‘येस बँके’चे असे कसे झाले?

‘येस बँके’चे असे कसे झाले?

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने देशातील एक बडी खासगी बँक ‘येस बँक’वर निर्बंध आणून खातेदारांना फक्त ५० हजार रु.ची रक्कम काढण्यास परवानगी

पिगॅसस हेरगिरी : अॅपलकडून एनएसओवर खटला
गलवान खोऱ्यात चीनचे मोठ्या प्रमाणात तळ
चीनच्या विरोधात हाँग काँगमध्ये निदर्शक पुन्हा रस्त्यावर

नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने देशातील एक बडी खासगी बँक ‘येस बँक’वर निर्बंध आणून खातेदारांना फक्त ५० हजार रु.ची रक्कम काढण्यास परवानगी दिली.

रिझर्व्ह बँकेच्या या आदेशामुळे गुरुवारी रात्रीपासून, शुक्रवारी दिवसभर ‘येस बँक’ खातेदारांमध्ये संतापाबरोबर निराशेचे वातावरण पसरलेले दिसले. शेकडो खातेधारक बँकेच्या शाखेबाहेर आपली साठवलेली पुंजी काढण्यासाठी जमा झाले होते. प्रत्येक खातेदाराच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. छोटे दुकानदार, उद्योजक, पेन्शनधारक खातेदार बँकेच्या व्यवस्थापनाला लाखोली वाहताना दिसत होते.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेऊन ‘येस बँक’ खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. खातेदारांना पैसे देण्याइतपत बँकेची आर्थिक क्षमता आहे, पैसे सुरक्षित आहेत, असा दिलासा दिला. तर रिझर्व्ह बँकेने ‘येस बँक’ची पुनर्रचना करण्याची घोषणाही केली. सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘येस बँक’ खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. एसबीआय ‘येस बँक’त पुढच्या तीन वर्षांपर्यंत ४९ टक्के आपली गुंतवणूक ठेवू शकते. तर २६ टक्क्यांहून कमी गुंतवणूक करता येणार नाही. ‘येस बँके’चे नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर एसबीआय ती बँक ताब्यात घेईल, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

रिझर्व्ह बँक काय म्हणतेय?

‘येस बँक’वर निर्बंध घालताना रिझर्व्ह बँकेने या बँकेच्या आर्थिक प्रकृतीबद्दल आपले मत व्यक्त केले. त्यात असे म्हटलेय की, गेले अनेक दिवस, महिने भांडवलनिर्मिती करू न शकल्याने व कर्जाचे ओझे वाढत गेल्याने बँकेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली. त्याचबरोबर बँकेच्या एकूण व्यवस्थापनात गंभीर अशा त्रुटी दिसून येत होत्या. त्यामुळे ही बँक आस्तेआस्ते धोक्यात येत होती व ती ढासळत चालली होती.

सध्या रिझर्व्ह बँकेने येस बँकेतील खातेदारांना त्यांच्या खात्यातून ५० हजार रु.ची रक्कम काढून घेण्यास परवानगी दिली आहे. ही कालमर्यादा ३ एप्रिल २०२० पर्यंत आहे. पण वैद्यकीय गरज, लग्न वा शिक्षणासाठी पैसे लागल्यास तशी माहिती बँकेला देणे गरजेचे आहे. बँकेला ते पटल्यास खातेदारांना त्यांना हवी तेवढी रक्कम मिळणार आहे.

येस बँकेवर अशी परिस्थिती का ओढावली?

गेली काही वर्षे मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकी व भांडवली गुंतवणुकीत अपयश येत असल्याने या बँकेची प्रकृती खराबच होती. २०१९या आर्थिक वर्षांत येस बँकेची कर्ज थकबाकी ही ९७८ कोटी रु. तर बुडीत कर्जाची रक्कम ही ३,२७७ कोटी रु. इतके होती. तर २०२०च्या आगामी दुसऱ्या तिमाहीत ‘कोर कॅपिटल रेशो’ जो रिझर्व्ह बँकेच्या दृष्टीने ८ टक्के असायला हवा होता तो ‘कोर कॅपिटल रेशो’ थकीत कर्जबाकी वाढल्यास ८.७ टक्क्यावर पोहोचणार होता. ही भीती रिझर्व्ह बँकेला होती.

येस बँकेचे सप्टेंबर २०१९मध्ये एकूण थकबाकीचे गुणोत्तर ७.३९ टक्के होते. त्यामुळे भांडवल गोळा करू न शकल्याने बँकेची परिस्थिती ढासळणार होती.

