मंदीर, मस्जिद, चर्च आणि कोरोना

मंदीर, मस्जिद, चर्च आणि कोरोना

भारतातील काही माध्यमाद्वारे १३ मार्चला दिल्लीमध्ये तब्लीगींचं जमणं आणि मुस्लीम धर्मियांनी कोरोना आणल्यासारख्या बातम्या अजूनही दिल्या जात आहेत. तसेच के

आमार कोलकाता – भाग ८ :भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर
आमार कोलकाता – भाग ७ – कोलकात्यातील चीनी
दोन पोप: त्यांच्यातले संघर्ष आणि संवाद

भारतातील काही माध्यमाद्वारे १३ मार्चला दिल्लीमध्ये तब्लीगींचं जमणं आणि मुस्लीम धर्मियांनी कोरोना आणल्यासारख्या बातम्या अजूनही दिल्या जात आहेत. तसेच केवळ इस्लामी धर्मस्थळावर कोरोनाची लागण झाल्याचं वारंवार अधोरिखेत केलं जातंय. १३ मार्चला दिल्लीमध्ये तब्लीगींची जमात सुरु होती आणि त्यामुळे भारतामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, असे केंद्र सरकारही या ना त्या प्रकारे सांगत आहे. पण त्याही पूर्वी लंडनमध्ये काय सुरु होते?

६ मार्चला लंडंनजवळ्च्या वॉटफर्ड शहरातील भक्तीवेदांत मंदीरात जमलेल्या लोकांमधूनही कोरोना पसरला. हे मंदीर ‘वॉटफर्ड’मध्ये आहे. वॉटफर्ड शहरात अॅल्डेनहॅम नावाचा एक भाग आहे. याठिकाणी १८ व्या शतकातले मॉक-ट्युडर मॅन्शन आहे. ‘बीटल’चे गिटारिस्ट जॉर्ज हॅरीसन यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्रिष्णा कॉन्शसनेस (ISKCON)ला ही जागा दान दिली आणि त्यातून हे मनोर अर्थात मंदीर उभे राहिले आहे. इथेच जमलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांपैकी अनेकजण कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते. या कार्यक्रमामुळे कोरोनाच्या प्रार्दुभावाचा धोका वाढला.

१२ मार्चला ‘इस्कॉन’च्याच एका सभासदाच्या अंत्यविधीसाठी ‘इस्कॉन’चे एक हजार भक्त जमले होते. त्यातूनही सुमारे एकवीस जणांना कोरोनाची लागण झाली आणि त्यातील पाच जणांचा आठ एप्रिल रोजी मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी रामेश्वर दास हे भक्ती चारु स्वामी यांचे शिष्य होते. ‘इस्कॉन’च्या कार्यकारणीचे अध्यक्ष प्रघोसा दास यांनी, हे कार्यक्रम देशात लॉकडॉउन सुरु होण्यापूर्वी झाल्याचे आणि १६ मार्चपासून लंडनमधील सर्व मंदिरे बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र तोपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झालेली होती.

त्याही पूर्वी म्हणजे ११-१२ फेब्रुवारीला दक्षिण कोरियामध्येही असेच काही घडत होते. दक्षिण कोरियामध्ये जानेवारीपासूनच कोरोनाचे रुग्ण दिसू लागले होते. त्यामुळे कोरियाने लगेच लोकांच्या टेस्ट्स सुरु केल्या होत्या. एका साठीतील स्त्रीला काही लक्षणे दिसत होती. या स्त्रीला आता रुग्ण क्रमांक ३१ असे म्हंटले जाते. तिला विलगीकरण करून राहायला सांगितले होते. पण ती एका चर्चच्या प्राथना सभेला उपस्थित राहिली.

