राशोमोन इफेक्ट आणि मीडिया ट्रायल

राशोमोन इफेक्ट आणि मीडिया ट्रायल

सर्वस्व खरे किंवा खोटं यात अनेक शक्यता दडलेल्या असतात. त्याच्याकडे सोयीने दुर्लक्ष करून एखाद्याला लक्ष्य केले जाते आणि त्या व्यक्तीच्या अब्रूची लक्तरे काढली जातात. सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्तीचे रोज होणारे हे वस्त्रहरण जणू आपण समाजसेवा करत आहोत. या थाटात केले जात आहे. हे एकतर्फी मीडिया रॅगिंग खूप भयावह झाले आहे.

वास्तव कधीच एका रेषेवरचं नसतं. वास्तवाला नेहमीच अनेक पदर असतात. एकाच गोष्टीकडे प्रत्येक जण आपल्या आकलन दृष्टीने बघत असतो. त्यामुळे वास्तवाबद्दलचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा एका स्वरूपाचा कधीही नसतो. त्यामुळे एखाद्या घटनेचे कथन करताना जे ‘घडले’ ते सांगण्याऐवजी जे त्यांना ‘भासले’ ते सत्य म्हणून सांगितले जाते. परिणामी एकाच घटनेबद्दल मतविभिन्नता समोर येते. त्यातून खरे काय? असा प्रश्न निर्माण होतो. हा सर्व चक्रावणारा नाविन्यपूर्ण खेळ अकिरा कुरोसावा यांनी ‘राशोमोन’ चित्रपटातून दिसतो.

एका जंगलात एका सामुराईचे प्रेत लाकूडतोड्याला दिसते. पोलीस तपासात जंगलात लपलेली त्याची बायको सापडते. ताजोमारु या कुख्यात डाकूने तिच्या नवऱ्याला कपटाने बंदी करून, तिच्यावर बलात्कार केला असतो. त्यानंतर जंगलात ‘काही तरी विशेष नाट्य’ घडलेले असते. त्या नाट्यानंतर सामुराई मृत्युमुखी पडलेला असतो. पुढे ताजोमारु तळ्याकाठी बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन, सुनावणी सुरू होते. त्यासाठी तीन लोकं कोर्टात घटनेबाबत साक्ष देण्यासाठी उपस्थित असतात. डाकू, पीडित स्त्री आणि प्रथम प्रेत बघितलेला लाकूडतोड्या. चित्रपटात मृत व्यक्तीच्या आत्म्याला तांत्रिक शक्तीच्या माध्यमातून बोलाविले जाते व तो देखील घडलेल्या प्रसंगबाबतची साक्ष देतो. आता एक घटना आणि त्या घटनेशी संबंधित असलेले तीनजण आणि साक्षीदार लाकूडतोड्या. या सर्वांच्या कथनात कमालीचा विरोधाभास आढळतो. त्या स्त्रीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेपर्यंत तिघांच्या निवेदनात सारखेपणा येतो. पण त्या नंतर जंगलात नेमकं काय घडलं? यावर तिघेजण वेगवेगळे ‘वास्तव’ सांगतात.

डाकू सांगतो की मला या स्त्रीचा मोह पडला आणि त्यामुळे तिच्या नवऱ्याला कपटाने बंदी बनवून मी हिच्यावर बलात्कार केला. मी परत जात असताना स्त्रीने तुम्ही दोघे द्वंद्व करा, जो जिंकेल त्याची बनून राहील. ते आव्हान मी स्वीकारले आणि त्या सामुराई योद्ध्याचा पराभव केला. व त्याला मारलं. या दरम्यान ही स्त्री जंगलात पळून गेली होती. तळ्याचे विषारी पाणी प्यायल्याने अलगद पोलिसांच्या तावडीत सापडलो.

स्त्री सांगते की या डाकूने माझ्यावर बलात्कार केल्यानंतर मी माझ्या नवऱ्याला बांधले त्या दोऱ्या माझ्या खंजीराने तोडून नवऱ्याला मुक्त केले पण माझ्या नवऱ्याने मला झिडकारले. डाकू सांगतोय तशी लढाई झालीच नाही. मी ताण आल्यामुळे बेशुद्ध झाले.

