समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.
मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला. या माफियाशी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे संबंध आहेत, असा आरोप मलिक यांनी केला.
मलिक म्हणाले, “ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. कोविड प्रोटोकॉल सुरू असूनही पार्टीसाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती, पोलिसांना या पार्टीची माहिती देण्यात आली नव्हती. गृहविभागालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. या पार्टीत काही लोकांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांचे फोटो देऊन त्यांना अडकवण्यात आले.” मलिक म्हणाले, “माझ्या माहितीनुसार, त्या पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफिया उपस्थित होता. त्याच्यासोबत त्याची बंदुकधारी प्रेयसीही होती. जो तिथे नाचत असल्याचे दिसत आहे. तो दाढीवाला कोण आहे, हे एनसीबीच्या सर्व लोकांना माहित आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, हा दाढीवाला काही काळ तिहार कारागृहात होता, राजस्थानच्या कारागृहातही होता. याची मैत्री वानखेडेंसोबतही आहे. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितले, की गोव्यात त्याचे मोठे रॅकेट आहे.”
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नवाब मलिक यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याची मालिका सुरू केली आहे. ते दररोज नवे आरोप करीत असून, कागदपत्रे सादर करीत आहेत.
आज पत्रकार परिषदेत बोलताना मलिक यांनी वानखेडे, के.पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या फोन कॉल (सीडीआर) तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असे मलिक म्हणाले.
मलिक पुढे म्हणाले, “क्रूझवरचं सीसीटीव्ही फुटेज तपासावे. प्रत्येक खोलीतले फुटेज तपासवे. डान्सचे फुटेजही पाहावे.”
‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अजून काही लोक फोन टॅपींग करत असून, त्यांनी खोटा जन्म दाखला वापरुन भारतीय महसूल सेवेमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी काल केला होता.
COMMENTS