मिठाचा खडा !

मिठाचा खडा !

सत्ताधारी भाजप व संघ परिवाराकडून १४ ऑगस्ट हा ‘विभाजन विभीषिका दिवस’ (फाळणी स्मृती दिवस) म्हणून शासकीय पातळीवरून साजरा आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी शाळा-शाळांमध्ये फाळणीसंबंधी पुस्तकांमधील उतारे आपल्या विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखविण्याचे फर्मान शिक्षण संस्थांना देण्यात आले आहे. वरवर पाहता विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्याचा हा शहाजोग प्रयत्न वाटला तरी प्रत्यक्षात संघ परिवाराने स्वातंत्र्याच्या निर्भेळ आनंदात मिठाचा खडा टाकला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा खरे म्हणजे देशातील सर्व नागरिकांनी मिळून साजरा करण्याचा प्रसंग आहे. म्हणून आपण इतरांपेक्षा वेगळे, श्रेष्ठ व उच्चतम नैतिक आदर्शाचे वारसदार आहोत असा भ्रम बाळगणाऱ्या संघ परिवाराच्या दृष्टीने मात्र नेहमीप्रमाणे त्यांचं वेगळे अस्तित्व दाखविण्याची आणखी एक संधी ठरते आहे. म्हणूनच १५ ऑगस्ट या ७५व्या स्वातंत्र्य दिनाबरोबरच विभाजन विभीषिका दिवस’ (फाळणी स्मृती दिवस) साजरा करण्याचे शासकीय पातळीवरून आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी शाळा-शाळांमध्ये फाळणीसंबंधी पुस्तकांमधील उतारे आपल्या विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखविण्याचे फर्मान शिक्षण संस्थांना देण्यात आले आहे. वरवर पाहता विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जाणीव निर्माण करण्याचा हा शहाजोग प्रयत्न वाटला तरी प्रत्यक्षात संघ परिवाराने स्वातंत्र्याच्या निर्भेळ आनंदात मिठाचा खडा टाकला आहे.

दीर्घकाळ चाललेला भारतीय स्वातंत्र्याचा लढा व अनुषंगिक घटनांचा इतिहास अनेकजणांनी लिहून ठेवला आहे. आशिया व आफ्रिकेतील अनेक देशांना मार्गदर्शन करणारा हा लढा ठरल्याचे त्या त्या देशातील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी मान्य केले आहे. अशा या प्रदीर्घ इतिहासात १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काडीचाही सहभाग नव्हता. उलट या लढ्याला अपशकून करण्याचे व त्याचा शक्तिपात करण्याचे अथक प्रयत्न संघाने केले. हल्लीहल्ली आमचाही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता’, असे खोटे दावे करण्याचा प्रयत्न संघ करीत असतो. त्या दाव्यांना स्वातंत्र्याबद्दलच्या लिखित इतिहासात कुठलाही पुरावा सापडत नाही. तरीही पिढ्यान्पिढ्या असे पोकळ दावे संघाच्या सरसंघचालकापासून ते गल्लीतल्या स्वयंसेवकापर्यंत सर्वांकडून केले जातात. तो वेगळ्या लेखाचा विषय आहे.

१९४२ च्या निर्णायक स्वातंत्र्य लढ्यानंतर स्वातंत्र्यासाठीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. वाटाघाटीच्या ओघात महंमद अली जीना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या हटवादीपणामुळे देशाच्या फाळणीची मागणी देखील विषय पत्रिकेवर आली. गांधीजींसह सर्व काँग्रेस नेत्यांचा या फाळणीला विरोध होता. त्यांनी त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. तथापि, काय वाटेल ते झाले तरी लॉर्ड माऊंटबॅटन यांना लवकरात लवकर या देशातला आपला गाशा गुंडाळण्याची घाई झाली होती. देशात त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष होता. तथापि, काँग्रेसचे हे महत्व कमी करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी इतरही अनेकांना वाटाघाटींमध्ये सामील करून घेतले. प्रत्येकाच्या आपआपल्या हितसंबंधांच्या आग्रहामुळे या वाटाघाटींचे गुऱ्हाळ चालू राहिले. जीनांच्या हट्टी व दुराग्रही राजकारणावर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या भारतीय स्वातंत्र्यावरील India Divided या ग्रंथात या विषयीचे विस्तृत विवेचन आहे.

सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत अशी सैद्धांतिक भूमिका घेतली. सावरकरांनी तर हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत’. असे स्पष्ट प्रितपादन केले होते. आज फाळणीच्या नावाने गळे काढणाऱ्यांनी ती टाळण्यासाठी आपण काय केले? या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. रा. स्व. संघ किंवा हिंदू महासभेच्या नेत्यांनी फाळणीसह स्वातंत्र्य निरर्थक आहे असे म्हणून फाळणीला विरोध होता का? किमानपक्षी फाळणी टाळण्याच्या आपल्या मागणीसाठी एखादा तरी मोर्चा, निदर्शन, निवेदन, धरणे असे काही केले होते का? पण यांपैकी कुठल्याही प्रश्नांचे उत्तर त्यांना देता येणार नाही. कारण इतिहास त्यांच्या बाजूचा नाही. दिल्ली आणि आसपासच्या भागात संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले सदानंद सप्रे यांनी लिहिलेले परम वैभव के पथ परया नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, दिल्ली आणि आसपासच्या भागात आम्ही मुस्लिम वस्त्यांमध्ये मुस्लिम पेहरावात जाऊन हिंदूविरोधी भावना भडकवणारी भाषणे करीत होतो व हिंदू वस्त्यांमध्ये हिंदू पोशाखात जाऊन मुस्लिमविरोधी भावना भडकवणारी भाषणे करीत होतो. अशा तऱ्हेने स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला फाळणी पक्की करणारे, दंगली पेटवणारी भाषणे करणाऱ्यांचे आजचे वारसदार फाळणीच्या नावाने गळा काढीत आहेत.

हा वरवर विरोधाभास दिसत असला तरी प्रत्यक्षात त्यांना त्यानिमित्ताने स्वातंत्र्याचे निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या व तो लढा यशस्वी करून दाखविणाऱ्या महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, मौलाना आझाद व काँग्रेस यांच्याविषयीची आपली मळमळ बाहेर काढायची आहे. या फाळणीचा सर्वस्वी दोष काँग्रेस व गांधी-नेहरूंचा आहे असा खोटा प्रचार संघ परिवार पिढ्यान्पिढ्या करीत आला आहे. तोच त्यांना या निमित्ताने पुन्हा एकदा करायचा आहे. म्हणूनच वर स्वातंत्र्याच्या निर्भेळ आनंदात संघाला मिठाचा खडा टाकायचा आहे असे म्हटले आहे.

फाळणीची मागणी जीना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने केली असली तरी ती काही भारतातील मुस्लिम नागरिकांची एकमुखी मागणी नव्हती. उलट खेड्यापाड्यातले अनेक मुस्लिम नागरिक गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते याची अनेक उदाहरणे देता येतील. म्हणूनच तर मुसलमानांसाठी पाकिस्तान हा वेगळा देश निर्माण झाला तरी सुद्धा देशातील जवळजवळ दोन तृतीयांश मुस्लिम नागरिकांनी भारतातच राहणे पसंत केले. एवढेच नव्हे तर सैन्य दले, शैक्षणिक क्षेत्र, संगीत व कला क्षेत्र यांसारख्या राष्ट्र उभारणीच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मुस्लिमांचे योगदान हिंदूंच्या बरोबरीचेच आहे.

भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वडील अखंड भारताच्या शासकीय सेवेत राजनैतिक मुत्सद्दी म्हणून कार्यरत होते. फाळणीनंतर स्वतः जीनांनी त्यांना पाकिस्तानात यायचे निमंत्रण दिले. पण त्या देशभक्त माणसाने जीनांना स्पष्ट शब्दांत नकार देऊन मायदेशातच राहणे पसंत केले अशी अनेक उदाहरणे देता येतील.

तरी सुद्धा आपल्या जन्मजात मुस्लिम द्वेषाने आंधळे झालेल्या संघ परिवाराला अजूनही मुस्लिमांचे अस्तित्व डोळ्यात खुपते आहे.

(लेखाचे छायाचित्र प्रतिकात्मक स्वरूपाचे.)

COMMENTS