आत्मारूपी नवरा सांगतो की या डाकूने कपटाने मला बंदी बनवले. व माझ्या पत्नीचा उपभोग घेतला. तिलाही तो उपभोग हवासा वाटला. ती त्या डाकूवर लुब्ध झाली आणि त्याच्यासोबत राहायला राजी झाली होती. त्यासाठी तिने माझी हत्या करायला डाकूला सांगितले. डाकूला देखील तिचे हे वर्तन आवडले नाही. त्याने तिचा धिक्कार करत मला मोकळे केले. त्याक्षणी मी डाकूला माफ केले. अशा स्त्रीमुळे माझी इज्जत धुळीला मिळाली म्हणून मी बायकोचा खंजीर खुपसून आत्महत्या केली.

लाकूडतोड्या सांगतो, आपण फक्त प्रेत बघितले. तिथे खंजीर नव्हता. बाकी आपल्याला काही माहिती नाही.

प्रत्येक जण जे त्याच्या लेखी सत्य आहे ते सांगत असतो. ते सांगताना ठरवून खोटं बोलत नसले तरी अजाणतेपणी त्यात स्वार्थ मिसळला जाऊ शकतो.

जसं डाकूला जनमानसात असलेली दहशत कायम ठेवण्यात रस असू शकतो.

स्त्रीला समाजात राहायचे आहे म्हणून आपण परिस्थितीचे बळी आहोत हे दाखवून सहानभूती मिळवायची असेल.

मृत नवऱ्याला आपण आपल्या बायकोचे रक्षण करू शकलो नाही व योद्धा असून आपण हरलो, याच खापर स्त्रीच्या चारित्र्यावर फोडून आपलं प्रतिमा स्वच्छ ठेवायची असेल.

लाकूडतोड्याला पोलिसांच्या भानगडीत पडायचे नसते. त्याने तो खंजीर घेतला असल्याने, चौकशीत ते समोर आले तर.. हे टाळण्यासाठी तो आवश्यक तेव्हढंच सांगत असेल.

यातून मानवी स्वभावाचे पैलू, हेतू आणि त्यामागील त्याची मानसिकता, मानवी मर्यादा याचे विस्मयकारी दर्शन होते. मल्टिपल पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ही घटना सांगितली जाते. प्रत्येक जण आपले म्हणणे सत्य आहे, असे ठामपणे सांगत असतो. आपल्यालाही सकृतदर्शनी प्रत्येकाचे वर्णन ऐकतांना खरे वाटावे असेच आहे.

दाखवलेल्या वेगवेगळ्या शक्यतेतून जाणवते की प्रत्येकासाठी सत्य वेगळे आहे. कारण मानवाच्या बुद्धीवर असलेला जाणिवांचा प्रभाव, वैचारिक समज, सामाजिक पगडा, त्यावेळेची शारीरिक- मानसिक स्थिती या सर्व घटकांचा आकलनशक्तीवर परिणाम होत असतो. आणि वास्तव समजून घ्यायला मर्यादा निर्माण येऊ शकतात. एकाच जागी उपस्थित लोकांच्या वेगवेगळ्या बाजू असूनसुद्धा त्या सत्य असण्याची समान शक्यता असते. घटना घडून गेल्यावर स्मृतीच्या आधारे ज्या स्वरूपात आठवेल तसे कथन केले जाते. घडलेला प्रसंग जश्याच्या तसा, बारीकसारीक तपशिलाने सांगणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे एकाच प्रसंगाचे वर्णन उपस्थित लोक करतात तेव्हा जो विरोधाभास जाणवतो त्याला ‘राशोमोन इफेक्ट’ म्हणतात.

सध्या सुशांतसिंग मृत्यू प्रकरणी असाच रोशोमोन इफेक्टचा अनुभव आपण घेत आहोत. नेमकं काय घडलं? याबद्दलचे उलटसुलट बातम्या येत असतात. या राशोमोन इफेक्टमुळे वेगवेगळे मतप्रवाह लोकांच्यात आहे. याचा फायदा चॅनलवाले, राजकारणी घेत आहे. त्याला कारण या आणि या सारख्या प्रकरणाबाबत लोकांच्या मनात असलेलं कमालीचे औत्सुक्य. राशोमोन इफेक्टचा आधार घेऊन लक्षात येते की प्रत्येकाची एक बाजू आहे. प्रत्येक बाजूतील सत्य परिस्थितीला समान संधी आहे तर मग निष्कर्ष काढायची इतकी घाई का? सर्वस्व खरे किंवा खोटं यात अनेक शक्यता दडलेल्या आहेत. त्याच्याकडे सोयीने दुर्लक्ष करून एखाद्याला लक्ष्य केले जाते आणि त्या व्यक्तीच्या अब्रूची लक्तरे काढली जात आहे. रोज होणारे हे वस्त्रहरण जणू आपण समाजसेवा करत आहोत. या थाटात केले जात आहे. हे एकतर्फी मीडिया रॅगिंग खूप भयावह झाले आहे.

