घडवण्यासाठी आपला कार्यक्रम नाट्यपूर्ण रीतीने सादर केला. या कार्यक्रमात रविश पडद्यावर आले आणि संतप्त आवाजांच्या नाटकी गदारोळाच्या अंधाऱ्या जगात टीव्ही वृत्त कार्यक्रम हरवल्याचे प्रेक्षकांना सांगितले. मग पडदा काळा झाला आणि पुढील एक तासभर त्या पडद्यामागून खऱ्याखुऱ्या टीव्ही कार्यक्रमांतील आवाजी गोंधळाचे, विषारी धमक्या, उन्मादी आक्रोश, शत्रूच्या रक्तासाठी तहानलेल्या गर्दीचे खिंकाळणे यांचे तुकडे ऐकू येत राहिले. रविश नेहमीच त्रयस्थपणे मर्म पोहोचेल याची खबरदारी घेतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रवीश संयतपणे, धारदारपणे आणि संपूर्ण माहिती घेऊनच बोलतात. ते आपल्या निमंत्रित पाहुण्यांवर दादागिरी करत नाहीत, त्यांना त्यांचे विचार मांडू देतात. पण उच्चपदस्थांना जाब विचारण्यास किंवा माध्यमांवर टीका करण्यास, देशातील बौद्धिक अवकाशाची परिस्थिती कथन करण्यास ते कचरत नाहीत. यामुळेच त्यांना सातत्याने विविध प्रकारांतल्या पिसाळलेल्या पक्षपाती लोकांकडून त्रास दिला जातो, धमक्या दिल्या जातात. या सर्व त्रासांतून, धोक्यांचा सामना करत रवीश यांनी, माध्यमांनी सामाजिक जबाबदारीचे पालन करावे, संतुलित चर्चेचा अवकाश वाढवावा आपल्या तत्वांपासून जराही न ढळता आपले वर्तन ठेवले आहे. लोकांची सेवा हे आपल्या कामाचे केंद्र असावे या पंथाच्या पत्रकारितेशी त्यांची निष्ठा अबाधित राहिली. एक पत्रकार म्हणून आपली निष्ठा कशावर आहे हे रवीश अतिशय सोप्या शब्दांत मांडतात, “आपण लोकांचा आवाज बनलो असू, तरच आपण पत्रकार आहोत.”

२०१९च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करताना, त्यांच्या या सर्वोच्च प्रतीच्या व्यावसायिक निष्ठेला, नैतिक मूल्यनिष्ठेला, सत्याच्या बाजूने उभे रहाण्याच्या त्यांच्या नैतिक धैर्याला, नीतीनिष्ठा आणि स्वतंत्र वृत्तीला, याशिवाय मूक अशा अन्यायग्रस्तांना एक स्पष्ट आणि आदरयुक्त आवाज देणे महत्त्वाचे आहे या त्यांच्या ठाम विश्वासाला, सत्ताधीशांपुढे संयतपणे पण धैर्यशौर्यशीलतेने सत्य मांडणारी पत्रकारिताच लोकशाहीची उदात्त ध्येये प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची असते या विश्वासालाच विश्वस्त मंडळाने पुरस्काररूपे मान्यता दिली आहे.

(मराठी अनुवाद – मुग्धा कर्णिक)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0