तळोजा कारागृहात सागर गोरखेंचे आमरण उपोषण सुरू

तळोजा कारागृहात सागर गोरखेंचे आमरण उपोषण सुरू

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी सागर तात्याराम गोरखे यांनी तळोजा कारागृह प्रशासनाकडून दिली जाणारी अमानवीय वागणूक व जाचाविरोधात आमरण उपोषण

सुधा भारद्वाज यांना जामीन
एल्गार परिषदः नवलखांचा जामीन सुप्रीम कोर्टाने नाकारला
एल्गार केसमधील आरोपींनी लिहिलेल्या पत्रांची अडवणूक

नवी दिल्लीः एल्गार परिषद प्रकरणातील एक आरोपी सागर तात्याराम गोरखे यांनी तळोजा कारागृह प्रशासनाकडून दिली जाणारी अमानवीय वागणूक व जाचाविरोधात आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. गोरखे यांचे आमरण उपोषण २१ मे पासून सुरू झाले असून त्यांनी तळोजा कारागृह प्रशासनाविरोधात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात भीमा-कोरेगाव प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या बंदीवानांना तळोजा कारागृह प्रशासन मानसिक, शारिरीक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. कारागृहाकडून औषधे दिली जात नाहीत, ही औषधे देण्यात मुद्दाम टाळाटाळ केली जाते. आपणाला पाठीचे दुखणे, संधीवात व त्वचा रोग असून त्या संबंधी लागणारी औषधे कारागृह प्रशासनाकडून पुरवली जात नाहीत, कारागृहातले वैद्यकीय अधिकारी तपासणी करत नाहीत, तुरुंगाधिकारी यांचेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संगनमत असून त्यांच्याकडून जाच केला जात असल्याचा आरोप गोरखे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

गोरखे यांनी आपल्या पत्रात काही साथीदारांनाही अशा वागणुकीचा त्रास होत असल्याचा खुलासा केला आहे. यात गौतम नवलखा, रमेश गायचोर, सुधीर ढवळे, महेश राऊत, सुरेंद्र गडलिंग, आनंद तेलतुंबडे व हनी बाबू या सर्वांना काही ना काही शारीरिक व्याधी असून त्यांना वेळेवर औषध उपचार दिले जात नाहीत, त्यांच्याकडे दुखण्यांकडे दुर्लक्ष केले जाते असेही या पत्रात गोरखे यांनी नमूद केले आहे.

कारागृहात येणाऱी पत्रे देण्याआधीच फोडलेली असतात, ही कृती बेकायदा असून आम्ही मागवलेली पुस्तकेही चोरीस जातात. आमची पत्रे बेकायदा पद्धतीने स्कॅनिंग केली जातात, तुरुंगात पाण्याची जाणूनबुजून टंचाई केली जाते. तुरुंग नियमानुसार प्रत्येक आरोपीस १३५ लीटर पाणी मिळण्याचा हक्क आहे पण तळोजा कारागृह प्रशासनाकडून आम्हांस प्रत्येकी १५ लिटरची एक बादली दिली जाते. या पाण्यामध्ये सर्व भागवावे असे सांगितले जाते, असे गोरखे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

गोरखे यांनी नातेवाईकांशी बोलण्यासाठी कारागृह प्रशासन दूरध्वनींचा वापर करू देत नाहीत, असाही आरोप केला आहे. आमच्यावर नक्षलवादी असल्याचे आरोप असले तरी आमच्यावरचे हे आरोप सिद्ध झालेले नाहीत, कोविड काळात दूरध्वनी वापरू दिले जात होते. पण ही सवलत आता बंद करण्यात आली आहे. आमच्या मूलभूत अधिकारांवर कारागृह प्रशासनाकडून जाणूनबुजून अतिक्रमण केले जात असल्याचेही गोरखे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तळोजा कारागृह प्रशासनाच्या बेपर्वाईमुळेच फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला होता, याकडे गोरखे यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0