दक्षिण कोरियातील देगू शहरात शिंनचोगंजी नावाचे चर्च आहे. आत्ता ८८ वर्षाचे असलेले ‘ली मान ही’, यांनी १९८४ मध्ये हे चर्च स्थापन केले. ते स्वतःला येशूचा अवतार मानतात. आणि मसीहा म्हणवून घेत्तात. ते म्हणतात की मी माझ्याबरोबर किमान १ लाख लोकांना स्वर्गात नेणार आहे. या चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थना सभा असतात. या प्रार्थना सभांमध्ये सभासद एकामेकांच्या एकदम जवळ बसतात आणि मोठ्यांदा प्रार्थना म्हणतात. चर्चच्या नियमानुसार हे करत असताना डोळ्यांवर चष्मा चढवण्याची किंवा तोंडाला मास्क बांधण्याची परवानगी नाही. गळ्यात माळ घालणे किंवा दागिने घालण्यावरही बंदी आहे. लोक आजारी असतील तरीही प्रार्थना सभांना उपस्थित राहतात. प्रार्थना झाली की बायबलच्या अभ्यासासाठी गटागटांमध्ये लोकांची विभगणी होते. बरेचदा प्रार्थनेनंतर सभासद धर्मप्रचारासाठी रस्त्यावर येतात.

या पंथातील लोकांमध्ये आपल्या सभासदत्वाविषयी आणि प्रार्थनासभांविषयी गुप्तता बाळ्गण्याची प्रथा आहे. जपान आणि चीनमध्ये सुध्दा या पंथाचे लोक सापडतात. गेल्यावर्षीच चीनच्या वूहान प्रांतामध्ये या चर्चची एक शाखा उघडण्यात आली होती. आता चर्चच्या वेबसाईटवरून याची माहिती काढून टाकण्यात आली आहे. कोरियातील इतर अनेक चर्चच्या मते हा पंथ ‘कल्ट’ आहे.

या चर्चच्या प्रार्थनासभांना ‘त्या’ ३१ क्रमाकाच्या रुग्ण स्त्रीने दोन रविवारी हजेरी लावली होती. त्यामुळे चर्चच्या अनेक सभासदांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती, मात्र कोरोनाविषयीदेखील गोपनियता बाळ्गण्याचे संकेत चर्चकडून दिले गेले. त्यामुळे बऱ्याच सभासदांनी लक्षणे दिसूनही गुप्तता बाळगली. ‘देगू’ शहरामध्ये अशा होणार्‍या प्रार्थनांतून त्यातील काही सभासदांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आणि ‘देगु’ शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकदम वाढली.

‘ली मान ही’, यांचे ‘देगु’ शहराजवळच ‘चेओंगडो’ या गावी जन्मस्थान आहे. येथेही चर्चचे सभासद स्वयंसेवी काम करण्यासाठी जातात. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ‘ली मान’ यांच्या भावाचे निधन झाले. तेंव्हा त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी चर्चच्या अनेक सभासदांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये त्या महिलेनेही त्या गावाला भेट दिली होती आणि सार्वजनिक स्नानगृहाचा वापर केला होता. त्या गावातील रुग्णालयात असणारे १०८ पेशंट, डॉक्टर आणि नर्सला कोरोना झाला.

मलेशियामध्येही अशीच एक घटना घडली. मलेशियात कुलालंपुरच्या जवळच ‘श्री पेटलिंग’ नावाचा भाग आहे. तिथे एक ‘जमेक’ नावची मशीद आहे. अतिशय जुनी असणारी ही मशीद अचानकपणे चर्चेत आली आणि दक्षिण पूर्व आशियातील कोरोना संक्रमणाचे केंद्र बनली. या ‘जमेक’ मशिदीत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे, २७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान एका धार्मिक कार्यक्रमासाठी सुमारे सोळा हजार भाविक जमले होते. मुस्लीम धर्मातील ‘तब्लीग’ या पंथाचा हा धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अनेक लोक सिंगापूर, सुरीनाम, कंबोडिया, बृनोई, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाइन्स व्हियेतनाम या आशियायी आणि इतर अशा ३० देशांतील भाविक लोक आले होते. यामध्ये भारतातील लोकांचाही समावेश होता. या ठिकाणी एकत्रित जेवणावळी झाल्या. मशिदीच्या बाहेर तंबूमध्ये लोक एकत्र राहिले. काही ठिकाणी लोकांनी एकत्रितपणे प्रवास केला. मलेशियातील सहाशे तीस लोकांना या संपर्कातून कोरोनाची लागण झाली.