फार पूर्वी पश्चिम आफ्रिकेत आरोपी शोधण्यासाठी गंमतीदार खेळ खेळला जायचा. सगळ्या संशयितांना एका रांगेत उभे केले जायचे. एका पक्षाचे अंडे भराभर एकाकडून दुसऱ्याकडे पास करायला सांगायचे. जो माणूस खोटं बोलत असेल तो अपराधी भावनेने किंवा पकडले जाऊ या भीतीने कापत असेल तर मग त्याच्या हातून ते अंड फुटेल आणि तो पकडला जाईल. अशी त्यामागची सुपीक कल्पना होती. ‘मीडिया ट्रायल’ नामक प्रकार असाच आहे.

अगदी उद्या उठून सर्व गोष्टीचा उलगडा झाला तरी या सर्व प्रकारचे किती गंभीर, सखोल परिणाम सर्व संबंधित लोकांच्या जीवनावर आणि समाजमनावर होणार आहेत, याचे जराही भान उरलेले नाहीये.

अशीच एक घटना १९६९ मध्ये घडली होती. सुप्रसिद्ध डायरेक्टर रोमन पोलन्स्कीच्या बाबत. तो लंडन येथे आपल्या नव्या चित्रपटाच्या पटकथेवर काम करत होता. त्याचे काम वेळेत न संपल्यामुळे, त्याची आठ महिन्याची गरोदर पत्नी शारोन लॉस एंजेलीस येथील घरी निघून आली. तिथे तिची व तिच्या मित्रमंडळींची घरात शिरून कोणीतरी निर्घृण हत्या केली. हे वृत्त ऐकताच रोमन वेडापिसा झाला. पुढे कित्येक दिवस तो भ्रमिष्ट अवस्थेत होता. आपल्या लाडक्या गरोदर पत्नीच्या मृत्यूच्या दुःखाने जितका रोमन कोलमडला त्याहून जास्त तो अफवांनी, वावड्यांनी कोलमडून गेला. शारोनची हत्या रोमनने घडवून आणली. असा परस्पर ‘निकाल’ अनेकांनी देऊन टाकला. पोलिसांच्या संशयितांमध्ये रोमन हा अग्रस्थानी होता. पण त्याखेरीज अजून विचित्र अफवा पसरवल्या जात होत्या की शारोन आणि रोमन मादक द्रव्यांचे अतिसेवन करीत असे. त्यांची काळ्या जादूवाल्या आफ्रिकन जादूगारांशी जवळीक होती. रोमन आपल्या घरी जादूटोण्यांचे विधी करत असे. (साम्य धक्कादायक आहे ना!) त्या सर्व प्रकारामुळे शारोनची हत्या झाली. अशा अतिशय खालच्या दर्जाच्या चर्चा सर्वत्र सुरू होत्या. इतकंच नाही तर फारसा संबंध नसलेल्या लोकांनी आपण शारोनच्या जवळचे लोकं आहोत असे भासवून कित्येक वृत्तपत्रांना मनाला येईल ते सांगून मुलाखती दिल्या.

‘टाइम’ सारखे नियतकालिक या चारित्र्यहननामध्ये मागे नव्हते. पुढे अमेरिकेतील कुप्रसिद्ध मँशन गँगकडून शारोनची हत्या घडली हे सिद्ध झाले. तेव्हा रोमन म्हणाला होता की “हत्या कशी झाली, हे लोक विसरतील पण अफवा मात्र कायम स्मरणात राहतील”.

रोमन पोलन्सिकीचे हे वाक्य अगदी खरं आणि अंगावर काटा आणणारे आहे.