या बँकेचे व्यवस्थापनही अत्यंत ढिसाळपणाचे होते. २०१८मध्ये रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे मुख्य राणा कपूर यांना योग्य कर्ज व्यवस्थापन करण्यास अपयश आल्याने त्यांना मुदतवाढ देण्यास नकार दिला होता व तसा ठपकाही ठेवला होता. राणा कपूर यांच्या जागी आलेले नवे अध्यक्ष रावनीत गील यांनी बँक व्यवस्थापनात सुधारणा आणण्याचे वर्षभर प्रयत्न केले पण त्यांनाही त्यात यश आले नाही.

येस बँक भांडवल उभी करू शकली नाही

बँकेवर बुडीत कर्जे व थकीत बाकी असल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मितीची टांगती तलवार होती. त्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरू होते. ऑगस्ट २०१९मध्ये काही गुंतवणुकदारांच्या माध्यमातून बँकेने १,९३०.४६ कोटी रु.चे भांडवल उभे केले पण ते बँकेची एकूण गरज पाहता कमीच होते. त्यानंतर बँकेला सावरण्यासाठी कोणीही गुंतवणूकदार पुढे आला नाही. जे काही गुंतवणूकदार आले होते त्यांची बाजारातील पत योग्य नव्हती व त्यांना नियम वाकवून प्रवेश देता आला नसता.

येस बँकेच्या व्यवस्थापनाने आम्ही गुंतवणूकदार शोधत आहोत, त्यात यश येईल, गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू आहे, असे रिझर्व्ह बँकेला सांगितले होते. काही प्रायव्हेट इक्विटी फर्म्सशी त्यांची बोलणीही सुरू होती. १२ फेब्रुवारी २०२०पर्यंत प्रयत्नांना यश येईल असेही बोलले जात होते. काही गुंतवणुकदारांनी रिझर्व्ह बँकेशी चर्चा केली होती पण त्यातून तोडगा निघाला नाही, असे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे.

येस बँक सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने त्या बँकेला पर्याप्त वेळ, संधी दिली होती. बँकेला काही योजना आखायच्या होत्या, त्यासाठीही वेळ दिला होता पण प्रत्यक्षात काहीच घडू शकले नाही व बँकेची परिस्थिती अधिक बिघडत गेली असे रिझर्व्ह बँक म्हणते.

खातेदारांचे पैसे सुरक्षित राहतील का?

पैसे सुरक्षित राहतील कारण या बँकेने खातेदारांना आपण पैसे देऊ शकत नाही असे अजून तरी म्हटलेले नाही. रिझर्व्ह बँकेनीही खातेदारांना आश्वस्त केले आहे, त्यांचे पैसे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुणी घाबरून जायचे कारण नाही असेही सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने एक मंडळही तयार करून खातेदारांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी पावले उचलण्यास सांगितले आहे. सध्या ५० हजार रु.ची रक्कम काढण्यास खातेदारांना परवानगी दिल्याने येस बँक कोणतीही चालढकल करताना दिसत नाही, असे म्हणण्यास जागा आहे.

यातील कळीचा व महत्त्वाचा मुद्दा पुढे काय होणार? येस बँक कोणी विकत घेईल का? बँकेकडे पर्याप्त भांडवल जमा होईल का?

अर्थमंत्र्यांनी एसबीआय येस बँक खरेदी करू शकते असे म्हटले आहे. एलआयसीही असल्याची चर्चा आहे. या दोघांच्या प्रयत्नातून ४९ टक्के समभाग एसबीआय व एलआयसी घेऊ शकते. त्यामुळे सध्या बुडण्याच्या अवस्थेतील हे जहाज काही काळ गटांगळ्या खाईल. त्यानंतर कोणी खासगी गुंतवणुकदार पुढे आल्यास बँक तरूनही जाईल. रिझर्व्ह बँकेने येस बँकेला सावरण्यासाठी सर्व पर्यायही खुले ठेवले आहेत हेही महत्त्वाचे आहे.

एकूणात केवळ येस बँकच नव्हे तर देशातील सर्व बँकांच्या खातेदारांमध्ये बँकिंग व्यवस्थेविषयी वाटणारी चिंता दूर करण्यासाठी सरकार व रिझर्व्ह बँकेने तत्पर पावले उचलली पाहिजेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: