चित्ता आल्याने बेघर होण्याची गावकऱ्यांमध्ये भीती

चित्ता आल्याने बेघर होण्याची गावकऱ्यांमध्ये भीती

शेओपूर (म. प्रदेश): कुनो राष्ट्रीय अभयारण्यामध्ये आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या चित्त्यांचे स्वागत अत्यंत हर्षोल्हासात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारकडून साजरे केले गेले असले तरी या अभयारण्याच्या नजीकच्या गावांमध्ये आपली जमीन जाईल अशी भीती निर्माण झाली आहे. कुनो राष्ट्रीय अभयारण्यात चित्ते आणल्याने तिथे रोजगार निर्माण होईल, असे चित्र केंद्र सरकार व म. प्रदेश सरकारकडून उभे केले गेले आहे.

शनिवारी मोदींच्या हस्ते नामिबियातून आणलेल्या ७ चित्त्यांपैकी ३ चित्त्यांना जंगलात सोडले गेले. आता या जंगलात चित्ते सोडल्याने अभयारण्याचे क्षेत्रही वाढवण्याच्या हालचाली सुरू होतील अशी भीती आसपासच्या २५ गावांमध्ये पसरली आहे. जी गावे अभयारण्याच्या बाजूला लागून आहेत, तेथे अनेक छोटी हॉटेल व अन्य व्यवसाय वसलेले आहेत. या व्यावसायिक व हॉटेल मालकांना आपली जमीन सरकार ताब्यात घेईल अशी भीती वाटत आहे. गेली १५ वर्षे कुनो राष्ट्रीय अभयारण्यची हद्द वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता प्रत्यक्षात चित्ते आल्याने प्रशासनाकडून व वनखात्याकडे हद्द वाढवण्याचे वेगाने प्रयत्न सुरू होतील अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे.

कुनो राष्ट्रीय अभयारण्याजवळून जाणाऱ्या शेओपूर-शिवपुरी मार्गावर सेसाईपूर गावात राधेश्याम यादव यांचे स्नॅक्स व चहाचे छोटे दुकान आहे. हे गाव कुनो राष्ट्रीय अभयारण्यापासून १५ किमी अंतरावर आहे. या आधीच कुनो नदीवरील धरणाचे काम सुरू असून सेसाईपूर गावांतील काही जमीन सरकारने घेतली आहे. आता हे संपूर्ण गावच हलवण्याची तयारी सुरू झाली आहे, असे यादव सांगतात. या धरणामुळे ५० गावे हलवली जाणार आहेत. या सर्व गावांचा मुख्य संपर्क सेसाईपूरशी आहे. ही सर्व गावे हलवल्यानंतर सेसाईपूर गावाचे काय होईल अशी भीती रामकुमार गुर्जर व्यक्त करतात.

चित्ता आल्याने आता कुनो परिसरात हॉटेल व्यवसायाला गती मिळणार आहे, पर्यटकांची संख्या वेगाने वाढत जाणार आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला लागणारे मनुष्यबळ आसपासच्या गावातून मिळेल असे गुर्जर यांचे म्हणणे आहे.

अन्य एक ग्रामस्थ संतोष गुर्जर यांना सर्व व्यवस्था कोलमडून पडेल असे वाटते. धर्मेंद्र कुमार ओझा हे कापडाचे दुकान चालवतात. त्यांना चित्ता गावात येईल अशी भीती वाटते. आम्हाला चित्ता आणल्याने काय फायदा होणार, असा सवाल ते करतात. बाहेरचे लोक येऊन जमिनी विकत घेतील, तेथे हॉटेल, रेस्तराँ उभे करतील याचा परिणाम येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल असे ओझा यांचे म्हणणे आहे.

चहा विकणारे सुरत सिंग यादव यांच्या मते येथील जंगलात चित्ता आणल्याने रोजगाराची संधी वाढेल. जागेच्या किंमती वाढतील. पण याचे भविष्य काय असेल ते सांगता येत नाही असे ते म्हणतात.

कुना अभयारण्यापासून २ किमी अंतरावर असलेल्या तिकतोली गावांतले एक दुकानदार केशव शर्मा यांना चित्ता आणल्याने धंद्यात वेगाने वाढ होईल, असे वाटते. तर मजुरीचे काम करणारे कैलाश यांना चित्ता आणल्याने आम्ही कुठे जाणार, अशी भीती वाटत आहे.

मूळ वृत्त

COMMENTS