याचवेळी मलेशियामध्ये राजकीय सत्तांतर होत होते. मलेशियातील वृध्द नेते महाथीर मोहम्मद यांनी राजीनामा दिला होता आणि नवे पंतप्रधान मुहायीद्दिन यासीन यांनी १ मार्चला शपथ घेतली. नव्या सरकारने १३ मार्चला मोठ्या समारंभांवर बंदी घातली. तो पर्यंत देशाच्या आरोग्य विभागाने केवळ काही सुचना केल्या होत्या. नंतर मलेशियाने देशाच्या सीमा बंद केल्या, पण तो पर्यंत या कार्यक्रमातून कोरोना ब्रुनेई (७३ केसेस) आणि थायलंडमध्ये (१० केसेस) पोहोचला होता. इतर अनेक देशांमध्ये या कार्यक्रमातून कोरोना पोहोचला. भारतामध्येही मरकज येथील जमातमध्ये याच कार्यक्रमातून कोरोना पोहोचल्याचा अंदाज आहे. मात्र मलेशियात या कार्यक्रमामध्ये कोरोना कसा पोहोचला, याचे उत्तर अजून मिळालेले नाही, मात्र याठिकाणी दक्षिण कोरिया आणि चीनमधील भाविकही आले होते.

पाकिस्तानमध्ये लाहोर येथे तब्लीगी मशिदीमध्ये जमात झाली. १० ते २० मार्चच्या दरम्यान ही जमात झाली होती. या कार्यक्रमाशी संबंधीत २० हजार लोकांना पाकिस्तान सरकारने विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अनेक लोक पाकिस्तानातील विविध प्रांतामधले होते. तसेच अफगानिस्तान, चीन, इंडोनेशिया आणि नायजेरिया या देशांमधलेही होते. या कार्यक्रमाला गेलेले १५४ लोक कोरोनाची लागण झालेले सापडले.

सौदी अरेबियातील मक्का हे मुस्लिम धर्मियांचे प्रसिध्द ठिकाण. कोरोनामुळे इथे परदेशी लोकांना यायला मज्जाव करावा लागला. नंतर धोका अधिक वाढला तशा मशिदी शुक्रवारी होणार्‍या नमाजासाठी सुध्दा बंद करण्यात आल्या. मक्केत एकत्र आलेल्या परदेशियांमध्ये काही लोक पाकिस्तान, अफगानिस्तानचे होते. तर काही लोक कुवेतमधून आलेले होते. इराणमध्ये इमाम अली या मुस्लीमांच्या धार्मिक स्थळालाही टाळेबंद करण्यात आले आहे.

इराण, सौदी अरेबियासकट इतर मध्य पूर्वेतील देश, मलेशिया, इंग्लंड, दक्षिण कोरिया सगळीकडे अशा घटना घडल्या.

अगदी अलिकडे म्हणजे २६ एप्रिलला बांगलादेशातून बातमी आली की राजधानी ढाक्यातील ‘इस्कॉन’चे स्वामिबाग नावाचे मंदीर नुकतेच बंद करण्यात आले आहे. ढाक्यामध्ये अनेक मंदिरे असून, त्याचे व्यवस्थापन ‘इस्कॉन’तर्फे केले जाते, पण हे मंदीर महत्त्वाचे मानले जाते. इथे दरवर्षी जगन्नाथ रथ यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. या मंदिरामध्ये पुजारी, भक्त आणि पदाधिकारी असे १०० लोक राहत होते. त्यातील ३६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी मंदिर बंद केले आहे.

मलेशियातील आणि भारतातील तब्लीगी जमातला उपस्थित असणारे म्हणजे सगळा मुस्लीम समाज नाही. लंडन येथील ‘इस्कॉन’चे सदस्य म्हणजे सगळा हिंदू समुदाय किंवा दक्षिण कोरियातील शिंनचोगंजी चर्चचे सभासद म्हणजे सर्व खिस्चन समाज नाही. थोडक्यात काय तर कोरोनाचा विषाणूची लागण ही ‘या’ जातीच्या किंवा ‘अमुक’ धर्माच्या लोकांमुळे झाली असा समज पसरवणं नक्कीच चुकीचं आहे. जगभरातील घटनांकडे पाहता असे दिसते, की सगळ्या धार्मिक स्थळांमध्ये असे प्रकार घडले आणि कोरोनाच्या संकटात भर पडली. भारतातही दिल्लीमध्ये तब्लीग प्रकरण घडले. जगभरामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरु असतानाही भारतामध्ये तामिळनाडू राज्यातील तिरुमाला मंदिरात मार्च महिन्यात तब्बल साठ हजार यात्रेकरुंनी मंदिराला भेट दिल्याची नोंद आहे. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही कोरोनासंबंधी थर्मल स्क्रिनींग, वेळोवेळी तिर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी आलेल्या भाविकांना सूचना देणे, अशा खबरदार्‍या घेतल्याचे माध्यमांना सांगितले.

या सर्व प्रकरणांचा संबंध लोकांचा धर्मावर असणाऱ्या अवाजवी विश्वासाशी आहे. लोकांना सुचना आणि माहिती देऊनही लोक अशा ठिकाणी जमतात आणि स्वतःसह इतरानाही धोक्यात घालतात. मात्र हे प्रकार सर्वत्र आणि सर्व धर्मांमध्ये आहे. एखाद्या रोगाचा आणि अमुक एका धर्माचा सबंध आहे, असा समज होइल अशा बातम्या देणं किंवा असे ग्रह दृढ होतील अशी वक्तव्य करणं धोकादायक आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सांगताना देश किंवा मीडियाने धर्म, वंशाचा उल्लेख करू नये, असे स्पष्ट निर्देश आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेचे दिले असतानाही मात्र या निर्देशांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून कोरोनाचा राजकारणासाठी आणि आपला धार्मिक अजेंडा पुढे नेण्यासाठी उपयोग केला जात आहे.

दिल्लीमधील धार्मिक दंगली ताज्या असतानाही, आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल यांनी देशात कोविड-१९ रुग्णांची संख्या अमुक अमुक (त्यावेळी १४,३७८) इतकी झाल्याची माहिती दिली. पण ती माहिती देताना इतक्या इतक्या (त्यावेळी ४,२९१) रुग्णांना झालेली कोरोनाची लागण तब्लीगमुळे झाल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. असे उल्लेख झाल्यावर त्याचा परिणाम सामाजिक स्तरावरही दिसू लागतो. अहमदाबादमध्ये शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी असलेल्या बेडची विभागणी धर्मानुसार करण्यात आली. भारतात झारखंड आणि राजस्थानमध्ये मुस्लीम स्त्रियांना वैद्किय सुविधा नाकारण्यात आल्या.

१९०७ च्या प्लेगच्या साथीदरम्यान ब्रिटन आणि अमेरिकेत प्लेगचं खापर भारतातील स्थलांतरित हिंदुंवर फोडण्यात आलं होतं. धर्मावर अवाजवी विश्वास ठेवला, की काय होते, याचा धडा कोरोना काय किंवा प्लेग काय फार पुर्वीपासूनच साथीच्या रोगांनी निर्माण झालेल्या संकटांनी दाखवून दिला आहे, प्रश्न हा आहे, की आपण हा धडा मनावर घेणार आहोत की नाही?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0