एकंदरीत दुसऱ्याच्या जीवनात डोकवण्याची फाजिल उत्सुकता या मनोवृत्तीला कारणीभूत आहे. दुसऱ्याच्या भानगडीतून, प्रकरणातून एक छुपा विकृत आनंद बऱ्याच लोकांना मिळतो. मध्यमवर्गीय माणसाच्या अंत:करणाला व्यापून राहिलेली निराशा, अपयश, भयाण एकाकीपण, दांभिकता यातून दुसऱ्याच्या जगण्याचा सन्मान न करण्याची मनोवृत्ती तयार होते. जे जगणे आपल्याला शक्य नसते, अशा जगण्यातील उणी, कमकुवत बाजू अधोरेखित करून, त्यापुढे आपल्या ‘सुसंस्कृत’ जीवनाची मोठी रेष ओढली जाते. आपली असूया, ईर्षा त्या रेषेमागे लपविण्याचा खेळ मोठ्या हुशारीने खेळला जातो. नैतिकतेचे प्रगती पुस्तक मिरवले जाते. दुसऱ्याच्या चारित्र्यावर नकळत बोट ठेवल्यासारखं करून आपल्या ‘चरित्रसंपन्न’ जगण्याची आरती ओवाळून घेतली जाते.

 

‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे नाटक एका प्रकारे राशोमोन इफेक्ट आणि मीडिया ट्रायल या दोघाच्यांत मोडणारे. यात अशाच मानवी मनाच्या अंतस्थ हेतूंचा शोध आणि बोध घेतला गेला आहे. हे केवळ नाटक उरत नाही, त्यातील वास्तवितेची धग या घडीला देखील प्रकर्षाने जाणवत आहे.

‘लीला बेणारे’च्या मोकळ्या, बिनधास्त आयुष्याबद्दल खरं तर पुरुष वर्गालाही हेवा वाटत असतो. तिच्या आयुष्यात खेळाद्वारे घुसखोरी करत बेणारे बाईच्या आयुष्याचा ताबा समाजाचे संस्कृतिरक्षक घेतात. हे प्रतिष्ठित कावळे लुटूपटूच्या अभिरुप खटल्याचा आधार घेत (सध्या न्यूजच्या नावाखाली) सुरू झालेल्या खेळातून तिचे लचके तोडतात. समाजाची क्रूरता आणि असंवेदनशीचे खरे रूप समोर येते.

बेणारेकडे एक वस्तू ( सध्या बातमी) म्हणून बघणारा समाज तिच्या स्त्रीत्वावर घाला घालून, तिला जेरबंद करतो. सर्व पात्र तिचे मानसिक खच्चीकरण करण्याची चुरस करतांना दिसतात. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि त्यांच्या मनातील कौर्य याचे प्रत्यकारी दर्शन घडते. एक जुनी म्हण आहे. ‘जर पुरुष कुमार्गाला लागला तर वाईट ठरतो. परंतु एखादी स्त्री जरा चुकली तर ती छचोर समजली जाते.’ एकूणच स्त्रियांबद्दल, त्याच्या खाजगी जीवनाबद्दलची चर्चा चघळत बसण्यात दांभिक लोकांना मज्जा येते. बातमी, चर्चाद्वारे चघळण्याचे हे हाडुक सुशोभित ट्रे मधून पेश केलं जातं. लाळघोट्या लोकांसाठी ती मोठी मेजवानी असते.

बेणारे बाईंना हे ठाऊक आहे की माणसे फार क्रूर होऊ शकतात. पण ते कोणत्या कारणाने होतात, हे तिला उमजले नव्हते.

‘बेणारेबाई’ ही व्यक्तिरेखा समाज कायम जिवंत ठेवेल. आणि न्यायाधीशाच्या खुर्चीवर समाज विराजमान आहेच..

 

‘कोर्ट’ सिनेमाच्या शेवटी न्यायाधीश आपल्या डुलक्यामध्ये व्यत्यय आला म्हणून आततायीपणाने मूकबधीर मुलाच्या थोबाडीत मारतो तेव्हा ती थोबाडीत आपल्याला बसल्याचा प्रत्यय किती जणांना आला? कित्ती लोकांचे हात स्वतःच्या हुळहुळणाऱ्या गालाकडे गेले?

प्रश्न संवेदनशीलतेचा आहे!

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS